शुक्रवार, १० जून, २०२२

७) बसवाण, बैल, महादेवाचा नंदी

 ७) बसवाण

               लेखक : निशिकांत हारुगले.

                एम. ए. बी. एड.




दख्खनच्या सह्याद्रीच डोंगर कप्यात शेताची खाचर डोलत होती. त्याच्या कुशीत वाहणारी वेदगंगा आपल्या काठावरील अनेक गावांना सुखावत चालली होती. तिच्या कुशीत अनेक वाड्या व गावे गुण्यागोविंदानं नांदत होत्या. पेठेच्या गावाला देखील असाच शिवार होता जसा गावाच्या खालती तसाच तो गावच्या वरती देखील होता. शिक्षणान जरी सुशिक्षित पण आलं असल तरी बरेच जन शेती करत होते. त्या पैकी एक पांडुरंग पवार. हा देखील शेती करी. तशी त्याला लहानपणापासूनच शेतीची आवड, त्यामूळे शेतात राबणारी बैलं म्हणजे त्याचे सवंगडी. लहानपणापासून याच्या बैलगाडीत बस. त्याच्या गोठ्यात खेळ, कधी मातीची बैलं बनव. असा सगळा खेळ खेळत तो लहानाचा मोठा झाला.

पुढे त्याच लग्न झालं. घरची जबाबदारी अंगावर पडली. व ज्या बैलांशी खेळत तो लहानाचा मोठा झाला. तिच बैलं त्याच्या जीवनाचा आधार झाले. घरच्या गाईची पाठी छान बैल तयार केली होती. पण बहिणीच्या नव्हऱ्याला हवी असल्याने त्यान ती देऊन टाकली. आता नवा जोड घ्यायचा तर पैसे हवेत. म्हणून घराच्या शेताबरोबर लोकाची शेत त्यानं कसायला घेतली. व सुगी होताच धान्य विकून आलेल्या पैशात बैलं घ्यायचं त्यानं ठरवलं. पेठेच्या शिवारात अनेक प्रकारची बैल असत. पण पांडबाला आपली बैलं नंबरी हवी होती. म्हणून त्यानं संकेश्वरच्या बाजारातून बैलं घ्यायची ठरवलं. त्या दृष्टीनं त्यानं रुपयांची जमवाजमव केली. व आपला मित्र हरबासोबत तो बैलं घ्यायला निघाला.

बाजाराच्या दिवशी तो तालुक्याच्या स्टँडवर आला. सोबत हरबा पण होता. गडहिंग्लजला चाललेली गाडी त्यांनी पकडली. थोड्या वेळानं गाडी निघाली. पाल घाट लवंडून गाडी चिकोत्रा खोऱ्यात उतरली. पांगीर पाटीवर काही उतारू उतरले. तर काही गाडीत चढले. एक म्हातारा लगबगिन चढला. व हरबाजवळ बसला. व म्हणाला, “गाडी कंच्या गावाला जाती.”

हारबा, “ पाटी वाचली नाही का?”

वाटसरु, “ नाही व मला जरा कमी दिसतं.”

हरबा, “ गडहिंग्लजला जाती. “

वाटसरु, “ तुम्ही कुठं चालल्यासा.”

हराबा, “ आदी तूम्ही कुठं जाणार ते सांगा.”

वाटसरु, “ मी उत्तूरात उतरणार हाय. जरा डुलकी लागती हो मला. उत्तूर आलं की सांगा. नायतर मागल्या वानी नको. गडहिंग्लजातच जाग यायची.”

हरबा, “ मी उठविन म्या चाललोय गडहिंग्लजला.”

तो थोड्या वेळानं घोराय लागला. उत्तूरात आल्यावर त्याला जाग केलं. व त्याला आदी उतरला. व दुसरीकडं बसलेल्या पांडबाला जवळ बसायला बोलावलं.

हरबा, “ काय त्या म्हाताऱ्याचा सूर कशी बायको नांदत असेल देव जाणे.”

पांडबा, “ गप्प लेका तू बी घोरतोस की.”

हरबा, “ माझी तिनची मोटार कुठं व ही दहाची कुठ.”

