२३) लक्ष्मीच्या नव्हर्याची दशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
२३) लक्ष्मीच्या नव्हर्याची दशा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २३

 कथा वाकाटखोर्याची भाग २३

२३) लक्ष्मीच्या नव्हर्याची दशा

लेखक : निशिकांत हारुगले.



सकाळ झाली. चुलीच्या धुराने या तिघींची साखर झोप चांगलीच उडाली होती. वज्रा व साकरी आपले अंथरूण घेऊन खाली आल्या. पाठोपाठ शांतीपण आली. दमाजीपंत पूजा करत होते. साकरी व वज्रेला जाताना पाहून शांतीची आई म्हणाली, “ पोरीओ चहा तरी घेऊन जावा.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ नको काकू आधीच उशीर झालाय. घरी काम ही आहे.”

त्या दोघी निघून गेल्या. शांती दात घासायला न्हाणीघरात गेली. तेव्हा सुंदरी म्हणाली, “ सारखी भूतावाणी फिरतीस, बोलले तर एकत नाहीस. काल त्या लक्ष्मी शिंदीचा नव्हरा भुतनींच्या मेळ्यात गावला. रात्री पासून बोबडीच ववलीय त्याची, लक्ष्मीन पांगिरला मानसं पाठवली भूत उतरवायला. अन् तो नाम्या पळाला, पाय मुरगळला त्याचा, टकुर फोडून बसलाय. त्याची बायको भगाटल्या पासून बसलीय रडत. तुला हजारदा सांगितलं त्या शिंद्यांच्या परड्यात जात जाऊ नको फुलबिल आणायला.नाहीतर एक दिवस तुलाच झपाटायचं.”

शांतीला हसू येत होत. पण तिन ते दाबून धरलं. ती म्हणाली, “ बेवड दारू पिऊन कुठं तरी धडपडल असल. व जिरायला थापा लावत असल.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ हो तर तुला सगळ्याच थापा वाटतात. तू तेवढी खर्याची पुतली नव्हं. उगाच खिदळतय एक दिवस तुलाच धराय पाहिजे, तवा राम आठवलं.”

“मला लागराय त्या भुतांची पितर जरी उतरली तरी त्यांना पण चिरडून टाकीन एखाद्या चीलटासारखं. उगा मला भ्या घालू नकोस. आशा गोष्टींनी मी घाबरणार नाही.. तू बस भाकऱ्या बडवत. “

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ हो मी भाकऱ्या बडवते, तू त्या खा अन् जा गाव फिरायला.”

तेव्हा शांती म्हणाली, “ होय , जाणारच आहे. तू येतेस काय मागून फिरायला”

तेव्हा शांतीची आई चिडली व म्हणाली, “उगाच वटवट करू नको. तोंड बंद कर नी गुमान आटप नाहीतर पेटत कोलीत बघितलस काय?”

तेव्हा तवा तापलय हे जाणून शांती शांतपणे दात घासत आवरु लागली.

वज्रेला पण घरी गेल्यावर शिंद्यांच्या घरातील रामायण समजले होते. ती गुपचूप आपल्या कामाला लागली.

शिंद्यांच्या घरात माणसांची रीघ लागली होती. या मात्र आपले जेवणखाण करून बारा वाजता एकत्र आल्या. शिंद्यांच्या घरला जायच्या आधी साकरीच्या परड्यात जमा झाल्या. पोटभर हसून घेऊन या शिंद्यांच्या लक्ष्मीच्या घरी जायला निघाल्या. तिच्या घरात अनेक आया बाया जमल्या होत्या. बाप्या मानस कट्टीवर बसली होती. लक्ष्मी जोत्यावर बसून रडत होती. बाजूला नव्ह र झोपला होता. सारखी वळवळ करत होता. वज्रा शांती साकरी क्रमाने आत आल्या.

वज्रा शिंद्यांच्या लक्ष्मीला म्हणाली, “ काकू काकांना खूप लागलंय का?”

