शनिवार, २३ एप्रिल, २०२२

सोसायटीचे राजकारण

 कथा क्र. ३ सोसायटीचे राजकारण

लेखक : निशिकांत हारुगले

एम. ए. बी.एड.




राजकारण व ग्रामीण भाग यांचं नात एकमेकांशी जुळलेले आहे. त्यात ग्रामपंचायतीच किंवा सोसायटीचे राजकारण ते काही वेगळेच असते. रोज एकमेकांबरोबर जेवण वाटून खाणारे लोक देखील टोणके घेऊन भांडताना दिसतात.

वेदगंगेच्या खोऱ्यात पेठेच्या हद्दीत अनेक वाड्या वस्त्या पाहायला मिळतात. हिरव्या गर्द झाडीत वसलेल्या या घरांचे रुप जरी कौलारू आसले तरी खाऊन पिऊन हे लोक सुखी असणारे पहावयास मिळतात.

एकमेकाला मदत करीत असताना एकमेकांवर कुरघोडी करण्यास देखील हे लोक पटाईत असतात. अशाच एका गावात घडलेली एक कथा आहे. पेठच्या हद्दीत वाडीची अनेक गावे होती. असेच एक वाडीच गाव उंच डोंगरमाथ्यावर वसलेलं नदीचं पाणी काही यांच्या भाग्यात नाही. अशा या गावात एक सोसायटी होती.त्या सोसायटीचे नाव होते लिंगराज सोसायटी होते.

सोसायटीतून वाडीतील लोकांना खते व बियाणे, कर्जे मिळत असत. त्यामुळे अनेक लोकांना सोसायटी म्हणजे गरजा भागवणार साधनच होत.

अशी ही सोसायटी शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज देत असे. पण मिटिंगला दोन गटात वाद विवाद होत, मात्र आतल्या आत मिटत असतं.

ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं. मतदान झाल्यापासून गावात चांगलीच दूफळी माजली होती.

धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात सोसायटीच्या बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की धनाजीनं अबाजीच्या विरुद्ध शड्डू ठोकला. व म्हणाला, “ बघतोच तुला लई नाटक चाललेत डेव्हिडंटवर सुद्धा टपून बसलास व्हय रं बोक्या, गोरगरिबांचा श्राफ घेशील. म्हणे इमारत फंडासाठी कट केलाय. ही इमारत काय बाद हाय. चांगली शंभर वर्षे अजून टिकल. मला माहित आहे. तुझ्या पोराच्या लग्नाचा खर्च वसूल करतोस व्हय यातनं, लई जड जाईल तुला, जर खर्च वाचवायचा होता तर गडच्या देवापुढे लगीन लावायचा होतास. वरात काढून गावात टेंभा मिरवून दाखवतोस काय.”

असे म्हंटल्यावर आबाजी पाटील चिडला व म्हणाला, “माझ्या पोराचं लगीन झालेलं बघवत नाही तुला. नाहीतर वरातीच्या रात्री दार बंद करून बसला नसतास. व सोसायटीच्या पैशान लगीन करायला मी काय भिकारी नाय माझ्याच पैशावर लगीन केलय मी माझ्या पोराचं. जरा इमारत वाढवावी म्हणून डेव्हिडंट काय कापला. तर तुझ काय जळतंय टकुर. उगाच लागलय भांडायला.”

तेव्हा धना सलगर म्हणाला, “ पाटील तुमची पाटीलकी त्या आंगठे बहादुरांपुढे दाखवा. मला नको, ते काय माहित नाही, आम्हाला संचालक मंडळाचा निर्णय मान्य नाही. आता चार महिन्यानी संचालक मंडळाची मुदत संपतीया. तेव्हा नवीन मतदान घेऊन संचालक मंडळाची बॉडी निवडायची .” असं बोलून तो मिटिंगमधून बाहेर पडला.

बघता बघता सोसायटीच्या मिटिंगची बातमी संपूर्ण गावात पसरली. व गावातील वातावरण तापायला लागलं. जो तो उठला सुटला याच विषयावर चर्चा करू लागला.

गावातील पारापासून ते नाव्ह्याच्या दुकानापर्यंत सगळीकडे हीच चर्चा सुरू झाली. गावातील मध्यवस्तीत देवळाजवळ दामाजी नाव्ह्याचे दुकान होते. दामाजी व आबाजी बालपणापासूनचे मैत्रर होते. त्यामुळे दामाला कर्ज देण्यासाठी आबाजीने मदत केली होती. त्या कर्जाच्या जीवावर त्याने दोन म्हैशी विकत घेतल्या होत्या. त्यामुळं तो आबाजीची बाजू उचलण्यास तयार होता.

गावात ज्या सफाईदारपणे वस्तरा चालवत असे. त्याप्रमाणे त्याचे तोंड ही चालवत असे. अंगान धिप्पाड रंगानं सावळा असा झूपकेदार मिशांचा हा न्हावी, त्याच्या दुकानात नेहमी गर्दी असायची. त्यामुळे त्याला दिवसभरात मिळाली तर दुपारची उसंत नाहीतर नाही.

अशा या नाव्ह्याच्या दुकानात गर्दी जमली होती. दामाजी व त्याने ठेवलेला पोऱ्या गिऱ्हाईकाची हजामत करत होते. इतक्यात तिथं बाबू ढलप्याच पोर आलं. त्याला गावातील बातमीपत्र म्हणत.

ते म्हणाल, “ सोसायटीत भांडणं झाल्यात धनाजी सलगर व आबाजी पाटील यांच्यात बाचाबाची झाली. इलेक्शन लागणार हाय म्हणत्यात.”

हे ऐकताच दामाचा वस्तरा थांबला. व तो म्हणाला, “ या धन्याचा आधून मधून लई किडा उठतोया. का त्या आबाच्या पाठी लागलाय कुणास ठाऊक. मुंबईचा पैसा मिळवला आता देव खाऊ देईना वाटतं. म्हणून हे धंदे करतोय. जा म्हणावं, माझा वस्तरा घे, व गावच्या ओढ्यावर जाऊन काम धंदा नसलं तर गावच्या म्हशी भादर म्हणावं.”

पण दाढी करून घेणाऱ्या आशा ढेकळ्याच्या पोराला त्याच बोलण रूचल नाही. ते म्हणाल, “ तुझ्या का पोटात चावतया. त्या दोघांचा वाद तुझी तू भादर की लेका.”

 तेव्हा दामाजी म्हणाला, “ तुझ्या सारखा मी नाही गरज सरो आणि वैद्य मरो. गावात एक पाण्याचा ठीबुस नव्हता. तेव्हा आबा पाटलांनी डोंगरातून झिरपीच पाणी आणलं. तवा कुठे होता तुझा धना सलगर. उगाच तोंड वाजू नको माझं.”असे म्हणत त्याने हजमतीला सुरुवात केली. गावात चौका चौकात लोकांच्या गप्पा चालू झाल्या. चौकातील पारावर गावातील अनेक लोक बसायला येत.

 त्यांच्या इकडल्या तिकडल्या गप्पा चालत. त्यात तरणी व म्हातारी सरमिसळ असत.

तरण्या पोरांना धना सलगर आवडत असे. ती धनाजीच्या बाजूने बोलत असत. म्हातारी मात्र आबाजी पाटील चांगला म्हणू लागली. तिथं बसलेला गजाबाईचा म्हातारा चाचपडत बोलला, “अबा पाटलानं गावचा बराच विकास केला आहे. ह्यो धना काय कालपरवाच पोर ते, त्याच काय एकायच काल परवाच पोर ते,गावात गावदेवीच देऊळ आबानच बांधल नव्हं.”

इतक्यात ईराचा भालू म्हणाला, “ तर देऊळ बांधल, ठाव हाय आम्हाला, देवळाला देणगी गोळा करताना आमच्या तंगड्या तुटल्या, देऊळ बांधून उरलेल्या पैशातून यान ट्रॅक्टर घेतला.म्हणतात ना तळे राखी तो पाणी चाखी.”

इतक्यात तुकाराम भुईकर म्हणाला, “ त्याने देवळाच्या पैशाने ट्रॅक्टर घेतला म्हणतोस जसा काय तुझ्या पुढ्यात घेतल्यासारखे बोलतोस की. आ उगाच लागलाय त्याच्या नावानं खड फोडायला. जरी तेन ट्रॅक्टर घेतला तरी त्याने गावचा विकास केलाय. गावात रस्ता करताना त्याचा ट्रॅक्टर नुसता डिझेलवर वापरल्यासा मला काय माहीत नाही व्हय. तुम्ही आज कालची शिपूर्डी पोर, नाव ठेवत्यासा म्हणून आम्ही नाही सोडणार तेला.”

त्याच हे बोलण एकूण संजू मास्तर म्हणाला, “तर तुला काय वाटणी दिली वाटत तवा तेची बाजू घेऊन बोलतोस व्हय. ते काय नाही नविन पक्ष नवी शाई.”

