गुरुवार, १२ मे, २०२२

शिकार

 ५) शिकार

लेखक : निशिकांत हारुगले.

एम. ए. बी.एड.



पेठच्या गावच्या वरील बाजूस हिरव्यागार डोंगराची राई होती. त्याच्यावर जंगल. सह्याद्रीच्या दूधगंगा डोंगररांगेत येणारा हा भाग निसर्ग संपन्न असा होता.

घनदाट अरण्यात या भागात गवे, रान कोंबडे, मोर, वाघट,असे अनेक प्राणी आहेत. फिरायला गेल्यावर मोरांचे थवेच्या थवे दृष्टीस पडत.

अशा या पेठच्या डोंगरात भुदरगडाच्या पायथ्याशी अनेक लहान वाड्या, हिरव्यागार दुलई पांघरलेल्या डोंगरात पायऱ्यांची उतार शेती असणाऱ्या भागात एक वाडी होती. इथल्या लोकांना शिकारीचा खूप नाद. डोंगरात जरी ही गाव असली. तरी डोंगरातील झर्याच्या पाण्यावर हिवाळी गहू, हरभरा घेत. पावसाळ्यात भात, नागली ठरलेली असे. या वाड्यावर जन्मलेली पोर पेठला शिकायला जात. शाळा शिकत डोंगरातून उड्या मारत ही लहानाची मोठी होत. मोठं झाल्यावर रोजगार धंद्याला काही गावाबाहेर जात. तर काही गावात राहून मिळेल तो कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करीत.

बाहेर गेलेले असोत. किंवा घरी राहणारे सगळ्यांचा आवडता छंद म्हणजे शिकार. अशा या गडतटा खाली वसलेल्या गावात अनेक महाभाग पाहायला मिळतात. अशा या महाभागांच एक टोळकं तयार होत असे. अशा एका वाडीतलं टोळकं. यात शिंप्याचा गजा, दुसरा नाव्ह्याचा बाजीराव, तिसरा पाटलांचा तुकाराम व सुर्यवंश्यांचा महादेव. असे जोडगोळीतले मित्र राहत होते. या चौकुळात मुख्य प्याद होत. ते म्हणजे नाव्ह्याचा बाजीराव. पण त्याला बाजाच म्हणत. याने कशी बशी सातवीपतूर शाळा शिकली असल. पुढे शाळेला जा म्हंटले की याची स्वारी घरातून शाळेला म्हणून निघे. व पेठच्या अर्ध्यावाटेवरून हे मागं फिरत व डोंगरातून गडतटाच्या खोर्यात फिरायचे. यांची शाळा म्हणजे जंगलातील सफर. फिरत फिरत हे डोंगरातील करवंदे,बोरं, तोरणं, बिब्ब्या, कटक्या खात उंडारत फिरत. सवंगड्यांशी खेळत त्यांचे दिवस गेले.

एक दिवस बाजीच्य बापाला कळलं. की पोरगं शाळेत जात नाही. तेव्हा तो तेला म्हणाला, “ तू शाळा शिकू नकोस हं, हाय पुढे तुझ्या एका हातात वस्तारा व दुसऱ्या हातात कात्री. गावाच्या माणसांची भादरायचीच तस म्हशी व रेडकांची पण भाद्रायची. तू लेका भादरतच मरणार. पूर्वजांचा वारसा चालवाय नको.”

तेव्हा बाजी बोलत असे, “ बा राजासारखा राजापण कुणापुढे झूकतोय माहीत आहे ना.”

तेव्हा बाजाचा बा म्हणाला, “ तर तू देव हाईस नव्हं.सगळ्या गावची केसरच काढ. आम्हाला तवा शाळा कसली ती ठावूक नव्हती. म्हणून आम्ही या फंदात पडलाव. तवा तूपण हाच कित्ता गिरव.”

तेव्हा बाजी म्हणायचा, “ उपाशी तरी मरणार नाही ना.”

तवा तेचा बा काठी घेऊन पाठी लागायचा.तेव्हा हा परसदारी पळून जायचा.

शिंप्याच्या गजानं पण बाजीच्या नादान शाळा सोडली. तसा तो चौकुळात असायचा.पण घरातील सर्व काम करून घर सांभाळून तो संगत करी. शाळा सोडल्यावर त्यानं बापाकडून आधी कपडे शिवायला शिकला. सुरवातीला कपडे शिवताना जरा चूकायचा मात्र नंतर त्याचा हात चांगलाच बसला होता.कधीतरी चुकून तक्रार यायची.

