वज्रा व शांतीचा अबोला
लेखक : निशिकांत हारुगले.
शाळेतून बाहेर पडलेली वज्रा शांतीसवे न बोलता घरी चालली होती. शांतीने ओळखले की वज्रा आपल्यावर रागावली आहे. तरी देखील ती मागोमाग तिला हाक मारत चालली. तशी रागाने वज्रा तिला म्हणाली, “ मला आजपासून तुझ्याशी बोलायचे नाही. तसेच तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. तुझ्यामुळे मला शिक्षा झाली. तुला काही फरक पडत नसेल, मात्र मला पडतो. तू राजाची लेक, मी मात्र गरीब बामणिन. तुझा व माझा स्वभाव विरुद्ध आहे. आपलं पटणार नाही.”
असे बोलून ती तरा तरा चालू लागली. शांतीला वाईट वाटले. कोण तरी काळजावर घाव घालत होते अशी जाणीव झाली. तिला शाळेतल्या मास्तरांचा राग आला. त्याना शुक्राचार्य म्हणजे राक्षसांचा गुरू असे म्हणू लागली. ती चालत राहिली. वज्रा पासून काही अंतर ठेवून ती चालत राहिली. गल्लीत आल्यावर तरी बोलेल असं वाटलं. पण नाही वज्रेनं तिचं नावच टाकल. शेवटी ती घरात आली. वज्रा ही गेली. घरात आल्यावर शांतीचा जीव कशातच रमेना. वडिलांनी आणलेली बाजारातून केळी ती ही खाववेना घशातून उतरेनात. काही केल्या तिचा जीव कशातच रमेना. इकडे वज्रेन घरी आल्यावर जोत्यावरील कपाटात आपले दप्तर ठेवले. आई शेताला गेली होती. आजी परसातील अंगणात तांदूळ निवडत होती. तिनं घरातील केरसुनी घेतली. व घर लोटले. नंतर गोठ्यात जाऊन शेण फेरा फेरान परसातील गारीवर बुट्टीतून टाकल. तिला पाहून रेडकी ओरडू लागली होती. धारेची वेळ जवळ असल्याने तिने तिला काही टाकले नाही. तिचा भाऊ व्यंकू शाळेतून आल्यावर खेळायला गेला होता. त्याने आजीला सर्व सांगितले होते. पण आजीने तिचा चेहरा बघून विचारायचे टाळले. तिचा व्यंकूपेक्षा वज्रेवर विश्वास होता. अंगणातील पेरवीचे पेरू आजीने काठीने दुपारी पाडले होते. वज्रा शेण काढताना आजीने चहा चुलीवर ठेवला. शेण काढल्यावर ती बावीवर हातपाय धुवाय गेली. तिथं व्यंकू खेळून आला. तो ही हातपाय धुवायला बावीवर आला होता. त्याने हातपाय धुताना वज्रीस चिडवल.” आज एका माणसाची धडगत नाही बुवा, मी आजीला सर्व सांगितले आहे.की शाळेत दोन कोंबड्या व्हरांड्यात उभ्या होत्या. त्यातील एक बामणाची व दूसरी सोनाराची.”
त्याच बोलण वज्रेस लागल ती त्याला म्हणाली, “ तुला पंचामृतापेक्षा शेणात चांगला चमचा फिरवायला येतो. भटाच्या पोटाला येण्यापेक्षा हेड्या का नाही झालास. जा बाजारात शयनग्रामच्या किंवा कडगावच्या. मला कोंबडी म्हणतोस. लाज नाही वाटत तुला. हुप्प्या कुठला? जा सांग जा मी भीत नाही कुणाला?”