मास्तरच बोलण तोडत तुकाराम भूईकर म्हणाला, “ हे बघा गुरुजी ती तुमची नवी शाई तुम्हालाच लखलाभ असुदेत. राजकारण म्हणजे अरळगुंडीच्या शाळेतील शेंबडी पोर शिकविण नव्ह, तुम्ही जावा शाळा शिकवा. बे एके बे व बांगडा भाजून दे.”

तुकारामच बोलण मास्तरला झोंबले तो म्हणाला, “ तुला तुझ एक घरातलं कारट सांभाळता येईना. व मला तू शिकवू नको शाळा सांभाळायला. मी मस्त घट्ट हाय शाळा सांभाळायला. तुमच्यात जर हिम्मत असेल तर या शाळेत शंभर तऱ्हेची शंभर पोर. सांभाळून दाखवा की मग बोला.पोर सांभाळन म्हणजे शेतात नांगर हाकन नव्हं.तुमच्यासारखी आम्ही कुतायची काम करत नाही.बुद्धीची करताव बुध्दीची.”

तवा तुकाराम चिडला व म्हणाला, “ शाळेतली पोरं राहुदेत आधी भांडून गेलेली बायको आण जा माहेरासन.” तेव्हा मास्तर चिडला व म्हणाला, “ तुक्या लई बोलतोस, जास्त बोलशील तर थोबाड फोडीन तुझं.”

यांचं बोलण पारावर बसलेला मारुती पाटील ऐकत होता. तो म्हणाला, “त्यांचं राजकारण आणि तुम्ही कशाला भांडता. सोडा तो विषय.”

तेव्हा ती दोघं शांत झाली.

सोसायटीचे राजकारण चांगलेच रंग दाखवायला लागले होते. याची व्याप्ती चौकापासून पाणवठ्यापर्यंत झाली नाहीतर नवल म्हणायचे. गावात आणलेलं डोंगरातील पाण्याची दोन ठिकाणी कनेक्शन दिली होती. एक ग्रामपंचायतीच्या दारात व दुसरे देवळाजवळ. देवळाच्या दारातील नळाला मोठे पाणी पडत असल्याने व ते ठिकाण भर वस्तीत असल्याने तिथे खूप गर्दी जमत असे.

उन्हाळ्याच्या दिवसात म्हातारीच्या वड्याचे पाणी आटल्याने . देवळाजवळ असलेल्या नळाला वाघझरीचं पाणी यायचं ते ही बारीक झिरपीच ते थोडे फार मिळत असे. अनेक बाया पाणी भरायला तिथे जमत असत. सुताराची सगुणा व माळ्याची कंबळी पाणी भरायला आली होती. सगुनाचे केस कायम विस्कटलेले असत. त्यामुळे गावातील बायका तिला सूताराची झिप्री म्हणून हाक मारत. सगुणा ही आबा पाटलाच्या गोटातील कारण आबाची बायको सरवड्याची होती. या दोघी एकाच गावच्या होत्या. तर माळ्याची सगुणा व धना सलगराची बायको जिगरी मैत्रिणी.

सगुणा कंबळीकड बघत म्हणाली, “ लई तोरा गाजवत्यात त्या धनां सलगराचा, आता जावा म्हणावं त्यासनी पाण्याला नदीला. कशाला इथे कलमडल्यात त्या आबा पाटलान पाणी आणल म्हणून पित्यासा. नाहीतर या गावात कुठं पाणी मिळालं असतं.”

सगुनेच बोलणं कंबळीला झोंबल होत. पण ती गप्प बसली. व आपली घागर पाणी भरायला तिने पुढे ढकलली.

तशी सगुणा म्हणाली, “ ये जरा थांब, एवढी कळशी घेतो आधी.”

कंबळी म्हणाली, “ माझी घागर आधी हाय मी पाणी आगोदर घेणार.”

तेव्हा सगुणा म्हणाली, “ लई पाणी पाणी करत्यासा, एवढी तहान लागली असल तर सांगा जावा त्या धना सलगराला गावात नवीन नळ बसव म्हणावं.”

तेव्हा कंबळी चिडली व म्हणाली, “ ए झिप्रे लई बोलतीस तुझे सगळे दात घशात घालून टाकीन बघ. मगाठावनं गुमान ऐकूण घेते म्हणून लईच बोलतीयास की, लई आबा पाटलाचं कौतिक सांगतीय. तो काय घर चालवतोय का तुझं. मघाठावन माझ्या नावानं खड फोडतीस व पाणी आबा पाटलांनी आणल म्हणायला गावातील बाकीची माणसं कुठं भाद्रायला गेलतीत का, उगाच तोंडाला तोंड देतिया नुसती. आमचा म्हातारा पण होता चर खोदायला. तुझ्या आबा पाटलान एकट्यानेच पाणी आणल्या सारखं बोलू नकोस. जा घरला खरकटी भांडी घास जा.” असे म्हंटल्यावर सुगंधीला राग आला. ती म्हणाली, “ तुझ्या जीवावर ठेवायला नाहीत मी भांडी, एकच कळशी घेतो म्हंटलं नव्हं, जरा मोठ बारक काही कळतं की नाही.”

तेव्हा कंबळा म्हणाली, “ म्हणूनच मगाठावनं गप्प होते. पण मोठ्या म्हशीनी पण आपली शिंगं लई दाखवू नये.” कंबळीच्या बोलण्याने सुगंधा चिडली. व कंबळीवर घागर घेऊन धावून मारायला आली. दोघींची भांडणे सोडवता सोडवता इतरांची दमछाक झाली. शेवटी इतर बायकांनी त्याना कसंबसं शांत केलं.

बघता बघता सोसायटीची इलेक्शन लागली. आबा पाटील व धना सलगर यांनी पण अर्ज दाखल केले. दोन पॅनेल मध्ये इलेक्शन होणार होती. गावात प्रचाराचा जोर चढला. आबा पाटलाच्या पॅनेलला पतंग तर धना सलगरला विमान असे चिन्ह देऊन इलेक्शन जाहीर झाली.

गावात प्रचार वाढला होता. जागोजागी पोस्टरं लावण्यात आली होती. निवडणूक लावलेल्यांच दिवाळ निघत होत. पण गावातील दारु पिणारी मात्र चैनीत होती. मांगाचा विलास हा गावातील अट्टल दारुडा होता. तो सकाळी एकाकडे तर संध्याकाळी दुसऱ्याकडे दारुसाठी नको ते धंदे करायला तयार होता. सोसायटीच्या इलेक्शनने त्याची तर चांदीच उसळली होती. फक्त नेत्यांच्या मागणं जयजयकार करत फिरायच होत. ते करत दारूच्या इतक्या बाटल्या घरात जमल्या की एखाद दारूचं दुकान निघालं असतं.

असा हा विलास धडपडत आबाजी पाटलाच्या प्रचारफेरीत दाखल झाला. व त्याने आबाजीच्या पोराकड दारूला पैसे मागितले. जवळच पवारांचा नंदन उभा होता. तो म्हणाला, “ विलासदा तुझ आपल बरं चाललय की सकाळी धनबाकड व रातीला आबाकड, दोन्ही बाजूंनी हलगी वाजवतोयस की.”

तेव्हा विलास म्हणाला, “ तू गप्प रे, जास्त बोलायचं काम नाही. मी आबांचा माणूस हाय धनबाकड जातोय म्हणजे फितुरांची माहिती काढायला.”

तेव्हा नंदू म्हणाला, “ हे बघ दारुसाठी तू शेण बी खाशील. मला तुझ्या नादाला लागायचं नाही.तुझी बायको चांगली म्हणून म्हणतोय. बिचारी खूप राबती, आणि ह्यो रेडा मुतू पिऊन धिंगाणा घालतोय.” असे बोलून नंदू तिथून निघून गेला. विलासने आबाच्या पोराकडून पैसे घेतले व तो दारुच्याअड्याच्या दिशेनं चालू लागला.

अशा या सोसायटीची इलेक्शन चांगली रंगात आली होती. घरोघरी कवा वटसावित्रीला हळदकुंकू न लावणाऱ्या बायका पण हळदीकुंकू कार्यक्रमाला हजर राहत होत्या. मटणाच्या पार्ट्या रंगात आल्या होत्या.

मतदानाचा दिवस उजाडला. मतदान सुरू झाले. 



पोलिस बंदोबस्तात मतदान पार पडले. त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार होती. दोन्ही बाजूचे दोन उमेदवार तिथे बसले होते. मोजणी सुरू झाली. निकाल लागलं तशी दोन्ही गोटात चळबळ सुरू झाली.

धना सलगर नवखा उमेदवार असल्याने त्याच्या बाजूने कमी मतदान पडते असं वाटल्यावर धनानं आपल्या गोटातील दोन पैलवानांना खालच्या कोटीतील मतपेट्या पळवण्यास सांगितल्या. तसे त्यांनी कोठीच्या मागच्या बाजूची खिडकी पेचून त्यातील एक पेटी पळवली. ती पळवून नेताना एका लहान मुलाने बघितली. ते पोरग सरळ दामा नाव्ह्याजवळ आलं. व म्हणाल, “ दामुअण्णा विरूद्ध पार्टीनं खालच्या कोटितल्या मतपेट्या पळवल्या.”