एकदा गावातल्या हौसा म्हातारीनं चोळी शिवायला टाकली. त्यान चोळी मस्त शिवली. चोळी शिवताना त्याला वाटल. म्हातार माणूस तरुणपणात कधी मिरवायला मिळालं नाही.म्हातारपणी तरी नटूदेत. म्हणून यानं तिच्या खांद्यावर दोन चार चुण्या पाडत फुगं पाडल. त्याला वाटल म्हातारी खुश होईल. पण तिसऱ्या दिवशी म्हातारी भांडत दुकानात आली. व गज्याला म्हणाली, “ गजा भाड्या मला काय नवरी म्हणून दाखवतोस व्हय र .या वयात कशाला पाडलास माह्या दंडाला फुग्. सर्व बायका म्हातारपणी म्हातारचळ लागलय म्हणत्यात. तवा ते उसवून परत चांगली शिव.”

असं म्हंटल्यावर तो म्हातारीला म्हणाला, “ तूझा नव्हरा काय म्हणाला काय तुला?”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ तो काय बोलतोय .मीच पोसते तेला. पडला असल दारू पिऊन.”

गजा म्हणाला, “ कोण नाव ठेवतं ते सांग.”

म्हातारीनं गल्लीतल्या बायकांची नाव सांगितली.”

तेव्हा तो म्हणाला, “ म्हातारे काळजी करू नको.पुढच्या चार महिन्यात त्यांची तोंड बंद करतो.”

व म्हंटल्याप्रमाणे या गजान त्यांची तोंड बंद केलीत. गावात दुसरा शिंपी नसलेने त्याच्या जवळच लोक शिवायला येत असत. त्यामुळे त्यानं फुग्याची फॅशन गावात फेमस करून टाकली. बाया आपल्या दंडाचे पडलेले डीझाइन सगळ्यांना दाखवत कौतुक करू लागल्या.

चौकुळतला पाटलाचा तुकाराम तसा दिसायला देखणा घरच्या शेतीमुळे याच्याकडे लोकांचा राबता असायचा. याला काही काम लावत नसत. हा खादडायचा व उंडरायचा. तो आळशी असल्यानं सगळी त्याला पाटलाचा गवारेडा म्हणायचे. मोठं झाल्यावर सुदरेला म्हणून त्याचा बाप दिवस ढकलत होता. या सगळ्यात जास्त शिकलेला म्हणजे सूर्यवंश्याचा महादू. तो चांगला मॅट्रिक पर्यंत शिकलेला होता. पण यांच्या नादान जंगलात फिरायची सवय होती. एके दिवशी बापानं मरेपर्यंत मारला. त्याची आई अडवायला गेली. तेव्हा तिलाही दोन-चार लाता बसल्या. शेवटी त्यानं गाव सोडलं. व मामासंगे मुंबईला गेला. तो आता सहा सहा महिने झाल्याशिवाय इकडे फिरकत नसे.

बघता बघता पोर वयात आलीत. तेव्हा त्याच्या बापानी त्यांचे दोनाचे चार करायचे ठरवले. कसंबसं या चौकडीचे चाराचे आठ झाले. जो तो आपल्या आपल्या संसाराला लागला. स्वतःचा घर संसार सांभाळत एकमेकाशी भेटी गाठी करत यांचे संसार सुरू झाले.

उन्हाळा आला. मुंबईला गर्मी वाढल्याने महिन्याभराची सुट्टी काढून महादू गावाकडे यायला निघाला.त्यानं मुंबई पाटगाव गाडी धरली. व दुसऱ्या दिवशी तो गावात हजर झाला.गावात आल्यावर सगळे विचारू लागले, “काय मुंबई कवा आली.”

महादू सांगे, “ आताच आलोय.”

प्रवासाने दमल्यामुळे त्या दिवशी महादू घराबाहेर पडला नाही. दुसऱ्या दिवशी उठून आपले सर्व आटोपून तो गावात रपेट मारायला गेला. गावातील मित्रांना व इतर लोकांना भेटून तो शेवटी गजा शिंप्याच्या दुकानात आला.

त्याला बघून गजा म्हणाला, “ तुझं आपल बर हाय बघ महादू, जीवाची मुंबई करतोस म्हणे. भारी बाबा नाहीतर आम्ही इथे कापतोय कापड.”

