नदीची जत्रा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नदीची जत्रा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ मे, २०२२

देवाक नदीची जत्रा

llदेवाक नदीची जत्राll

लेखक : निशिकांत हारुगले

 एम.ए.बी.एड.




ग्रामीण भागात कोणतीही घटना घडूदेत. पहिल्यांदा देव देवताळ तपासून पहात. अंगारे धुपारे देव देवरशी व उतारे यांची उतारा उतर घडे.

वेदगंगेच्या काठावर भुदरगड खोऱ्यात अनेक गावे वसलेली आहेत. या गावात साट लोट करून लग्न वर्हाडाचे संबंध जुळलेले आहेतच. पेठेच्या गावातील जना पाटलीनीन आपली पोरगी कडगाव फाट्याला दिली होती. तिचा नवरा बागायतदार होता. तशी त्याची थोडीफार जमीन पाण्याखाली असल्याने त्याला बागायतदार म्हणत असत. शेतात राबून ऊसाला पाणी देऊन येणार्या पिकाचे कारखान्याला घालवल्यावर मिळणाऱ्या टनाचे पैसे मोजत तेही या वर्षी ऊस गेला की पुढल्या वर्षी ऊस तोडणीसाठी आला की पैसे मिळत. त्यामुळे पैशाची उलाढाल करावी लागायची.

जनाबाईची लेक सुनिता तिच्या हाताखाली राबत लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे ती चांगलीच घट्ट झाली होती.तिला सर्व सूने म्हणत.

तिन तिच्या नवऱ्याला शेत कसे कसतात ते दाखवलं. नाहीतर त्याला साधा शेताचा बांधसुध्दा माहीत नव्हता. मात्र तिचा दीर एकजात बेवडा. घरात काही कामधंदा करणार नाही. पण गावात याच्याकड राब त्याच्याकडे राब, व मिळालेल्या पैशातून दारू ढोसून संध्याकाळी धिंगाणा घाल. त्याला लोक बेवडा शिरप्या म्हणत.

सुनिता व तिचा नवरा खूप राबत असत. त्यामुळे त्यांचे कोणतेही पीक डावे नसे. नेहमी उजवच असे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सूनिताच ऊस चांगला आला होता. मळवातल्या ऊसात सूनिताचा ऊस उठून दिसत असे. मात्र चांगल झाल की त्यावर घाला हा येतोच. अशा प्रमाणे लाईटच्या वायरींच स्पार्किंग झालं. व ठिणग्या पडल्या. व फडाला आग लागली बघता बघता चांगला ऊस पेटला. उत्पादन घटल. ऊसाच चिपाड झालं.

हातातोंडाचा घास देवानं काढून घेतला. सुनिताचा नव्हरा खुळ्यासारखं करायला लागला. सुनितानं समजाऊन सांगितल. पण काही उपयोग झाला नाही. दवापाणी पण केलं. त्यानं चांगलच मनाला लावून घेतलं होत. कारण दोन घरचा संसार त्या एका एकरातील उसावर चालायचा. एक सूनीताचा व दुसरा बेवड्या शिरपाचा..

एके दिवशी सूनिताच्या शेजारची मालाक्का निष्णपला निघाली होती. ती सुनीताला म्हणाली, “सूने येतीस काय निष्णपला माझ्या माहेरची देवी लई जागृत हाय बघ. तिथून पुढे वाडीत माझ्या ओळखीचा एक देवऋशी हाय बघ. तेला विचारुया तुझ्या नवऱ्याबद्दल, त्याच्या मागं काय कटकट लागलीय.”

सुनीताला पण वाटल. व तिन सासुबाईला सांगून मालुबाई बरोबर ती निष्णपच्या वाटेला लागली. सुनिताच्या डोक्यात चालता चालता विचार येत होते. की तो देवऋषी काय सांगेल.

ती गुमान मालुच्या मागणं निघाली. नदीच्या काठान रस्त्याने चालत त्या वाडीवर आल्या. तिथं आल्यावर त्या निष्णपच्या चढणीच्या वाटेला लागल्या. वाटेला देवीला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची रेलचेल दिसत होती.

मालू सुनीताला म्हणाली, “ हे बघ सुने आमची देवी अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध हाय. नुसती हाक मारली की माग उभी राहती बघ. तिच्याकडून काय मागनं असेल तर मागून घे. नंतर आपण वाडीवल्या देवऋष्याकडं जाऊ.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ नवरा चांगला झाला म्हणजे झालं. बाकी काय नको मला.”