तसा दामूनं आपला टॉवेल खांद्यावर टाकला. व त्या पोरग्यास विचारले, “ कोणत्या दिशेला गेल्यात.”

तेव्हा वताडाच्या दिशेला बोट करत ते म्हणालं, “ त्या बाजूला गेल्यात.”

दामा त्या दिशेनं पळाला त्यानं पंधरा मिनिटात त्यांना गाठलं. व म्हणाला, “ कुठं पळत्यासा चोरांनो, तुमची आई बाळत झालीय काय ते भेट घेऊन निघाल्यासा. गाढवानो थांबा.”

तेंव्हा त्यातील गुंड्यान दामाला ढकलले व म्हणाला, “ ह्यो नाव्ही लई तोंड चालवतोय याला धरून बडवायचाच. असे म्हणून त्यांनी पेटी बाजूला ठेवून दामला धरला व बडवायला लागलीत. दामा कसा बसा त्यांच्या तावडीतून निसटला. व आपला रुमाल फिरवून गुंड्याला मारला. रुमालाचा एक जोराचा दणका बसला. तसा गुंड्या आई गो, मेलो मेलो, असं ओरडायला लागला. दरम्यान गुंड्या व दुसऱ्या मेंबरला टॉवेलान चांगलाच चेचला. तसं ती हाबकली व म्हणाली, की टॉवेल लागतोय काय बांधले त्यात या नाव्ह्यान देवास ठावं.

इतक्यात धना सलगरची आणखी पाच सहा मानसं आलीत. त्यानी दगड मारायला सुरुवात केली. तस दामान पण नेम धरुन दोघा तिघांची टकुरी फोडलीत. तसा एक जण काठी घेऊन धावून आला. तस दामाने वार चुकवला. व टॉवलाचा एक सोगा फिरवून मारला दणक्यात तो गडी गार झाला. व दाडवान धरून बसला.त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या. येईल त्याला तो टॉवेलाने बडवत होता.

एकजण म्हणाला, “ आर यांच्याजवळ ना दगड ना काठी फक्त टॉवेल फिरवून यांन चेचल. अस काय हाय याच्या जवळ.”

पण इतका वेळ कुणाजवळ नव्हता. इतक्यात पोलिस आले. त्यानी पेट्या ताब्यात घेतल्या. पण कोणी पेट्या पळवल्या म्हंटल्यावर जो तो एकमेकाकडे बघू लागला. शेवटी सामोपचाराने मिटवायच ठरलं.

पेट्या पुन्हा गावात आणल्या. मोजणी पूर्ण झाली.पुन्हा आबाच पॅनल निवडून आले. तरी देखील धना सलगरच्या काही शिटा निवडून आल्या. त्यामूळे इथून पुढे प्रत्येक सभा सोसायटीची गाजणार हे सिद्ध झालं.

जखमी सर्वांना तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये गारगोटीला आणण्यात आलं. त्यांवर उपचार सुरू झाले. दामजीला पण चांगलच लागलं होत. त्याला देखील मलमपट्टी केली होती.

नर्सबाई मुद्दाम बेंजोईनचे औषधं टाकत होती. ताज्या जखमेवर बेंजोईन पडल्यावर जोरात कळ यायची. तेव्हा नर्स म्हणायची, “मारामारी करतांना लई गॉड वाटतं नव्ह. मग आता सहन करायचं. उगाच कालवा करायचा नाही. बाकीचे पेशंट डिस्टर्ब होता येत. उगाच पुंगी वाजवू नका तोंडाची. नाहीतर जखमा कात्रिन कुर्दरिन.”

मुकाट्यानं कळ सोसण्याशीवाय त्यांजवळ गत्यंतर नव्हते.

सोसायटीच्या राजकारणापेक्षा दामाच्या करामतीचीच जिकड तिकड चर्चा ऐकायला मिळत होत्या. गारगोटीचे सरकारी दवाखान्यातून दामाजीला आबाजी मलमपट्टी करून घेऊन आला होता. दवाखान्यातून बाहेर पडताना धना सलगर गुंड्याला घेऊन आत चालला होता. गुंड्या दामाजीला बघताच म्हणाला, “ तुला दावतोच.”

तेव्हा दामा म्हणाला, “ ये दाखवायचं ते इथच दाव, अजून मस्ती गेली नाही वाटत. मार विसरलास काय. जा आत तुझी आई बसलीय औषध लावायला. दोन थेंब पडल बेंजॉइंच की गारगार वाटतंय जा तोंड घेऊन. ”

असं म्हणून ती दोघं घराकड चालली. व गुंड्याला धना दवाखान्यात घेऊन गेला. गावात जिकडे तिकडे दामाचीच चर्चा सुरू होती. की दामानं पराक्रम केला.

आबा पाटलाने दामाचा सत्कार केला. सत्कारात दामाचे कौतुक करताना पाटील म्हणाले, “ शिवाजी महाराजांच्या काळात जशी घोडखिंड बाजीप्रभुनी लढवली. तशी आपल्या दामान वताडाची खिंड लढवून धनाजी सारख्या मातबबर शत्रूला खडे चारले. दामाजिने केलेलं हे कार्य अतुलनीय आहे.”

सत्कार झाल्यावर दामा घरी आला. दामाच्या बायकोन दामा घरी आल्यावर दामाला ओवाळले व घरात घेतले. व त्याला गोडधोड जेवण घातले.

जेवता जेवता दामा म्हणाला, “ आज नव्हर्याच लई कवतिक चाललय.”

तेव्हा दामाची बायको म्हणाली, “ सगळ्या गावात नाव गाजवल्यासा सात आठ जणांना टॉवेलाच्या फटक्यात लोळवल्यासा, मग कवतिक कराय नको का.”

असे म्हंटल्यावर दामा म्हणाला, “ म्हणून सगळ केलस व्हय.”

“नुसत्या रुमालाने कस लोळवलत तुम्ही?” दामाची बायको बोलली.

तेव्हा दामू म्हणाला, “ आग, तुला गंमत माहीत नाही नुसत्या टॉवेलने मी त्यांना लोळवल नाही. तर जाताना रस्त्यावरले खडीकरणाचे दोन बारके दगड त्यात लपवले होते. व फिरवलं तसं ते लई जोरात लागायचे. अशा प्रकारे मी त्यांचा फज्जा उडवला. मला तो गुंड्या म्हणत होता नुसतं तोंड चालवता येते. तवा आता तेलां कळल आसल तोंड, वस्त्रारा व टॉवेलपणं चालवता येतोय मला ते.”

तेव्हा ती दोघं खो खो हसायला लागली . अशा प्रकारे सोसायटीचे राजकारण झाल. कुठं हसू तर कुठं रडू फुटलं.

लेखक : निशिकांत हारुगले

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

म्हशीचे दात

 llम्हशीचे दात ll


लेखक : निशिकांत हारुगले.

                               एम. ए. बी. एड.

                                                गाव :  पुष्पनगर



तांब्याच्या वाडीची वेदगंगा भुदरगडाच्या पायथ्याला नांदते. तिच्या काठावर वसलेले पेठच गाव होते. तिथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीचा होता. घर संसार म्हटलं तर खर्च आलाच. शेतीतील उत्पन्नावर भागवणे अवघडच. चार सहा महिन्याचा पावसाळा सरला की शेतातून मिळणारे तांदळाचे चार दाणे, व बांधाला लागलेल्या वरण्या- जगदाल्याच्या शेंगा, हा काय तो चरितार्थ, कधी पीठलं कधी मासळी असे खाद्य ते खात व सणाला केलेली पुरणपोळी हेच काय ते जेवण, या बाहेर हॉटेलचे चमचमीत काय ठाऊकच नाही.

शेतातील उत्पन्नास पाळलेल्या गाई, म्हशीच्या दुधाची काय ती जोड असायची. गोकुळचा संघ झाला. त्यामुळं फुकट पासरी जाणार दूध जरा त्याला भाव यायला लागला. त्यामुळे लोकांची चलती झाली. व साध्या खापराच्या घरावर बेंगलोरी कौलारू झालर चढली. अशा या पेठेत गणपत राहत होता. पण त्याला बारशात कोणतरी गणपतराव म्हटलं असल. नाहीतर रोज त्याला गण्या शिवाय हाक मारली नाय तर शपथ. असा हा गणा मोठा झाल्यावर त्याचं लग्न ठरवायला लागले. घरची परिस्थिती बेताचीच होती. यामुळे कोणी पोरगी देईना. सगळे म्हणत. “ हाच भिकारी पोरीला काय सुख लावणार.”

आपल्या घरात खायला काही नसना पण नवऱ्याच्या घरात पोरगी सुखात रहावी ही प्रत्येक बापाची अपेक्षा असते.

गणाचं काही केल्या लग्न जमत नव्हते. म्हणून गणाच्या बापानं घरात कणग्यांची रांग लावली. व त्यामधे लाकडाचा भुसा व कोंडा भरला. व वरती भाताचे चार दाणे पसरले व लिंपण घातले. कोकणातल्या लोकांना याचे कारणामे माहित असलेने, त्याने देश मुलखात पोरी लग्नासाठी बघायला सुरवात केली. लग्न होत नसल्याने गणा मात्र रडायच्या घाईला आला होता. त्याच्या वर्गातील त्याचे जुने मित्र मात्र चिडवत होते, ते म्हणत, “ गणा तुझ्या नशिबात देवाकडे विमानावरून जाणं काय लिहिलं नाही वाटत, घोंगड्यातून जाशील.”

