मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १६

 कथा वाकाटखोर्याची भाग १६

१६) आधुनिक रामायण

लेखक : निशिकांत हारुगले

घरात आल्यावर वज्रेन डोक्यावरील धुण्याची बुट्टी खाली उतरवली. म्हशी घरात आणून बांधल्या. स्वयंपाक घरात जाऊन तेल व हळद घेऊन आली. व रेडी व म्हसिच्या झुंजीत लागलेल्या जागी लावली. नंतर वैरण घालून ती धूणं उन्हात घालायला गेली. कामाला माणस बघाय गेलेली. पार्वती तोपर्यंत आली होती. तिने हळद तेलाची वाटी पहिली. व वज्रेस कशाला हळद घेतल्याचे विचारले. वज्रेन घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा आईचे लक्ष वज्रेच्या हाताकडे गेले. तिच्या हाताला लागलेली जखम बघून पार्वतीने काळजीनं तिला जवळ बोलावले. तिला उराशी कवटाळून ती म्हणाली, “ काय ही वेळ देवा महादेवान आणली.” तिने वज्रेचे पटापट मुके घेतले. व तिचा हात हातात घेऊन त्या हातात कुठे लागले का ते तपासले. काकणांची काच कुठे लागली का ते पाहिले. जखमेवर हळद तेल लावले. त्या दिवशी खोडव वेचायला दोन बायका माणस खूप मेहनतीने मिळाली होती. आईने आपले आवरले. व ती म्हणाली, “ वज्रे मी माणसं घेऊन रानात जाते. तू घरी थांब.”

 तेव्हा वज्रा मी येणार म्हणाली. पार्वती आपले आवरून माणस घेऊन शेताला गेली. वज्रेन जेवून घेतले. व भांडी घासायला ती न्हाणी घरात गेली. व भांडी घासू लागली. इतक्यात शांती आली. ती वज्रेस हाक मारत न्हाणी घरात घुसली. वज्रेस भांडी घासताना पाहून तू घास मी धुते असे म्हणून ती भांडी धुवायला बसली. व भांडी धुवू लागली. इतक्यात तिचं लक्ष वज्रच्या हातातील जखमेकड गेलं. शांतीने तिला काय लागलं ते विचारलं. पण वज्रेन विषय टाळला. . शांती पुन्हा पुन्हा विचारू लागली. इतक्यात माजघरात झोपलेली म्हातारी धडपडत स्वयंपाक घरात आली. व शांतीला म्हणाली, “ काय सांगू बाई नदीला म्हशी घेऊन गेलती त्या कंबळीच्या म्हसिण शिंग मारलं. आमच्या माग एक झाल की दुसर संकट येतच बघ.”

असे बोलून म्हातारी आणखी काही बोलणार इतक्यात वज्रा म्हणाली, “आजी गप्प बस तू, कशाला उठलीस, गप झोप जा. तुला उगाच लागत. सापाच्या कानाची हाईस बघ.”

शांती लगेच वज्रेला म्हणाली, “ त्या कंबळीला जरा मस्तीच आलीय. एवढं नव्हरा दारु पिऊन चेचतोय तर एवढी हाय.”

तिचे बोलणे तोडत वज्रा म्हणाली, “गप्प बस शांते, तू पण उगाच तिच्याशी भांडशील तू पण, आधीच बरीच माणसं आमच्यासंगे वाकडी हाईत. सोड तो विषय.”

तेव्हा शांती विषय बदलत म्हणाली, “ बर ते जाऊ दे. चल, आपणं गप्पा मारत बसू.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ नाही मला शेताला जायचय.”

शांती म्हणाली, “ पण आई तर येऊ नकोस म्हणाली ना.”

“ ती म्हणाली पण मी जाणार पावसाळा जवळ आलाय. खोडव वेचाय हवं. एक दोन माणसांनी काय होत.” वज्रा बोलली.

तेव्हा शांती आपण येतो म्हणाली. तेव्हा वज्रा म्हणाली, “ नको बाई , तू काम कमी व दंगाच जास्त घालशील.”

तेव्हा शांती म्हणाली, “ तू आता पहिल्यासारखी नाहीस तुला चांगली गवारेड्यासारखी दोन दोन शिंगे आल्यात. लई शहाणी झालीस. मी तुला आवडत नाही. म्हणून मला टाळतीस मोठी झालीस ना.”

तेव्हा वज्र तिला म्हणाली, “ तू माझा जीव की प्राण आहेस. तुला कशी विसरेन मी. मरेपर्यंत मी कधीच तुला विसरणार नाही.” असे म्हणून तिने डोळ्यात पाणी भरले.

शांतीने तिचे डोळे पुसले. नंतर घरातील सर्व आवरून वज्रा व शांती घराबाहेर पडल्या. जाताना पुढल्या जोत्यावर अंथरूण घालून आजीला झोपवले. व प्यायच्या पाण्याचा तांब्या उशाशी ठेवून बाबा येईपर्यंत अशीच झोप, असे सांगून ती शेताला निघाली. शांती आपल्या घरी गेली. व वज्रा शेताकडे. शेतात वज्रा पोहचली तेव्हा उन्ह चढू लागली होती. दुपारच्या दोनपतुर अर्ध रान वेचून झाल. दुपारी भाकरी खायला जांभळीच्या सावलीत बसलीत. सकाळी म्हस धुवायला गेलेली कंबळा अजून घरला गेली नव्हती. रिकाम्या दिवशी ती दुपारपतुर म्हसीला चारवत असे. त्या दिवशी पण तेच करत होती. ती म्हशीच्या माग माग फिरत होती. गावातील मुले नदीच्या काठाला खेळत होती. माणसाना प्यायला पाणी हवे होत. म्हणून वज्रेला आईने नदीवरून घागर भरून आणायला सांगितले. वज्रा उठून घागर घेऊन नदीवर आली. तिने नदीच्या खळाळत्या पाण्यात घागर धुतली. व भरली. घागर घेऊन ती निघाली. तेव्हा गल्लीतली पोर तिथे खेळताना दिसली. त्यांना पाहून ती म्हणाली, “ काय रे पोरांनो, काय करताय उन्हाच.”

तेव्हा त्यातील पाटलाचा बाजा म्हणाला, “ रामायण रामायण खेळतोय.”

वज्रेला हसूच आलं. ती म्हणाली, “अरे, दुपारचं ऊन किती आहे. घरी खेळायच. रानात कुठला अध्याय खेलत्यासा रामायनातला.”

अध्याय शब्द ऐकताच ती मुले कावरी बावरी झाली. कारण तो त्याना अवघड शब्द होता. तरीपण त्यातून न्हाव्याचा हणमंता म्हणाला, “ राम सीतेचा वनवास घरी कसा खेळायचा. व घरी खेळताना आज्जा ओरडतो. त्याची झोप मोड होती म्हणून. त्याचा काव खाण्यापेक्षा रानातच खेळलेल बरं.”

वज्रेच लक्ष बाज्याच्या हातातील धनुष्याकडे गेले. त्याच्या हातातील धनुष्य हे छान मेसकाठीपासून केलेले होते. व बाण ही धारदार होते. त्याशेजारी उभारलेला शिंप्याचा सत्त्या सितेसारखा पेहराव करून बसलेला होता. अआजाचा पटका साडी म्हणून घेतलेला होता. तांबड्या मातीतून चालून तो भगवा पटका लाल झाला होता. वज्रेला पाहून तो लाजला.

वज्रेस त्यांच्या खेळाचे कौतुक वाटले. ती त्यांना जपून खेळा, असे सांगून ती शेतात आली. पाण्याची घागर सावलीत ठेवली. व माणसासंगे ती भाकरी खायला बसली.

मुले खेळत होती. इतक्यात बाजा पाटलाने एक बाण सोडला तो बाण झुळझुळ वाऱ्याच्या वेगात निघाला तो थेट गजाबाईच्या अंब्यावरील मोहोळात जाऊन घुसला. दुपारच्या तावाने माशा उठल्या व त्यांनी आकाशात काळी फौज तयार केली. व गुंजारव सुरू झाला. मव्हाच्या पोळ्यात घुसलेला बाण पाहून मुले घाबरली. व त्यांनी चांगलीच धूम ठोकली. शिंम्प्याचा सत्त्या तर आपल्या आजाचा पटका तिथंच टाकून पळाला. पळता पळता तो बाज्याला शिवा देत होता. शहाणाच आहेस. की बस आता शिमगा करत. मी पळतो. असे म्हणून एका मागून एक मुले गावच्या दिशेला पळाली. मव्हाच्या माशा उठल्यावर सगळ्यांनी भाकरी ठेवल्या. सर्वजण झाडाखाली गप्प बसून राहिली.

पार्वती म्हणाली, “कोणीही हलायच नाही. हालचाल दिसली तर आपल्याला महू चावेल. व पाठी लागल. सर्व शांत बसलित. मव्हाच्या माशा शिवारात पसरल्या.त्याना पांदित म्हस घेऊन निघालेली कंबळा दिसली. त्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तशी कंबळी जोरात ओरडत पळाली. तिच्या म्हसीन केव्हाच घर गाठल होत. ती पाणंद सोडून शिवारात घुसली. माशा पाठ सोडेनात. ती रडू लागली. ती बामनाच्या शेतात घुसली. पार्वतीला रहावलं नाही. तिने कामाला आलेल्या शेवांतीच पोत घेतल. व गोळा केलेल्या खोडव्याला काडी वडली. उन्हाच्या तावण खोडवी धुमू लागली. आतल्या ओलसर खोडव्यानी धूर झाला. एकमेका संगतीन खोडवि धुमत पेटू लागली. धुरान आकाश अच्छादाय लागले. माशांनी धुरामुळे माघार घेतली. पण या सगळ्यात पार्वतीला दोन चार माशा चावल्याच. माशा शिवारातून मागे सरल्या व त्यांनी आपला मोर्चा नदीकडे वळीवला. नदीवर मासे धरायला आलेली शयनग्रामची मुले त्यांनी हेरली. व त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या. परंतू पाण्याबाहेर तोंड काढताच माशा त्यांवर झडप घालत. कशीबशी त्यांनी सुटका करून घेऊन ती मुले नदीपार गेलीत. थोड्या वेळाने माशा शांत झाल्या. व पोळ्यात परतल्या. पार्वतीनं व बाकीच्यांनी कंबळीला झाडाखाली नेलं. कामाला आलेल्या स्त्रियांनी तसेच पार्वतीनं तिच्या अंगावरील काटे काढले. तेव्हा कंबळीला भरून आले. ती पार्वतीला म्हणाली, “ बाईसाब मी तुम्हाला नको तस बोलले, सकाळी वज्रेला ही बोलले. त्याची देवानं मला आज शिक्षा दिली. एवढं होऊनही तुम्ही मला वाचवल्यासा अगदी देवावाणी हाईसा. आमची रान थोडी असल्यानं खंडाची शेत करावी लागतात. काय करणार मालक म्हणेल तस ऐकावच लागत.”

 पार्वतीनं तिची समजूत काढली. तोपर्यंत बायजककानं बांधाकडचा टिक्कीचा पाला आणला व चोळून तिच्या महू चावलेल्या जागेवर लावला. बर वाटू लागल्यावर ती घरला गेली. वज्रेला मात्र तिची जराही दया आली नाही. तिने तिच्याकडे दुर्लक्षच केले. थोड्या वेळानं भाकरी खाऊन सर्वजण खोडव वेचू लागली. सायंकाळपर्यंतत बरच रान वेचलं. सांज झाल्यावर वज्रा व आई अन् शेतात आलेली माणसे घरी परतली.

क्रमश : पुढे….


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...