बघता बघता देऊळ आल्ं. मंदिरा बाहेर अनेक माणसांची गर्दी होती. काहीजण गाड्या करून आली होती. मालू व सुनिता देवळात गेल्या. देवीला त्यांनी नमस्कार केला. देवदर्शन घेऊन मालूनं चौकावर पूजेचं साहित्य ठेवलं. तांदूळ साखर,कापूराच्या पुड्या सोडून ठेवल्या. गुरवान ते घेऊन आंगारा लावला. तशा त्या गुरवाच्या पाया पडल्या. व बाजूला एका कोपऱ्यात जाऊन बसल्या.

बसल्या जागेवरून सुनिता देवीला हात जोडून म्हणाली, “ आई लक्ष्मी आमच्यावर कृपा असु देत.”

ती देवळाच्या बाहेर पडलीत. व वाडीच्या दिशेला लागलीत. वाडीत भरवस्तीत त्या देवऋषाचे घर होत. त्या तिथं गेल्या. तिथं आतील बाजूस मोठा देवारा सजवलेला होता. तिथे अनेक देवांचे टाक पुजले होते. त्या तिथे गेल्या. गर्दी होती. थोड्यावेळाने त्यांचा नंबर आला. त्या दोघींनी देवऋष्याच्या पायावर लोटांगण घातले. व त्या त्याच्या शेजारी बसल्या.

 बघताच देवऋषी म्हणाला, “ ये मालुबाई आजकाल दिसत नाहीस कुठं.”

तेंव्हा मालू म्हणाली, “ काय सांगू देवा माझ्यामागं एक वनवास हाय होय. अगदी सीतवाणी हाय बघ, आदी लहान असताना आई मेली. नंतर सावत्र आईचा झिंज्या उपटून मार खात मोठी झाले. मागं अठरा विश्व दारिद्र्य म्हणून मला त्या बेवड्याच्या गळ्यात बांधली. तर तो नवरा बर खर सासू नको अशी गत झाली. सासून तर माझा दांडगा छळ केला. शेवटी त्या छळाला कंटाळून मग वेगळा प्रपंच मांडला. आता कुठं सुखान चार घास खाते. दोन पोर हाईत पोटाला चांगल चाललय बघ. पण….”

“पण काय आणखीन.” देव ऋषी म्हणाला. तेव्हा मालू म्हणाली, “ नवऱ्यानं तेवढी दारू सोडाया पाहिजे.”

तेव्हा तो हसला व म्हणाला, “ ते काय माझं काम हाय का जा की डॉक्टरकडं.” तेव्हा ती म्हणाली, “ माझा नाही विश्वास डाक्टर वर.”

देवऋषी बोलला, “ असं कसं म्हणून चालेल, डॉकटर म्हणजे वैद्य माणूस. त्याला नाव ठेवू नयेत. आपली जुनी औषध फक्त नवीन बाटलीत भरून देतात.”

“ते काही बी मला माहित नाही. तुम्हीच करा उपाय.”

तेव्हा त्या देवऋषाने विचार केला. व म्हणाला, “ हे बघ तुझ्या गावाला जाताना वाडी लागलं. तिथं एक वैदू राहतो. दिसायला जक्कड म्हातारा. त्याच्या घरात पूर्वीपासून वैद्यकी चालते. तिथं जाऊन गाठ घे. त्याकडून जे औषध मिळेल ते घेऊन जा, चांगला गुण आहे म्हणत्यात तेच्या हाताला. तिथं माझं नाव सांग. पण जाताना एखादा नारळ व पंचवीस रुपये दक्षिणा घेऊन जा म्हणजे झालं. आग नवीन डॉकटर सुध्दा माहिती घेऊन जातात त्यांच्याकडून.”

“बर माझं आणखीन एक काम आहे. ही आमच्या गावची सुनिता हीचा मागं ऊस पेटला. व नवरा तवाठावणं खुळ्यागत करायला लागला. तवा त्यावर उपाय सांगा.”

तेव्हा तो म्हणाला, “ बाळ सुनिता एखाद्या फुलाच नाव सांग.”

सुनिता म्हणाली, “ आ आ … तांबड फूल.”

देवऋशी म्हणाला, “ हे आणि कोणतं फूल म्हणायचं.”

सुनिता म्हणाली, “ ते हो गणोबाला घालतात ते.”

“ जास्वंदीची म्हण की.” देवऋषी उत्तरला. त्यानं सूनिताच्य पुढ्यात एक पाट मांडला. व म्हणाला, “ शेजारी ठेवलेल्या ताटातील चार तांदळाचे दाणे घे. व इथं ठेव.”

सुनिता ने ते ठेवले. तो जोड्या जुळवू लागला. व बडबडू लागला, “ जर घरच्या देवाच असेल. शेता भातातील असेल तर जुळू दे.”