तेव्हा गणा चिडून त्यांना म्हणे,

“ तुमची मढी जाऊ देत तिरडी वरून, मी काय बिन लग्नाचा मरणार नाही. जर का कुणी मुलगी दिली नाहीतर एखादी पळवूनच आणीन, बघाच तुम्ही.”

गणाची ही अवस्था त्याच्या आत्तिला बघवत नसे. तिने आपल्या लांबच्या निपाणीतील पाहुण्यातली एक मुलगी स्थळ म्हणून काढली. मुलीचा बाप जातीचा हेड्या पण त्याला म्हशीतील जेवढं जमे त्यापेक्षा लग्नातील काहीच जमत नसे. भेटीगाठी झाल्या, एकदाचं लग्न ठरलं. दोन्ही घरची परिस्थिती गरीब असलेने लाखेचं मंगळसूत्र घालून कसबस गणाचं लग्न पार पडलं. व गणाचा संसार सुरू झाला. थोड्या दिवसात नव्या सुनेला कणगीतल्या भाताची गंमत कळाली. व तिने भांडण काढले.

 व म्हणाली, “ बरे आहात की बाप- लेक आम्हाला घरात धान्य भरपूर आहे शेत आहे. म्हणून फसवलत नव्ह. केसा न गळा कापला माझा. कणगीत कोंडा भरला व सांगतात भात आहे म्हणून.”

असे बोलून गणाच्या बायकोन घर चांगलच डोक्यावर घेतलं होत. गणाची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती. “ आग गप बसं भावकित अब्रू घालवू नकोस म्हणून. मी तुझ्या पाया पडते ग.”

असे म्हणून देखील तिने दोन दिवस घर डोक्यावर घेतले. व दोन दिवसांनी ती आपल बोचक गुंडाळून माहेरी निघून गेली. सगळे गणाला चीडवाय लागले. “ गण्याची बायको पळाली. अग ग.”

 गणला तर लग्न करूनच चुकलं की काय असं वाटायला लागलं. दोन दिवस झालं मुलीचा बाप त्या पोरीला घेऊन आला. सगळे आश्चर्यानं तिच्याकडे बघत होते. कालपर्यंत नाव ठेवणारी सुगंधा पाटलीन गणाच्या बायकोला न रहावून म्हणाली, “ काय ग रखमा नांदण टाकून गेलतीस नव्हं, आणि दोन दिवसात परत आलीस व्हय ग.”

आधीच राग त्यात ही सुगंधा असं म्हणत्याले ऐकूण ती फाडकण तिला म्हणाली, “नांदण टाकून जायला मी बाजार बुणगी नव्हं, जातिवंताचीच आहे. जर माहेराला गेले नसते. तर ह्यो हेडया बा आला असता काय माझी संसाराची घडी नीट बसवायला. जशी यानं मला दिली तशी माझी नीट व्यवस्था लावू देत.”

असे म्हणून ती घराकडे गेली. घरात आल्यावर तिच्या बापाने गणाला व त्याच्या घरातल्यासणी फैलावर घेतले. थोड्या वेळाने त्यानं बघितलं घरात म्हस देखील नाही.

तेव्हा त्यानं सांगितलं घरात काय थोड पैसे आहेत काय. तर गणा म्हणाला, “ लग्नात सगळे संपले.”

तेव्हा त्याची लेक रखमा म्हणाली, “माझ्या घरातील पैसे घेऊन मलाच म्हैस घेऊन द्यायला बोलवलं नाही. बाबा तूच दे. तुझे पैसे घालून.”

तेंव्हा तो म्हणाला, “ माझीच लेक नव्हं, कशी शब्दात गावल. तवा उद्या शुक्रवार हाय कोकन्या कडगावचा बाजार हाय. तेव्हा जावईबापू तुम्ही या तिथं बघू एखादी म्हैस.”

असे म्हणून त्यानं चहा घेतला व त्यो गेला. गणाची बायको घरातल्या कामाला लागली. तिनं नवऱ्याला गोठा तयार करायला सांगितला.सासू व सासऱ्याला सांगितले आता गप्प बसून चालत नाही. उठा कामाला लागा.

दुसरा दिवस उजाडला. गणाच्या बायको रखमान चांगल्या चार पाच भाकऱ्या व पिठल केलं. व शिदोरी बांधून गणाच्या हातात टेकवली. व त्याला कडगावची वाट धरायला सांगितलं. रखमानं दिलेल्या शिदोरीची पिशवी घेऊन तो जायला निघाला. 

नदीच्या वाटेनं पुढे वाडीचा पुल पार केला. व शेणगाव गाठलं. दत्ताच्या पाया पडला. नंतर कुंभारवाड्यावर गेल्यावर त्यानं मिळेल त्या वाहनाला हात दाखवत तो कडगावच्या पेठत पोहोचला. तोपर्यंत चांगलीच उन्ह चढली होती. घामाच्या धारा अंगावरून चांगल्याच निथळत होत्या. 

तो कसा बसा जनावरांच्या बाजारात आला. व मामा कुठं दिसतोय का ते पाहू लागला. तर त्याला सासरेबुवा एका टेम्पोत म्हैस चढवत्याला दिसला. आपलं काम आटोपल्यावर मामा गणाजवळ आला. दोघेही सावलीत एका झाडाखाली जाऊन बसली. खूप भूक लागली होती. दोघांनी शिदोरी सोडली. व चांगलाच ताव पीठल भाकरीवर मारला. जेवताना सासरेबुवा म्हणाले, “ काय गणपतराव थोडे फार पैसे आणलेत काय.”

गणा म्हणाला, “ बायकोन फक्त येस्टीपूरत दिल्यात. व म्हणाली चांगली म्हैस घेऊन द्या म्हणावं.”

तेव्हा रखमाचा बा म्हणाला, “ शेवटी निपाणीचीच ना, व्यवहाराला ऐकलं तर खरं.”

रखमाच्या बापानं बाजारातील ओळखिण इकडल तिकडल पैसे जमवलं. व बाजारात आलेल्या म्हैशीतिल एक थकीव रेडी जी नुकतीच व्याली होती ती निवडली.

 गणाचा सासरा गणाला म्हणाला, “काय जावई पसंत आहे का रेडकी.”

गणा, “ मला यातल काय कळतंय,तुम्हीच बघा.”

असे म्हंटल्यावर त्याने त्या म्हैशीच्या मालकास घोळात घेतले. व दुसऱ्या हेड्याला घेऊन मध्यस्ती केली. व म्हशीचा दर काढला. म्हैशीचा मालक पाटगाव कडला होता.

 तो म्हणाला, “पाच हजार रुपये देत असशीला तर सोगा धर. नाहीतर पुढे जा.”

गणाच्या सासऱ्याने म्हैशीच्या कितीतरी खोड्या काढल्या. तरी त्याचं वाक्य ठरलेलं, एक पाई कमी करणार नाही. शेवटी गणाच्या सासऱ्यानं बाजारात हेडेगिरी करून आणखी पैसे कमवून व बाजारातील ओळखीचे लोकांकडून घेऊन एकदाची ती म्हैस गणाला घेऊन दिली. म्हैस घेऊन दिल्यावर गणाचा सासरा गणाला म्हणाला, “ बघ गणा आता म्हैस दिली आता तू व तुझ नशीब. कोकणातल्या रेड्या आपल्या भागात दुधाला सुटतात. पुढे दोन तीन येत खाल्यावर मुरगूडच्या किंवा निपाणीच्या बाजारात खपवूया आपण.”

असे म्हंटल्यावर गणा खुश झाला. त्यानं म्हैस घेतली. व गावच्या वाटेला लागला. नदीच्या वाटेनं म्हैस घेऊन तो निघाला. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देता देता तोंडाला फेस यायची पाळी आली.

कसा बसा तो शेणगावात आला. नदीचं पाणी कमी होत. त्यानं नदीच्या वाटेनं गाव गाठलं. कसा बसा वेशीत आला. संध्याकाळ झाली होती. पवारांची कमळा शेण टाकायला निघाली होती. गणा म्हैशीसंग येत्याला तीनं बघितलं.

 हासली व म्हणाली, “ काय र गणा हे काय म्हणायचं,”

गणा म्हणाला, “ मामान म्हस दिलीय. ती घेऊन आलोय.”

म्हैस बघितल्यावर ती म्हणाली, “ आर तिच्या अंगात हाडतरी हाईत काय, व ही काय दूध द्यायची.केवढ्याला घेतली र..”

तेव्हा गणू म्हणाला, “ पाच हजाराला.”

तेव्हा कमळी डोक्यावर हात मारत म्हणाली, “ आता पाच हजार टाचण्या मारून कापसाचे बोळे लाव. व वरती दूर पांघर तवा दिसेल जरा गबगबित म्हशीवाणी.फसला ग बाई.”

