लेखक : निशिकांत हारुगले.
एम. ए. बी. एड.
सह्याद्रीच कुशीत असलेल्या या पेठत सर्व लोकांना जमिनी काही समान नाहीत. काही लोकांना कमी काहीना जास्त अशा आहेत. तर काहींना तर जमिनीचं नाहीत. अशा या लोकांचं राहणं सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात जास्त जात. पावसाळा म्हंटला की भात खाचरात राबायचं व चार महिन्यात वर्षभराच पिकवायच. व पुढचे सहा महिने लोकांच्यात किंवा आपल्या शेतातील राहिलेली कामे करायची. पेठेच्या गावातील अनेक कुटुंबे शेती करत असल्याने घरात चुलीच्या जळणाची समस्या उद्भवत असे. फेब्रुवारी महिना उलटला की डोंगरच फासल पाणी अटायचं. त्यामूळे शेत कामातून थोडा विसावा मिळत असे.
लागोपाठ जत्रा यायच्या व शिमग्या पर्यंत घरातील जळण संपत असे.
तेव्हा घरातल्या बायांना राईतील तसेच भुदरगडला लागूनच असलेला डोंगर खुणावू लागे. व बायाबापड्या राईच्या डोंगराची पायवाट चढू लागत. अशीच एक कथा पेठेच्या गावातील बायांची लाकडापायी होणारी झडती कशी होते ती सांगते.
रब्बीचा हंगाम निघाला. व जत्रांचा ओघ सुरू झाला. गाव देव जोतिबाची पण जत्रा झाली. व गडच्या भैरवनाथाची सुद्धा.
रिकाम्या वेळात काय करायचं तर वाकळ शिवण चालू होई. अशाच या एकमेकींच्या शेजारील बायाबापड्या आपले घरकाम आटोपून शेजारच्या तानुबाईच्या परस अंगणात ओसरीत वाकाळ शिवत बसल्या होत्या. यामध्ये चव्हाणांची तानुबाई, गुरवाची सखूबाई, नाव्ह्याची बायजाक्का होत्या.
बोलता बोलता त्यांच्यात विषय निघाला. गुरवाची सखूबाई बायजाक्काला म्हणाली, “ काय सांगू बाई घरात जळणाचा एक तुकडा पण नाही. म्हाताऱ्यानं पावसात वाहून आलेला ओंडका आणला होता. तो पण संपला.”
तेव्हा बायजाक्का म्हणाली, “ तर काय बाई फेब्रुवारी महिन्यात माही झाली. पावन रावळं जेवलीत. त्यात माझी पण लाकड संपलित बघ. आमचा काय खंडोळ कमी हाय हो. जमली की चांगली भुतावळच नव्हं.”
तेवढ्यात तिथे पोऱ्याची सुंदरा आली. व म्हणाली, “ काय तान्याक्का वाकाळ शिवतेस म्हणं.”
तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “काय दिसत नाही.”
तेव्हा सुंदरा म्हणाली, “ दिसतेय की पण विचारायची एक पद्धत असतीया. कुणासाठी शिवतीस ग.”
तेव्हा तानुबाई म्हणाली, “ माझ्या लेकीसाठी.”
तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “तर.. लेकीलाच दे. तिचं तिथं खाऊन संपना एवढं असताना हीची पोर मुलखातनं राबून आणत्यात. व ही लागली लेकीला वाकाळ द्यायला.”
तेव्हा तानुबाई म्हणाली, “ काय सांगू जावई म्हणाला म्हणून, नाहीतर मला कुठली हौस. आलिया. तरुणपणात शिवल्या होत्या वीस पंचवीस वाकळी. आता नाही जमत. म्हटल कवा मागत नाही. आता मागितलीया तवा देऊया एखादी शिवून. “
तेवढ्यात सखू म्हणाली, “ तर तर तो लागला गोड गोड बोलायला, व ही लागली म्हातारी डोलायला तेच्या तालावर. शहरवस्तीला बंगला बांधला. चिमुटभर कुंकू लावायला तरी बोलावलं का तुला. राधानगरीचा चिक्कू कोंबडा त्यो कवा येताना पावाची पिशवी तरी आणतो का तो.”
तेव्हा म्हातारी म्हणाली, “ जाऊ दे तिकड. नाहीतर तेच्या खादिन कुठं माझी झाड व्हायचीत. पोरगी सुखात असली म्हणजे झालं.”
तेव्हा सुंदरा म्हणाली, “ सखू बोलती ते खर हाय. तेच्या घरात नाही काय तेची आई. तिला इत नाही का वाकाळ शिवायला. तुला लई व्याप बघ.”