“ होय खरंच तू कुणाला भीत नाहीस? वाघीणच आहेस ना बिन शेपटीची. तुझी मैत्रीण शांतीचे चांगलेच गुण उचललीस.” व्यंकू बोलला. शांतीच नाव घेताच वज्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. व्यंकूला पाठमोरा उभा राहून हात पाय धुताना पाहून बावीतली बारडी काढली व व्यंकूच्या अंगावर उपडी केली. व तिथेच बारडी टाकून ती घरात धावत आली. व आजी जवळ येऊन रडू लागली. तसा भिजलेल्या अवस्थेत व्यंकू तिथं आला. तो चिडलेला होता. आजीला पाहून म्हणाला, “ आज्जी हे बघ काय केलं तिन, मी वज्रेला मारणार..” आज्जीने वज्रेस जवळ घेतले होते ती म्हणाली, “ व्यंक्या मी ऐकलेय सगळं. तू काय बोललास ते. शाळेतल्या मास्तरांची पारख चुकेल. मात्र माझी नाही. मला माणसं परखता येतात. माझी वज्रा कुणाची उगीच कळ काढणार नाही. तू मगाशी तिला टोचून बोलत होतास. ते ऐकलेय मी. उलट तुला पाणी ओतून शुद्ध केलाय तिन बाहेरून स्वच्छ झालास आतल्या मनाच काय.” आजीच आताचं बोलण तसेच मगाशी वज्रेच बोलण ऐकूण तो गप्पगार झाला होता. त्याला काही सुचत नव्हते. भिजल्याने थंडी वाजत होती. तो थरथरत होता. तो टाचा आपटत माजघरात कपडे बदलण्यास गेला. इतक्यात त्याचे आईवडील शेतावरुन आले. आल्याबरोबर हातपाय धुतले. व पार्वती धारला गेली. तर शिवानंद टेकून भिंतीला बसला. त्याने वज्रेचा हिरमुसला चेहरा पाहिला. व तो आपल्या आईला म्हणाला, “ ही अशी का बसलीय येथे.” तेव्हा वज्रा म्हणाली, “ व्यंकू मला चिडवतो.” तेव्हा शिवानंद म्हणाला, “ त्याचे घर उन्हात बांधू. देवाजवळ सांजवात लाव जा.” तेव्हा आज्जी म्हणाली, “ त्या व्यंकूला सांग देवाजवळ सांजवात लावायला. आताच वज्रीन अंघोळ घातली तेला व शुद्ध केला.” इतक्यात व्यंकू बोलला, “ आजी मला सांगायची गरज नाही. मी दिवा लावलाय व शुभंकरोती पण म्हणतोय. त्या मांजरीला म्हणावं ओणव शाळेत उभारून पाय दुखायचे बंद झाले असतील तर ये म्हणावं शुभंकरोती म्हणायला.” शिवानंदाने वज्रेला शुभंकरोती म्हणायला पाठीवले. ती दोघे भावंडे छान पद्मासनात बसून शुभंकरोती म्हणू लागले. इकडे धारला निघालेल्या पारुला म्हातारी चहा घेऊन जा असे म्हणाली. पण धारला वेळ झाल्याने ती नंतर घेते अस म्हणाली. व ती धारला गेली. थोडया वेळाने शुभंकरोती म्हणून आलेल्या मुलांना म्हातारीनं चहा दिला तसच शिवानंदाला सुध्दा दिला. तो लागवड ठेवाय म्हसीला गेला. काही वेळाने पारू धार काढून आली. तिने चहा घेतला. व ती स्वयंपाकाला लागली. म्हातारी व दोघी भांगलनीच्या गप्पात जेवण तयार करु लागल्या. थोड्या वेळानं व्यंकू दूध घालायला ढेरीला गेला. वज्रा अभ्यासाला बसली. थोड्या वेळानं व्यंकू दुध घालून आला. तो ही अभ्यासाला बसला. अंधार पडू लागला होता त्याने वज्रेस शिक्षा का केली होती असे विचारले. तेव्हा ती म्हणाली, “ तू नको त्या चौकशा करु नको. तुझा तू अभ्यास कर.” असे म्हणताच तो अभ्यास करू लागला . इकडे शांता घरी आल्यापासून तिचे घरातच नव्हे तर अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नव्हते. डोळ्या समोर वज्रेची सोज्वळ मुर्ती दिसत होती. व मनामध्ये आपल्यामुळे तिला शिक्षा झाल्याची खंत जाणवत होती. तिला समजावयाचे कसे हाच प्रश्न तिला पडला होता. संपूर्ण रात्रभर ती अंथरुणावर लोळत होती. कारण तिची जिवलग मैत्रीण तिच्यावर प्रथमच रागावली होती. तिच्या पासून तुटक राहण तिला जमणार नव्हत. सकाळ झाली. पहाते जर डोळा लागला होता. चिमण्यांची चिवचिवाटाने तिला जाग आली तिन आपले आवरले. व ती परसात गेली. तेथून पुढे जवळच शिंद्यांचे परडे होते. त्यांच्या परड्यात मोगर्याची वेल होती. ती वेल कसली चांगली जाळीच होती. शिंद्यांच्या परड्यात अनेक झाड, फणस, आंबा, जांभूळ यांनी भरलेली. फुलांच्या झाडांची तर पर्वणीच असायची. शांती फुले काढायला गेली. तिनेने आपल्या पलकराचा ओठा केला. व ती फुले काढणार इतक्यात तिला वज्रेची आठवण झाली. चोरून काढलेली फुले तिला आवडणार नाहीत. तेव्हा विचारून फुले काढल्यास त्याचा गजरा आपण वज्रेस दिला तर ती बोलेल या विचाराने ती शिंद्यांच्या घरात गेली. शिंद्याची हौसा धार काढत होती. वाटोळ्या शिंगाची म्हस बकाबक सुग्रासचे तोब्रे मारत होती. हौसेने मसरी लावली होती. कोल्हापूर सोलापूर करत पिचकारी मसरीची ती मारत होती. तिलां म्हणाली, “ पिचकारी जपून मार. दुधात जाईल.”
