२५)दादाची सायकल
लेखक : निशिकांत हारुगले.
व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी लागली होती. व्यंकू कॉलेजचा खर्च व घरातील खर्च: भागविण्यासाठी त्याने एका दुकानात काम करायचे ठरवले. त्यासाठी तो सकाळी कॉलेज करी. व दुपारच्या पुढे कामावर जाऊ लागला. एका कापड दुकानात तो काम करत असे.
संध्याकाळी घरी येताना अंधार होई. व वाहन मिळत नसे, त्यामुळे त्याने एक जुनी सायकल विकत घेतली. व तो रोज ये-जा करू लागला. वज्रेला सायकल खूप आवडायची.
पण शिकवणार कोण. दिवसभर ती दादा घेऊन जाई.व रात्री मारता येत नसे. फक्त ती शनिवारी घरी असे. पण व्यंकू तिला शिकवण्याच्या भानगडीत पडत नसे. कारण एक दिवस सुट्टीचा, त्याला भरपूर काम असे. व विश्रांती देखील हवी असे.. एके दिवशी शनिवारी सुट्टीच्या दिवशी सायकल परसातील गोठ्याच्या भिंतीला उभी होती. वज्रा घंटी वाजवत होती. इतक्यात तिथे शांती आली. ती सायकल पाहून म्हणाली, “ वज्रे सायकल शिकायची काय?”
तेव्हा व वज्रा 'हो' म्हणाली. तेव्हा दोघींनी सायकल बाहेर काढली. व शिवाराच्या वाटेवर शिकायला त्या निघाल्या. रस्त्याला त्यांना पाहून साकरी पण आली. पहिल्यांदा सायकलीची हवा तपासली. ती कमी होती. त्यात दामुशेटच्या दुकानातून पंप घेऊन त्यांनी हवा मारली. व त्या शिवार वाटेला गेल्या. प्रथम वज्रा महादेवाच्या पाय पडली नंतर सायकलीच्या, ते पाहून शांती म्हणाली, “ ओ भटबाई आता हळदी कुंकू लाव अन् नारळ फोडा. व म्हणा एखादा मंत्र म्हणजे झालं.”
तेव्हा वज्रा म्हणाली, “ गप्प ग. आपली संस्कृती आहे. प्रतेक वस्तू विषयी कृतज्ञता असावी.”
साकरी म्हणाली, “ हो का, मग उद्या न्हाणीघर पण पुजशिल.”
वज्रा म्हणाली, “ पुरे झालं हळदी कुंकू पूराण, आता , मारू का सायकल.”
शांती म्हणाली, “ हा होऊन जाऊ दे.”
वज्रा म्हणाली, “ धरा ग घट्ट.” असे म्हणत ती प्यांडेल मारू लागली. त्या मागे धरत सोडत तिला मदत करू लागल्या. ती सारखी धरा धरा म्हणत होती. ती प्यांडेल मारू लागली. व थोड अंतर गेल्यावर तिने सायकल मारत मागे पाहिले. या लांब उभा होत्या. ते पाहून ती घाबरली. व तिज अवसान गळाले. व धपकन पडली सायकल उरावर घेऊन व ओरडू लागली. त्या दोघी धावल्या व सायकल बाजूला केली.. तिला थोडे खरचटले होते. ती रडवेल्या स्वरात म्हणाली, “ शांते माकडीने सोडलीस नव्ह सायकल पडलो की मी.”
लगेच साकरी म्हणाली, “ अग, सोडली नाही तर शिकणार कशी.”
शांती हसत म्हणाली, “ चला उदघाटन तरी झालं. आता उठा सुरू करा वज्राबाई.”
पुन्हा उठून ती सायकल मारू लागली. तेवढ्यात वाटेने शेताकडे येणारा रखमा पाटलीनीचा सासरा मुद्दाम आडवा आला, त्याला बाजूला हो म्हणत असताना ऐकेनात. शेवटी गेली तेच्या ढेंगत सायकल. तसा म्हातारा दंगा करू लागला. “आई ग, मेलो मेलो. मारल गो शिवाच्या पोरीन. कबर मोडली माझी.”
शांती व साकरीने त्याला सावरलं. सायकल बाजूस केली व म्हाताऱ्याला शेजारील झाडाखाली बसवला. व त्याला सावरलं. तसा तो लईच दंगा करू लागला. तेव्हा शांतीच्या ध्यानात आलं की हा मुद्दामच करतोय. तेव्हा ती मुद्दाम म्हणाली, “ चल साकरे म्हाताऱ्याला दवाखान्यात नेवू. बिचाऱ्याची कंबर मोडली. सरकारी दवाखान्यात एक नवा डॉक्टर आलाय. जो हाड बदलून देतो.चल नेऊ याला तिथं. “
तेव्हा तो म्हणाला, “ नको डाक्टर त्यापेक्षा पैसे दे तुझ्या बा कडनं.”
तेंव्हा वज्रा घाबरली. ते पाहून शांती म्हणाली, “ किती द्यायचं.”
तो पन्नास रुपये म्हणाला. त्याच बोलण साकरीच्या लक्षात आले. तिने शांतीस खूनावल.
शांती म्हणाली, “ मामा पैसे बैसे नको त्यापेक्षा दवाखान्यात चल. दोन इंजक्शनात तयार होशील.”
तेव्हा तो नाही म्हणून पैशाला हट्ट करू लागला. तेव्हा शांती म्हणाली, “ कशाला हवेत पैसे.”
तेव्हा तो काही कबूल करेना. शेवटी घोळात घेतल्यावर त्याने दारुसाठी रुपये पाहिजे. म्हंटल्यावर. शांती चिडली. व म्हणाली, “ तुझ्या तिर्डीचा मोडला बांबू, तू चल पळ इथून. तुला पैसे काय दवाखान्यात पण नेत नाही.”
तिनं त्याला घालवला. तस वज्राने सायकल चरितून काढून
वज्रा म्हणाली, “ बाई बास ग, नको ती सायकल उगाच भांडण यायला.”
तशी शांती म्हणाली, “ ए चल मार कोण येत अडव बघू.”
असे म्हणत ती सायकल शिकवू लागली. थोड्या दिवसात ती उत्तम सायकल चालवू लागली ती ही डब्बल शीट. अशा तऱ्हेने वज्रा सायकल चालवायला शिकली.
......
क्रमशः पुढे......