तेवढ्यात बायजाक्का म्हणाली, “ ते सर्व जाऊ देत लाकडाचं काय करायचं. तेवढं सांग.”
तेव्हा सखूबाई म्हणाली, “ काय करायचं म्हणजे आणायची डोंगरातून नाहीतर काय.”
तेव्हा सुंदरा पण म्हणाली, “आमच्यात काटकीचा एक नार पण नाही.तवा परवा दिवशी सोमवार हाय. जाऊया काय लाकडाला.”
तेव्हा त्या बायकांच्यात चर्चा झाली. व लाकडाला जायचं ठरलं.”
सोमवारचा दिवस उजाडला. तस त्या सर्वजणी आपापली कामे आटोपून डोंगराला निघाल्या. प्रत्येकिन आपल्या घरातील कोयते व दोऱ्या घेतल्या या सर्वजणी डोंगराला निघाल्या. एकमेकींशी गप्पा करत त्या डोंगर चढू लागल्या. चालता चालता सखू तानुबाईच्या सुनेला म्हणाली, “ काय सुने माहेराला कधी गेलतिस का लाकडाला.”
सुनिता म्हणाली, “नाही बाई आमच्या गावाला डोंगर कुठला.सगळा सपाट माळ हाय. ऊसातील रानात खोडव्याबिगर कायपण मिळत नाही.”
तेव्हा बायजाक्का म्हणाली, “डोंगरची मोळी इल काय तुला.”
“न यायला काय झाल. मी आमच्या गावाला नदीच्या रानातनं वाड्याची वज्जी व उसाच्या मोळ्या वडल्यात. ऊसाच्या मोळ्या पण वडाय जाईते की. मी काय वज्ज्याला हलकी नाही.”
सुनिताच उत्तर ऐकूण बायजाकका म्हणाली, “ पोरगी घट्ट हाय. शंकर्याचा संसार लई चांगला करील.”
इतक्यात सुंदरा म्हणाली, “ तुझा नव्हरा लई साधा माणूस, कोण पण फसवल बघ तेला. तवा डोळ्यात तेल घालून संसार कराय पाहिजे बघ तुला. नाहीतर ही तानी लई जावई जावई करतेय. कधी नाही विचारणार जावई तिला. पण तुला जरा आधार हाय तिचा.”
सुनिता म्हणाली, “ तिच्या जिवावर तर पोर टाकून मला बाहेर पडता येत.”
अशा गप्पा मारत त्या डोंगर चढून गावमिरीच्या रानात आल्या. गवमिरीच रान सपाट असल्याने तिथं भाताची शेतं केली जायची. रानगव्यांच्या मुळे नुकसान होत असे. त्यात मोरांचा वावर असल्याने तर भात पिकाची चांगलीच मळणी व्हायची. गावमिरीला लागून असलेल्या जंगलाच्या रानात गेल्या. व लाकडाच्या मोळ्या काढल्या. व घेऊन आल्या. अस त्यानी आठवडा भरात भरपूर जळण गोळा केलं. हे तुळजाईच्या तुक्यान बघितलं. व त्यानं वन खात्याला चहाडी केली. एकदा जळणाला गेल्या असताना. त्या जळण काढू लागल्या इकडून तिकडून त्यांनी जळण जमा कराय सुरवात केली.
सखूबाई झाडावर चढण्यात तरबेज असल्याने तिन झाडावर चढून वाळलेला मोठा ढापा पाडला. आपल्या वज्ज्याची जोडणी केली. व सुनीताला म्हणाली, “ तू लाकड तोडून मोळी बांध. मी तुला पण एखादा ढापा बघते. अशा तऱ्हेनं त्यानी आपली वज्जी तयार केली. वज्जी केल्यावर त्या एका झाडाखाली जाऊन विसावल्या. आपापल्या भाकरी सोडल्या. एकमेकींना सांबार व कालवण वाटून त्यानी भाकरी खाल्या. व तेथील जवळच्या झरीच पाणी प्यायल्या. रानातली बोर, करवंद, तोरणं गोळा करून ते खात आपल्या वज्जा जवळ आल्या.सूनितांन त्यातली थोडी करवंद आपल्या मुलीसाठी पदरात बांधली.”
बघून सुंदरा म्हणाली, “ काय नव्हऱ्याला नेऊन देतेस वाटत.”
तर सुनिता म्हणाली, “ नाही पोरसनी घेते.”