अचानक आलेल्या हाळीने हौसेने मागे पाहिले तिला शांती दिसली. तिच्या मनात आले सकाळच्या रामाधर्माच्या पाळी ही का आली असेल. दामूअण्णान तर लावुन दिली नसेल उसन पैसे आणायला. मालक पण घरात नाहीत. तरी पण तिन विचारलं.
“ शांते सकाळी सकाळी बरी उगवलीस ग.”
शांतीन तिच्या कपाळावरील आट्या पाहून ओळखले. ती तिला म्हणाली, “ बाबांनी नाही पाठवलं. मी आलते थोडी फुले हवी होती. घेऊ का?”
हे ऐकताच हौसेच्या जीवात जीव आला. ती म्हणाली, “ एवढंच होय घे जा की, त्यात काय विचारायचं अंथरूण होतंय रोज.” ती निघाली. तिच्या पायातील पैंजण छुम छुम वाजत होते. खाटेवर झोपलेला हौसेचा मुलगा म्हणाला, “ कोण आहे?”
शांती म्हणाली, “ मी वेलणकरांची शांता थोडी फुले हवी होती.”
तो म्हणाला, “ मग घे जा की पण जरा जपून सकाळच्या पारी सपाकिरड्याच भ्या, दुसरं काय.”
त्याच बोलण एकतच ती परड्यात गेली. फुले काढताना तिच्या मनात आले. 'परवा साकरीने फुले काढली तेव्हा हिच हौसा व गण्या तिला मारायला धावली होती. मला कशी गोगलगाईसारखी बोलती.’ हा विचार करत तिने फुले काढली. फुले घेऊन ती घरच्या दिशेने गेली. जाताना तिला साक्रीने खालेला मार आठवला. नंतर तिच्या लक्षात आले की हौसेचा नव्हरा आपल्या अण्णा कडून उसने पैसे घेऊन गेलाय. म्हणूनच म्हातारी मांजरी सारखी होती. नाहीतर या चार फुलांसाठी म्हातारीनं फाडून खाल्ली असती. सोडा तो विषय आपल्याला फुले मिळाली याचा छान गजरा करू. व वज्रेला खुश करू. बघू बामणाच्या बेडकीची हवा किती उशीर राहते ती व थोडासा गजरा साक्री करता व माझ्यासाठी पण करते.
शांती घरी आली. व सुईदोरा घेऊन गजरा विनू लागली. ते सुंदराने पाहिले ती म्हणाली, “ आज काय शिंद्यांच्या परड्यावर धाड टाकली वाटत. ती हौसा भांडत आली. म्हणजे बापालाच पुढे करते. स्वतच्या परड्यात अबोलीची फुले असताना ती नकोत. व दुसऱ्याच्या परड्यातली हवी. मी केलेला गजरा घालताना तुझ्याकडे वेळ नसतो. व आज अचानक फुले आणून गजरा विणतेस काय माळीन व्हायचा बेत तर नाही ना.”
आईचे टोचून बोलणे तिला लागले. ती म्हणाली, “ चोरून बिरून आणायला नाहीत मागून आणलेत. व परड्यात अबोलीला बहर संपलाय.”
सुंदरा, “ हो का विचारू काकूंना.”
तेव्हा शांता बोलली, “ बोलावून आणू का? उगाच शंका नको.”