एकच हास्या पिकला.

गाडी गडहिंग्लजात दाखल होताच. त्यानी पहिल्यांदा उपहारगृह गाठलं. भजी पावाची ऑर्डर दिली. ती येताच नाष्टा आटोपून ती बील भागवून स्टँडवर आलीत. व संकेश्वर पाटी वर आलीत. तिथं अनेक कन्नड बस होत्या. त्याकडे पाहत

पांडबा, “ हरबा यातर सगळ्याच जिलब्या हाईत. कोणत्या बशीत चढायचं.”

हरबा, “ थांब कंडेक्टरला विचारू आधी.”

मग त्यानं दोन चार एस्टींची चौकशी केली. शेवटी त्यांना संकेश्वरला जाणारी बस मिळाली. व तेनी थेट संकेश्वर गाठलं.

संकेश्वरचा बाजार भरला होता. ती चौकशी करत करत. जनावरांच्या बाजारात दाखल झाली. त्याना काय करावे सुचेना सगळेच कन्नड बोलणारे. ते कावरे बावरे होऊन इकडे तिकडे फिरुन बैलं बघू लागले.




त्याने बघून एकजण जवळ आला व कन्नड मध्ये बोलला.

तेंव्हा हरबा , “ ये बाबा मराठीत बोल तुझं कायबी समजत नाही.”

तेव्हा तो म्हणाला, “ काय बसवाण घ्यायचय.”

हरबा, “ होय, बैलच घ्यायची हाईत. पण आम्हाला या लोकांची भाषा समजत नाही.”

“एवढच नव्हे, मी देतो जमवून पण मला हजार रुपये कमिशन पाहिजे.” तो म्हणाला.

हरबा, “ पावणं आम्ही तुम्हाला येड वाटलाव काय. नको आम्हाला तुमच्या कडन बैलं. आमचं आम्हीच बघतो.”

ते दोघे बाजूला गेले. बाजारात हिंडून बैल बघू लागले.काही पाडी दोन दाती तर काही चार दाती , शेपटीचा गोंडा, अंगाच कांड बघत ते निघाले. शेवटी त्यांनी एक बैलजोडी हेरली. बैलं दिसायला वक्राकार शिंगाची करड्या रंगाची. दिसायला झ्याक त्यानं आपल्या भाषेत त्या पाड्यांचा दर विचारला. त्या माणसानं पंचवीस हजार सांगितला. दर जास्त पाहून ते बाजूच्या जोडीला बघू लागले. थोड्या वेळानं ते दोघे एका बाजूला गेले. हरबा, “हे बघ पांडू जर आपल्या दरात जोडी मिळाली तर घ्यायची. नाहीतर निघायचं. थोड्या वेळानं तो मघाचा कानडी हेड्या पुन्हा त्यांच्याजवळ आला. “ हे बघ मामा मला जर सातचे रुपये देत असशीला तर तुम्हाला बैल जमवून देतो.”

पांडबा, “ हे बघ तू जर ती करड्या रंगाची बैल चौदा हजारात जमवून देत असशिल तर तुला पाचशे रुपये कमिशन देईन.”

“काय राव चौदा हजाराला ऐक बैल तरी येईल काय?.”

हरबा, “ मग तुझी बैलच नकोत. चल पांडू जाऊया आपल्या भागात बघू एखादा जोड मुरगुडच्या बाजारात.”

 असे म्हणताच तो त्यांना थांबा म्हणाला, व त्या बैल मालकाकडे गेला कानडीत बोलचाल झाली व पंधरा हजार चारशेला ती बैल ठरवून त्यानं दिली. बैलं घेतल्यावर त्याला पैसे दिले. व मध्यस्तीला पाचशे रुपये देऊन व्यवहार बाजारात नोंद केला. व बैल घेऊन ती बाजारातून बाहेर पडलीत. आता थोडेच पैसे शिल्लक होते .

बाजारातून बाहेर पडताना त्या मध्यस्तान विचारलं, “काय ट्यांपो गाठून देऊ का.”