महादू म्हणाला, “ कसली जीवाची मुंबई. राबराब राबायच. व तिथंच खर्च व्हायचं. आपण जास्त शाळा शिकली नसल्यानं मिळल ते काम करावं लागतंय बघ. तुमच्यासारखे हाय व्हय आमचं. नोकऱ्या नाही मिळाल्यात की हाय सुईदोरा तुला. व बाजाला वस्तरा. तसं आमचं नाय. शेवटी हाय नांगर व खुरपं पुजलेली पाचवीला.

तेव्हा गजा म्हणाला, “ तुला काय नको म्हंटल व्हय सुईदोर घ्यायला..” “लेका मी सूईदोरा घेतला तर तूझ्या पोटावर पाय येईल.”

“ बर ते सगळं जाऊ देत. आपण आज शिकारीला जाऊया. खूप दिवस झालेत शिकार करुन.” महादू बोलला.

“ जाऊया की.” गजा उत्तरला.

“बाजी व तुक्याला पण बोलतो.” महादू म्हणाला.

तवा गजा म्हणाला, “ चाललं की नाहीतर तू नसल्यामुळे आम्हाला पण शिकारीला जायला अवघड वाटत. तुझ्यासारखा नेम इतरांना जमतच नाही बघ. आम्ही जरी गेलो तरी एखाद्या कवड्यावरच समाधान मानावं लागत बघ. मागच्या महिन्यात दिवसाचं भगटायला त्या तुक्याला घेऊन गेलो होतो. त्याचे डोळे आधी सरळ बघतोय कुणीकड व नेम धरतोय कुणीकड. हे समजतच नाही. मागं रानकोंबडी टिपायला सांगितली. तर यांन नेम धरून कुठ बार काढला कुणास ठाऊक. कोंबडीला सोडून गव्हाला पाणी पाजयला गेलेल्या तान्याला छरा लागला. तो अजून पाय वाकड करीत चालतोय. त्याची बायको येता जाता शिवा देते बघ. तेव्हापासून कोणपणं शिकारीला गेलं नाही बघ.”

महादू म्हणाला, “ ते काही नाही आज जायचं शिकारीला. तू बत्ती तेवढी तयार कर . मी तुक्या व बाज्याला तयार करतो. आज रातीला आपण शिकारीला जायचं.”

तिथून महादू निघाला. त्याने आपल्या मित्रांची गाठ घेतली. रात्री शिकारीला जायचं ठरवलं. शिकारीला जायचं म्हणून तुकाराम व बाजी सुध्दा खुश झाले.

संध्याकाळी सर्वांनी शिकारीला जायसाठी लागणार साहित्य ठरलेल्या ठिकाणी नेऊन ठेवलं. यांचं ठरलेलं ठिकाण होत महादुचा गोठा. जो गावापासून जरा बाजूला शेतात होता.गावापासून जरा दूर असलेने कुणाला कळत सुध्दा नव्हतं.

या सर्वांचे पार्टी करायचे ठिकाणही महादुचे घर असलेने कुणाला कळत नव्हते. रात्री लवकर आठ वाजता जेवण करून ते सर्व महादूच्या गोठ्यात जमणार होते.

महादू घरात आला. शिकारीच साहित्य शोधू लागला. त्याच साहित्य त्याच्या बायकोने सारवान काढताना वरती माळ्यावर ठेवले होते. ते शोधायला तो माळ्यावर चढला.शोधताना त्याला कनुगल्याच्या कोपऱ्यात त्याचे गंबुट सापडले. ते सुस्थितीत असल्याचे बघितल्यावर त्याने ते चौकोणी फळी काढलेल्या ठिकाणातून खाली फेकले. शिकारीची कपडे शोधताना त्याला ती बोचक्यात सापडली. ते काढताना त्यानं बायकोला दोन -चार सुनावतच काढली. तो म्हणाला, “ कुठं हे आडग पदरात पडल शिकारीची कापड बोचक्यात ठेवतय.” त्याच बोलणं एकूण त्याची बायको जेवण खोलितून म्हणाली, “ हे आडगं हाय म्हणुन संसार चाललाय. नाहीतर तुमचे मुंबईचे पैसे या घरातील तेलासाबनाला तरी पुरले असते का.” तिचा आवाज ऐकून तो गपचूप आपली कपडे घेऊन खाली उतरला. व बायकोला म्हणाला, “ लई शहाणी हायेस, जेवणं कर लवकर, मी शिकारीला जाणार हाय,”