दाणे जुळले नाहीत. मग त्यानं दुसरा कौल लावला. असे करत करत शेवटी माहेरच्या देवाचा नदीचा सात देवींचा राग निघाला.”

सुनिता म्हणाली, “ पण आमच्या गावात कुठलच सात देवीचं मंदिर नाही.”

तेव्हा देवऋषी म्हणाला, “ हे बघ तुला कधी स्वप्नात पाणी आलतं काय?”

सुनिता म्हणाली, “ परवाच आलत , आमच्या गावची सरल्याका व पोरी धूणं धुत्याल्या नदीवर दिसल्या.”

तेव्हा तो म्हणाला, “ मग तूझ्या अंगावर सात्या असरा आहेत बघ. त्याची सांगड द्यावी लागली बघ. आधी ती दे. मग माझ्याकडं ये.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ त्याला आणखी काय काय लागतं.”

तेव्हा मालू म्हणाली, “ हे बघ मला सगळं माहीत आहे. मी सांगते तुला.”

असे म्हणून ती उठली. व सुनिता व मालू देवऋष्याच्या पाया पडल्या. व पंधरा, पंधरा रुपये दक्षिणा ठेवून तिथून बाहेर पडल्या. व वाटेला लागल्या. आता दुपारचे चांगलंच दोन वाजले होते. उतरण उतरून त्या वाडीत आल्या. गावातील लोकांना विचारत विचारत त्या पुढे त्या वैदुच्या घरी गेल्या.तिथं जाण्याआधी त्यांनी किराणा दुकानातून एक नारळ घेतला. व त्या वैद्याच्या घरात गेल्या.

तिथं गेल्यावर मालू म्हणाली, “आम्हाला जोतबा देवऋष्यानं पाठीवले. तुमच्याकडून औषधं घ्यायला.”

तेव्हा तो म्हणाला, “ तुम्हाला कुठल औषधं पाहिजे हाय.”

तेव्हा मालू म्हणाली, “ माझा नवरा दारू लई पितो. तवा दारू सोडायचं औषध हवंय.”

तेव्हा वैद्याने त्यांना जोत्यावर बसायला सांगून तो आत मध्ये गेला व एक पुडी घेऊन आला. व मालुला म्हणाला, “ हे बघ नवऱ्याला न कळता त्याच्या जेवणातून वा पाण्यातून दे. थोडा त्रास होईल. पण आपण औषध द्यायचं थांबवायचं नाही. सोडल दारू. संपल की ये पुन्हा एक दोन पुडीत काम होईल.” मालून ते औषध कंबरेवरच्या कडोसरीत लपवले. व ती सुनीताला म्हणाली, “हे बघ सुने ही गोष्ट तुझ्यात व माझ्यातच. ह्या कानाचे त्या कानाला कळता कामा नये.”

असे म्हणून मालूने त्या वैद्यापुढे पंचवीस रुपये ठेवले. व एक श्रीफळ ठेवून ती त्यांच्या पाया पडली व म्हणाली, “ वैद्यबुवा तुमच्या बोलण्याला यश येऊ देत.” व त्या दोघी गावच्या वाटेला लागल्या. गावात यायला चांगलीच संध्याकाळ झाली. गावात आल्यावर मालू ही आपल्या घरला निघून गेली. व सुनिता आपल्या घरला आली. घरात आल्यावर सुनिता न्हाणीघरात गेली. व चुलिवरल्या डेरक्यातील पाणी घेऊन. तिन हात पाय खळखळ धुतल. व घर लोटायला घेतलं. बघता बघता तीन घर स्वच्छ करून जनावरांचे शेण काढले. चूल शिलगावली. तेवढ्यात शेताला गेलेली तिची सासू व जाऊ आली. सुनिताने चहा केला व त्यांना दिला.

चहा घेत सासुन विचारलं, “ काय म्हंटला ग देवऋषी.”

“ काय नाय माहेरच्या देवाचा राग हाय म्हण.”

“ कोणत्या देवाचा राग गं.”

“ साती असरांचा हाय म्हण. जत्रा करा म्हणतोय.”

तेव्हा सासू म्हणाली, “ म्हणजे हाय सात आठशेला भुर्दंड.”

“ मग कराया नको.”

“ करा की म्या काय नको म्हणतोय पण..”

“ पण काय.”

“ आम्ही पण त्याच नदीच्या काठाला राहता व माझा माहेरपण त्याच व्हळीला हाय. आमची काळ्याची पांढरी झाली पण नाही आम्हाला कवा राग निघाला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “सगळ्यांचं काय सारखच असतय व्हय.”