तेव्हा हारबा म्हणाला, “ नको पावन, इथ भडगावात आहेत पावन आमचं त्यांचा टेम्पो हाय की.”

असे म्हणुन ती गडहिंग्लजच्या वाटेला लागलीत. जवळ पैसे कमी असलेने त्यांनी चालत जायचं ठरवलं.”

थोड अंतर गेल्यावर पांडू म्हणाला, “ मगाशी टेम्पो ठरवला असता व घरी गेल्यावर पैसे दिले असते तर चालले असते की.”

हरी, “ चल गप हा आधी कारडी मुलुख यांचा काय नेम कुठतरी न्यायची व लुटायची.”

“मग आता गावी कस जायचं.” पांडबा म्हणाला.

“ कस म्हणजे चालत वाटेत कुणी विचारलं की सांगायचं पुढल्या गावी चाललोय म्हणून.” हारबा म्हणाला.

चालत चालत ती दोघ गडहिंग्लजला आलीत. एका हॉटेल बाहेर थांबून तेथून थोड्या चपात्या व भाजी घेतली. व थोडं पाणी पण आपल्या जवळील कातडी पाण्याच्या पिशवीत घेतलं. व ती आपल्या वाटेला लागलीत. पुढे वाटेला एका शेतात त्यांनी जेवण केलं. व उत्तूरच्या वाटेला लागलीत वाटेतील ओढ्यातील पाणी बैलांना पाजलं. बैलं चांगलीच धापली होती. त्याना सोक पडला होता. पाणी प्यायल्यावर त्यांना बर वाटलं. ती पुढे वाटेला लागलीत. वाटेत भेटणारी लोक बैलांची चौकशी करत होती. उत्तूरजवळ आल्यावर एका माणसान विचारलं, तो दिसायला काळसर होता.

“ बैलं आणली वाटत.”

हारबा, “ व्हय आणल्यात.”

थोड्या वेळानं त्यानें पुन्हा विचारले.

“ कोणत्या गावाला चालल्यासा.”

तेव्हा पांडबा म्हणाला, “ उत्तूरला चाललोय.”

पुढे ती निघालीत. थोड्या वेळात उत्तुर पार करून पिंपळगाव पाटी आली. आपल्या भागात आल्यामुळे त्यांना बर वाटलं. पिंपळगाव यायला चांगलाच अंधार झाला.

हरबा पांडबाला म्हणाला, “ एकदास आलो आपल्या भागात, या भागात वाटमाऱ्या होतात. आता मांगणूर पार केलं म्हणजे झाल.”

मांगणूर पार करत पाल गाठाय चांगलेच बारा वाजले. कुठून तरी जंगलातून कोल्हेकुई ऐकू येत होती. आता अंधाऱ्या वाटेनं चालन कठीण झाल होत. हारबा पांडबाला म्हणाला, “हे बघ पांडू चालून पाय दुखायला लागलेत. तवा आपण आपल्या पार्वतीकडे मुक्काम करूया.”

पांडबा, “ हे बरं हाय की.”

तेव्हा ती सर्वजण पार्वतीच्या घराकडे निघाली. पालीच्या मध्यावर पार्वतीच घर होत. तिथं गेल्यावर हहारबन पांडबाच्या हातात बैलाची दोरी दिली. व त्यानं पार्वतीच्या दारावर थाप मारली. रात्रीचं बारा वाजता घरावर थाप पडल्याने थापेच्या आवाजाने पार्वतीचा नव्हरा उठला. व दार उघडायला निघाला. तेंव्हा पार्वती म्हणाली, “ काय बाई म्हणावं या बाप्ययाला राती येळच कोण पणं थाप मारलं. रात्रीचं बारा वाजले. भुतावळ उठली असलं. झोपा गप्पवाणी.”

तो पुन्हा माग येऊन अंथरुणावर बसला. तेव्हा दारावर पुन्हा थाप पडली. तेव्हा तो म्हणाला, “ कोण हाय,”

हरबा, “ मी हाय हारबा पेठचा पावणा.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ आव, भुताटकी असलं ती, एवढ्या रातीला आमचा दादा कशाला येईल. इथं. “

हरबा, “ ये पारे असली कसली झोप लागली तुला.” पार्वती खाडकन उठली. व अंगावरली वाकाळ बाजूला सारत नवऱ्याला म्हणाली, “ चला बघुया कोण हाय ते.”

