६) रक्ताच नातं
लेखक : निशिकांत हारुगले.
एम. ए. बी.एड.
सुगंधा तशी पेठेच्या माळावरल्या वाडीत जन्मलेली घरची परिस्थिती बेताची असलेने व मुलीची जात असल्याने तिच्या शिक्षणावर म्हणावा तितका खर्च तिच्या बापानं केला नाही. त्यामुळे घराजवळच्या पोरीसंगे खेळण्या बागडण्याच्या वयात तिला शेतात राबाव लागत असे. कधी कधी लाकूडफाट्यासाठी डोंगरात देखील जावे लागे.
राबत कष्टतच तिचं बालपण गेलं. वयात आल्यावर इकडून तिकडून स्थळ तिला येवू लागली. पण मुलाकडील मागणी जास्त असे. व घरची परिस्थिती नाजूक असलेने मंगळसरीला लागणारे पैसे देखील तिच्या बापाने कर्जाऊ घेतले. सुगंधेच राबन व लाघवी बोलणं यामुळे शामा कुंभाराच्या बायकोन आपल्या माहेरच्या गावाकडून स्थळ काढल.
शामा कुंभाराची बायको ही दूधगंगा काठची असल्याने तिनं ऐनी कडल्या वाडीतील एक स्थळ काढल. नव्हरा दिसायला सावळा होता. पण देखणा शेतकरी होता. त्याची परिस्थिती बेताचीच असलेने त्याची मागणी पण जास्त नव्हती. तो कष्टाळू असलेने सुगंधेला सुखात ठेवल म्हणून तिने ते स्थळ काढले.
शेवट पै पाहुण्यांनी ठरवून सुगंधेच लग्न जमवून गावातली गणपतीच्या देवळात अक्षता टाकून एकदासी सुगंधेला उजवली.
सुगंधा आता सासरी नांदु लागली. घरची शेती करत थोडीफार बाहेरची शेती पण ते करु लागले.सुगंधेची सासू हौसा ही खूप साधी होती. मात्र तिचा दीर खूप शिकला असल्याने तो मास्तर झाला होता. जाता येता तो सूगंधेच्या नव्हऱ्याला बोलत असे. सुगंधेला खूप वाईट वाटत असे. शेवटी तिला राहवल नाही. व ती नव्हर्याला बोलली, “दुसऱ्याच्या जीवावर कधी संसाराचा गाडा हाकता येत नाही, आपलं राबन कधी चुकतंय का? हा बैलोबा जरी मास्तर असला तरी आपल्याला कधी उपयोगात पडणार नाही. आपण राबायच व याच्या हातात सत्ता हे काय बरोबर नाही. आपल्याला त्याची पै पण नको. तवा आपण वेगळं झालेलं बर.”
तिन वेगळं मागताच तिच्या दिरानं भांडण उकरून काढले. एके दिवशी सुगंधा म्हसीची धार काढत होती. तिचा दीर बाहेरून टाचा आपटतच घरात आला. व आईजवळ येऊन म्हणाला, “ वाटणी पाहिजे म्हणते ना, घे म्हणावं तिला वाटणी. लई परपंजा करुन दावती मला, कर म्हणावं. उद्याच बोलवतो पंच व करतो वाटणी. सुगंधा हे सारं धार काढताना ऐकत होती. नव्हरा घरात नसलेने तिनं गप्प बसायचे ठरवले. तिचा नवरा दुसऱ्याच्यात कामाला गेला होता. संध्याकाळी घरी आल्यावर सुगंधेचा नव्हरा न्हाणी घरात हातपाय धूवाय लागला. तेवढ्यात बाहेर गेलेला तिचा दीर मारुती आला. व आईजवळ जाऊन मोठ्यानं बोलाय लागला.
उद्याच पंच बोलवतो. कर म्हणाव वाटणी. माझी बायको माहेराला गेलीय बाळंतपणाला तवा मी तयार हाय. माझ काय पडत नाही.”