तेवढ्यात सखू गुरविन म्हणाली, “लई पोर पोर करू नकोस, स्वतच्या पोटाला देखील खात जा. या जगात कोण बी कुणाचं नसतं. माझं वय बघितलंस नव्हं. तुझ्या सासुबरोबर नांदायला आले. तवापासन हा वनवस हाय बघ. आदी सासूच्या राज्यात राबूनच मेले. व आता पोरग्याच्या राज्यात तरी डोंगराची मोळी चुकली नाही बघ.”
“ मी पण माझ्या पोरासनी तुझ्यासारखी जपते. या रानातनं पिशव्या भरून करवांद नेईते. पण आता लगीन झाल्यापासून बघितलस नव्हं, दोन दोन सूना असून आम्हा म्हातारा म्हातारीला राबाय लागतेय. मी मरायच्या आधी माझा नव्हरा कलमडला तर बर. नाहीतर त्याच वाळवान लागल माझ्या मागं.”
“बरं घ्या आता मोळ्या व चला लागूया गावच्या वाटेला.”
तेव्हा सुनिता म्हणाली, “ शेवटला देवान आईपण दिलंय नव्हं. तू अस बोलतीस. व पदराआडनं सांबार नेऊन लेकाला देतीस नव्हं. “
तेव्हा सखू म्हणाली, “ व्हय बाई खर हाय तुझं. कवा वनवास संपतोया देवा जोतिबाला ठावं.”
असे म्हणून वज्जी घेऊन त्या गावच्या वाटेला लागल्या. गावमिरीच्या शिवरातून त्या खाली उतरल्या. व विश्रांतीसाठी थोडावेळ मेसकाट्यांच्या दाटीच्या बेटाच्या जागेवर बसल्या.
इतक्यात तपासणीला निघालेला वनरक्षक त्यांना गाठ पडला. व त्यांना बघून म्हणाला, “ लाकड कुठून आणल्यासा मला माहीत आहे. खूप दिवस शोधतोय तवा आज सापडल्यासा मुद्देमालासह.”
तेव्हा सुनीता हळूच म्हणाली, “आता काय करायचं ग.”
सकू म्हणाली, “ गप्प बस भिऊ नको.“
तेव्हा तो आपल्या तोऱ्यात जास्तच बोलू लागला.या सगळ्या त्याच्याकडं पाहू लागल्या.”
त्यात बायक्का म्हणाली, “ एक वार माफ करा साहेब. आम्ही गरीब माणसं आहोत. पोटासाठी एवढं डोंगर कट्टा चढताव काय करावं.”
तेव्हा सुंदरा म्हणाली, “ एवढ्या डाव सोडा साहेब आम्ही काय वल्ली लाकड नाही काढलीत. वाळलेल ढाक पाडल्यात. तवा आम्हाला सोडा.”
तेव्हा तो दोनचार शिवा हासडत मोळीतील कोयते काढून घेऊ लागला.”
तशी सखू म्हणाली, “ पाया पडते साहेब कोयत तेवढे काढून घेऊ नका.”
“तुमचे कोयते काढून घेतल्या शिवाय तुमची मस्ती उतरायची नाही.” तो म्हणाला.
कितीतरी वेळा गया वया केली तरी तो ऐकायला तयार नव्हता. व जास्तच अरेरावी करायला लागला.
ते पाहून सखू म्हणाली, “ लई सरकारच जंगल सरकारच जंगल म्हणतोस. सरकार कुणाचं गा आम्ही निवडून दिलेलच नव्ह. चार फुकण्या कांडग्या पाई गरीबाच कोयत काढून घेऊन बायकांवर पुरुषार्थ दाखवतोस व्हय रं.”
तेव्हा तो म्हणाला, “ एक तर चोरी व वरती बरी चाललीय शिरजोरी.”
तेव्हा सुंदरा म्हणाली, “ मगाठावण ओरडुन सांगताव की आम्ही वाळलेली लाकड काढल्यात. तुला एक तरी वल लाकूड दिसतय का. आम्ही गरीब मानस गावात धड घर नाही की शिवारात धड शेत नाही कुठं जावाव.”
तेव्हा तो म्हणाला, “ जावा की मसणात.”
तेव्हा बायजा म्हणाली, “ हे बघा मसणात तर सगळीच जात्यात. तू पण जाशील.”
शेवटी सखू म्हणाली, “ हे बघ आम्ही आता गावमिरीत हाय तू काय आम्हाला जंगलातली लाकड काढताना पकडलास काय. आमचं म्हणणं हाय की आम्ही जंगलातील लाकड काढली नाहीत. जा आता काय म्हणणं हाय तुझ.”
तेव्हा तो म्हणाला, “मग कुठली काढल्यासा सांगा.”