पार्वती अन तिचा नव्हरा दार उघडायला गेले. दाराजवळ जाताच पार्वती म्हणाली, “ दादा तू असशील तर दारावर चारवेळा थाप मार व राम म्हण.”

हरबान हसतच दारावर चारवेळा थाप मारून राम म्हणाला. पार्वतीची खात्री झाली. तिनं नव्हऱ्याला दार उघडायला लावलं.

दार उघडताच हारबा तिला म्हणाला, “ पेठत असताना बाच्यामागं रातइरचं पाणी पाजायला जाताना तुला भीती वाटत नव्हती. आन आता कुठून हे खूळ डोक्यात बसलय तुझ्या.”

पार्वती म्हणाली, “ तवा आपला बाबा असायचा संग. तो म्हणजे देव माणूस कसं त्या बरोबर कुठं पण जायलां भ्या नव्हतं वाटत. पण आता….”

अस म्हणत तीन बोलण तोडले.

पार्वतीचा नवरा म्हणाला, “ रात्रीचं कस येणं केल्यासा. सगळ कुशल हाय नव्हं…”

हारबा म्हणाला, “ पांडबाला बैल घ्यायची होती. म्हणून संकेश्वरला गेलतो. येताना चालत अलाव मोजक पैकं होत नव्ह. आदि तो कारडी मुलुख. फसवा वाटमाऱ्या होतात. तवा सगळ्यांना गंडवत आलाव. रात लई झाली.

 तवा तुझ्यात मुक्काम करावं म्हणून आलावं. बरं आता येळ नको बैल तेवढी गोठ्यात बांध व आम्हाला कायतरी वाढ बाय. कावळ कोकलायल्यात पोटात. पांडू हाय बैल घेऊन दारात.”

पार्वतीनं नव्हऱ्याला मांगराच दार उघडायला सांगितल. पांडबान बैल बांधली. त्यांना पाणी पाजून वैरण घातली. बैल बघून पार्वतीची म्हस नाचाय लागली. ती घाबरली होती. तशी पांडू व पार्वतीच्या नव्हर्यान बैलं आकडूनच बांधली. व दोघ घरात आली. हरबा व पांडू न्हाणीघरात जाऊन हातपाय धुऊन आलीत. तोपर्यंत पारून चुलीवरच्या शिक्याच्या थाबड्यात बघितलं. त्यात एक भाकर होती. तिन गोबर गॅस पेटवला. व दोन भाकरी टाकल्या. त्याच तव्यात झूणका केला. व ताट तयार करून घोंगडं अंथरले. व त्यांना वाढलं.

लागलीच थोडा असणारा भात व वरण्याच्या दाण्याचं कालवण पण वाढलं. ती दोघं जेवू लागली. त्यांना पाणी देण्यासाठी ती डेरक्याजवळ गेली. फळीवरचे तांबे काढून डेरक्यात बुडिवलं. तसा डूबुक डूबुक असा आवाज झाला. डेरक्याला पांढर कापड गुंडाळल होत. त्यामुळे त्यातील पाणी थंडगार होत.

पाण्यानं भरलेले तांबे देत पार्वती. पांडबाला म्हणाली, “ दादा जोडी मस्त हाईत. मग पैली जोडी काय केलीस रं.”

“ काय सांगू पार्वती दाजिला बैलं हवी होती. म्हणून घरचा जोड दिला. व आता सोसायटीचे प्रकरण व धान्य विकून आलेल्या पैक्यात हा सगळा डाव मांडला. आता बघुया आता ही बैल कशी लागत्यात.” पांडबा म्हणाला.

बोलत चालत इकडील तिकडील गप्पा मारत त्यांनी जेवण केलं.नंतर पारूच्या नव्हर्यान घोंगड अंथरलं. व ती सगळी झोपी गेली.

