२६) गडची जत्रा
लेखक निशिकांत हारुगले.
उन्हाळा सुरू झाला. की गावांच्या जत्रा सुरू व्हायच्या. वेदगंगेच्या पंचक्रोशीत भुदरगडची जत्रा खूप मोठी भरायची. नियमाप्रमाणे या वर्षी पण जत्रा आली होती. गडाच्या जत्रेला जायचे या तिघींनी ठरवले. व्यंकू पण जाणार होता. आईने व्यंकूबरोबर जायला वज्रेला सांगितले होते. पण तिने नकार दिला. कारण शांती व साकरीसंगे जी मौज करायला मिळते ती व्यंकूबरोबर जाण्यात नाही. तेव्हा तिने आपल्या मैत्रिणी बरोबर जाणार असे स्पष्ट सांगितले. जत्रेचा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून या तिघांनी आपले आवरले. शिदोरी बांधली. व या तिघी थोड जेवण करून गडाच्या वाटेला लागल्या. गडाची जत्रा संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. संपूर्ण भागातील लोक जत्रेला येत असत. त्या दिवशी पण लोकांची रीघ लागली होती. या तिघीही निघाल्या. गडाची वाट वळणा वळणाची होती. तसेच मधून लहान पायवाटेने देखील जाता येत असे. या तिघी गड चढू लागल्या. उंच चढणीला दम लागत असे. दम भरत असे. पण जसे उंच चढावे तसे वेदेच्या खोऱ्याचे दर्शन घडे. मन भारावून जात असे. गडाचा चढ चढून या तिघी दमल्या होत्या. गडाखालची वाडी चढून त्या वरती गेल्या.
शांतीचे पाय दुखू लागले. ती म्हणाली, “ अग, थांब ग जरा माझे पाय दुःखताहेत.”
तेव्हा साकरी म्हणाली, “ ए बाई दमलीस काय लगेच, जवळच गड आलाय.”
तेव्हा शांती म्हणाली, “ तुला काय जातंय बोलायला बाई , तुम्ही दोघी रानात रोज जाता मला नाही सवय.”
वज्रा म्हणाली, “ मग दामू अण्णाला सांग की, रान घ्यायला व तू ही रोज जा रानात.”
साकरी म्हणाली, “ हो खरंच सांग.”
वज्रा म्हणाली, “ भांडण मारामाऱ्या करायला बडा जोर येतो. अन् साध गड चढताना बरी दमलिस. तुला काय धाड भरलीय उठ चल.”
तेव्हा ती चिडली. व त्या दोघींच्या पुढे भरभर चालू लागली. तशी वज्रा तिला म्हणाली, “ ए गुपचूप माघारी, चालून पाय दुखू लागले तर कोण पाठीवर घेणार, ये या आंब्याच्या गारव्याला विसावा घेऊ.”
त्या थोडावेळ तिथे विसावल्या. शांती म्हणाली, “ तुम्ही काय बाई भीमाचा अवतार हाईसा सगळे गाव पाठवणावर घेऊन फिरशीला विंचवासारख्या.”
तेव्हा वज्रा म्हणाली, “ तू कौतुक करतेस की टोमणा मारतेस.”
शांती म्हणाली, “तुमची बाई कळ कोण काढेल. तुम्ही गड चढणार्या मावळनी.”
वज्रा म्हणाली, “ हो का अन् तू कोण?”
शांती म्हणाली, “ मी कोण असणार. एक अबला नारी.”
वज्रा म्हणाली, “ तू अन् अबला, चांगली सबला आहेस. सगळ्यांना चुना लावतीस.”
साकरी म्हणाली, “ शांते गप्प बस नाहीतर रप्पाटा खाशील. कशाला लागलीय भांडायला मांजरीनीसारखं.”
थोडावेळ विसावा घेऊन त्या गडाच्या वाटेला लागल्या. गडाची वाट लई गजबजली होती. अनेक लोक गडाला चालले होते.
पुढे पायवाटेने जाऊया असे शांती म्हणाली. वळणाने जाण्यापेक्षा आपण या पाऊलवाटेने जाऊया म्हणजे आपल्याला लवकर पोहोचता येईल.
तेव्हा वज्रा म्हणाली, “ तुला माहित तरी आहे का ही वाट कुठे जाते ते, उगाच इकडे तिकडे घुसू नकोस. नाहीतर निघालो कोल्हापूरला व पोहोचलो सोलापूरला अस व्हायचं.”
तेव्हा शांती तिच्याकडे मारक्या म्हसीसारखी डोळे वटारून पाहत होती. ती म्हणाली, “ तू आता जरा जरी आवाज काढलास तर बडविन. गुमान चल मागून.”