सुगंधेचा नव्हरा धनाजी न्हाणीघरातून हातपाय पुसतच बाहेर जोत्यावर आला. भावाला बडबडताना बघून तो म्हणाला, “हे बघ मारुती तुझ्या वागण्यात व बोलण्यात खूप अंतर हाय. गावच्या चारचौकडीच ऐकतोस व घरात येऊन नको तसं बोलतोस. नोकरीला लागल्यापासून एक पाई देखील दिली नाहीस घरात व कसल्या लाखाच्या कोटीच्या गप्पा मारतोस.”
तवा मारुती गप्प बसला. दुसऱ्या दिवशी पंच बोलावण्यात आले. व वाटणी करण्यात आली. पंचामधिल तिघे मास्तरच्या सलगितले होते. त्यानी वाटणी करताना गावातलं घर मास्तरला दिलं. व गावाबाहेर असणारा गोठा व त्या मागची पाच गुंठे जागा सुगंधेला दिली गेली. शेताची वाटणी करताना तगाच काळवाटाची जमीन मास्तरला दिली. त्यातील एक दहा गुंठे ओपा फक्त धनाजीला दिला. त्या बदली गावच्या वरील जमीन धनाजिला दिली. वैरणीचं रान धनाजीला पसंत न पडलेने पंचातील गणू अण्णाला तो म्हणाला, “ गणू आण्णा घराच्या वाटणीत मला डावी बाजू दिल्यासा मी काही बोललो नाही. शेत देताना देखील डाव उजवं केला. तरी मी काही बोललो नाही. आता पेंडीच्या वावराची सरळ वाटणी झाली पाहिजे. तेव्हा गणू अण्णा म्हणाला, “ मगाठावनं मी गप्प होतो. बाकीच्यांच ऐकलं आता नाही, आता पेंडीच्या वावरातल रान जरा जादा आम्ही धनाजीला देणार. शेवटी वाटणी झाली.
मास्तर मात्र डूरक्या बैलासारखा धनाजिकडे बघत म्हणाला, “घे वावर नाहीतर त्यात काय पेंडिच कापणार नव्ह. पयानाच्या चार काड्याशिवाय काय मिळणार आहे त्यात.”
शेवटी स्टॅम्प करण्यात आला. व समदी वाटणी झाली. म्हाताऱ्या हौसेला मात्र अन्न गोड लागणा झालं. धनाजीला दिलेली वाटणी तिला पसंद पडली नाही. नव्हरा मेलेला म्हातारं झाड काय म्हणलं. शेवटचं दिस आलेत तसे कंठायचे
घरातील सुगंधेच्या लग्नात आलेल्या चार भांड्यावर तांदळाच्या काही दाण्यावर व शेरभर चटनिवर सुगंधेला वाटणी देण्यात आली. घरातील मुर्हा म्हस जी मास्तरन कोकणात असताना घेतली होती. ती पण मास्तरन घेतली.
सुगंधा मात्र शांत राहिली व आपल्याला दिलेल्या घरात तिनं आपला संसार मांडला. त्यापूर्वी गावातील आपल्या साखळीच्या माणसांच्या मदतीने ते घर शेकरुन घेतले. सारवण सूरवण करून आपला संसार थाटला. तिचा नवरा व ती आपले शेत बघत दुसऱ्याच्या शेतात राबत. ते आपला संसाराचा गाडा हाकू लागले.
सुगंधेला बघून तिचा दीर इतर बायकांना म्हणत असे की कर् म्हणावं परपंजा उपाशी राहून. तेव्हा सुगंधा म्हणत असे, “ तूझ्या ताटाखालचं मांजर होऊन राहण्या पेक्षा उपाशी राहून ध्याड काढेन मी.”
तो तिच्याकडे डोळे मोठे करून बघत असे. सुगंधेची वाटणी झाल्याचे तिच्या माहेरी समजले. तेव्हा तिचा बाप तिला भेटायला चांगल मणभर तांदूळ व शीधा घेऊन आला. वाटणी चुकीची झाल्याची लक्षात येताच तो जावयाला म्हणाला, “ काय हो पावनं कोणती कोल्ही आणला होता वाटणी करायला.”
तेव्हा धनाजी म्हणाला, “ मामा झाल ते झाल वाटणी म्हंटल्यावर जरा इकडं तिकड व्हायचंय मी मला दिलेल्यात समाधानी आहे. पुढं राबून आपण मिळवायचं.”