पारून भांडी उचलून बाजूला एका बुट्टीत घालून ठेवली. व ती पण आतल्या माळीत अंथरुन घालून झोपली.

तांबड फुटायला सुरुवात झाली. डालाखालची कोंबडी आरवू लागली. पार्वती उठली. न्हाणीघरात डेर्याखाली तीनं जाळ घातला. व बाहेरील हौदातन पाणी आणून त्यात भरलं. तिचा नव्हरा पण उठला. व न्हाणीघरात डेर्याखाली जाळ घालत शेकत दात घासू लागला. तिन मग उठून मांगर गाठला. तिला शेण काढायचं होत. बैल बघून तिनं नव्हऱ्याला हाक मारली.

“ आव इकडं या बैल बील मला मारल.”

तसा तिचा नव्हरा लागलीच आला. व बैलांचा रात्री त्याला अंदाज होता. त्याला उभा करून तिन शेण काढल. नंतर धार पण म्हशीची काढली. नंतर तिच्या नव्हऱ्यान जनावरांच्या पुढ्यातील काडसर काढून त्यानं पाणी पाजलं व वैरण घातली. तोपर्यंत पाणी तापल. पारुनं अंघोळ केली. व ती स्वयंपाकाला लागली. तिन चूल पेटवली. व बुड भांड्याला घेऊन भाताचं आधन ठेवलं. व वायलावर चहा टाकून ती भांडी घासायला गेली. थोड्या वेळानं पांडबा व हरबा उठले. त्यानी आपल आवरलं. ते दोघे जेवणखोलीत आले. पार्वतीनं त्यांनां पाठ दिला. ते त्यावर बसले. पार्वती चपात्या करत होती. तिन चहा आन चपाती दिली ती त्यानी खाल्ली. व ते म्हणाले, “ पारू आता निघताव.” तस पार्वती म्हणाली, “ असं कसं राती पण सरळ जेवण नाही. आता जेवूनच जा.” पार्वतीनं जेवणं केले. ती दोघं जेवली. व रातीच्या विश्रांतीन बैलं पणं तरतरीत झाली होती. आता त्यांनी जायचं ठरवल. त्यानी निरोप घेतला व तालुक्याच्या वाटेला लागली. घाट उतरून गारगोटी पार केली व नदीच्या शिवारानं त्यांनी गाव गाठलं. दारात आल्यावर पांडबाच्या बायकोन बैलाना ओवाळले. त्यानंतर पांडबान बैलं गोठ्यात नेऊन बांधली. नंतर ते दोघे हातपाय धुवून आले. पांडबाच्या बायकोन त्याना जेवण वाढले. त्यांनी जेवण केलं. नंतर थोडावेळ गप्पा मारून हरबा घरी जायला निघाला. 




गावातली लोकं येऊन बैलांची चौकशी करू लागले. बैलं चांगली लागली. कष्टाळू असल्याने पांडबान आपल सगळ कर्ज फेडलं. पण तो बैलांची खूप काळजी घेत असे. बैलांकडून चांगली राबनुक करुन जरी घेतली. तरी तो त्यांच्या सेवेत काही कमी पडू देत नव्हता. पांडबाची बैलं बघून जळणारे अनेकजण होते. त्यात गजा पाटील हा देखील होता. एकदा त्यानं दसऱ्याच्या शिलंगणाला पांडबाची कळ काढली.

शिलंगण असल्याने पांडबाने बैलं सोडली. तो व त्याचा पोरगा बैलं धुवायला व पवनी पाडायला नदीला गेलीत. अमृतमहल माटी करड्या रंगाची बैल खाऊन टमटमित दिसत होती. त्यांच्या वाटोळ्या शिंगांना लावलेला रंग व त्यावरील नक्षी खूप छान दिसत होती. बैलं घरी घेऊन जाताना वाटेत. गजा पाटील आपली खीलार बैलं घेऊन जाताना दिसला. सखारामला बघून म्हणाला, “काय सखाराम लावायची का शर्यत.”