असे म्हणून ती शेण टाकायला गेली. गणान कशीबशी ती म्हस् धडपडत घरापर्यंत आणली. . रखंमान भाकर तुकडा ओवाळून टाकून रखमानं म्हैस घरात घ्यायला लावली. तिला पाणी पाजून थोडी वैरण घालून दमल्या भागल्या नवऱ्यास पाणी आणून दिलं.

गणा पाणी घटाघटा प्यायला. व रखमाला म्हणाला, “ काय तुझ्या बापाने म्हैस दिली बघ. सगळी मानसं नाव ठेवत होती.”

तेव्हा ती म्हणाली, “ उगाच गावच्या कहाण्या सांगू नका. जर गाव काय म्हणतं याचा विचार करत रहीलासा तर असच बसशीला तंबाखू चोळत. ते काही नाही, चांगली चार पाच महिन्यात अशी करते बघा तिला दोन्ही दारातून गेली तर शपथं.”

असे म्हणून तिने खुरपे घेतले. व म्हणाली, “ आ तुम्ही घरात बसा. मी व मामंजी रानात जाऊन चार पेंड्या घेऊन येतो.”

असे म्हणून ती शेताच्या वाटेला लागली. अशा रीतीने गणूच्या संसाराची गाडी रुळावर आली. गणू स्वभावाने खूप भोळा होता. त्याला कोणीही सहज फसवेल. असा त्याचा स्वभाव. पण बायकोच्या राबण्यानं त्याचा संसार खूप सुखात चालला होता.

 त्याच्या बायकोने म्हंटल्याप्रमाणे त्या म्हशीला चांगले तयार केले. गणाची रोज निंदा करणारे लोक आता त्याचे कौतुक करू लागले होते. पण गणाची प्रगती गावच्या पाटलाच्या मनात सलत होती. त्याला गणाची म्हैस गब्दुल्ली झालेली बघवत नव्हती.




एके दिवशी रखमा धारला बसली होती. व गणा उगाच गोठ्यात बसला होता. तर त्याचं लक्ष त्या रवंथ करणाऱ्या म्हशीकडे गेला. तेव्हा त्याला म्हशीच्या वरच्या बाजूला एकपण दात दिसला नाही. तो विचार करायला लागला. की म्हशीला वरती एक पण दात दिसत नाही. आजपतोर म्हैस कशी वैरण खाते दूध देते. वरच्या बाजूला तर एकपण दात नाही.

 “बापरे, मामानं माझ्या गळ्यात दात पडकी म्हस् बांधली वाटतं.”

तो बायकोला म्हणाला, “ काय ग रखमा मामानं पैसे दिले नाही म्हणून दात पडकी म्हस बांधली वाटत. बघ की जरा तिला वरती एकपण दात नाही.”

“ गप बसा उगीच कायपण बोलत्यासा, वैरण तर खाती, शेण देती, दूध पण देती. मला काय दाताच नाय ठावं. मला फक्त दुधाची शीर ठाव. ती तर दिसती. जावा गप कामाला.”

दुसऱ्या दिवशी सकाळी गणू उठला.त्याने उठून चहा घेतला. व खुरपे घेतले व शिवाराच्य वाटेला लागला. पाणंदितून जाताना त्याला सखाराम पाटील भेटला. तो म्हणाला, “काय गणू कसा काय प्रपंच चाललाय.”

तेव्हा गणू म्हणाला, “कसला गरिबांचा प्रपंच म्हणायचा पाटील. तुमच्या वाणी नाही आमचं, आमची माळा मुरडाची रानं कसली पिकत्यात. दैवारान भिजायची व चांदण्या न वाळायची.काय पिकायच तिच्यात चार भाताच दाण, व बुटिभर शेंगा, व कुट्टतरी नाचणं बाकीच्या रानात गवताबिगर काय नाही.

सखाराम म्हणाला, “ नाही कस म्हैस तर लई झाक बाळगलीस.”

तेंव्हा गणू म्हणाला, “ कसली झ्याक मामानं फसवल राव, म्हस दिली ती पण दात पडकी.तिला वरती एकपण दात नाही बघा. आता विकताना कोण घेईल बरं. दर पडला की.”

सखाराम पाटील म्हणाला, “ आर तो हेड्या फसवणारच. चल आज आमच्या मळवातली पेंडी देतो तुला.”

गणुपण खुश झाला. व पाटला बरोबर मळवात गेला. मळवातील पेंडी कापताना पाटील म्हणाला, “ हे बघ गणू तूझ्या मामानं फसवल बघ तुला. तू माझा बालपणाचा मित्र म्हणून सांगतो. मला तुझी दया येते बघ. आता कुठं तुझा संसार सरळ चालला होता त्यात ही दात पडकी म्हस् सासऱ्यांन गळ्यात बांधली तुझ्या. तो तर जातीचा हेड्या. हेड्या तो हेड्याच, त्यांना फक्त पैसा दिसतो बघ. तशा माझ्या घरात म्हशी हाईत पण तुझ्यासाठी मी ती म्हैस खरेदी करतो बघ. तू जेवढ्याला आणली तेवढ्याला मी ती म्हस् खरेदी करतो बघ. यात तुझा तोटा पण नाही व माझा फायदा पण नाही. त्या पैशात दुसरी म्हस घे तू. “

तेव्हा गणू म्हणाला, “ घरात विचारतो, व नंतर काय ते सांगतो.”

तेव्हा पाटील म्हणाला, “ अरे मर्दा बापया सारखा बापय तू व बायकांना काय विचारायचं. व म्हातार्यांच काय ऐकायच.”

गणुला पाटलाच बोलण एकूण मोठं झाल्या सारखं वाटायला लागलं.

“ नंतर येईन मागन व्यवहार करायला,” असे बोलून त्याने पेंडीच वज्ज बांधल. व तो घरच्या वाटेला लागला.

वाटेत त्याच्या मनात विचारांचे काहूर माजू लागले. तो विचार करू लागला. नाहीतर म्हशीची किंमत मिळतेच. ही देऊ व दुसरी घेऊ आपण. असा विचार करत तो घरात आला त्याने वज्ज टाकलं. अंघोळ केली. व नंतर थोड्या वेळानं तो सखा पाटलाच्या घरात गेला. सखाराम गणा आल्याचं बघताच त्याने आपल्या बायकोला चहा करायला सांगितला.

थोड्या नाखूशीन पाटलीन  मुरका मारून आत गेली. शेवटी सखा पाटलान गणाला चांगलाच घोळात घेऊन त्याच्या हातावर पाच हजार रुपये टेकवले व म्हशीचा कागद करून घेतला. थोड्या वेळानं रखमा व म्हातारा शेताला गेल्यावर त्यानं गणुच्या दावणीची म्हस सोडून आणली.

गणूला अवघडल्यासारखं झाल. पण पुन्हा विचार केला. की दुसरी घेता येईल.

संध्याकाळ झाली रानात गेलेली माणस घरला निघाली. गणुच्या बापाला घरला येताना वाटेत शिंद्याचा म्हादू भेटला. तो गणूच्या बापाला म्हंटला.

“काय राव म्हैस विकणार माहीत असत तर मीच घेतली असती. त्या पाटलाला कशाला दिली.”

“ काय म्हैस कोण म्हणत दिली.”

“घरला जा तुझ्या पोरग्यानच दिली.”

“काय म्हणतोस, मला काय माहीत नाही यातलं.”

“म्हणजे पोरगं मोठं झालं व्हय व्यवहार करायला.तू बस आता कोपऱ्यात , जा घरला.” असे म्हणून तो निघून गेला.

म्हातारा लगबगिन घरला आला. त्याने गोठ्यात म्हस बघितली.म्हस गोठ्यात नव्हती. तो तडक घरात आला. व गणाला म्हणाला, “ गण्या म्हस कुठं हाय.”

गणा, “ विकली.”

“ का विकलीस कुणाला विचारून तुझं टकोर तर फिरल नाही नव्ह.” म्हातारा चाचपडत बोलला.

तेंव्हा गणू म्हणाला, “ तिचं दात पडल होत.”

तेव्हा म्हातारा म्हणाला, “तरण्या रेडीच कधी दात पडलत काय र!”

तेव्हा गणू म्हणाला, “हे बघ बा मला थोडी तरी अक्कल हाय,उगाच कालवा करू नकोस. उद्या दुसरी घेऊ.”

तेव्हा गणूचा बाप म्हणाला, “ तसली म्हैस परत मिळाय ठेवलीय तूझ्या बापानं.लगीन झालं म्हणजे शेना झालास.”

तेव्हा गणू उठला. व परसदारी रागात निघून गेला. थोड्या वेळानं गणुची आई व बायको रानातून आल्या. त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यां गणूला खूप बोलल्या. शेवटी गणू रागान दोरी घेऊन फासलावाय निघाला.तेव्हा सगळी गप्प झाली.

म्हातारी म्हणाली. “जाऊदे दुसरी घ्या पण माझ्या पोरान काय करून घेतल तर मी कुणाकडं बघू असल्या भावकित मी हाडाची काड करून संसार केला कुणासाठी याच्यासाठी. सोडा विषय तो.”

