रविवार, १८ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २४

 कथा वाकाटखोर्याची भाग २४

२४) उतारा

लेखक: निशिकांत हारुगले

दुसऱ्या दिवशी सकाळी वज्रा, साकरी व शांतीने धूणं धूवायला नदीला जायचे ठरवले. त्या तिघीजनी नदीच्या वाटेला लागल्या. नदीच्या वाटेवर उंबरणीच वळण लागलं. तिथे झाडाखाली मापट्याचा भात व बाजूला उताऱ्याच समान ठेवलेलं दिसलं.

साकरी म्हणाली, “ कुणी ग बाई ह्यो निवद ठेवलाय म्हणायचा.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ काल बुधवार होता कुणीतरी ठेवला असल.”

तशा त्या तिघी नदीला पुढे गेल्या. नदीवर अनेक बाया धुणं धुवायला जमल्या होत्या. रखमा पाटलीन मालुला धुणं धूत म्हणाली, “ काय बाई लक्ष्मीची झडती मला पहावतच नाही. नुसत ढोरावानी राबतय नुसतं. अन् तिचा त्यो बिनकामाचा नव्हरा पडलाय डोचक फोडून नव्ह. कधी म्हशीला पेंडी पण सोडून न घालणारा, नुसता कपाळा पुरताच हाय म्हणायचा. पडल्यापासून लक्ष्मीन पायाला भिंगरी बांधलीय या देवरुष्याकडे जा तो भट बघ सगळ केलं. शेवटी तालुक्याचा डाक्टर पण बघितला. आता कुठं सरळ झालाय.”

तेवढ्यात मालू म्हणाली, “तयार होऊन काय उपयोग साधी वज्जाची गाठ सोडत नाही. काय कामाचा ना धामाचा.”

इतक्यात साकरी म्हणाली, “मालूअक्का कामाचा नाही कसा, दारूची बाटली एका दणक्यात रीचवतो नव्ह.”

तेव्हा रखमा पाटलीन म्हणाली, “गप्प साकरे, थोरा मोठ्या माणसा विषयी अस बोलू नये.”

तेव्हा मालू म्हणाली, “ काय चुकीचं बोलतेय साकरी , खर तेच बोलतीय दारू प्यायच्या कामाचाच आहे. या दारू पाई भुतनिंच्या मेळ्यात सापडला नव्हे.”

अशा गप्पा टप्प करत त्या धूणं धुवू लागल्या. वज्रा शांती साकरी यांनी झपझप धुण धुतलं. व घरला यायला निघाल्या. मालू गुरवीनीच धुणं धुवून झाल होत. ती पण वाटेला धुणं घेऊन लागली. उंबरनीच्या वळणावर त्यांनी पाहिलं तिथं जना पाटलीनीची म्हस् उंबारणी खालच्या निवदावर यथेच्छ ताव मारत होती. व जना पाटलीन तिथे काठी घेऊन उभा होती. ते पाहून मालू तिला म्हणाली, “ आग ये म्हातारे, म्हशीन निवद खाल्ला नव्ह. म्हसीच्या माग भुतावळ लागलं नव्ह,दूध द्यायची बंद होईल. अन् तू काय बघत उभारलीयास.”

तेव्हा जना पाटलीन म्हणाली, “भूतावळ की फितावळ. आजपतूर माझ्या म्हशीन या उंबरानी खालचे निवद कितीदा तरी खाल्ले असतील, कवा दुधाला तक्रार जमायची नाही. उलट खोगलाभर जास्तच देती. मला भुतावळ लागायला माझ्या म्हातारी जवळ हाय तरी काय. खुट्या एवढी असल्या पासन प्रपंच करतेय. मला नाही कवा लागीर फागीर झाल.”

तेव्हा मालू म्हणाली, “ तुला कशाला लागारतील, तुलाच बघून पळतील. त्या लक्ष्मीन ठेवलाय निवद तिच्या नवऱ्यावरुन उतरून. आता बस वरडत.”

जना म्हणाली, “ त्या लक्ष्मीचं व तुझ कौतुक पुरे. तिला अन् तुला नाही काम. बेवड धडपडल अन् तंगडी मोडून बाजल्यावर पडल. त्या परड्यातनी मी कितीदा वावरते. हजारदा त्या परड्याजवळच्या कुडाण्यातील वैरण आणून बैलासनी अन् म्हशीसनी घातली असल. दाल्याच्या पाटन भाताच्या मळणीसाठी हजारदा रातीच बारा बारा वाजेपर्यंत शिवारात राहिले. आम्ही नाय कवा भूतं बघितली. अन् असल्या दारुड्यांना बर लागीरतात. ती लक्ष्मी म्हणजे कोकणी सुपारी. त्या कडगाव, पाटगावच्या बायका अर्ध्या घागरी साऱ्या, ना व्यवहाराच्या, ना कामाधामाच्या देवळात व भुतावळीत वावरणाऱ्या. तिला पण चांगल कारण गावल असल निवद ठेवायला. अन् अंगार धुपार फुकायला. त्या बिनकामाच्या नव्हत्याच कवतिक करतीय. ढोरासारख नुसतं राबल म्हणजे संसार होत नाही. ना धड शेंडा ना बुडका, कसलं राबन म्हणायचं. नुसत बैलासारख राबल म्हणजे संसार होत नाही. मी पाहिजे होते तिच्या जागेला. त्या बेवड्याची दारूच उतरून, चांगला सुतासारखा सरळ केला असता तेला.”

तेव्हा मालू म्हणाली, “ लई बोलती म्हातारी पोपटावाणी पिंपळावरची हाडळ कुठली.”

तेव्हा म्हातारी जना म्हणाली, “ माले मला हडळ म्हणतीस व्हय, जा बघ जा तुझं थोबाड आयन्यामधी, तुझ्यासारख दोन दोन दिवसांनी अंघोळ नाही करत मी. रोज सूर्य उगवायच्या आधी अंघोळ करून तयार असते. तुझ्या सारखी देसोरी नाही मी. जा गप्प वाटणं. खाऊ दे माझी म्हस् निवद, अन् लागरु दे मला भुतावळ. तुला उतारा टाकाय बोलावत नाही मी जा.”

तेव्हा मालू तिला म्हणाली, “ तुझ्या नादाला लागायला कुणाला वेळ आहे. जाते मी.”

असे बोलून ती वाटेला लागली. तिच्या माग या तिघी हसू येत असताना तोंड दाबून गुमानं मांजरागत घरच्या वाटेला लागल्या.

क्रमशः पुढे…….


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...