तेव्हा साकरी म्हणाली, “ शांते चल तू पुढे, आम्ही येतो मागून.”
तशी शांती पुढे चालू लागली. तेव्हा साकरी वज्रेला म्हणाली, “ मला ही वाट माहीत आहे. चल गप गडावर जातीय.”
त्या मागोमाग निघाल्या. शेवटी घनदाट झाडीतून वाट काढत ती टेक चढून वर रस्त्याला आल्या. तसे गडावरील पेठ शिवापूर दिसले. त्या लगेच गावातून गडाच्या दिशेला निघाल्या. थोड्याच वेळात गडावर पोहोचल्या. गडावर गर्दी होती. वेगवेगळी दुकाने नटली होती, सजली होती. अनेक खेळण्याची खाद्य पदार्थांची दुकानात रेलचेल होती. प्रथम देवदर्शन घ्यायचं व नंतर जत्रा करायची असे ठरवून त्या मंदिरात आल्या. यात्रेमध्ये गर्दी होती. गर्दीत घुसून त्यांनी भैरवनाथाचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन त्या बाहेर आल्या. नारळ वाढवला व अंगारा, गुलाल लावून त्याची पुडी व भकल आपल्या पिशवीत घेतले. बाहेर येऊन पाहतात तो एक पोरग साकरीचे चप्पल नेताना शांतीला दिसलं. शांतीने त्याला पकडल. ते पोरग निसटण्यासाठी धडपडत होत. तेव्हा वज्रा म्हणाली, “ चप्पल घे व सोड त्याला”
तेव्हा शांती म्हणाली, “ वज्रा चोरी करण वाईट. याला सोडायला खुळ लागलं नाही. वज्ज्याला व चोराला लटक सोडू नये अशी आपली घाटी म्हण हाय.”
तशी साकरी म्हणाली, “ सोडू नकोस त्याला. चल गडाच्या कोपऱ्यात घेऊन.”
त्याकडे माणसे पहात होती. त्याला त्या तिघींनी ऐका कोपऱ्यात नेल. साकरीन त्याच्या कानशिलात लगावली. व म्हणाली, “ शाळा सोडून हेच धंदे करतोस व्हय.”
तेव्हा ते रडायला लागलं. मी पुन्हा करीत नाही असे बोलू लागले.
तेव्हा साकरी म्हणाली, “ वा रे वा चप्पल घेऊन पळाला असतास तर अनवाणी गड मला उतरायला लावला असतास. थांब तुझी गंमत करते.”
असे बोलून तिने त्याचे चप्पल काढून घेतले. व ते गडतटावरून टाकू लागली. इतक्यात वज्राने तिचा हात धरला. व म्हणाली, “ फेकू नकोस त्या चप्पल नाहीतर तो पुन्हा चोरी करेल. व त्याचा चेहरा सांगतोय. अंगावरील कपडे बघ, त्याच्या चोरी करण्यामागे काहीतरी कारण असेल सोड त्याला.”
शांती मध्येच बोलली, “ ओ संतबाई हा काय स्वतः साठी चप्पल चोरत नव्हता. मुलींची चप्पल हव्यात कशाला याला.”असे म्हणत तिने दोन लगावल्या. व त्याला सोडून दिले. तो मुलगा पळून गेला.
या तिघी जत्रेत फिरू लागल्या. तेव्हा त्यांना तालुक्याच्या पेठतील भामट्या दिसला. त्यांना पाहून तो बाजूला खाली मान घालून गेला. त्याना त्या गोष्टीचं हसू आलं.त्या मुलाचे मित्र मात्र त्याकडे कुतूहलाने पाहत होते. इतक्यात शांती म्हणाली, “ साकरे वज्रेला तोंडाचा पट्टा चालवता येत नसला तरी उसाच्या कांड्या घुमवून मारायला बेस जमत.”
तेव्हा वज्रेने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. तेव्हा शांती म्हणाली, “आता काय आपले खरे नाही बुवा.”
तेव्हा वज्रा बोलली, “ हे बघ शांता तुझी नाटक पुरे झाली. चला उठा तळ्यावर जाऊन जेवण करून घेऊ.”
त्या तेथून उठून तळ्यावर आल्या. त्यांनी तेथील मंदिरात आपल्या शिदोरी सोडल्या. व जेवण केलं. त्यानंतर त्या गडाचा तट्ट फिरू लागल्या. गड फिरताना त्यांना एक इसम एका स्त्रीशी बोलताना दिसला. त्यांमध्ये तणाव असल्याचे जाणवले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गडतटावरून सगळ्या पंचक्रोशीच दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी थोडीफार खरेदी करून पुन्हा गड उतरणीला लागल्या. हळूहळू मुख्य रस्ता ओलांडून त्या आडवळणी वाटेला लागल्या. पण चालता चालता त्यांची पायवाट चुकली. व भलत्याच पायवाटेला लागल्या.