जावयाचं बोलण एकूण सुगंधेचा बाप आपल्या बरोबर आणलेले पैसे देत म्हणाला, “ हे बघा जावईबापू यातून एक म्हैस घ्या. व चालवा आपल रहाटगाडगं. माझ्याकडून जमेल तितकी मदत मी करेन.
त्या दिवशी मुक्काम करुन सुगंधेचा बाप सकाळी जावई व मुलीशी हितगूज साधून तो आपल्या गावाला गेला.
सोसायटीचे एक प्रकरण करून व मामाने दिलेले पैसे याच्यावर दोंन म्हशी घ्यायचे धनाजीनं ठरवल.
घरला लागूनच मागील बाजूला त्यानं एक छप्पर काढलं. दोन-चार मेडक्या लाऊन त्यावर बांबू टाकून पत्रे अंथरले. व डोंगराच्या चीव्याचा कुड केला. व छानसा गोठा तयार केला. नदीच्या वत्ताडाचा बुरुंब टाकून त्यावर फरसी घातली. व दर वाजा तयार केला. आपला मित्र गजा चव्हाणाला घेऊन तो मुरगूड व निपाणीचा बाजार फिरून आला. इकडल्या तिकडल्या बाजारात चौकशी करून म्हशीचे दर काढले. ते चांगलेच भडकलेले होते. असा एक आठवडा गेला.
एके दिवशी सुगंधा आपल्या शेजारच्या तारुबाई संग भांगलानिस गेली असता. भांगलताना तिनं तारुबाईपुढे विषय काढला. तवा तारुबाई म्हणाली, “तुझ्या नव्हर्याला सांग कशाला मुरगूड निपाणीच्या बाजाराला जातोस. त्या मोठ्या म्हशी तुला परवडायच्या नाहीत. तू ऐनीचा डोंगर उतर व सरळ कोकण्या कडगावच्या बाजाराला जा. तिथं येणाऱ्या थकिव कुडाळ मुलखाच्या रेड्या बघ. तुला परवडेल.
आता आमच्या घरातील म्हस बघितलीस नव्ह माझ्या नव्हऱ्यान जवा आणली. तवा तिच्या आंगावर चिमुटभर मास नव्हतं. आमच्या हळदीच्या पावण्यानं बघितली. तेव्हा म्हणाला, “ पावणी बाई झूल नाहीतर वाकळ घाल मग दिसल गबगबीत. तुझ्याच भागातील तवा रोडकीच असायची. पण आता तिचं म्हस दोन दारातून जाणार नाही.
परवा आलता पावणा व म्हशीकडे बघून म्हणाला, पावणीबाई म्हस झ्याक केलीस. तवा मी पण म्हणाले, “ ठेवता नव्ह नाव मला व माझ्या म्हशीला. तुम्हा डोंबाऱ्यांचा संसार आम्हीच कडगाव भागाच्या पोरी करताव. व आमच्या भागातील म्हशींच दूध पिऊन तुमची पोर मोठी झाल्यात. तवा तो थोबाडीत मारल्यासारखा गप्प बसला.”
तवा सुगंधा म्हणाली, “होय अक्कासाब तुमच्या सारखच करते. आमचा करंबळीचा पावना हाय. त्यालाच गाठाय सांगते तो देईल एखादी छानशी रेडी घेऊन.”
तारुबाई म्हणाली, “ हे बघ पहिल्यांदा नव्हरा जातोय. म्हस आणायला. तवा तू त्याच्या हातावर दही साखरेची चिमट ठेव त्याच्या हातावर जाताना, निष्णपच्या देवीचं नाव घे म्हणावं तिच्या खोऱ्यात जाणार हाय. यावर तिचा आशीर्वाद असुदेत. असे म्हणुन चुलीतला राकूंडा अंगारा म्हणून लाव कपाळाला. अन बघ सांजपतोर तुझ्या गोठ्यात म्हस उभा राहते की नाय ते.”.