म्हाताऱ्याने दुम काढला म्हैस कुणाला दिली याचा. त्याला समजले की सखा पाटलाकड म्हस हाय.तेव्हा त्यानं ओळखलं सख्यानं फसवल माझ्या गणाला.रात्री म्हाताऱ्याला जेवण गॉड लागलं नाही. तो नुसता हांथरुणावर तळमळत होता.

भगटायला तो उठून बसला. त्याच्या लक्षात आले की शिंद्याची लक्ष्मी आपल्या माहेरला यमगर्णीला जाणार हाय. तो तडक तिच्या घरला गेला. व त्याने सर्व हकीकत लक्ष्मीला सांगितली. व रखमाच्या बापाला तेवढा निरोप द्यायला संगितला.

लक्ष्मी म्हणाली, “म्हाताऱ्या तू काळजी करू नकोस, मी सांगते रखमाच्या बापाला. त्या सखा पाटलाच मडं बसवलं ते, भाड्या कोणत्या येळला उपाजलाय देवा महादेवाला ठाव. सगळ्या गावाला खाऊन भुजंगावाणी बसलाय करिटखाऊ मेला. तेला बुडीवला वेदगंगेत .” असे म्हणत लक्ष्मी चुलिवला चहा म्हाताऱ्याला देऊ लागली. तेव्हा म्हातारा म्हणाला, “ नको मला चहा काय, काहीपण गॉड लागत नाही बघ. या पोरान ह्यो बाजार मांडलाय, माझ काम एवढं कर.” असे बोलून तो घरी आला. लक्ष्मी गावाला गेली तिन निपाणीत रखमाच्या बापाला निरोप पोचवला. दुसऱ्या दिवशी सकाळी भगटायला रखमाचा बाप पेठत हजर झाला. व घरात आल्या आल्या त्यानं गणा कुठाय विचारलं.गणा लगेच हजर झाला.

“ गण्या म्हस कुणाला विकलिस व का विकलीस.” गणा जरा घाबरूनच बोलला, “सखाराम पाटलाला.”

“ का विकलीस,” असे विचारताच गणू म्हटला, “दात पडकी म्हस माझ्या गळ्यात बांधल्यासा व आता मला विचारता होय.” तेव्हा सासरा म्हणाला, “ काय दात पडकी, आर परवडीची रेडी घेऊन दिली होती तुला, व दात पडकी म्हणतोस व्हय.”

तेव्हा गणू म्हणाला, “नाहीतर काय त्या म्हशीला वरती एक पण दात नव्हता.कोण पुढे विकत घेणार, शेवटी विचार केला व दिलेलं तेवढं पैसे परत मिळत्यात म्हंटल्यावर विकली सखा पाटलाला.”

असे म्हटल्यावर रखमाच्या बापानं डोक्यावर हात मारून घेतला. व तो म्हणाला, “ तुझ्या बापाने तरी लावले होते काय म्हशीला वरती दात. व विकत घेणारा काय बचाळी बसवणार हाय का? जा उठ व गावातल्या सगळ्या म्हशींना बघून ये वरती दात आहेत का ते. कुठली अवदसा सुचली व तुझ्या पदरात पोरगी बांधली माझी.”

गणा उठला व शेजारच्या शिंद्यांच्या गोठ्यात गेला.त्यांच्या गोठ्यातील म्हशीचे दात पाहण्याचा प्रयत्न त्याने केला. तर त्याला रवंथ करताना म्हशीचे फक्त खालचेच दात दिसले. वरती दात नव्हते. त्याने डोक्याला हात मारला. व तो घरी आला. व रडू लागला.

त्याच्या बायकोने समजूत काढली. बाबाला म्हणाली, “आता बाबा तूच यातून मार्ग काढ. माझा नवरा भोळा भाबडा त्याची फसगत झाली.”

रखमाच्या बापानं गणाची समजूत काढली. तो म्हणाला माणूस चुकतोचं झालं गेलं गंगेला मिळालं. इथून पुढं शान व्हायचं. ते पाच हजार आण. आणखी काही जोडणी करा. आता मी एक पाई घालणार नाही.तुला दुसरी म्हैस घेऊन देतो. येत्या बाजारात तुझ्या घरात दुसरी म्हस बांधतो. पण इथून पुढं तरी मला विचारल्या शिवाय व्यवहार करायचा नाही.”

गणाच्या बायकोने म्हशीच्या दुधातून साठलेलं दोन हजार रूपये दिवळीतल्या गाडग्यात साठवले होते ते बाबाकडे दिले व म्हणाली,” मी पण खुळ्यासारखच केलं.तुला विचारायच्या आधी या बाबाला व्यवहार करू दिला. तेच माझं चुकल. इथून पुढे सावध राहीन. आता मला काय पण कमी नाही बघ तुझ्या आशीर्वादाने पण तेवढी म्हैस आन बाबा.” बोलून ती त्याच्या पाया पडली.

रखमाचा बा जाताना वाटेत सखा पाटलाला वाटेत दिसल्यावर म्हणाला, “ माझ्या भोळ्या जावयाला फसवून काय मेल्यावर मड्यावरन घेऊन जाणार हाईस काय. तुलापण कोणतरी भेटल सवाई. दुसऱ्याचं वाईट केलं की देव आपलं पण करतोय. एवढा जातीचा हेड्या, हेड्याचा धंदा करतोय पण बाजारात पत हाय माझी. घेतलीस म्हस नव्ह घे. त्या म्हशीपेक्षा नाही सवाई म्हैस घेतली माझ्या लेकीच्यात तर नाव सांगणार नाही.”




अस म्हणून तो निघून गेला. व म्हटल्याप्रमाणे त्याने चांगली म्हैस घेऊन दिली.” त्या दिवसापासून गणा प्रत्येक व्यवहार सावधगिरीने करीत असे.

पाटील व त्याचे मित्र गणाला चिडवत असत. पण हा काही बोलत नसे.गप्प राही. पण त्याच्या मनात पाटलाचा राग होताच.

त्याला न कळताच धडा शिकवण्याच गणाने ठरवले.

दिवस सरत चालले होते. भात कापणी झाली. गाणाची बायको राबणारी असल्याने या वर्षी चांगलंच भात पिकलं. व शेंगा पण वावरात भरपूर झाल्या. म्हशीमुळे व राबणुकिमुळे घरखर्च भागून चाऱ पैसे पण साठाय लागले होते.

गणाने मात्र सखा पाटलाची धुंदी उतरायचा चंगच बांधला. वैरण कापणी सुरू झाली. आपल्या वावरातल पयान कापताना गणा मनातल्या मनात हासला. कारण त्याच्या मनात पाटलाची खोड मोडायची युक्ती सुचली होती.

भात कापणी झाली. शेतं नांगरून पडायला लागली. गणानं पण आपल शेत नांगरल.पण माळधावणी असल्याने त्याने त्यात काही टाकल नाही. सखा पाटलान मात्र आपल्या शेतात हरभरा व मसूर टाकली होती. दिवस सरत चालले. हरभर्याला घाटे धरून काढणीस आला.

एके दिवशी सखा पाटलाची बायको दारात उभा राहून शिवा देताना दिसली. तेव्हा रखमा पाण्याला गेली होती. घरात आल्यावर ती सासूला म्हणाली. “सासूबाई सखा पाटलाचा हरभरा कुणी उपटून नेला म्हणं.”

रखमाची सासू म्हणाली, “ नेवूदेत भाड्याचं आमच्या पोराला फसवलं, असच जायचं.”

गणा मात्र शांत होता. सात आठ दिवसांनी गणा बायकोला म्हणाला, “ चल जरा डोंगराकड शेतात काम आहे.”

तर ती म्हणाली, “ पयान पण कापून रचलं. आता काय काम तिकड.”

तेव्हा गणा म्हणाला, “ चल गप काम आहे.”

तशी घरातलं काम आवरून नवऱ्याच्या मागणं शेताला निघाली.शेतात गेल्यावर त्याने दोन व्हळीमधील उनात घातलेला हरभरा काढला व तिला एक टोणका झोडायल आणून दिला.

तेव्हा ती म्हणाली, “हा हरभरा कुठला?” तेव्हा गणा म्हणाला, “ तू आंबे खा झाडे मोजू नको.”

ती म्हणाली, “ असं कुणाचं चोरून खाण्यपरिस उपाशी मरीन मी.” तेव्हा गणा रखमाला म्हणाला, “ लई खर्याची पुतळी आहेस बघ. हा हरभरा त्या सखा पाटलाचा आहे. माझी म्हस फसवून घेतो काय. आता खा म्हणावं हरभरं, तू राब मी खातो.”

“ आव ती पाटलिन लई शिवा देत होती. पांडुरंग बघून घेईल चोराला. तुम्हाला हे धंदे करायला कुणी सांगितलं.” रखमा बोलली.

गणा म्हणाला, “ रखमा तू लई साधी आहेस. हा भोळापणा सोड. मी केला तेवढा गाढवपणा पुरे. त्या पाटलाची घमेंड आता अशीच जिरवायची कड कडणं कुरण खायचं त्याला कळूच द्यायचं नाही. तू गप्प बस मी नाही त्या पाच हजाराचे दहा हजार केले तर नावाचा गणा नाही.मला फसवतो काय.”

दर वर्षी पाटलाच्या शेतातील हरभरा , कधी ज्वारी, कधी मुगाच्या शेंगा असं काहीना काही चोरीला जायला लागलं. गणानं असे दरवर्षी हजार पाचशे मिळवत म्हैशीच्या आठ दाताचे आठ दहा हजार मिळवले. व पाटलाची चांगलीच मस्ती उतरायचे काम या भोळ्या शंकराच्या गणाने केले.

तात्पर्य : आपण कोणाला तरी फसवले तर आपल्यालाही कोण तरी फसवू शकते.

टीप. सद्या म्हैशीचे दर जास्त आहेत. हा दर २००८-०९, सालचा आहे. नाहीतर ५००० रुपये घ्याल व जाल बाजारात म्हस द्या म्हणून खुळ्यात काढतील. तुमचा शुभचिंतक.

लेखक. : निशिकांत हारुगले
                              एम. एम. बी.एड.


शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

कथाक्र. १ मासेमारी

 १) मासेमारी

लेखक :निशिकांत हारुगले.

                                 एम.ए बी एड.



दर वर्षी सण समारंभ चालून येत असतात. नित्य नेमाने आश्विन महिन्यात दसरा आला. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यातून येणाऱ्या पैशावरच उदरनिर्वाह चालत असे.दसरा म्हटल की खारकांडाचा बेत ठरलेला असे. पण मटण महाग असलेने सर्व सामान्य गरीब कुटुंबांना त्याचा खर्चं परवडत नसे.तेव्हा या मासाहाराची गरज भागवण्याचे काम पेठच्या शिवारातील नदी वेदगंगा व तिच्या व्हळी म्हणजेच ओढे करत असत.

पेठच्या गावात होऊन गेलेलं प्रसिद्ध त्रिकुट म्हणजे पाटलाचा हणमंता, कुंभाराचा शंकऱ्या व येसाक्काचा बाजीराव. ही तिघे पेठच्या रानात पाखराप्रमाने लहानाची मोठी झालीत.

शाळा शिकणे म्हणजे डोक्याच काम ते जमणार छे छे वेड व्हायला होतंय असे समजत असत. त्यामुळे शाळेत कमी व गावच्या शिवारात जास्त हुंदड्या मारतच हे लहानाचे मोठे झाले.

लहानपणी शाळेला जर मुले बोलवायला आले की कधी कणुगल्यात तर कधी पोटमाळ्यावर लपून बसत. तर कधी शिवारात दडी मारत.

येसाक्का तर आपल्या बाज्याला फुकणीन बडवत असे.की शाळेला का जात नाहीस.

“भाड्या नुसता खादाड बोका खातोय व खोंडावाणी हुंदडतोय नुसता.” असे म्हणत असे.हा शाळा शिकावा व या त्रिकुटाच खेळ मोडावा म्हणून येसुबाईन बाजीरावाला त्याच्या मामाच्या गावी भोगावतीला पाटीवला.पण काय घरातील मांजर पिल्ली धरतय म्हणून रानात सोडावं व ते फिरून परत यावे तसा हा चांगल महिनाभर खादडून महिन्यान चालत घरला आला. तवा आईनं डोचक्यावर हात मारून घेतला व म्हणाली, “ काय बाई करावं या पोराला आता ह्यो भाड्या व याचं नशीब मी काय करणार.” अस म्हणून तिने त्याचा नाद सोडला.

शेतातून येणारे चार तांदळाचे दाणे व म्हशीचे दूध ढेरीला घालून मिळणाऱ्या दहा दिवसाच्या बिलावर घर कसे बसे चालत असे.

 डोंगरातील जंगलातील लाकडाच्या मोळ्या घरच्या सरपणाची गरज भागवत असत.पैशाची वानवा अशीच परिस्थिती हणमंत पाटलाची होती.

शंकर कुंभाराच्या बापाचा मडकी तयार करायचा.पावसाळ्यात चिखल रांधून गणपती करायचे व ते विकायचे. शंकरला गणपतीतला ग सुद्धा येत नव्हता. एकदा त्याच्या बापानं मारून मुटकून त्याला गणपती करायला बसवला. तर त्याने गणपतीचं धड एका बाजूला व तोंड मागल्या बाजूला. केले. गणेश चतुर्थीला जो तो हसू लागला. तेव्हा शंकर्या सगळ्यांना सांगे. की हा नवसाला पावणारा गणपती आहे.कारण त्याचे तोंड पाठीमागे होते.घरला जाताना तुमच्याकडे बघून आशीर्वाद देणारा व तुम्ही त्याला बुडवता तो मात्र तुम्हाला तारणार. तारल्या वाचून राहणार नाही.

पण एवढं सांगून पण तो गणपती घ्यायला कोणीच तयार नव्हते.

शेवटी शंकऱ्यान त्या गणपतीला उचलले व हनमाच्या गळ्यात घातले. व म्हणाला, “ मला तुझी पई नको, पण माझ्या श्रमाचा गणपती आवंदा तरी खपुदेत. पुढचं पुढं बघू.शेवटी हणमंतानं मैत्रीखातर तो गणपती घरी नेला.

घरात आणल्यावर हणमाच्या आजीनं घर डोक्यावर घेतलं व म्हणाली,

“ भाड्या फुकटात मिळालं म्हणजे शेण पण आणशील.तुला मोडून बसवला नदीवर त्यो. रेड्या आसला कसला गणपती आणला.”

तेव्हा हणमंत म्हणाला, “ म्हातारे गप्प बस उगाच कालवा करू नकोस, बघ नवसाला पावतो की नाही हा गणपती.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तो आधीच पावलाय व तुझ्यासारखं कारट आमच्या पदरात टाकलय काय कामाचं ना धामाचं.”

तेव्हा तो म्हणाला, “ कामाचं नाही कस तू खपलीस तर तुझ्या लेकाला नाहीतर मलाच तिटव धरायला देतील लोक तवा म्हणशील काय कामाचं ना धामाचं.”

तेव्हा म्हातारीनं काठी घेतली व त्याला म्हणाली, “ भाड्या माझ्या मरणावर उठलाय.”

तेव्हा हणमाच्या आईनं कशीबशी समजूत काढली. व म्हातारीला शांत केली. तेव्हा तो म्हणाला , “ तिला म्हणावं जा माहेरला गवर खेळायला.”

तेव्हा ती म्हणाली, “ ये वळू या म्हातारपणी मला पाठवतो व्हय रं मेल्या या दावणीला डोकं फोडून मरेन पण माहेरला जाणार नाही.”

अस म्हणून ती आत गेली. पण पाठमोरा गणपती हाणमाला पावलाच म्हणायचा. त्यावर्षी हाणमाच्या शेतात धान्य भरपूर पिकलं, म्हैस दुधाला सरळ लागली. व हणमाचं लगीन पण झालं. तेव्हा तो म्हातारीला म्हणाला,  "का गणपतीला नावं ठेवती नव्हं आता बघ कसा पावला गणपती शिखरासकट मला.” म्हातारीने त्याचे पटापटा मुके घेतले.

अशा प्रकारचे हे त्रिकुट दसऱ्याला एकत्र न आले तर नवलच. या त्रिकुटाने देव उठल्यावर ठरवलं काही नाही आज रात्री शिकारीला जायचं पाण्यातल्या. यांची शिकार म्हणजे मासेमारी हाणमानं त्या दिवशी माळ्यावरली बत्ती काढली. व इकडल तिकडल उसन रॉकेल आणून कशीबशी तयारी केली. येसू पाटलिनीच्या बाज्यानं माळ्यावरल्या मच्छरदाणीची जाळी कापून घेऊन आला. व कुंभाराचा शंकऱ्या विळा घेऊन तयार झाला.तिघेजण अंधार पडल्यावर बाहेर पडले. तेव्हा म्हातारी ओरडली, “हाणमंता काठी घेऊन जा माझी रातीची वेळ हाय, उगाच शंका नको.”

तसा हणमंत ती काठी घेऊन ती तिघ नदीच्या वाटेला लागली. नदीच्या वाटेवर ओढा लागला. त्या ओढ्यात अलगत घुसली. व पाण्याच्या वाटेनं निघाली. अंधाऱ्या रात्री किर किर आवाज करत किड्यांचा कालवा चालला होता. गप्पा मारत यांनी मासळ्या व किरवी धरायला सुरवात केली अंधाऱ्या रात्री अनेक किरवी बाहेर पडत असत. खुरप्याने पटापट टिपत आणलेल्या पोत्यात किरवी टाकत पुढे चालली होती. शंकर कुंभार हाणमाल म्हणाला, “ तुझी आजी लई वांड हाय रं, लई बोलती म्हातारी, हाड म्हातारी झाल्यात पण जीभ काय तिची म्हातारी झाली नाही बघ.आशी बोलते की समंद गावच हादरायला पाहिजे. तुझ्या आईचं कस ध्याड गेलं असतील र तिच्या हाताखाली.”