तेव्हा लक्ष्मी म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. माझा वनवस अगदी सितवाणी हाय बघ. काल गावच्या पोरांनी सिनेमा आणला. म्हणून गेले पाहायला. अन् हया बाबाला दारू प्यायला रान मोकळं भेटल. रातच्याला परड्यात नाम्या शिंप्या बरोबर गेला. अन् गावला नव्ह भुतांच्या मेळ्यात. रातपासून बोबडीच वळलीय नव्ह.”

इतक्यात लक्ष्मीचा सासरा म्हणाला, “ बर झालं. आता समजल दारू प्यायची.”

तेव्हा लक्ष्मीची सासू डोळे वटारून म्हणाली, “ तुम्हाला नुसतं टोचून बोलायला लई येते. पोरग हातच जाईल. तेच काय नाही. माझं पोर दारू पिऊ दे, नाहीतर गडागडा लोळणा. तुम्हाला पोराचं कधी कवतुकच नाही. लेकी पाहिजेत लेकी नुसत्या. काय करायच्या त्या, आम्ही मेल्यावर वेशितन टाळा पगळून येवून रडायच्या अन् बारा दिवसाला पातळ नेसून जायच्या. माझं पोर बारा मुलुख हिंडून येवु दे, अन् माझ्या मड्यावर लाथेन माती सारु देत. फिटलं माझं पांग म्हणीन.”

तेव्हा लक्ष्मीचा सासरा म्हणाला, “मड्यावर का जिवंतपणी माती घालील बघ. दारूची बाटली काळी का गोरी बापजन्मात मी कधी पाहिली नाही. कवा सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही मला. अन् हे कारट दारूच्या बाटल्या ओतून घेतय घाट्यात. अन् ही लागली फूस लावाय तेला. अशानच वाटोळं व्हायची पाळी आलीय. दारू प्यायला गेला नसता तर असा तंगड्या वर करुन बाजल धरून पडला नसता.”

“ ती गरीब बिचारी लक्ष्मी राबती म्हणून आम्हाला म्हातारपणी चार घास खायला मिळतात.घरात दाणापाणी दुध दुभत दिसतंय नाहीतर तुझ्या लेकाच्या दारून फास तेवढा ठेवलाय घाटयाला लावायचा.”

असे लक्ष्मीचा सासरा बोलताच सासू गप्प मांजरीणीसारखी बसली. साकरी व वज्रा गुपचूप ऐकत होत्या. इतक्यात शांती बोलली, “झाल गेलं गंगेला मिळालं. आता सुदरेल तो, नाही प्यायला परत जायचा दारू.”

तेव्हा लक्ष्मी म्हणाली, “ हू.. ही सांगती मला, एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवल, पण ह्यो काय बाबा दारू सोडायचा नाही. ह्यान मांडलेला खेळ आता मलाच निस्तराय पाहिजेत. आता अस बसून भागत नाही. आता भटाबिटाकड, देवरश्याकड जाऊन काय उपयोग नाही. मीच जावून एखादा चांगला डाक्टर आणते. अन् या बाबाला सरळ करते. बिन नवहऱ्याचा संसार काय माझ्या कामाचा.”

असे बोलून आपल्या दंड घातलेल्या लुगड्याचा पदर तीने डोईवर घेतला अन् ती उठली. अन् घरातून बाहेर पडली अन् वरल्या आळीच्या दिशेनं निघाली.तिच्या मागोमाग या तिघी बाहेर पडल्या. व घरी निघाल्या. थोड अंतर गेल्यावर शांती म्हणाली, “ कालच्या भूतनिंनी चांगलीच गंमत केली. म्हणायची.”

शांती म्हणाली, " गंमत तर झाली. पण लक्ष्मीकड पाहिल्यावर वाईट वाटत. ही गंमत तिला चांगलीच महागात पडणार.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ चला गप, ती लक्ष्मी माप घट्ट हाय हे निस्तरायला. अन् तुमचं कुणी ऐकलं तर तुमचीच गम्मत व्हायची. या विषयाला येथेच पूर्णविराम चला आता.” त्या तिघी आपापल्या घरला निघून गेल्या.

क्रमशः पुढे….



कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...