तेव्हा ती म्हणाली, “ ते तुला विचारायचा संबंध नाही. व एवढी रखवाली करतोस रात्रीची सागवानाची लाकड व चंदनाची लाकड कुठं पळून नेत्यात त्यांनां पकड की. तेव्हा पडत असशील डाराडूर घोरत. व आम्हा बायकांना बघून शड्डू ठोकतोस व्हय र.”
तेवढ्यात सुंदरा म्हणाली, “ मला काय ठाव नाही त्या लाकडविक्या तुक्यासंग तुझ काय संधाण हाय ते. जंगलातली सागवानाची लाकड कुठं जात्यात ते माहीत नाही व्हय आम्हाला. गुमाण कोयत दे नाहीतर उभा इतच जाळताव तुला..”
तेव्हा तो म्हणाला, “ सरकारी अधिकाऱ्याला अस बोलण गुन्हा हाय.”
तेव्हा सखू म्हणाली, “ होय गुन्हा हाय खर तर कायदा तुम्हाला पण लागू हाय. तुम्ही इकता ते चालत. व आम्ही पोटासाठी कांडग्या काढताव ते चुकीचं.”
हे बोलणं ऐकूण हुज्ज्जत घालत्याला त्यो वनरक्षक ओशाळला. व त्यांचे त्याने कोयते परत केले. व निघून गेला.”
तेव्हा सुनिता म्हणाली, “ आता तो आपली तक्रार करणार.”
सखू म्हणाली, “ सुने हा साधापणा सोड. बघितलंस काय कसा फुगलेल्या बैलागत आलता. व गेला कसा भिजलेल्या उंदरागत याला एकीच बळ म्हणत्यात.”
बायजा म्हणाली, “ आता काय या वर्षाची जोडणी झाली. उद्यापासनं खोडव्याला जायचं. इकडली वाट जगला वाचलाव तर पुढल्या वर्षी.”
लाकडाच्या मोळ्या घेऊन त्या घरला आल्या. त्यानी आता सुटकेचा निःश्वास टाकला होता. संध्याकाळ झाली. सांजेच्या जेवणाला सुनिता लागली. इतक्यात शेजारील मंगलाची पोरगी सांगत आली. तुम्हा लाकड आणायला जात्याली चाडी तुळजाबाईच्या तुक्यान केली. मगाशी मी दामू अण्णाच्या दुकानात गेले. तेव्हा संगप्पा आजाला तो सांगताना ऐकलं.
तेव्हा सुनिता चिडली. व तिने हातातलं काम सोडलं. व तिने सखुला सांगितलं. तशी सखू चिडली. व तिने लाकडाला जाणाऱ्या बायकांना बोलावलं. व हे सांगितलं. तशा सगळ्या बायका चिडल्या. व व एक एक लाकूड घेऊन तावा सरशा तुळजाईच्या घरात शिरल्या. व तुळजाईच्या सुनेला त्यानी विचारलं. ‘तुक्या कुठं हाय?’ तेव्हा ती म्हणाली, “ काय काम हाय?”
तेव्हा सखू म्हणाली, “ त्याची पूजा बांधायची हाय.”
इतक्यात त्यांना चुलवानाला बसलेला तुकाराम दिसला. त्यानी आत जाऊन त्याला जाब विचारला.
तसा तो म्हणाला, “ तुला कुणी सांगितलं म्या.. म्ह.. टल म्हणून.”
तेव्हा ती म्हणाली, “ त्या ऑफिसरन सांगितल जातोस काय विचारायला लेका.”
तुझ्या बाबन डबोल करून ठेवलंय तस आमच्या सासऱ्यान नाही. तुझ मड बसवलं ते.” असे म्हणत. त्यानी तुक्याला बडवायला सुरुवात केली. तस त्याची बायको मधी पडली. तशी तिला धरत सुनिता म्हणाली, “ तू गप्प बसलीस तर बर नाहीतर तुला पण निपाणी दाखवीन.”
शेवटी तुक्या बोंबलायला लागला. तवा तुळजा म्हणाली, “ सखे सोड बाई तेला. तुझ्या पाया पडते.”
तेव्हा सखू म्हणाली, “ म्हातारे तुझ्याकडं बघून याला आता सोडताव जर याने असा परत चमचा ढवळला तर डोचक्याची पाक केस निघतील तेच्या.”
शेवटी त्या सगळ्या त्या घरातून बाहेर पडल्या. व आपापल्या घरला निघून गेल्या.
अशा प्रकारे डोंगरची मोळी पेठतील लोकांच्या मनोरंजनाचे कारण बनली.
लेखक : निशिकांत हारुगले