तेच बोलण ऐकूण पांडबा म्हणाला, “ तेला काय इचारतोस. मालक अजून मी हाय. मी काय बैलं शर्यतीसाठी बाळगली नाहीत. माझा प्रपंच चालवतात ती. तूझ काय जातय म्हणायला, दहजणांच डबोल लाटून नाही बसलो मी भुजंगावाणी. तू काय एकाच्या दहा जोड्या घेशील बैलांच्या. तस माझं नाही. “

तसा गजा पाटील तेला म्हणाला, “तू भित्र्या लढाईच्या आधीच शेपूट ढेंगत घालतोय व्हय र.”

पांडबा, “ तू काय म्हणायचं ते म्हण.”

असे बोलून तो घरी निघाला. वाटेत शेताला निघालेला हरबा त्याला भेटला. गजाचं तिरक बोलण त्यानं हरबाला सांगितलं. तसा हरबा म्हणाला, “ बघवत नाही तेला खोटा पैसा हाय, तालुक्याच्या काय चोर बाजारात देखील खपणार नाही. तेच्या नादाला लागायच नाही.” अस बोलून हरबा शेताला गेला. पांडबान बैल गोठ्यात बांधलित. त्यांना चांगल सजिवल. त्याच्या बायकोने पुरणपोळीचा नैवेद्य खायला बैलांना दिला. नंतर पांडू व सखान जेवण केलं.

संध्याकाळ झाली. शिलंगणाच सोन लुटायला बैलगाड्या निघाल्या. पांडबाच पोरग म्हणाल, “काय नाही आज मी बैल घेऊन जाणार. त्यानं बैलं सोडली. तशी पांडबाची आई तेला म्हणाली, “ पांडू तू जा बरोबर, तरण पोर आहे, सळसळत रगात शांत बैलं न्यायचं नाही.”

तेव्हा पांडबा म्हणाला, “ हे बघ सखा आपण शेतकरी माणस, बैल जास्त दबवू नकोस. बैल म्हणजे महादेवाचा नंदी, बसवाणं महादेवान पाठीवलय तेला. त्याची सेवा आपला धर्म. बैल लई दबवू नकोस. देवाच्या पायावर घालून आण. महादेवान आपल्या सेवेला पाठीवले त्याला. महादेवान नंदीला पाठीवल की जा व माणसाला सांग दोनवेळ आंघोळ कर व एकवेळा जेव. पण नंदी सांगत आला. दोन वेळा जेव व एकदा अंघोळ कर. म्हणून महादेवान त्याला शिक्षा केली. दुसऱ्या वेळच्या माणसाच्या जेवणाची तयारी तू कर. तेव्हापासून नंदी शेतात राबतो. व माणसाला मदत करतो.म्हणून आपण त्याला दुखवायचं नाही.”

असं म्हंटल्यावर सखाराम बर बरं म्हणाला. व तेनं बैलं सोडली. सखाच्या बायकोन दृष्ट काढून बैलांना ओवाळले. त्यांवर मायेचा हात फिरवला व कानाजवळ नेऊन बोट कडाकडा मोडलीत. सखाराम बैल जुंपून देवळाकडे आला. देवळाला वेडा घालून त्यानं बैल ऊभी केली. देवाच्या पाया पडून अंगारा घेतला. आपल्या व बैलांच्या कपाळाला लावला. त्याचे मित्र पण गाडीत चढले. इतर बैलगाड्या पाठोपाठ शीलंगणाला निघाला. गावा बाहेर येताच गजा पाटलाची गाडी पण होती. त्याच पोरगं व तो बैलं दबवत होते. त्याची खिल्लार जोडी पळण्यात लई पटाईत होती. मुख्य सडकला आल्यावर गजा पाटील सखारामला म्हणाला, “ काय सखा लावायची का शर्यत.”

तेव्हा सखा म्हणाला, “ नाही मी शिलंगणाला आणल्यात.”

तेव्हा गजा पाटील म्हणाला, “बुळग्या हरलो म्हण की.”

सखारामचे मित्र म्हणाले, “ चल की लावूया बघू तरी.”

शेवटी शर्यत लागली. पांडबान पत्री न मारल्यान बैलांना डांबरी रस्त्यावर जोरात पळता येईना. गजाची गाडी पुढे निघाली. गजा म्हणाला, “ बघितला का खिल्लारांचा खिल्लारपणा इकडून तिकडून नाही आणली म्हसवडच्या बाजाराची हाईत. तस सख्यानं बैलांना दोन चाबूक लगावले. तशी बैल पळू लागली. डांबरी रस्ता संपला. व भोर्डीच्या माळाचा कच्चा रस्ता लागला. चडाचा टेक असल्यानं व बुरंबाट रस्त्यानं बैलानी जोर धरला. डोंगरच पयांन वडून सरावलेली बैल धावू लागली. व शर्यतीला आणलेली गजाची बैल माग पडली. वाट वळखीची असल्यानं डिरक्या फोडत कृष्णाकाठी बैलं पळायला लागली. टेक पार करून अमृतमहल माटी बैलांनी गजाच्या बैलांना माग सारत भोर्डीचा माळ गाठला. शर्यत जिंकून शिलंगणाच सोन लुटून बैलं घरला आलीत. पांडबाला समजल्यावर त्यानं सख्याला गोरणीत घालून चाबकाने बडवला.

सख्या म्हणाला, “ बा चुकलो मी, पुन्हा नाही करायचा असं.”

 शिलंगण झाल. भात कापणीची धांदल सुरू झाली. भाताच्या मळण्या निघू लागल्या. शर्यतीत झालेल्या हारीन पाटील चांगलाच भांबावलेला होता. गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली होती.

एके दिवशी पांडबाने हरबाची मळणी काढून बैल हरबाच्या मांगरात बांधली. व बैलांना वैरण आणायला गेला. इतक्यात पाटील उसाच्या फडातून आला. लपत छपत येऊन त्यानं कडच्या बैलाला कायतरी खायला घाटल. ते खाल्यावर बैल ओरडू लागला. तसा पाटील पळाला. बैलाचा आवाज ऐकून पांडबा व रानातील माणस तिथं आली. बैलाच्या तोंडाला फेस आला. व जाग्याला बैल मटकन बसला. व तळमळूनं बैलान प्राण सोडला. काय पायाखालच झाल का म्हणून इकड तिकड बघितलं. तर काही नव्हतं शेताला निघालेल्या लक्ष्मीला पाटील गडबडीने जाताना दिसला. ती कालवा ऐकूण तिथं आली. व म्हणाली, पांडूदा मी गजा पाटलाला उसाच्या सरितन जाताना बघितला. मेल्याचच काम असणार हे. इकडं तेच शेत का भात काय कराय आलता मेला.”

पांडबाला रडू आलं. दुसरी बैलगाडी आणली. व बैलाला नेऊन शेतात पुरलं. घरी कळल्यावर पांडबाच्या बायकोन शिव्यांची लाखोली वाहिली. तेची आई हात पाय घासत म्हणाली, “ माझ्या बसवणाला इक घालणाऱ्याच मड बसू दे. आई लक्ष्मी बघून घेईल. त्याच्या रक्ताचं शिंपण होईल.” पश्चिमेला पुढा करून तिन माहेरच्या देवीला नमस्कार केला. व म्हणाली, “बघून घे ग आई.” दोनचार दिस कुणाला आन गोड लागलं नाही. सगळे लोक पाटलाला शिवा देवू लागले. दिस सरू लागले. पाटील एके दिवशी शेताला गेला होता. त्याला झटका आला. व पाण्याचा एक थेंब पण न मिळता जाग्याला मेला. काही दिवस गेले. हरबा पांडबाच्या घरी आला. व म्हणाला, “ एक बैल मेला म्हणून दुःखी होऊ नको. त्याच आयुष्य तितकं. चल जाऊ संकेश्वरला आणि या बैलाच्या जोडीला दुसरा बैलं घेऊया. “ पांडबांन जोडणी केली व दुसऱ्या दिवशी शिदोरी घेऊन ते दोघे पुन्हा तालुक्याला आले. व गडहिंग्लजची गाडी धरली. व बैल आणायला ते दोघे संकेश्वरला निघाले.

लेखक : निशिकांत हारुगले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...