असे म्हणून सुनिता स्वयंपाकाला लागली.

थोड्या वेळानं मालू सूनीताच्या घरला आली. थोडा वेळ गप्प झाली. नदीची जत्रा करायच ठरलं. मालूनं कोण कोणते साहित्य लागणार याची माहिती सांगितली. त्याच टिपण केलं गेलं.

घरला जाताना मालू म्हणाली, “ हे बघ सुने उद्या कडगावचा बाजार हाय. तवा मी सांगितलेलं साहित्य घेऊन ये. मग मी काय करायचं ते सांगते.” असे बोलून मालू घरला निघून गेली.

दुसरा दिवस उजाडला. सुनिता उठून कामाला लागली. संपूर्ण घरकाम करून ती व तिची जाऊ जेवणासाठी बसली. इतक्यात बाहेर मुले घेऊन गेलेली तिची सासू आली. व तिला म्हणाली, “ हे बघ सुने दूधाच आलेलं बील मी कपाटात ठेवलंय. तवा त्यातील पैसे घे. व कडगावच्या बाजारातून तुला सांगितलेलं साहित्य व बाजार करून ये. व जाताना धृपदेला पण घेऊन जा. म्हणजे एकीला दोघी असलेल्या बऱ्या.” असे म्हणून ती कडेवरील बाळाला खेळवाय लागली.

थोड्या वेळानं धुणं भांडी आटोपून सुनिता व तिची जाऊ धृपदा नवी साडी नेसून त्या कडगावच्या बाजाराला निघाल्या. कडगाव जवळ असलेने चालत चालत कुठेतरी झाडाखाली थांबत कशाबशा त्या दोघी कडगावच्या पेठत आल्या. संपूर्ण बाजार फिरून झाल्यावर त्यांनी थोड माळवं विकत घेतलं. व त्या पुढे सरकल्या. बाजारात एके ठिकाणी झाडाखाली बसलेल्या बुरडाजवळ आल्या. सुनिताने बुरडाला उतार्याच्या शिबड्याचा भाव विचारला.तर तो म्हणाला, “ पंचवीस रुपये.”

तशी धृपदा म्हणाली, “ काय मामा तुला काय आणि पोरी वाटलाव तवा असा कसा भाव सांगालाईस ऐकू येतय नव्ह. आम्ही शिबड्याचा भाव विचारतोय दुर्डीचा नाही.”

तेव्हा तो म्हणाला, “ मी पण शिबडयाचाच भाव सांगतोय.”

तवा सुनिता बोलली, “ शिबड्याला पंचवीस, त्याच्यासंग तुझा पण भाव सांगतोस काय.”

तेव्हा तो बुरुड म्हणाला, “ मला म्हाताऱ्याला कोण विकत घेतय. परवडत असल तर घे नाहीतर हो पुढे.”

शेवटी सूनितान भाव वरखाली करून शेवटी त्याला म्हणाली, “ दहा रुपड्यांला देते बघ.”

तवा तो म्हातारा म्हणाला, “ दहा रुपयाला गुढीची काठी पण येत नाही. व शिबड कस देऊ. मुलुख महाग काठी नानिवळ्याच्या व्हळीसन आणली. आणि मला काय बाई विसाच्या खाली द्यायला परवडत नाही.”

तेव्हा द्रुपदा म्हणाली, “ नानिवळ्यासन काठी आणायला वेदगंगेच्या शिवारात काय दुष्काळ पडलाय काय.”

तरी देखील म्हाताऱ्या एक रुपया कमी केला नाही. तेव्हा सुनिता म्हणाली, “ राहु देत चलं धुरपा आपल्या शेजारच्या रामू आजाकडून घेऊया वळून.” असे म्हणून त्या पुढे निघाल्या. त्यांना जाताना पाहून म्हातारा ओरडुन म्हणाला, “ ये बाई घे.” अस म्हणून त्यानं ते शीबड दहा रुपयाला विकलं. तशी धुरपा म्हणाली, “ मगाशी कशाला आडवेडं घेत होतास, तुझा काय म्होतुर होता काय, म्हणत्यात ना नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही.”

तेव्हा तो म्हातारा म्हणाला, “ धंदा करायचा म्हणजे असं वागावच लागत. मी जर मगाशी दहा रुपये म्हणलो असतो तर तू पाच रुपयाला मागितलं असतस.म्हणून लेकी वीस रुपये म्हणालो.”