वाट चुकल्याची जाणीव खूप अंतर चालून गेल्यावर त्यांना झाली. वज्रेला बोलायला अवसर मिळाला. ती म्हणाली, “ काय ग लई मोठ बोलत असतीस. मघाशी आलेली वाट तुझ्या लक्षात नाही. पुढे जत्रेला नव्हऱ्यासंगे आलीस. तर स्वतः चार नव्हरा विसरून दुसराच घेऊन जायचिस.”
तेव्हा शांती म्हणाली, “ तुला व्यवस्थीत पोहोचवली म्हणजे झालं ना.”
वज्रा म्हणाली, “ घरला पोहोचवतीस की एखाद्या वाघाच्या गुहेत देव जाणे. या झाडीतून वाट शोधता शोधता रात नाही झाली म्हणजे झाल.व एखाद्या हिस्त्र प्राण्याने नाही खाल्ले म्हणजे झालं.”
साकरी म्हणाली, “ ये बाई शुभ शुभ बोल जरा. व तिला एवढं बोलायला, तू पण त्याच वाटेने आलीस मघाशी मग तुझ्या का लक्षात नाही राहिली वाट.”
वज्रा म्हणाली, “ मगाशी बुद्धी जरा गंजली माझी. मला वाटल सगळीकडे पुढे असती. नेईल व्यवस्थित.”
शांती म्हणाली, “ आता आलोय ना वाटेने. काढू वाट शोधून या झांजडीतून.”
तशी शांती वाटेने झांजडीतून वाट काढत निघाली. तशी वज्रा म्हणाली,” ये बघत चल इकडे तिकडे.”
शांती म्हणाली, “ हे बघ उगाच भ्या घालू नकोस. अन् एखाद आलच तर हाय की रामपुरी. अण्णाच्या कपाटातून आणलाय मी. बघितलास नव्ह. काढू कोथळा बाहेर.”
वज्रा म्हणाली, “ कोथळा काढती. तोपर्यंत तुझच तोंड धरायचं ते.”
साकरी बोलली, “ हे बघ भांडण्यापेक्षा तूच काढ वाट.”
वज्रा म्हणाली, “ अस म्हणतेस तर मग चला, आपण पूर्वेकडे सरकलाव आता आपण मावळतीकडे जाऊया. या बाजूला म्हणजे वाट सापडेल.”
बोट दाखवत वज्रा बोलली. त्या त्या मार्गाने निघाल्या. थोडे अंतर गेल्यावर त्याना कोणाच्या तरी भांडत्याला आवाज ऐकू येवू लागला. तशा त्या पुढे गेल्यावर उतरंडीतून खाली सरकली. त्यांनी पुढे आल्यावर पाहिले.मघाशी गडावर वावरत्याले ते जोडपे त्यांना दिसलं. त्यातील स्त्री व पुरूष साथीदार यात जोरदार जुंपली होती. तो इसम त्या स्त्रीला म्हणत होता. तुला आता जित्तीच सोडत नाही. संपवतोच तुला. त्याने आपल्या साथीदाराला इशारा दिला. तशी त्याने लपवलेली कुराड काढली व त्याच्या दिशेनं फेकली. तो तिला मारणार इतक्यात वज्रा ओरडली, तिचा आवाज ऐकून त्या माणसाने इकडे तिकडे पाहिले. त्याला या तिघी दिसल्या. तो म्हणाला, “इकडे काय मरायला आल्यासा. थांब तुम्हाला पण दाखवतो. आधी हिचा काटा काढतो.”
तेव्हा शांतीने रामपुरी चाकू काढला. तो पाहून तो हसत म्हणाला, “याने काय करणार कांदे कापणार. ये शाम्या धर तिला.”
तसं परिस्थिती पाहून साकरीने आजूबाजूची दगडे गोळा केली. व एक दगड झेलत ती म्हणाली, “हाय तिथंच थांब. नाहीतर टकुर फोडीन. आम्हाला सोडायचं राहू दे तुझा जीव वाचीव आधी.”
तेव्हा तो दुसरा इसम म्हणाला, “तुला काय कैरी वाटलो काय मी?नेम आहे का?”
साकरी म्हणाली, “ आजमावून बघ. एक वेळ महाभारतातील अर्जुनाचा बाण चुकल पण या साकरीचा नेम अख्ख्या पेठत प्रसिद्ध आहे.”
तरी देखील तो पुढे येऊ लागला. साकरीने नेम धरून दगड मारला. एखादी भिंगरी फिरवू तसा तो दगड निघाला. बघता बघता त्याच्या टक्कुर्यात बसला. तो रक्तबंबाळ होऊन खाली बसला. ते पाहून त्याचा मित्र हबकला. व रागाने त्याकडे पाहू लागला. इतक्यात ती स्त्री त्याला धकलून या तिघिंजवळ आली. तो रागाने त्याच्या अंगावर धावून आला. साकरीने जोराचा दगड त्याच्या गुडघ्याचा नेम धरून मारला. त्याच्या गुडघ्याची वाटी फुटली. तो कोकलू लागला. याच संधीचा फायदा या तिघींनी घेतला. शांतीने इशारा करताच त्या धावू लागल्या. शांती व साकरी मागोमाग धावू लागली. पळता पळता. त्याना वाट सापडली. तशा त्या पायवाटेन धावू लागल्या. त्याना गड उतरणीची वाट पुढे सापडली. तस त्या वाटेनं पुढे पळाल्या. थोड अंतर गेल्यावर लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले. त्याना मुख्य सडक मिळाली. सडकला अनेक लोक गड उतरताना दिसू लागले. तस त्याना बर वाटल. त्या लोकांमध्ये मिसळल्या. थोड अंतर गेल्यावर शांती म्हणाली, “काय पण म्हण साकरे नेम भारी आहे हा तुझा.”
साकरी म्हणाली, “ असनारच शाळू राखाय जाते ना मी आज्या बरोबर. त्यानेच मला नेम शिकवला.आता माझा आज्जापेक्षा मस्त नेम आहे. अन् भांडणात गडी कसा घायाळ करायचा ते मी आज्जी कडून शिकले. कशी गुडघ्याची वाटी फोडली.”
चालता चालता शांतीने त्या बाईला विचारल, “कोण ग बाई तू? अन् तो मारणारा कोण?”
ती म्हणाली, “ काय सांगू बाई. आज देव पाठीशी म्हणून वाचले. माझा नवरा मूल लहान असताना मरून गेला. भावकी इस्टेट लाटल म्हणून या पाटलाचा नाद धरला. पण हाच उलटला. व माझी इस्टेट लाटण्याचा प्रयत्न करू लागला. मी जरी अडाणी असेल तरी माझ्या मुलाचं भविष्य मलाच पहिलं पहिजेत. हा मला फसवत होता. याने मला जत्रेच्या बहाण्याने आणले. व कागदावर अंगठा उठवून घेतला. मी भांडते म्हंटल्यावर माझा काटा काढाय पहात होता.
तेव्हा वज्रा म्हणाली, “ तुला कोणी सांगितलं होत. त्याच्या नादाला लागायला.”
तेव्हा शांतीने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. तेव्हा ती स्त्री म्हणाली, “ व्हय बाई तुझं बरोबर हाय, पण भावकी लई वंगाळ माझी. तिच्यासंग लढा द्यायसाठी म्हणून हा सोगा धराय गेले. पण तोच माझ्या मानगुटीवर पडेल याच मला भानच राहील नाही.”
शांती म्हणाली, “ झाल गेलं गंगेला मिळालं. पण त्यान तुझा अंगठा घेतलाय म्हंटल्यावर तुझी इस्टेट लाटील की तो.”
तेव्हा ती म्हणाली, “ कसा लाटील मी त्याला लाटू दिली तर.”
साकरी तिचं बोलण ऐकूण म्हणाली, “आर्ध्या डोचक्याची बाई कधीच कडेला जात नाही.”
ती बाई म्हणाली, “ मी काही अडगी नाही. माझा कागद माझ्या जवळच आहे. बघितल नव्ह तो मला माराय कुराड घेऊन टपला होता. का माहिताय. मी तो कागद त्याच्या हाताला लागणार नाही अशा पेटीत बंद केलाय.”
असे म्हणत तिने आपल्या पोटावरून हात फिरवून घेतला.
वज्रा म्हणाली, “ बरोबर हाय हुशार हाईस म्हणायची.”
“ हो हाईच मी हुशार, उगाच त्याच्या मागून गोडगोड बोलत फिरत नव्हते. तो कागद मघाशी मी घेतला व हया पेटीत बंद केला. तो मला आडगी समजत होता. पण मला माझ्या पोराचं भविष्य उध्वस्त करायचं नाही. त्याला वाटलं असल डोंगरातून फिरणारी करवंदाच्या जाळीतील फुलं घालणारी ही फसल. पण मी जरी डोंगरी असले तरी याला गाडून उरीन.”
तेव्हा साकरी म्हणाली, “ होय तू गाडणारी माझा नेम बसला म्हणून बर झाल, नाहीतर आता बसली असतीस ढगात राम कृष्ण हरी म्हणत. मड देखील मिळालं नसतं कुणाला. त्या पेठच्या महादेवाची कृपा झाली तुझ्यावर व या शांतीची वाट चुकली. व आम्ही तिघी दत्त होऊन उभ्या ठाक लव.”
तेव्हा ती म्हणाली, “ खरंच हाय, महादेवाची कृपा झाली.तुमच्या तिघिंचे उपकार जन्मभर विसरणार नाही मी.”
शांती म्हणाली, “हे बघ आता त्या पाटलाचा नाद सोड. उगाच विस्तवाशी खेळ नको. तुला जर कामधंदा नसलं तर ये आठवड्याच्या बाजाराला तुला मी मदत करते. व माळव विकणाऱ्या हाणमाकडून तुला माल घेऊन देते. तो विक अन् चालावं तुझा प्रपंचा. उद्याच्या बाजारी आलीस की तुला ते दामा वेलणकरांच दुकान माहीत आहे नव्ह. तिथ ये. मी तुला मदत करेन. बोलता बोलता गड केव्हा उतरला. याचे भानच राहिले नाही.
पुढें त्या बाईच्या गावाकडे निघालेल्या ट्रॅक्टर मध्ये तिला चढवली. व या आपल्या गावी पोहोचल्या.
समारोप
काळ सरत चालला होता आता या तिघींना मागण्या येऊ लागल्या होत्या. साकरीच्या बापाने साकरीचे लग्न जमवले होते. तिला चांगला करवीर भागातील नव्हरा शोधून काढला होता. चार तोळे सोने व दारात अक्षता टाकून त्याने लग्न लावून दिले. वज्रेला पण स्थळे येत असत. पण बरीच भट असणारी. त्यांची शेंडी पाहून शांती नाक मुर्डे व ती स्थळे मोडी कारण एखादा चांगला नोकरदार तिला मिळावा असे तिला वाटे. शेवटी दूधगंगा काठचे एक स्थळ आले होते. शांतीला ते पसंत नव्हते. तिने नवऱ्याच्या चहात मुद्दाम मीठ घातले. पण तो मुलगा पण बिलंदर होता. तो चहा गटागटा प्यायला. व मुलगी पसंत आहे असे त्याने ठासून सांगितले. व सुपारी फोडली लगीन ठरले. वेदेच्या खोऱ्यातील वज्रा दूधगंगा काठी नांदायला गेली. वज्रेच लग्न झाल्यावर शांती उदास राहू लागली. तिच्या वडिलांनी पण तिचा विरोध असूनही तिचे लग्न एका सोनार पेठेतील मित्राच्या मुलाशी ठरवले. शेवटी थोरांच्या पुढे तिचे काही चालले नाही. शेवटी लग्न झाले. नाखुशिने शांतीने त्या मुलाच्या गळ्यात हार घातला. तो मुलगा हसत होता. शांती मात्र मनात म्हणत होती की अरे, बेट्या आजचा दिवस हसशील नंतर आयुष्यभर रडशील. तिच्या लग्नास साकरी व वज्रा पण आली होती. पण लग्न झाल्याने त्या मनमोकळ्या वागू शकत नव्हत्या. लग्न झाल्यावर घासभर खाऊन आश्रुपुर्ण डोळ्यांनी त्यांनी एकमेकींचा निरोप घेतला. आता त्या कधीतरी माहेरी आल्या की भेटत असतं. आता त्यांच्या आयुष्यातील स्वातंत्र्याची बंधने हरवली होती. व लग्नाच्या बेडीत त्या अडकल्या होत्या. व स्वतःचा संसार पाहण्यात मग्न होत्या. लहानपणी व लग्नाआधी केलेल्या गंमती जमती त्यांना आठवत व हसू येई. आपल्या पुढील आयुष्याच्या वाटेवर आपली मुलंबाळं यामध्ये आपले बालपण त्या शोधत होत्या. कधीतरी माहेरी आल्यावर गाठीभेटी व्हायच्या. जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या. व त्या आठवणीच्या हिंदोळ्यावर त्या पुन्हा आपल्या सासरी संसाराचा गाडा चालवायला सिद्ध व तयार व्हायच्या. जीवनातील अनेक संकटाना सामोऱ्या जात त्या मार्ग काढत जगत होत्या. देवघरातील समईतील वातीसारख्या तेवत होत्या.
… … …
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा