लेखक : निशिकांत हारुगले
हळूहळू दिवस सरू लागले. बघता बघता मुले मोठी होऊ लागली. तसा लुटूपुटू भातुकलीचा खेळ रंगू लागला. शांता व वज्रा या जिवलग मैत्रिणी, दोघींचे स्वभाव मात्र भिन्न होते. वज्रीच्या परसबागेत भल मोठ आंब्याचं झाड होत. आंब्याशेजारी ओसरी होती. तिथे पांढ-या शाडूच्या मातीच्या भिंतीशी मुले जेवणापाणी म्हणजे भातुकली खेळत होती. प्रत्येक मुलाने काही ना काही आणले होतें. वज्रेन गुळ आणला होता. पाटलाच्या सुरेखान भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. पण शांतेन काहीच आणल नव्हत. वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. व आई बाजाराला गेली होती. वज्राची आई ही गेली होती. त्यामुळे खेळायला आडवणारे कोणी नव्हते. वज्रेची आज्जी शेजारच्या बायकांशी गप्पा मारत होती. शांतीस मात्र वाईट वाटत होत. तिला आपण ही काहीतरी आणावे असे वाटत होत. तिच्यातील नेतृत्व गाजवयची वृत्ती तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिला शंकरआबाच्या परड्यातील चिंचेचं झाड आठवलं. त्या चिंचेच्या चिंचा खूप गोड असत. लहान तसेच मोठ्या मुलींना त्या खूप आवडत. मुली कधी मागून तर कधी चोरून आणत. वज्रा कधी चोरत नसे ती मागून घेई. शांती मात्र तिच्या उलट वागे मागून भीक मागणे तिला पसंत नव्हते. त्या पेक्षा चोरून आणलेले बरे हे तिचे ठाम मत होते. ती आले, असे सांगून ती तेथून घरला आली. घराला भलं मोठ कुलूप. बाबा बाहेर गावाला सोन्याच्या वसुलीला गेले होते. तितक्यात तिचे लक्ष शंकर आबाच्या परड्यातील चींचेच्या शेंड्याकडे गेलं. शेंड्याला लोंबणाऱ्या चिंचा तिला खूणावत होत्या. ती तडक तिथून शेजारील विलास अण्णांच्या घरात शिरली. व परसदारी निघाली. तेव्हा तिला बायक्का पाटलिन म्हणाली. “ काय कराय निघालीस ग शांते.”
शांता, “ काम आहे परड्यात जरा. ती तडक मागल्या सोप्यात आली. तिथं औतासन आणलेली बैलं बांधली होती. ती रवंथ करत होती. शेजारी पंढरपुरी – सांगोला म्हैस उभी होती. जवळच चारपाई पलंगावर औतासन येऊन विलासअण्णा झोपलेला होता. चांगला डाराडूर पडला होता. शांतेला पाहताच त्या म्हशीन शिंग हलवली. व ती वैरणीसाठी रेकू लागली. शांती तिला बघून बोलली, “ माझ्याकडे काय मागतीस तिथं झोपलेल्या मालकाला उठव जा हलवून. कसा बैलोबा झोपलाय बघ.” शांती परसदारी आली. पाटलिनीच्या परड्यात रामफळ, लिंबू, पेरू अशी कितीतरी झाडे होती. तेथून पुढे पायवाटेने गेल्यावर शेणाची गार ओलांडल्यावर शंकर आबाच्या परड्यात ती पोहोचली. शंकर आबाच्या परड्याचे दार बंद होते. ती तडक चिंचेकडे गेली. खारुताई सारखी झाडावर झपझप चढली. तिने पटापटा चिंचा काढल्या काही ओठयात काही खिशात व उरलेल्या तोंडात धरुन ती खाली उतरली. . तेंव्हा तिला जाधवांच्या जानबानं पाहिलं. व तो तिला म्हणाला,
“ मी सांगणार शंकरआबाला.”
शांता,
“ सांग जा, मी भित नाही कुणाच्या बापाला. जा चोमड्या.”
व ती तेथून तडक मुले खेळतात तिथे आली. तिच्याकडल्या चिंचा पाहून वज्रा तिला म्हणाली, “ काय डाका टाकून आलीस वाटतं.”
“ हो, तू चिंचा खा उगाच झाड मोजू नकोस.”
“ तुझ्या या धाडीत आम्ही पण भरडले गेलो नाही म्हणजे झालं.”
“ काही झाल तरी मी निस्तरेन . तू नको काळजी करू. व उगाच खेळताना भांडण उकरून काढू नकोस.”
सर्वजण खेळात रमून गेले.संध्याकाळ होत आलेली त्यांना कळलंच नाही. बाजाराला गेलेली वज्रा व शांतीची आई परतल्या होत्या. चलून आल्याने त्या खूप दमल्या होता. थोडी विश्रांती घेऊन त्या लगेच घरकामाला लागल्या. इतक्यात शंकर आबा वटवट करत शांताच्या घरी आला. बरोबर जानबापण होता. त्याने फूनगी टाकून आग लावायचे काम चांगलेच केले होते. शंकरआबा सुंदरा काकूंना म्हणाला,
“ तुझ्या लाडक्या बयेन माझ्या झाडाच्या चिंचा काढल्या. चींच उतरली. तो जास्तच तणतणत होता तेव्हा सुंदरान त्याच्या हातावर रुपये टेकवले. व त्याला परत पाठवले. दामाजीपंत खूप थकल्याने ते काही बोलले नाहीत. संध्याकाळ झाली. मुलांनी डाव मोडला. व घरी निघाली. वज्रेन आपली खेळणी परसात ठेवली. व आईला मदत करायला स्वयंपाक घरात गेली. वज्रेच्या आईन गुळाचा चहा चुलीवर ठेवला. व बाजारातील आणलेला वडा व्यंकू व वज्रेला वाटून दिला. व्यंकूस चहा पाहायला सांगून ती शेण काढायला गोठ्यात गेली. इकडे वज्रेन सगळ घर, आंगण झाडून काढलं. व ती परसदारी आली. परसदारातील विहिरीचे पाणी दोघा भावंडांनी काढले. व हातपाय धुवून दोन्ही भावंडे शुभंकरोती म्हणायला देवखोलित आले. व दिवा लावून शुभंकरोती म्हणू लागले. शांता घरी गेली. वज्रेच्या घरापासून आठ दहा पावलावर शांतीच घर होत. अन् घराच्या अंगणात यायला तिच्या कानावर आई आणि बाबांचे बोलणे ऐकू आले. ती बोलत होती. “तुमच्या लाडाने ही पोरगी बिघडत चालली आहे. बाप जन्मात कधी कुणाच्या वल्या पातोऱ्यावर मी पाय ठेवला नाही. का कुठली चोरी लबाडी केली नाही. अन् कुठून ही अंबाबाई पदरात पडली नुसती.घरात येऊ देत नाही तिला आज धडा शिकवला तर नावाची सुंदरा नाही.” असे बोलून ती आत चालली. तेव्हा दामाजीपंत म्हणाले., “ काढल्या असतील पोरीन दोन चार चिंचा याबद्दल त्या शंकर्यान कशाला गाव पेटवायचं एवढं. त्याला पैसे दिलेस ना. गप्प बस आता.”
अस बोलून राम कृष्ण हरी असं म्हणत ते पलंगावर बसले.
सुंदरा म्हणाली, “ हे सगळं तुमची फूस असल्यानं झालंय. येऊ देत गाव हिंडून टवळी दाखवते.” असे बोलून ती स्वयंपाक घरात गेली.
आई आत गेल्याचे पाहताच शांता हळूच घरात आली. दामाजीपंतानी तिला माडीवर जाण्यास सांगीतले. ती वर गेली. नंतर त्यांनी पाठीमागून येऊन तिला बाजारातून आणलेला खाऊ दिला. व तिथेच गप्प बसून खाण्यास सांगितले. व खाली येऊ नकोस. व ते खाली आले. गच्चीवरल्या सोप्यात शांतेन पुडी उगडली. व त्यातील वडा खाऊ लागली. शांतीने बघता बघता त्या वड्यावर हात साफ करून कागद परकराच्या खिशात घातला. गचका लागला तरी तिनं तो आवरला व ती हळूच खाली येऊ लागली. पण घरातील मांजर तिच्या पायात घुटमळू लागले. ते तिचे लाडके होते. पण आता यावेळी तिला त्याचा भरपूर राग आला होता. कारण आई मारेल याची भीती वाटत होती. ते शेवटी कलमडलेच. ती त्याला जिना उतरताना पायात आले म्हणून लाथेने बाजूला सारू लागली. व शेवटी रागाने ढकलले. त्यावेळी आई काही कामानिमित्त बाहेरील खोलीत आली होती. दामाजीपंत पोथी वाचत बसले होते. जसा कावळा बसावा अन ढांपी मोडावी. तस झाल. अन् शांतीने फेकलेले ते मांजर आईच्या पायात पडले. आईची नजर वर गेली शांती जिन्यावर दिसली. अनायासे जाळ्यात सापडली. आईने तिच्या वेणीला हात घातला. तशी ती ओरडली. दामजीपंत पोथी अर्ध्यात ठेऊन उठत्याले पाहून सुंदरा म्हणाली,
“ माझ्या व शांतीच्यामधी पडलात तर माझं मडं बघशिला. व शांतीची शपथ आहे तुम्हाला.”
तीनं तिला फरफटत आत नेली. व तट्टयाच्या कोपऱ्यातील काठी घेऊन चांगलीच बदडली. शांती ओरडू लागली.
“ आई ग मेलो मेलो, बाबा वाचव रे.”
पण सुंदरा कुठली ऐकते. दामाजी केविलवाणे होऊन पाहत होता.
शांती चिडून बोलली,
“ काठीण मारण्यापेक्षा नख लाव घाट्याला माझ्या. व टाक ठार मारून.”
सुंदरा म्हणाली, “ वेळ आली तर तेही करेन समजल काय.”
“अशा गुणांनी मिर्या वाटशील डोक्यावर. काय गरज होती त्या भाडखाऊच्या चिंचेच्या चिंचा काढायची. व त्या ही चोरून आजून म्हातारी झाले नाही की मेले नाही मी. चोऱ्या करतेय. तुझ्या कारणाने बापजन्मात कधी ऐकल्या नाहीत अशा शिवा ऐकायची पाळी आणलीस माझ्यावर. देवा महादेव, असली कसली बया पदरात टाकलीस माझ्या.” असं बडबडत तिन तिला माराय सुरुवात केली. इतक्यात बाजारातून आणलेली तंबाखूची पुडी व गूळ जो वज्रेरेच्या आईच्या पिशवीत ठेवला होता तो द्यायला वज्रा शांतीच्या घरी आली होती.
शांताला मारताना पाहून वज्रा वर डोंगरच कोसळला. आणलेले साहित्य दामाजीपंताकडे देऊन ती शांताकडे धावली. व तिला मिठी मारली. तिच्या आईच्या हातची काठी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तशा तिलाही दोन चार प्रसाद रूपाने मिळाल्या. वज्रीला लागताच शांतीच्या आईने आटोपते घेतले. तिच्या डोळ्यातून पाणी गळत होते. दामाजी केविलवाण्या नजरेने पहात होते. वज्रा शांतेला घेऊन आपल्या घरला निघाली. घरातून बाहेर पडल्यावर गल्लीत आल्यावर शांतीने आपले डोळे पुसले. व ती शंकरआण्णाच्या घरच्या दिशेनं निघाली. तिच्या मागून जात वज्रा तिला म्हणाली, “शांते नको जाऊस आता उगाच विजलेला विस्तव फुकून कशाला पेटवतेस.”
“तू गप्प बस वज्रे त्या शंकर्याची मस्तीच जिरवतो बघ.” शांता म्हणाली.
ती शंकर आण्णाच्या घरात शिरली. त्याची शेताहून आलेली बायको राधाबाई धारला बसली होती. शांता तडक परसदारी गेली. तिथं शंकर अण्णा वैरण कुठत बसला होता. त्याला पाहताच शांता चिडून म्हणाली,
“ काय रे म्हाताऱ्या, ओंजळभर चिंचा काढल्या असताना चिंच झाडली असं सांगत गेलास व्हय. तुझी पोरगी पाय घसरून ओट्यावरून पडली. तेव्हा तुझी पणजी आभाळातून रगत चंदनाची बाहुली घेऊन आली होती का? तेव्हा तुला कोणी मदत केली. मी, माझ्या घरातून चोरून लपवून आणून तुला दिली. तवा तुझी पोरगी चांगली झाली. व चार चिंचा पाई मला मार बसवलास. तुझ दांडक निखळल तुझ ते. थांब तुला दाखवतेच. माझ्या आईकडून पैसे घेऊन आलास व्हय भिकार्या पयल पैसे दे. नाहीतर तुझी धडगत नाही. माझा बाबा डोंगरकट्टा चालून धंदा करतोय. व पैसे कमावतो. त्याची कमाई तुला फुकट खायला देऊ काय. जर पैसे परत केले नाहीस तर तुझं व त्या तारीचं प्रकरण सगळ्या गावभर करीन. इतकं बोलताच शंकरच्या हातापायातील पाणी पळालं. त्याने कनवटीला गोपात अडकवलेला बटवा काढला. व शांतीच्या हातावर शंभर रुपये ठेवत हळूच म्हणाला,
“ तू तेवढी बाई गप्प बस. त्या जानबानं दोनीत चार घालून सांगीतले. म्हणून बाई म्या बोललो. तेवढी तू बाई शांत हो. उगाच माझी अब्रू घालवू नको.”
शांती परत निघाली. जाताना धार काढणाऱ्या राधाबाईन तिला विचारलं, “ का ग अशी नागिनीवाणी आली होतीस.”
शांता,
“ तुझा मालक आला होता काडी टाकून त्याला आलते डसायला.” त्या जान्याला उद्या बघून घेते.
“ अग, चिंचा काढल्यास त्या काढल्यास. व उलट आम्हालाच बोलातीस. आत काय म्हणालीस मालकाला मला नीट ऐकायला आलं नाही.”
तेव्हा शांता म्हणाली,
“ धार काढतीस काय नको ते उद्योग कर्तीस. व एवढं चिंचेचं झाड माझं माझं म्हणतीस. काय माहेरासन आणली होतीस काय हुंड्यात आंदण म्हणून लावणारा गेला मरून तू नको दाखवू तुझा टेंभा.”
राधाबाई,
“ बोलणारा राहिला बाजूला व तू मला गरीब गाईला बोलतेस होय.”
शांता म्हणाली, “ मग जरा गरीब गाईने आपली पांगिर पाटीची शिंगे दाखवावित. व नव्हऱ्याला ताब्यात ठेवावं.”
तेव्हा राधाबाई म्हणाली, “ शांता अजून लई ध्याड बघायचे आहेत तुला. डोईवर अक्षता पडल्या की कळलं तुला.”
तिचं ते बोलण शांतीला चांगलच लागल. तिला आपणं उगाच राधाबाईला बोलल्याचे वाईट वाटले. ती बाहेर पडली. वज्रा दारात आली होती. तिनं ते ऐकलं होत. थोड पुढे गेल्यावर ती शांतील म्हणाली, “मोठ्या माणसाला असं बोलू नये.”
शांता म्हणाली, “ मी राधाबाईला बोलले त्याच मला वाईट वाटत. पण त्या शंकर्याचं तंगड तोडाव असं वाटतं होत. राधा सारखी नाकासमोर चालणारी आपल काम भल व आपण भल अशी चांगली बायको असताना हा बाहेर शेण खात फिरतो.”
इतक्यात शांतेचा झगा कोणीतरी ओढत होत. तिन मग पाहिलं तर तिला पांडू दिसला. ती त्याला म्हणाली, “ काय रे काय पाहिजे तुला?”
तेव्हा ते पोरगं म्हणाल, “ तू मगाशी आमच्या काकांना दांडक निखळल म्हणालीस व काका घाबरले. मला ते दांडक कुठं मिळल ते सांग. म्हणजे मी ते दाखविन तेव्हा काका घाबरल. व मला मसराकड पाठवणार नाही.”
तेव्हा शांता त्याला म्हणाली, “बाळा ते दांडक साध सुध नाही चांगल तिर्डीच दांडक आहे. ते तुला आता नाही कळायचं.”
त्या दोघी हसत वज्रेच्या घरी गेल्या. वज्रेच्या जोत्यावरील झूल्यावर बसून झोके घेऊ लागल्या. शांतीला बराच प्रसाद मिळाला होता. अंग दुखत होत; पण तिनं तसं काही दाखवलं नाही. पण वज्रेस रहावलं नाही. तिन शांतेच्या घरात घडलेला सगळा वृत्तांत आईला सांगितला. वज्रेच्या आईने शांतीच्या पाठीवर व पायावर पडलेले वळ पाहिले. व ती म्हणाली, “ सुंदरीला काहीच कळत नाही. कसं ढोराला बडवावेत तस बडवलय पोरीला.”
इतक्यात वज्रेची आजी तेथें आली व म्हणाली, “ पोटातल्या चिंचा पाठीवर आल्या जणू.”
वज्रा म्हणाली, “ तुला ग कसं कळालं?”
“ कसं म्हणजे मघाशी सदुवाण्याच्या दुकानाला वाणसामान आणायला गेले होते तेव्हा जान्या म्हणत होता. की शांतीला मारली तिच्या आईन.”
हे ऐकताच शांती चिडली. तिचा झोपलेला क्रोधाग्नी जागा झाला. ती दात ओठ खात म्हणाली, “ जान्या उद्या दाखवतो तुला शाळेत येच आता.”
इतक्यात पार्वती तेला व हळद वाटीतून घेऊन आली. तशी म्हातारी तिच्याकडून ती घेत म्हणाली, “ दे इकडे मी लावते. तू जा तुझ्या कामाला.”
व तिने शांतीला बोलावले ती जवळ गेली. म्हातारीनं तिच्या पाठीवरून हात फिरवला. व म्हणाली, “दामाजीला मुलं नव्हते तेव्हा त्याची अवस्था काय होती. अन् आता त्या फडतूस चिंचेसाठी पोरीला मारलं. त्या शंकर्याला बिगर राहायची नाही मी.” तेव्हा वज्रा म्हणाली, “ तू बोलायच्या आधीच सार झालंय. मॅडम सत्कार करून आल्यात.”
आजी आपल्या खरबरीत हातानी तेल लावत होती. त्या हातात शांतीला गोडवा जाणवत होता. आजीनं तेल लावल्यावर तिच्या व वज्रीच्या डोक्यावरून हात फिरवला. व म्हणाली, “ माझी वज्रा शांती दोन्ही कोंदणातली हिरकच जणू” तेल लावल्यावर आजी उठून वाटी ठेवायला आत गेली. रात्र चांगलीच झाली होती. वज्रेच्या आईने स्वयंपाक केला होता. तिने जेवायला बोलावले. शांतीस पण बोलावले. पण शांता म्हणाली, “ काकू तुम्ही जेवा.” तेव्हा वज्रेच्या आईने तिला आत घरात नेले व जेवणास वाढले. आज केळ्याच शिकरण व सुजीच्या पोळ्या केल्या होत्या. सर्व जेवलीत. वज्रा व शांता या बाहेरील पलंगावर पहुडल्या बघता बघता त्यांना झोप लागली. ते त्याना समजलच नाही.