शेवटी शिबड घेऊन त्या पुढे कोंबडी बाजारात आल्या. एका बाजूनं भाव विचारत त्या निघाल्या. कुठे शंभर तर कुठे एकशे वीस असा दर छोट्या पिलांचा ऐकूण त्या थक्क झाल्या. शेवटी त्या दोघी एका घेवारनीजवळ आल्या. तिच्या जवळील पिले जरा मोठी वाटली तवा सूनिताने भाव विचारला. तर ती बाई म्हणाली,” दीडशे रुपये जोडी.” तेव्हा सुनिता म्हणाली, “ काय किलोभर तरी मटण पडल काय तेच.”

तेव्हा ती म्हणाली, “ किलोभर मटणासाठी घ्यायच नसत देवकाची किंमत लावायची नसतीया.” तेव्हा धृपदा म्हणाली, “ व्हय देवकाची किंमत लावायची नसतीया पण तू आता कोंबडीच्या बारक्या पिल्लांना पण जर बकऱ्याची किंमत लावालियास तर कस होईल. सोन्याचा मुलामा लावलीस काय त्या पिल्लांना.”



शेवटी सूनिताने घासाघीस करून एकशे एक रुपयाला ती दोन कोमडा व कोमडीची पिल्ली (सांगड) घेतली. अशा तर्हेने त्या बाजार करून घरच्या वाटला लागल्या.

घरात आल्यावर त्याने सगळा बाजार व्यवस्थित लावला. व जत्रेला आणलेली सांगड कोंबडीची पिली त्यांनी डालग्याखाली झाकली. दुसऱ्या दिवशी सूनितेनं आपल्या माहेरी निरोप धाडला की ती मंगळवारी नदीची जत्रा करायला येणार आहे म्हणून.तेव्हा सगळी व्यवस्था लावायला सांगितलं. मंगळवारचा दिवस उजाडला. सूनितानं आपल्या घरातील सर्व कामे आटोपली व तिने आपल्या मुलांना बोलवले. व आपण मामाच्या गावाला जायचं आहे. जत्रा करायची आहे. तेव्हा आज शाळेला जाऊ नका. मी गुरुजींची परवानगी घेतली आहे. तवा ती मुले खुश झाली. व सारे काही आटोपून तिने आपल्या मुलांना व आपल्या जावेच्या मुलांना घेऊन सासऱ्याला घेऊन ती माहेरच्या वाटेला लागलीत जाताना तिने प्रत्येकाच्या हातात काहीना काही वस्तू दिल्या.तिचा नवरा नंतर येणार होता. थोडं साहित्य दुर्डीत बांधल. ती आपल्या डोक्यावर घेऊन ती सर्व लटांबर घेऊन निघाली. तिचं गाव थोड्याच अंतरावर होतं. गावाला जाणारी वाट शेतातून जात होती. शेतातून जरा चालत उठत बसत ती सर्व झाडाखाली विसावा घेत. माहेराला आली. पोचल्यावर वेशितंच तिला पारू जाधवीन शेताला राकुंडा टाकायला निघालेली भेटली. सुनीताला बघून म्हणाली, “ सुने आज अचानक कशी काय उगवलीस .”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ त्या लाईटीच मड बसवलं. तारांच्या स्पार्कींगन ठिणग्या पडून आखंड फड जळला. नव्हरा खुळ्यागत करायला लागला. तवा देवऋष्याला विचारलं, तवा नदीचा राग निघाला. म्हणून जत्रा करायला आलो. बघ.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ लई वाईट झाल बघ. तुझा फड पेटला खरं. जनीला माहीत असून एक शबुद बोलली नाही बघ म्हातारी. आता तू म्हंटल्यावर आम्हाला ठाव.”

“ पण तुला सांगते तुला जत्रा भराय यायची नाही. तवा तू संध्याकाळी आंबककाला बोलावं. ती तुला सांगेल काय करायचं ते. मी जाते शेताला.” ती आपल्या वाटेला लागली. सुनिता गावात आली. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाशी बोलत चालत शेवटी ती आपल्या माहेरच्या घरात आली. तिन आल्यावर आपल्या भावजयीला डोक्यावरील बुट्टी उतरायला सांगितली. बुट्टी उतरल्यावर भावजयीन पाणी दिलं. मुले हात पाय धुवायला न्हाणीघरात गेली. हातपाय धुतल्यावर सर्वांनी चहा घेतला. मुले परस दाराला खेळायला गेली.

 थोड्या वेळाने सूनिताची आई जी दुकानाला गेली होती.ती परत आली. तिन सुनीताला पाहिलं. व म्हणाली, “आलीस व्हय लई बर झालं. मी अंबककाला बोलले संध्याकाळी येईल ती, सगळं ठीक हाय नव्हं, पोर कुठं हाईत.”