संध्याकाळ झाली. दिस बुडाला कुलकरी उडाला. सुगंधा घरी आली. घरात आल्यावर तिने आपल्या नव्हर्याला सर्व काही सांगितलं. व आपल्या माहेरी जाऊन बाबाला घेऊन करंबळीला जावा व तेथील आपल्या पाहुण्याला घेऊन बघा एखादी म्हस मिळते का?
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल आवरून तडक धनाने सासुरवाडी गाठली. सासऱ्याला घेऊन तो थेट करंबळीला गेला. पाहुण्याच्या ओळखीने त्यानं म्हस बघितली. दोन चार म्हशी बघितल्यावर त्याने त्यातील दोन लहान रेड्या ज्या नुकत्याच व्याल्या होत्या. त्या घ्यायचे ठरवले. दरात योग्य पडल्याने त्याने त्या घेतल्या. व एका छोट्या टेम्पोत घालून घरी घेऊन आला.
घरात आणल्यावर सुगंधाने हळदीकुंकू लावून ओवाळले. त्यांना पाणी पाजलं व वैरण घातली. एकीला दोन मिळाल्याने ती खुश होती.
त्या दोन्ही म्हशी चांगल्या लागल्या. त्या म्हशींच्या जोरावर त्यांनी सुधारणा केली. सुगंधेला मिळालेलं डोंगरातील जे रान मिळालं होत . ते त्यांनी बसवून त्यात चांगल पिक घेतले. डोंगरातून जाणाऱ्या ओढ्याला समांतर फाटा पाडून त्या द्वार त्यांनी चांगले पिक घेतले.
डोंगरी पाण्यानं माळधावणीच रान चांगलंच तगाच झालं. त्यातून चांगल पीक यायला लागल्याने त्यांनी हळूहळू घरदार सुधारले. या धामधुमीत सुगंधेला दोन मुलं पण झालीत. सुगंधाचा संसार सुरळीत चालला.
पण सुगंधेच्या दिराला तिची झालेली प्रगती आवडत नव्हती. एकदिवस डोंगरातून पयान कापताना त्यानं भांडण काढल. त्या दिवशी सुगंधा व तिचा नव्हरा पयान कापायला गेली होती. इतक्यात तिथं मास्तर व त्याची बायको तिथं आली. सुगंधा व तिच्या नव्हर्याला पयान कापताना बघून तो म्हणाला, “ हे बघ दादा मला वावराची वाटणी पसंत नाही. मला पेंडीच रान कमी आलय. तवा.”
त्याच बोलण तोडत धनाजी म्हणाला, “ हे बघ मारुती तू जे रान मागितल ते मी तुला दिलं. चांगल रान घेऊन मला माळ दिलास. व सगळी वाटणी तुझ्यासारखी झाली. व आता मेलेल मड उकरून काढू नकोस. “
तेव्हा मास्तरची बायको सुगंधेला पहात म्हणाली, “ हीच्या अंगात सगळ पाणी आहे. हिनच वाटणी केली. त्यावेळी मी नव्हते. नाहीतर दाखवला आसता हिला माझा हिसका.”
सुगंधेला जावेच बोलण आवडल नाही. ती म्हणाली, “ हे बघ उगाच तुझा तोरा मिरवू नकोस. गप्प बसते म्हणून नाटकं करू नकोस. वाटणी करताना तगाच चांगल रान घातलं तुझ्या घशात. गावातील घर दिलं. व आम्ही गोठा पत्करला. तवा तू कुठं ग गेलतीस. व आता मी राबून खातोय ते बघवत नाही काय तुला..”
सुगंधेकड बघत मास्तर म्हणाला, “ माझ्या बायकोला कायपण बोलायचं नाही.”
सुगंधा, “ तर तुझी बायको राजाची लेक ना. माझ्यापुढे तुझं शहाणपण नको. चार पोरासनी शिकवतोस तुझ्या पईट आम्ही मिंद नाही. आता उगाच तोंड पिसळवू नको. राबाय नको दाणागोटा काय फुकट पिकत नाही. बायको फिरती टळो करुन लोकाची दारं पुजती.”
मारुती, “ उगा माझ्या तोंडाला बबाईमासान लागायचं काम नाही.”
मास्तराची बायको, “ तुझ्या जीवावर नाही फिरत. उगीच नको ते बोलू नको.”
शेवटी त्या दोघांचं भांडण मोठ झाल. शेवटी रागाच्या भरात धनाजीन मास्तरच्या दोन कानफाटात लावल्या. शेवटी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भांडण मिटवलं.
त्या दिवसा पासून मास्तर गप्प राहू लागला. धनाजीला व सुगंधेला वाईट वाटत होत. दिस झपाझप जात होते. त्या दिवसापासून मास्तर शांतच राही. आपल घर, शाळा व आपले शेत यातच तो लक्ष देऊ लागला. त्याच मन त्याला खात होत. वाटणी करताना आपण चुकीची वाटणी केली.
एके दिवशी मास्तर आपल्या रानातील गव्हाला पाणी पाजत होता. तवा सुगंधा व तिचा नव्हरा शेजारच्या मालूच्या रानात काडसर कापत होती. मास्तरन लाकड तोडून ठेवलेली होती. ती न्यायला शिरपा बैलगाडी घेऊन आला होता. वावरात गाडी आणण्यासाठी महादू पाटलाच्या रानातून शिरपान गाडी घातली. गाडी भरली. व परत जाताना महादू पाटलाने गाडी अडवली. व तो मास्तरसंगे भांडू लागला.
बघता बघता मास्तर व महादुची हमरी तुमरी लागली. व. महादू पाटलाने मास्तरची गळपट धरली. व मास्तरला खाली पाडलं. महादू वांड असलेने कोण त्याच्या नादी लागत नसे. सगळ्या शिवारात लोकं भांडण बघत होते.
भांडण लागल्याचा सांगावा मिळताच मास्तराची बायको तिथं आली. तिची व महादूची हुज्जत लागली. तस महादून आपल्या बायकोला हाक मारली. ती तरतरतच खालच्या ओप्यातून आली. तिनंन मास्तरच्या बायकोला मारायला सुरुवात केली. भांडणाला चांगलंच तोंड फुटल.
बघ्यामध्ये असणाऱ्या पांडू ढेकळ्याला ते बघवलं नाही. तो धावत खालच्या शिवारात गेला. सुगंधा व धना असणाऱ्या ठिकाणी आला. व धापा टाकतच बोलला.
“ वरती रस्त्याला महादूच्या वावरात मास्तर व महादूची भांडण चालल्यात. मास्तर व त्याच्या बायकोला लई मारलय.”
धनाजी व सुगंधेला रहावलं नाही. ती तडक काम टाकून धावतच वरच्या रानाकडं आली. गाडी अडवलेल्या ठिकाणी आल्यावर धनान महादुला आपल्या भावाच्या अंगावर बसलेला पाहुनी तो चिडला. व त्यान महादुला ढकलला. व गाडीतल्या गेचक्याच लाकूड काढलं व महादूच्या अंगावर धावून गेला. तसा त्यानं दोन चार लगावली.
सुगंधानन महादुच्या बायकोला चांगलीच हिसकली. व ती म्हणाली, “ बैलगाडी अडवायला तुला तालेवारणीन काढली काय. मेल्यावर काय मड्यावरून घेऊन जाणार हाईस काय. एवढ्याशा वाटपाई माझ्या दिराला मारायला आम्ही काय मेलो नाही. बघतेच कसा वाट अडवतोस ते.”
महादू म्हणाला, “ माझ्या वावरातून गाडी न्यायची नाही.”
तेव्हा धनाजी म्हणाला, “ तुझ्या वावरातन गाडी न्यायची नाही. तर मग माझ्या वावरातन पयानाच्या गाड्या वडताना लाज नाही वाटली. व आमची लाकडाची गाडी अडवतोस व्हय.”
शेवटी महादू व महदुच्या बायकोन गाडी सोडली. व ती गप्प बसली.
त्यावेळी मास्तरन आपल्या भावाला गच्च मिठी मारली. व तो ढसा ढसा रडू लागला. त्या दिवसापासून दोन्ही भावात गोडवा निर्माण झाला. व पुन्हा दुरून का असेना स्नेहबंध निर्माण झाला.
लेखक : निशिकांत हारुगले.