तसी त्याची बायको पुटपुटत कामाला लागली. रात्री आठ वाजता ती सर्व महादुच्या गोठ्यात जमा झाली. महादूनं शिकारीचे कपडे घातले. त्याचे गुडघ्यापर्यंतचे गंबुट व इंग्लिश कॅप त्याने खास मुंबईवरून आणून ठेवली होती. प्रत्येकाने आपापल साहित्य घेतले. तुक्यानं बत्ती पेटवली. महादून मुंबईवरून आणलेली ऐव्हरीडेची बॅटरी घेतली. व ती सर्व जंगलाच्या वाटेला लागली. बॅटरी वर असणार रानमांजराच चित्र बघून तुक्या म्हणाला, “ आज काय रानमांजर मारायचं काय?” तेव्हा ती हसत जंगलाच्या वाटेला लागलीत.

अंधाऱ्या रात्री ब्याट्री व बत्तीच्या प्रकाशात ती सर्वजण जंगलाकडे निघाली. रातकिड्यांची किरकिर चांदण्याच्या प्रकाशात कुठेतरी घुबडाचा घुत्कार ऐकू येत होता. बत्तीच्या प्रकाशात इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ते निघाले. कुठेतरी काजव्याचं लखलखन दिसत होत. ही सर्व मंडळी शिळेचं वताडाचा उगम ओलांडून वाघझरीला पोचले. उन्हाळ्यात सगळे पाणवठे आटतं तेव्हा तहान भागवणेसाठी प्राणी वाघझरीला येत. महादुने आज निश्चय केला होता. की आज एकतरी शिकार मारायची. ते त्यांच्या निश्चीत असणाऱ्या ठिकाणी. म्हणजे वाघझरिवर असणाऱ्या आंब्याच्या झाडावरील मचानावर गेलीत. तिथं गेल्यावर त्यांनी बत्ती विझविली. व शांतपणे सावजाची वाट बघायला लागलीत. इकडे तिकडे पाहायला लागलीत. थोड्या वेळानं वेताच्या बेटाच्या झाडिकडून सळसळ ऐकू येऊ लागली. तुकारामान बॅटरीचा झोत पाडला तर त्यांना एक वाघीण तिच्या पिलांसवे पाणी प्यायला आली होती. तिच्या तोंडाला रक्त लागल होत. त्यावरून तिने कुठल्या तरी प्राण्याचे काम तमाम केले होते. कारण वाघाट आपल्या अंगावर कुठलही रक्ताचं डाग वा घाण ठेवत नाहीत. शिकार करताना तिला खूप त्रास झाला असणार त्यामूळे ती खूप दमली होती. थकावट भागवनेसाठी ती तेथें पाणी प्यायला आली होती.

तिचा अवतार पाहून शिंप्याचा गजा म्हणाला, “ यांच आपल बर हाय की शेतात राबाय नको, याच पैसे द्यायचे, त्याकडून उधारी वसूल करायची असं काही टेन्शन नाही बघ. टाकली झेप केली शिकार लागली गटम गटम करायला. नाहीतर आम्ही मानस नुसती हा काय करतोय तो काय म्हणतोय, याच्याकडे किती पैसे, त्याकडे किती याचाच विचार करत असतो. यातच सगळी जिंदगाणी जातिया..”

 हे बोलण ऐकून नाव्ह्याचा बाजी म्हणाला, “ मग आता देवा पांडुरंगाला हात जोड. व म्हण, पुढला जन्म वाघाचा मिळूदेत म्हणून. म्हणजे तू व तुझी दूनिया या जंगलातच फिरत जाऊ देत. काय बोलतोस त्यांचं जीवन सोपं हाई व्हय. पावसाळ्यात इकडं तिकडं निवारा शोधताना व चिल्टानी फाडून खाल्ला म्हणजे समजलं. शिकार काय रोज मिळतीय काय. त्याना काय कमी श्रम कराय लागत नाही.

इतर प्राणी त्यापुढे येऊन उभा राहत नाहीत. की वाघोबा दादा भूक लागली असल तर मला येऊन खा. माणसाचा जन्म मिळालाय म्हणून चमचमीत खातोस नाहीतर बसला असतास सडत एखाद्या गुहेत.”

त्याच हे बोलण ऐकूण तुकाराम हसायला लागला. ते पाहून गजा म्हणाला, “ तुला काय झालंय बत्तीसी काढायला. तोंड बंद कर ते ब्याटरीच्या उजेडात तरी पांढरं दिसतील काय ते दात.”

तसा तुकाराम म्हणाला, “ हे आपल बर हाय की तुझ बोलणारा राहिला बाजूला व ऐकनार्यालाच लागलाय कावयला.”

तेव्हा त्याचं हे बोलण ऐकूण महादू म्हणाला, “ ए गप्प बसा तुम्हाला इथं शिकारीला आणलय की गप्पा मारायला.”

तेंव्हा बाजीराव म्हणाला, “तू लेका एवढं मुंबई करून आलास.जरा खायला मिठाई तरी आणलीस काय.”

महादू म्हणाला, “ मला वाटलच होत, तू हावऱ्या कसा काय बोलला नाहीस. चींगट्या कवा खरकट्या हातानं कावळा मारत नाहीस. व मला बोलतोस व्हय. आणलीय बघ तुझ्या शेजारच्या पिशवीतत हाय. तुम्हाला कवा चुकवून खाल्लया काय मी. तुम्ही कवा येवढं मुंबई करून आलोय . प्रेमानं कवा बोलत्यासा काय. तुमची सर्व जोडणी करायची. तुम्ही मात्र आयत्या बिळात नागोबा होऊन बस्त्यासा. आता शांत बसा. आलोय कशाला व करताय काय.”

थोडा वेळ वाट पाहिली पण कोणतंही सावज आलं नाही.

दोन चार तास झाले.

शेवटी महादू म्हणाला, “ हे बघा बराच वेळ झाला. काहीच सापडलं नाही. तवा त्या पिशवीतील मिठाई खावा. व बाजा तू आणि गजा खालच्या बाजूच्या डोहात बसलेली रानातली उठवा. मी त्यातील एखादं टिपतो. तेव्हा सांगितल्याप्रमाणे त्यांनी मिठाई वर ताव मारला. बाजा व गजा काठी आणि खूरपे घेऊन झाडावरून खालती उतरली. व खालच्या डोहाच्या बाजूला गेलीत. तिथं वटाडाच्या खालच्या बाजूला मोठा डोह होता. पायवाटेने पुढे पानमलळ्यातून ते डोहाजवळ आलीत. व तिथे आल्यावर बाजीरावाने वाघाचा आवाज काढायला सुरुवात केली. तशी ती रानातली सावध झालीत. गजान तोपर्यंत दगड मारायला सुरुवात केली. तशी ती रानातली जंगलाच्या चढणीच्या वाटेला लागलीत. त्यामागे हुर्रे हुर्रे असा आवाज करत ते हकलाय लागलीत.

तशी ती वटाडाच्या वाटेने वाघझरीला निघाली. ती जाताना पाहून गजा म्हणाला, “ आज एकाधी चांगली शिकार साधतीया.” वाघझरीला येत्याली रानातली त्यांच्या पायाच्या आवाजाने दगडातून खडखड आवाज येत होता. म्हादूने नेम धरला. व एका रानातल्यावर आवाजाच्या रोखाने नेम धरून चाप ओढला. छरा बंदुकीतून सुटला. आवाजाने बिथरून ती इकडे तिकडे पळू लागली. व एका रानातल्याच्या पायात जरा लागला. ते झुडपातून उलट पळाल. ते सरळ गजाच्या दिशेनं निघालं. तसा गजा आडवा पळाला. तो वाचला.त्यातून एक काठी लगावली तसा त्याचा वेग मंदावला. पण जातांना त्याची धडक बाजाला बसली. तो खाली पडला. तरी त्याने त्यातून सावरून त्याला खुरपं मारल. पण ते त्याचा नेम चुकुन पळालच. योजना फसली. सगळे नाराज झाले. बाजीरावाला धडक बसल्याने त्याचा पाय खुब्यातून दुखू लागला . ती पुन्हा माचावर आलीत. माचावर बराच वेळ बसली पण काही शिकार येईना. शेवटी फेराफेराने जागरण केली. तरी देखील शिकार नाही आली. मध्यरात्र उलटुन गेली. दोनच्या सुमारास एक वाघा सारखा प्राणी आला. त्याचा आवाज ऐकूण तुकारामान बॅटरीचा प्रकाश झोत पाडला. तो एक छोटा चीत्ता होता. ते बघितल्यानंतर. तुकारामान बॅटरी बंद केली. चीता आवाजाच्या व झाडाच्या रोखाने निघाला. त्याच येणं पाहून तुका घाबरला. व इतरांना म्हणाला, “ अरे तो चित्ता इकडचं येतोय.”

तसा महादू म्हणाला, “ तो काय खातोय तुला.”

“ तस नाही रं तो झाडावर चढला तर काय करायचं.त्याला कस टोलवायचं.”

तवा शिंप्याचा गजा म्हणाला, “ ही काठी काय पुजायला आणली काय. येऊदेत वरती द्यायचं ढकलून खालती.”

“ मगाशी काय भारी उपयोग केलास बघ. जरा वाचलो नाही तर माझीच शिकार झाली असती.” बाजीराव म्हणाला.

तवा गजा म्हणाला, “ जरा ठोका कमी पडला रं नाहीतर त्याचं डोकच फोडीतो.”

बाजीराव म्हणाला, “ गावात कुणाला शिकारीला जातोस म्हंटलास तर हसतील लेका तुला बघितली काठी कशी फिरवलीस ते.”

इतक्यात तो चित्ता झाडावर चढू लागला. ते बघून तुकारामाने वाघाचा आवाज करत डहाळी जोरात हलवली.तस तो चीता घाबरून पळून गेला.पहाट व्हायला लागली तशी ही सगळी हिरमुसली. व घराच्या वाटेला लागली. उजडायला ती गाव शिवारात आली. तवा रानकोंबडी त्यांना गावाच्या शिवारात दिसली. तसा नेम धरुन चार कोंबडी त्यानं टिपली. त्यांना उचलून घेत तुकाराम म्हणाला, “ महादू असताना शिकारीच कधी रिकाम जाणं घडलं होय.”

यावर गजा म्हणाला, “ काही का असेना दुधाची तहान ताकावर भागवून. घेऊया.”

तेव्हा महादू लंगड्या बाजीरावाला सावरत गावाकडे निघाला. शिकार झालेले कोंबडे चांगलेच रानातील पिकाच्या लोंब्या खाऊन माजले होते. गप्पा मारत ते घरला चालले.



महादू म्हणाला, “ एवढी जीवाची मुंबई केली. पण आपल्या या भुदरगडाच्या दऱ्या खोऱ्यात असणारी गंमत कुठच नाय बघ. तुमच्या सारखे सवंगडी व जीवाला जीव लावणारी माणसे कुट मिळतात. बाजीरावाला हिम्मत देत महादू म्हणाला, “ घाबरु नकोस मी मुंबईवरून आणलेलं आयुर्वेदिक औषध जे दाजीला दिल होत. त्यातील एक बाटली घरात हाय. ते लावलं की लागशील दोन दिवसात उड्या मारायला. बोलत चालत ती गावात आली. त्यांना बघून जो तो कौतुक करत होता. बाजाची बायको मात्र म्हणाली, “ काय शिकार करायला गेलता की शिकार व्हायला.”



तवा बाजी म्हणाला, “ अगं शिकार करायची म्हणजे लहान सहान अपघात व्हायचे. शिकार म्हणजे जोखमीच काम.”

ती म्हणाली, “ होय तर आता दोन चार दिवस दुकान बंद ठेवावं लागलं.”

तवा तो म्हणाला, “ दोन चार दिवस दुकान बंद ठेवायला मला काय पाळणा करून आणला नाय.”

मारलेली शिकार वाटून घेतली. व घरच्यांसकट सगळ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

आपल्या सवंगड्यासवे मज्जा मारत महिना आनंदात घालवून महादू पुन्हा मुंबईला जायला निघाला. तेव्हा गावच्या स्टँडवर त्याचे मित्र सोडायला आले. महादू गाडीत आपल् लगेज घेऊन चढला. थोड्या वेळाने गाडी तालुक्याला मार्गस्थ झाली. बाकीचे तिघे त्याची आठवण काढत घरला निघाले. त्यांच्या मनात महादू पुन्हा दसऱ्याला गावी आला की शिकारीला जायचं हा विचार घोळू लागला. मनात मनोराज्ये रचत सगळी आपापल्या कामात मग्न झाली.

बाजीराव पुन्हा आपल्या दुकानात वस्तरा चालवू लागला. तर गजा आपल्या दुकानात कपडे शीवण्यात मग्न झाला. तर तुकाराम आपले घर शेत व जनावरे सांभाळण्यात गुंतला.

महादू मात्र आपल्या गावच्या आठवणीत शहरातील धावत्या जगात आपले दिवस ढकलू लागला. पुन्हा कधी सुट्टी मिळेल. व मी गावी जाईन या आठवणीत तो दिवस घालवाय लागला.

लेखक : निशिकांत हारुगले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...