तवा सुनिता म्हणाली , “ पोर होय, हाईत परडला खेळत्यात. व तू कशी हाईस. आबा कुठं दिसत नाहीत मी सांगावा पाठवलाय नव्हं.”

तेव्हा जना म्हणाली, “ तुझ्या बाला काय एकच काम हाय का सगळा व्याप, ऐतीलच थोड्या वेळात. जावईबापू कुठं हाईत. मामंजीला पाणी दे म्हणावं. व चहा टाक.”

“ते झाली आमचं बहिणीनं केव्हाच चहा दिलाय.” सुनिता म्हणाली.

तशी ती न बसता तीनं पिशवीतील सांगड बुट्टीखाली झाकली. व वहिणीकडून पोतिरा घेऊन चुलीला मारू लागली.तेव्हा वहिनी म्हणाली, “ वनसं मी मारते की.”

तस ती म्हणाली, “ हे बघ सांजपतूर काम व्हाय पाहिजे. मी करते तू कर दुसर काम. तसा तिनं पोतिरा देऊन चुलीला हळद कुंकू लावलं. व चुलीत विस्तू पेटवला. व आपल्या मुलग्याला संजाला हाक मारली. व अंबककाला बोलवण पाटीवल. पोरग गाडी कशी चालवतात तस ब्रुम ब्रुम् करत पळाल. तो पर्यंत तिचा नव्हरा पण पोचला होता. त्याला चहा पाणी भावजयीन दिलं.

इतक्यात अंबकका घरामधे आली. हिरवगार लुगडं व कपाळाला लालभडक पंढरपुरासन आणलेलं कुंकू, गळ्यात चीत्ताक व घनसर मंगळसूत्र असणारी ही आंबक्का चालायला लागली की मासोळ्या छमछम वाजायच्या. अंबिका मुरका मारतच आत आली. तिला बघून सुनिता व तिचा नव्हरा दोघे पाया पडलीत.

आंबक्का सुनिताच्या नव्हऱ्याला म्हणाली, “ हे बघा जावईबापू हात फिर तिथे लक्ष्मी वस म्हणत्यात. फड पेटला नव्ह पेटूदेत. अशी डोचक्यात राख घालून चालत नाही संसार म्हंटला की चढण बुडण आलच. तवा मागलं सगळ विसरायचं व पुढली वाट धरायची. एका वर्षी बुडल म्हणायचं. पुढं तरी तारल नव्हं. ज्यान जन्माला घातलं. तेला काळजी नाही का? तो ज्याचा त्याचा शेर घालूनच पाठवतो झालं गेलं गंगेला मिळालं अस म्हणायचं व पुढली वाट चालायची.”

सुनिताचा नव्हरा गप पाटावर बसून ऐकत होता.

सुनिता म्हणाली, “ आता तूच सांग चांगल्या शहाणपणाच्या गोष्टी, आमचं ऐकतय कोण.”

अंबिका म्हणाली, “ सुने चल बघता बघता सांज होईल.” असे बोलून त्या जत्रेच्या तयारीला लागल्या. सुनिता आंबकका व सूनिताची भावजय यांनी सर्व जेवण केलं. व एका हऱ्यात भरलं. मुंज्याचा निवद, उतराच शिबडं देखील तयार केलं. तोपर्यंत चांगलच सांजेच सहा वाजले होते. म्हातारीनं शेजारच्या मालुबाईच्यातील बत्ती पण आणली होती. तेवढ्यात म्हातारा घरात आला होता. शेतातून आल्याने त्याच आंग घामानं चांगलच थबकत होत. न्हाणीघरात जाऊन त्याने सगळं आंग धुवून घेतल. अंगातील मळकी कापड काढून टाकली. व दुसरी चढवली. व तो जावयाजवळ जाऊन बसला. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. म्हातारीनं भावकीतल्या बायाना व शेजारच्या बायांना हळदीकुंकू लावायला बोलवले. अंबककाने सर्व मांडणी केली होती. थोड्या वेळाने सर्व बायकांनी हळदी कुंकू लावले. व बाया एकमेकींना लावू लागल्या. इकडे अंबक्का घुमायला लागली. तशी मालू म्हणाली. “ अंगात आलं वाटतं.”



आंबक्का आंगात काढून बडबडू लागली. तिचे ते डोलने पाहून सूनीताची पोरं कावरी बावरी होऊन बघत व बाहेर जाऊन हसत. थोड्या वेळाने सर्व तयारी झाली. सुनिताच्या नवऱ्यानं तिच्या अंगावरुन उताराच शिबड उतरून तो वाटेला लागला. पाठोपाठ इतर जणांनी पण बाकीचं सामान उतरून घेतला. व नदीच्या वाटेला लागलीत. सुनिताची व तिच्या दिराची पोर पण माग लागली होती. चांगलाच अंधार पडला होता. सूनिताच्या बापानं बत्ती पेटवली. तशी बत्तीच्या उजेडात सगळी चालायला लागलीत. अंधार पडल्यामुळे दिवसांची हिरवीगार दिसणारी झाड रात्री काळी दिसत होती. आधुनमधून काजवे चमकत होते. रातकिडे किरकिरत होते.अंधारातून पायाकडे बघत मुलांना घेऊन नदीवर आलीत.सर साहित्य ठेवून दोघांनी चूल मांडली. सूनिताच्या नव्हऱ्यान आपल्या हातातील शीबडं नदीच्या वाहत्या पाण्यात सोडलं. ते हळूहळू पुढे पुढे जाऊ लागल. सूनिताच्या नव्हऱ्यान चुळ भरली. व तो नदीच्या काठावर आला. सूनीताच्या बापानं सात खडं पुजलं. व श्रीपती व गण्याला मुंजाचा नीवद उंबरणीखाली ठेवायला सांगतलं. ते तिकडे जाऊन ठेऊन आले.



 सूनितेच्या आबान पोरांना कोंबड्यांची सांगड आणायला सांगितली. तसं सुनीताच्या पोरान सांगड आणून दिली. सांगडीतल्या पिल्लानी चावचाव करायला सुरुवात केली. व फडफड चालवली. त्यांचं पाय सोडलं. पिलांना पायाखाली धरलं. व हणमाला खुरपे द्यायला सांगितलं. तस हाणमा खुरपे घेऊन आला. खुरपे घेऊन म्हातार्यांन त्या तलंगेच व कोमड्याच काम तमाम केलं. व त्यान नदीकडं पुढा करून म्हणाला, “ वाकडं तिकडं देवा तुला साकड. कसपण घे, गोड मानून घे. व माझ्या लेकीला सुखी ठेव.” व तो म्हातारा नदीच्या पाया पडला. सगळी मंडळी जेवणाच्या तयारीला लागली. सूनितेची मूल लहान असल्याने बाजूला बसून सगळ्यांची गंमत पाहत होती.

सुनिताच पोरग संज्या सुशाला म्हणाला, “ आर, हे सगळ देवाक माणसांनी केलं. त्यांच्या चैनीखातर.”

शेजारी बसलेला सुशा म्हणाला, “नाहीतर काय त्या कोंबडीच्या पिलांचा जीव जाणार. व यांना म्हणे सुख मिळणार. “

इतक्यात शेजारी बसलेला धृपदेचा बाजा म्हणाला, “ तुम्ही कशाला बडबडता आपल्याला खायला मिळतंय नव्ह. गप्प बसा अशा गप्पात मुले रंगून गेली. इतक्यात बाजाच लक्ष हाणमादाकड गेलं. तो शेजारच्या सुशाला म्हणाला, “ ते बघ तो हणमादा रडतोय.”

तेव्हा सुशा म्हणाला, “ काय काका पेंडीच वज्ज पटापट कापत्यासा व आता साधा कांदा कापताना रडतासा.”

तेव्हा हणमादा म्हणाला “ लेका ये इथं कांदा कापायला म्हणजे कळल तुला, बायकांची काम बायकांनी करावीत. तिथं पेंडी कापणारा गडीसुधा चालत नाही. गप बसतोस काय तिथं .”

तसा सूशा गप्प बसला.

थोड्या वेळात कोणतरी बॅटरीचा उजेड पाडत येताना दिसले. थोड जवळ आल्यावर पोरासनी दिसलं, शिंद्यांचा नागुअण्ण व संजाचा काका म्हणजे सुनीताचा दीर येताना दिसली. संजाच्या काकानं जरा चांगलीच घेतली होती. तो धडपडत कसा बसा त्यांच्याजवळ आला. नागू अण्णा कडे बघत सुनीताचा बाबा म्हणाला, “ काय नागूआण्णा उशीर केलास.”

तवा नागुआण्णा म्हणाला, “ काय करू मामा माझ्या माग काय एक कटकट हाय. एकातन बाहेर पडावं तर दुसर दत्त म्हणून उभा. शेतातून येऊन बघतोय तर पोरग्यान म्हस सोडली नदीच्या पल्याड गेलती. तिला घरात आणून बांधतो. तवर शेजारी पुष्प्यान बायकोला चेचली. त्यांची भांडण सोडवून रिकामा झालो. तोवर म्हातारी कट्टीवरन घसरली. तिला दवाखान्यातन आणली. आन इकडं आलो बघ.”