तेव्हा हाणमा म्हणाला, “ म्हातारी बडबडतीया पण पोटात लई माय बघ, तुळशी काठाची असली तरी तुळशिगतच हाय बघ. आता मी जोपतोर घरात जाईत नाही तोपर्यंत झोपली तर शपथ माझ्या लग्नाचा खर्च तिनच केला नव्ह, साठवलेल्या पैशातून. नाहीतर आमचा बा काय आडगा पन्नास पैशाला पाच रुपये व पाच रुपयाला पन्नास पैसे म्हणतोय. तो काय व्यवहार करणार दगड. म्हातारी हाय म्हणून सगळ चाललय नाहीतर आमचं वाळवणं कवाच लागलं असतं. आमच्या आसल्या भावकीत तिचा आवाज ऐकला की आजुन हादरतिया.

आमच्या भावकितल्या किशाच्या बापानं आमच्या बाला दमदाटी करताच व शिव्या देताच किशाच्या बापाला आमच्या म्हातारीनं गोरणीत घालून बडवला.



अशा गप्पा मारत ओढ्याचे पात्रातून ते मासे धरत ते पुढे चालले.भरपूर मासे जमले. टिक्क उचलना झालं, तेव्हा शंकर म्हणाला, “आता बास, पुढल्या वळणावर बाहेर पडू.”

तसे ती तिघे पुढल्या वळणावर बाहेर पडू लागली. वळणावरून बाहेर पडताना अचानक हणमाला पायात काय तरी चावल्या सारखं वाटल.

माग वळून बत्तीच्या उजेडात त्याला सापाची शेपटी दिसली. तिचे दात त्याच्या पायात लागले होते. व बारीक मुंग्या मारू लागल्या होत्या.

शंकर व बाज्या चांगलेच घाबरले होते.

शंकर म्हणाला, “ आता काय करायचं र.”

बाजीराव, “काय करायचं म्हणजे याला पाटकोळीवर घे व रस्त्याला ये. व ही पिशवी तिथ व्हळीत लपव. मी बैलगाडी आणतो.”

बाज्या पळत घरला गेला व त्यानं परसदरातील मांगरातील बैलं सोडली. व छकड्याला जुंपली..खीलार बैलांना दोन चाबूक लगवताच डीरर्क्या फोडत पळाली. इतक्यात शंकर हाणमाला घेऊन वाटेला आला होता. बैलगाडी येताच त्यानं हाणमाला छकडा गाडीत टाकल. हाणमाला मात्र काहीच वाटत नव्हते. त्याने आपल्या पायाला दोराने घट्ट बांधले होते. गाडी तालुक्याच्या सडकला लागली.थोड्याच वेळात बघता बघता बैलांनी वेग धरला. दणक्यात बाजीरावानं गाडी तालुक्याला रेटली. हणमाला घेऊन तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात आलीत.

बैलगाडी तशीच उभा करून त्यांनी दवाखान्याच दार ठोठावले रातपळीला आलेली नर्स उठून आली. व म्हणाली, “काय हाय येवढ्या रातीच,जरा कुठं डोळा लागतोय तोपर्यंत कलमडलित.” अस म्हणतच तीन दार उघडलं.तस धापा टाकत शंकर म्हणाला, “हणमाला पायाखालच झालय.”

 तवा ती नर्स म्हणाली, “एवढ्या रातीच कशाला गेलता वारुळाकड जीव द्यायला काय?”

“ बोला काय होत ते नासकवणी की फुरस .”

तेव्हा बाजीराव म्हणाला, “ सापटोळी होती.”

तेव्हा ती नर्स म्हणाली, “ काय साप टोळी मी नवीनच नाव ऐकतेय.”

“केवढी होती लांबीला.” नर्स म्हणाली.

तेव्हा हणमंता म्हणाला, “ बाई जर ती दिसली असती तर तुम्हा पुढे आणून टाकली असती.”

 तेव्हा त्या बाईन जास्त वाडाचार न लावता एक इंजेक्शन घेतल. व हाणमाला टोचत म्हणाली, “ मी आता हे जे इंजेक्शन देते. ते सर्व सापांवर चालते. जर एवढी रात्र ढकलली तर समजा हा वाचला नाहीतर चचला.”

असे म्हणून तिने त्याला वार्डात एका खाटेवर जागा दिली. व ती निघून गेली.

हणमाला बाजीराव व शंकऱ्यान आणून त्या खाटेवर झोपवला. व बाजीराव गाडीची बैल सोडायला निघून गेला.

शंकर मात्र खाली गार फरशीवर बसला. आधीच ओढ्याच्या पाण्यात भिजल्यांन थंडी वाजत होती. त्यात सरकारी हॉस्पिटल मधील गार फरशी याने चांगलीच हुडहुडी भरली.

थोड्या वेळानं बाजीराव तिथे आला, व म्हणाला, “ काय झालं र.”

तेव्हा शंकर म्हणाला, “काय नाही इथे फरशीवर आणखी दोन तास बसलं तर मलाच दाखल व्हावं लागलं दुसऱ्या खाटेवर.”

थोड्या वेळानं हाणमा डाराडूर झोपला ते दोघे मात्र त्याच्या पहार्याला रातभर जागे होते.सारखं आंगाला हात लावून बघत असत. व म्हणत, “ हाय, हाय, आजूनं जित्ता हाय म्हणायचा.”

रातभर जागून जागून डोळ पांढर व्हायची वेळ आली होती.भगटायला कुठे यांचा जरा डोळा लागतोय तोच हाणमंता उठला. व म्हणाला, “ ये चला लवकर रातभर नुसती झोपा काढत्यात, घरला जायचं की नाही.”

त्यावर शंकर म्हणाला, “ हे आपल बर हाय की तू झोप डाराडूर व तुझ्या काळजीनं रातसारी जाग आम्ही. व आम्हालाच म्हण झोपा काढत्यात.”

बाजीराव म्हणाला, “ मेला असतास तर लई बर झाल असत, तुझी काळजी करून जागं आम्ही व तूच तोरा दावतोस व्हय रं.”

तेव्हा हाणमा म्हणाला, “ खेकडी मास्यांची पिसवी कुठाय.”

ती दोघं म्हणाली असल शिवारात व्हळीत ठेवलीय.”

ती उठून जायला निघाली.बाजीराव बैलगाडी जुंपली.रातभर बैलांना झाडाखाली चांगलंच चीलटानी खाल्ल होत.जुंपताना डूरक्या बैलान शिंग दाखवली. तशी त्याने वेसण धरली व गाडी जुंपली . इतक्यात रातपाळीची नर्स डुटी संपल्यावर घरला निघाली होती. “ काय हाईस व्हय मला वाटल… …”

तेव्हा शंकर म्हणाला, “ तुमच्या सारखी सावित्री असताना हाणमाचा जीव न्यायची काय बिशाद त्या यमदेवाची.”

असे म्हणताच ती नर्स चिडली. व म्हणाली, “ देव करो व आज तुला साप चावू दे, व तू इथे येवो, नाही तुला वरती पाठवला ढगात तर बघ.मला सावित्री म्हणतोस व्हय रे डूचक्या आणि हा तुझा सत्यवान काय. घाणेरडी किती दिवसांनी आंघोळ करत्यासा देवाला ठाऊक, तुमच्या आंगाचा वास बघून तो यम म्हणाला असेल की आधीच नरकात हाईसा आणि उगीच कशाला नेऊ.”

असे ऐकल्यावर व तिचा अवतार बघून बाजीरावाने गाडी गडबडीने जुंपली. व ती तिघे गावच्या वाटेला लागलीत.गावात यायला घराजवळ चांगलीच गर्दी उसळली होती. आजू बाजूच्या बायका जमल्या होत्या. म्हातारीनं घर चांगलच डोक्यावर घेतलं होत.ती चांगलीच सुर लावून रडत होती.

“ कशाला गेला मासळ्या धरायला.”

शेवटी हाणमाला बघितल्यावर म्हातारीचा जीव भांड्यात पडला. व म्हणाली,

“ हाणमा नको आम्हाला मासे ते तू घरात बसून रहा म्या आजुन धट्टीकट्टी हाय राबायला.तुला कायबी कमी पडू देणार नाही.तू तेवढा चांगला रहा बाबा.”

जो तो येऊन चौकशी करू लागला.

व शंकर व बाज्याला म्हणू लागले, “ काय अक्कल हाय की नाही कशाला गेलत्यासा मासळ्या धरायला. जीव गेला असता तर.दिसाचं जाता इत नाही.”

तेव्हा बाज्या व शंकर त्यांच्या तोंडाकडे बघून विचार करू लागले. “हे आपल बर हाय देणं नाही घेणं आणि कंदील लावुन येणं. हाच घेऊन गेला माश्याला , याच्यासाठी एवढं रामायण केलं. थंडीनं कुडकुडलो. रातभर जागे राहीलाव व सगळे आम्हालाच बोलत्यात.”

कसे बसे सात आठ दिवस गेले. हाणमा परत बाजीराव व शंकरकडे गेला. व म्हणाला, “ काय जायचं काय आज रात्री मासळ्या धरायला.”

तेव्हा हे त्रिकूट पुन्हा मासे धरायला जाण्याच्या तयारीला लागले.

लेखक. : निशिकांत हारुगले


कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...