सुंदरा म्हणाली, “ नको मी विचारेन. व ती आपल्या कामाला लागली.”
शांतीने तिन गजरे विणले. व त्यातील एक घेऊन ती वज्रेच्या घरी गेली. वज्रा आपले काम आटोपुन गजरा विनत होती. व साक्री तिला मदत करत होती. ते पाहिल्यावर तिला काहीच सुचेना. ती तडक तिथं आली. व आपल्या हातातील गजरा दाखवत म्हणाली, “ हा घे मी तुझ्यासाठी विणलाय.” तेव्हा तोंड फिरवत वज्रा म्हणाली, “ मी गुंफलाय मला, नको तो, तूच घाल. कुणाच्या तरी वेलीवर धाड टाकून आणली असतील फुले ती. त्यापेक्षा न घातलेलाच बरा.” शांतीला वज्रेच बोलण जिव्हारी लागत होत, मात्र ती शांतपणे म्हणाली, “ महादेवा शपथ, मी फुले चोरून नाही आणली. मागून आणल्यात. विचार वाटल्यास शिंदे काकूंना.”
वज्रा म्हणाली, “ माझा तुझ्यावर विश्वास नाही. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल. पण तू सुधारणार नाहीस. मला तुझ्याशी काही बोलायचे नाही. असं म्हणून ती आत मध्ये उठून गेली. शांतीला कससच वाटल. पण या सर्वांमुळे साकरीला धक्काच बसला. कारण या दोघींची अतूट मैत्री सर्व मुलाना माहीत होती. त्या दोघींचे स्वभाव भिन्न मात्र त्यांची मैत्री घनिष्ट होती. वज्राचे बोल ऐकूण शांतीच्या हातचे बळच निघून गेलं. तिच्या हातातील गजरा गळून पडला. ती रडवेली झाली. व नाराज होऊन निघून गेली. वज्रेच वागणं साकरीला खटकत होत. वज्रा आत गेल्यावर ती तिच्या मागे गेली. तेव्हा तिला वज्रा परसात बावीजवळ असणाऱ्या रामफळीखाली बसली होती. तिचे डोळे पाणावले होते. तिला पाहताच साकरी म्हणाली, “ का ग असं तू शांतीला बोललेल मला नाही आवडलं.”
वज्रा म्हणाली, “ तिने तिचा स्वभाव बदलावा म्हणून बोलले.”
साकरी म्हणाली, “ काय वाईट आहे ग ती.”
वज्रा बोलली, “ ती मुलांशी भांडते. तिच्यामुळे तिच्या आईला व मला लोकांची बोलणी खावी लागतात. ती सुधारावी म्हणून बोललो. मुलीच्या जातीन वेळूसारखं असावं. वेळ येईल तस वाकाव. वादळात मोठी झाडे उन्मळून पडतात. वेळू टिकतात. ही तर कायम सगळ्यांपुढे नागणी वाणी फणा काढून असते. ती सुदरावी म्हणून बोलले.”
“ आज मी तिला शिंद्यांच्या मोग्ऱ्याची फुले काढताना पहिली. ही मला खुश कराय बघणार हे मी जानल. म्हणून मी तुला बोलवून हा घाट घातला. कारण मला तिला तोंडघशी पाडायचे होते.”
तेव्हा साकरी बोलली, “ तू काय करायला गेलतीस तिकडे.”
वज्रा बोलली, “ आईला अळवाचे वडे करायचे होते. म्हणून मी सगुनाताईंच्या परड्यात गेले होते. तेव्हा या बयेला फुले तोडताना पाहिलं.”
साकरी म्हणाली, “कल्याण आहे बुवा तुझ. विद्वान पंडितच आहेस की. तुमच्या भांडणात मला ओढलास. काय वाटलं असेल तिला? व एवढी काही ती वाईट नाही ह. व माणसानं वेळेनुसार झाड पणं झाल पाहिजे. वेळूसारख सदा नी कदा वाकू नये.”
वज्रा म्हणाली, “ तिला काय वाटायचे ते वाटू देत. तुझ अवर जा आपण शाळेला जाऊ.”
साकरी म्हणाली, “ मलापण जायला हवं. आबांच्या दुकानातून तंबाखूची पुडी व सुपारी आणायची आहे. बर निघते.”
असे बोलून ती निघून गेली.
क्रमशः पुढे……