इतक्यात संजाचा काका म्हणाला, “झाल काय नाही जेवण.”

तेव्हा नागूआण्णा म्हणाला, “ पावनं झेपत नाही तर घेता कशाला. मगाठावण त्या म्हशीनं दंबवल. व येताना या बाबांन मी होतो म्हणून बर. नाहीतर कुठतरी पडल असत वाट कडला. रस्त्यानं कुठं धड चालतंय व्हय याला काकतच घ्यायचं राहीलतं बघ. कसा बसा आणलाय हेला.” तेव्हा एकच हशा पिकला. थोड्या वेळानं जेवण तयार झालं. निवद दाखवला. व सर्वजण जेवायला बसलीत. कवळ्या कोंबड्याचा व तलंगेच्या रश्यावर सर्वांनी ताव मारला.जेवताना मुलांचं लक्ष मात्र समोर बसलेल्या बेवड्या काकाकडं लक्ष होत. तो चांगलाच फतकल मांडून बसला होता. त्याचा हात कधी जेवत्याल्या पत्रावळीत तर कधी बाजूच्या मातीत जात होता. तो तसाच घास ढकलत होता.

तेची तऱ्हा बघून नागूआण्णा म्हणाला, “ जेव की नीट, काय माती खातोस कशाला आलया जन्माला देवाला ठावं.”

त्याची ही तऱ्हा पाहून सूनीताच्या नव्हऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. व तो म्हणाला, “ काय सांगू नागू अण्णा याच्या दारुमुळं सगळ्या संसाराची माती व्हायला आलीय. नाहीतर यांच्यासारखा माणूस नाही.” अस म्हणत त्याने आपल्या बेवड्या भावाला घास भरवायला सुरुवात केली.”

ते बघून नागू अण्णा म्हणाला, “ इथच चुकतंय बघा तुमचं, चांगल मुंगणीच्या शिवारातल्या झाडाला बांधाय पाहिजे, रातसारी डोंगळ्यानी खाल्ल म्हणजे समजल.”

असे बोलत चालत त्यांनी जेवणावर ताव मारला. व शेवटी ती सर्वजण आटोपून शिजवलेली भांडी रीती करून व साहित्य घेऊन घरच्या वाटेला लागलीत. इकडल्या तिकडल्या गप्पा मारत ती सर्व जण घराकडे निघाली. पोचल्यावर त्यानी घरात जाण्यापूर्वी दारात सगळ्यांनी आपापल्या हातपाय धुतले. व घरात गेलीत.

दुसऱ्या दिवशी सुनिता सर्व आटोपून सासरी जायला निघाली. सर्व मोठ्या लोकांना नमस्कार केला. आईला कडकडून भेटली. व पुन्हा दुर्डी आपल्या डोक्यावर घेतली. दूर्डी घेताना जड लागली. तेव्हा ती म्हणाली, “ आई दुर्डित काय ग.”

तर जना म्हणाली, “ जरास तांदूळ बांधल्यात हावळं, पोरसणी चार आंबोळ्या करून घाल.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ कशाला उगाच बांधलस तिकड काय मिळतं नाहीत व्हय.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तसं नाही लेकी माहेरच्या दाण्याला प्रेमाचा गोडवा असतोया. दिवून च्या दिवून तुला एका शेतकऱ्याच्या गळ्यात बांधली. आम्हावाणी तुझं पण हाड या वेदगंगे काठच्या तांबड्या मातीसंग झुजतच जायचं. तवा आईच्या मायेनं दिल्यात ते घेऊन जा.”

 असं म्हंटल्यावर सूनिताचं डोळ पाणावल. ती म्हणाली, “ शेतकरी नव्हता जरी असला तरी सुपारीच सुदिक व्यसन नाही बघ. मी सुखात हाय बघ.” अस म्हणत तीन दुर्डी डोक्यावर घेतली. भावजयीन जाताना हळदीकुंकू तिच्या हातावर दही साखरेची चिमट ठेवली. ती घेत सुनिता व तिचा नवरा मुलांबरोबर चालती झाली.

वाटेत त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. बेवडया भावान घातलेला गोंधळ त्यामुळे त्याला गावी रात्रीचं पाठवलं होतं. आपल्या दिराच्या पोरांकडे बघत सुनितानं मनात ठरवल. मालूच्या नव्हऱ्यासारखं धृपदेच्या नव्हर्याची पण दारू सोडवायची.असा निश्चय करून ती गावच्या वाटेला लागलीत.

लेखक : निशिकांत हारुगले.

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...