खूप वेळ शांता घराबाहेर गेल्यानं व आपण तिला मारल्याची बोचणी शांताच्या आईला इंगळ्या डसल्यागत डसत होत्या. तिला राहवलं नाही. व तिने आपल्या नव्हर्यास. हाक मारली. व म्हणाली, “ जरा बघा की शांती किती उशीर झाला बाहेर गेली अजून परत आली नाही. मला बाई भीती वाटते.”
तेव्हा दामाजी पंत म्हणाले, “ मगाशी बडबडताना कुठे गेली होती तुझी भीती. जा आता शोध व आणजा. मला शपथ घालतेस. सुंदराला रडू आले . ती घराबाहेर पडली. ती हाक मारणार इतक्यात दामाजी तिला मागून म्हणाला, “ काळजी तुलाच फक्त दिली का? मगाशी मी पाहिलं ती शिवानंद बामनाच्या घरी आहे. काळजी नको. तुला काय वाटलं काळजी फक्त तुलाच आहे. जा. घेऊन ये जा.” ती म्हणाली, “स्वत:च्या नजरेनं पहिल्या शिवाय मला खात्री पटणार नाही. जेवणाची वेळ झाली आहे. मी जाते व तिला घेऊन येते.” ती घराबाहेर पडली व वज्रीच्या घरी आली. तिने वज्रा व शांतीला ऐकत्र मिठी मारून झोपलेल्या पाहिलं. तिला पाहून म्हातारी म्हणाली, “ त्या शंकर्याच्या चार चिंचा साठी पोरीला इतकं ढोरा सारख बडवलस तुझे हात कसे झडले नाहीत.”
सुंदरा म्हणाली, “ काय सांगू काकू तो शंकर्या नाही नाहीये घालून पाडून बोलत होता आदी बाजारासन चालून आलताव त्यात त्याच बोलण या पोरीमुळे तो माझ्या कुळीचा उध्दार करायला निघाला. तेव्हा मला राग आला. म्हणून मी मारलं मला सहनच झालं नाही.”
शांतीला तिच्या आईनं सहज उचलून घेतले. व ती निघाली. इतक्यात पार्वती जेवणखोलितन आली. तीने दोन सुजीच्या पोळ्या सुंदरीच्या हातावर ठेवल्या. व शांती इथे जेवल्याचे सांगितले.
“ अक्कासाब तुमच्या सारखी मानसं आहेत म्हणून बर नाहीतर आम्हा सारख्यानी काय करायचं होत. जगाच्या या रहाटगाडग्यात कसा टिकाव लागला असता. भावकी ती तसली म्हणून इथे आलो. तर शेजारी पण बाद लागले. काहितरी भांडण आहेच. पण तुमच्यामुळे बराच आधार मिळाला.”
पार्वती म्हणाली, “ उगाच काय बाय बोलू नका. ती जेवलीय इकडे. काळजी नको.”
सुंदरा,
“ उगाच नाही योग्य तेच बोलते.”
अस बोलून ती घरी शांतीला घेऊन आली. आल्यावर तिला पलंगावर झोपवले. व तिने जेवणखोलित आली. नव्हर्याला जेवण वाढले. व पुन्हा शांती झोपल्या ठिकाणी आली. तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण शांती गाढ झोपली होती. एखादा हत्ती जरी चित्कारत गेला तरी उठणार नव्हती. मग ती जेवणखोलीत आली. नव्हऱ्या बरोबर जेवायला बसली. तो म्हणाला, “ ती शिवानंदाच्या घरी…,.”
सुंदरा म्हणाली, “ होय जेवली पण रहावलं नाही.”
दामजिपंत, “ बरं. जेव आता. मला उद्या दागिन्यांची ऑर्डर द्यायला जायचं आहे.” त्या दोघांनी आपले जेवण केले. सुंदराने आपली कामे आटोपली व ती ही झोपायला गेली.
……. …… ….. ….
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा