सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग ८

८) गुरुजींना शिक्षा

लेखक : निशिकांत हारुगले.

दिवस सरत चालले होते. एके दिवशी आई वज्रेला व व्यंकूला म्हणाली, “ म्हशी सोडा, जरा त्यांचे पाय हलके होवू देत. व धुवून आणा.”

तसे वज्रेन थोरल्या म्हशीला लोडना बांधला. व तिचे दावे सोडून वेसणीला दोर बांधला. व दादाने दुसऱ्या म्हशीला व रेडकीला सोडलं. व बाहेर म्हशी काढल्या. ती दोघे नदीच्या वाटेला लागलीत. ओढ्याला पाणी असलेने अनेक जण जनावरे व धूणं धुवायला ओढ्याला जात असत. शांती व साकरी धूण धूत होत्या. वज्रेन आपली म्हस वरल्या कोंडीकडे नेली. तेथें जाताच म्हस फतकल मांडून बसली. त्या दोघा भनी भावंडांनी म्हशी धुतल्या. व बाहेर काढल्या. म्हस धुवून जाताना शांती न शुक शुक अशी साद दिली. पण तिने लक्ष दिले नाही. साकरी मात्र म्हणाली, “ काय वज्राबाई लवकर म्हस धुवायला आलीस वड्यावर.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ माझ्या अगोदर तूच आलीस व मला म्हणतेस लवकर कशी आलीस. तुला तर माझी गरजच नाही बघ. नाहीतर मला बोलवायच्या आधी आली नसतीस.”

वज्रेच टोचून बोलण जाणवल्यावर साकरी तिला म्हणाली, “ बघुया किती दिवस अबोला टिकतोय ते, मी पण याच गावात राहते.”

“ हो तर मग रोज भिंतीवर काठ्या

रोज ओढत जा.” असे म्हणत वज्रेन शांतीकडे भुईतून बघितलं. व ती पुढे गेली. तिच्या पाठोपाठ तिच्या भावाने रेडकी व दुसरी म्हस काढली. व तो ही निघाला. जाता जाता मात्र एक टोमणा मारून गेला. “ बिचाऱ्या मैत्रिणीत किती चांगल चाललं होत. कोण्या नारदाने कळ लावली. देव जाणे.”

व्यंकूचे शब्द कानावर पडल्यावर शांता विचार करू लागली. व तिला आठवलं. की गुरुजींच्यामुळे हे सगळ झाल. तरी देखील आपण वज्रेला बोलती करायचं तिनं ठरवले. ती वज्रा दिसेल तिथे बोलावण्याचा प्रयत्न करी. पण वज्रा तिच्याकडे लक्ष देत नसे.

संध्याकाळी शांता दुकानातून गूळ आणायला चालली होती. तेव्हा तिला वज्रा शेवग्याच्या शेंगा काढताना दिसली. तेव्हा तिने शुक शुक करत बोलावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वज्रा शेजारी असलेल्या गणूस म्हणाली, की बाळा चिचुंद्री कुठे दिसते का बघ पाहू. तेव्हा तो मुलगा झाडाच्या बुंध्याभोवती फिरून चिचुंद्री, चिचुंद्री असे बोलत फिरू लागला. शांतीचा मात्र आता चांगलाच स्वाभिमान दुखावला. ती दुकानाला गेली. व परत घरी जाताना वज्रेस तिचा लालबुंद चेहरा दिसला तिला ती रागवल्याच जाणवलं. व वाईट वाटल. आपण हा अबोला जास्तच तानतोय हे तिला जाणवल. आपण साध झाड वेलींना दुखावत नाही. अन् आपल्या जिवलग मैत्रिणीला अस बोलायचं तिला वाईट वाटल. पण यामुळे आपण जास्तच मवाळ झाल्याचं शांतीस जाणवलं. व तिने इथून पुढे ती स्वतःहून बोलल्या शिवाय आपण बोलायचं नाही असं ठरवल. व इथून पुढे तिच्याकडे बोलण सोडाच पहायचं देखील नाही असं तिन ठरवल.

त्या दिवसापासून शांती अत्यंत शांत वागू लागली. घरात आईला कामात मदत करणे. वडिलांना सोनारकामात मदत करणे. बाजारापासून झाडलोटीपर्यंत सर्व कामे ती करू लागली. शाळेला नियमित जाणे. वेळच्यावेळी अभ्यास करणे. यामुळे तिचा दिवस कसा जातो हे तिलाच कळेना.तिचे हे बदललेले वागणे पाहून दामाजीपंत व सुंदरा दोघेही खुश होते. वज्रेलाल देखील शांतेत झालेला बदल जाणवला.तिला वाटायचे हा अबोला संपवला तर तिला जाऊन गच्च मिठी मारावी व आपले हे अबोल दुःख संपवावे. पण तिच्या नजरेस नजर भिडवण्याचे धाडस मात्र आता वज्रेत नव्हते.

 शांतीचा स्वभाव जरी बदलला तरी तिच्या मनात वर्गशिक्षकाविषयी बराच राग होता. बघता बघता दिवस सरू लागले. सहामाही परीक्षा झाली. व मार्क आले. शांतीला वज्राचे तोडीस तोड मार्क मिळाले होते. वज्रेस वाटले की तिला जाऊन आपण खूप शुभेच्छा द्याव्यात. पण शांतीन आपला जर सर्वांसमोर पाणउतारा केला तर. असे अनेक प्रश्न ही तिच्या मनात उठत होते. दीपावलीच्या आनंदात पण या अबोलपनाचे विरजण जाणवत होते. सुट्टी संपली. पुन्हा शाळा सुरू झाली. एके दिवशी सकाळी सकाळी शांती आईला म्हणाली, “ मला थोडी कोराटीची फुले हवी होती. मी जाऊन आणू का?”

आईचा होकार मिळताच ती घरातून बाहेर पडली. व शिवाराच्या वाटेला लागली. पावसाळा संपला असला तरी अंधळशाहीच्या सरी अधूनमधून येत होत्या. अचानक रात्री कोसळलेल्या पावसामुळे गारवा सुटला होता. पायात झालेल्या चिखल वाटेतून वाट काढत ती शिवारात चालली होती. मोर रानात केकावत होते. ती लगेच तुकाआण्णाच्या घाळीकडे गेली. तिथे कोराटीची जाळी होती. तिथली फुले पटापट काढून तिने आपल्या पिशवीत घेतली. सकाळची वेळ असल्याने शिवारात कोणी नव्हते. ती निरव शांतता भीतीदायक व एकलेपणाची जाणीव करुन देत होती. कशीबशी तिन एका गजर्याची फुले गोळा केली व ती वाटेला लागली. जरा पुढे आल्यावर पळसाच्या झाडाची काही पाने तोडून तिने गवत काड्यांनी तिचा द्रोण केला. वाटेत सगुणाआत्तीच शेत लागत असे. त्याला वाटेकडून काळ्या मेहंदीच्या जाळीन आच्छादलेले होते. तिथं आल्यावर त्या मेहंदीत असणाऱ्या एरड मुगलीचा डहाळा तिन मोडला. तेव्हा तिचे लक्ष त्या झाडाच्या हिरव्या बियांकडे गेले. तिला आजोळच्या आजीचे बोल आठवले. की ती सांगत असे. “पोरीवो एरंडमुगळीच्या काड्या जशा दात घासायला चांगल्या. तितक्याच तिच्या बिया विषारी त्यानें विषबाधा होते. त्यांच्या वाटेला जाऊ नका हो.”

  तिला ते आठवले. तिने ती काडी घेतली. दातावरून फिरवत पुढे आली. पुढे तिला कुंपनात कावशीची वेल दिसली. तिने इकडे तिकडे पाहिले रस्त्यावर व वळणावर कोण आहे का? कोणी नाही याची खात्री पटताच तिने जाळीत हात घालून अलगद कावशी काढून पळस पानात बांधली. व आपल्या पिशवीच्या तळाला टाकली. व वाटेला लागली. पुढे वळणावर बाबू पेंटर पेंडीला निघालेला गाठ पडला. त्याचे डोळे लाल लाल कुल्फीगत होते. तो शांतीला पाहून खेकसला.

“ सकाळी सकाळी सापकिरड्याच भुतावाणी कशाला फिरतेस.”

“ थोडी कोराटीची फूल हवी होती.”

शांती उत्तरली.

“ काय गजरा घालून नव्या नवरीवाणी मिरवायला जायची आहेस का? पायाखालचं झाल असत म्हणजे. आज्जा आठवला असता.”

तेव्हा शांतीने डोळे वट्टारून त्याकडे पहिलं.

“ तुम्हा मुलींना फुलं म्हणजे सोन्याहून प्रिय बुवा.पण या वासाच्या फुलांच्या जाळ्यामध्ये भुजांगाचा वास असतो. तो डसला तर पाणीही मागू द्यायचा नाही. जा आता माघारी.”

त्याच्या बोलण्यात करडेपणा होता. पण पोटात फणसावाणी माया होती. शांती हसतच पुढे गेली. थोडया वेळात ती घरात पोहोचली. आई वाट पाहत उभी होती. तिला येताच म्हणाली, “ काय फुलं उमलायची वाट पाहत होतीस काय? मला वाटल इथ जवळ कुठेतरी गेली अससिल तर तिकडे शिवारात गेलतीस होय. चल आटप लवकर अंघोळ करून घे.”

तशी तिने ती पिशवी कणगीच्या कोपऱ्यात ठेवली. व अंघोळीला गेली. पटापट अंघोळ करून तिने आपले आवरले. व सुईदोरा घेऊन ती फुलाच्या पिशवीसवे जिन्यावर गेली. तिने पटपट गजरा विणला. व कोणी पहात नाही हे बघून आपले दप्तर काढून एका कागदात ती कावशी बांधली. व सुरक्षित तळाला ठेवून वर दप्तर भरल. व ती मांजरीच्या पायांनी खाली आली. दप्तर ठेवून तिने नट्टापट्टा केला. व गजरा माळला. आपले आवरले. जेवण केलं. व ती शाळेला गेली. शाळेत गेल्यावर तिला पाहून इतर मुली कौतुक करू लागल्या. वज्रेस वाटत होत की आपणही जावे व शांतीसी बोलावे. मात्र तिचे ताठणे पाहून तिने गप्प राहणे पसंत केले. दिवस कसा गेला हे कळलंच नाही. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. सर्व मुलांनी आपापले दप्तर भरले गुरुजी ऑफीस मध्ये गेले. वज्राही साकरीसोबत बाहेर गेली. शांती मात्र हळूच शाळेजवळील मोगळात गेली.

मुले गेल्यावर ती हळूच वर्गात गेली. तिने आपल्या दप्तरातील कावशी अलगत काढून टेबल व खुर्चीवर टाकली. कागदाने ती पसरली. तिचे लव्हाळीसारखे काटे पसरले. व कुणी यायच्या आत सगळा कारभार आटोपुन ती वर्गाबाहेर पडली. व घरला गेली. घरी आल्यावर तिने परसात न्हाणीत जाऊन आपले दप्तर धुतले. व उनात घातले. 

दुसऱ्या दिवशी तिने शाळेला जाताना दुसऱ्या जुन्या दप्तरातील आपले शालेय साहित्य घेऊन ती गेली. शालेय प्रार्थना झाली. मुले वर्गात आली. गुरुजी आले. त्यांनी मुलांकडून वर्ग लोटून घेतला. व स्वतः टेबल व खुर्ची झाडून ते त्यावर बसले. थोड्या वेळाने त्यांना खाजवू लागले. ते तडक वर्गातून ऑफिसमध्ये गेले. तिथे हेडमास्तरांना सांगून ते रजा मंजूर करून गावी गेले. हेडमास्तरांनी मुलांना दुसऱ्या वर्गात बसवले. व वर्ग स्वच्छ धुवून घेतला. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. मुले घरी निघून गेली. शांतीला आनंद झाला. पण तो तिने कुणालाही दाखवला नाही. वज्रेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिला काहीतरी घडले आहे .याची जाणीव झाली. कारण गुरुजी खाजवतच बाहेर पडले होते. पुढे दोन दिवस काही गुरुजी शाळेला आले नाहीत. दोन दिवसानंतर गुरुजी शाळेत आले.

  वज्रेन त्यांना विचारले, “ दोन दिवस कुठे होता?”

आजारी असल्याचे कारण त्यांनी सांगितले. तिचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले. त्यांनी कोणतेतरी तेल लावल्याचे जाणवले. पुढे तिने काही विचारले नाही. वर्गात पुढे बसत असल्याने खुर्चीवर गुरुजी बसल्यावर विजार थोडी उचलल्यावर त्यांच्या पायावर ओरखडे दिसू लागले होते. जे त्यांनी खांजळल्यामुळे निर्माण झाले होते. बाकीची मुले अभ्यास करताना वज्रा मात्र विचारात गढून गेली होती. तिचे अभ्यासात लक्ष लागेना. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. तसे वज्रेन आपले दप्तर भरले. व ती साकरीसोबत निघाली. नेहमी तिच्यामागे दोन पावले असणारी शांती सगळ्यांच्या पुढे होती. व ती आज आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. तिच्यापासून दूर न राहणारी. व न करमनारी शांती आज एवढ्या आनंदात कशी याचा विचार करत ती गल्लीत आली. तेव्हा तिचे लक्ष पाटलांच्या गुलमोहराच्या झाडाकडे गेलं. गगुलमोहराची लालेलाल फुले मांडवात झालरीसाठी वापरतात. तेव्हा तिला गुरुजी रजा टाकून गेलेल्या आदल्या दिवशी शांतीन घातलेला कोराटीच्या फुलांचा गजरा घातलेला तिला आठवला. ही फुले शिवारात मिळतात. व शांतीनच खुजलीची कावशी आणली असल का? असा विचार मनात आला. कारण वर्गात असा टारगटपणा कोण करणार नव्हत. व गुरुजींनी शांतीला शिक्षा केली त्यामूळे तिनं असं केल असेल तर तिला आपण गुरुजींची माफी मागण्यास लावायच असं ठरवून ती घरी आली.

पुढे क्रमशः....

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ७

 कथा वाकाट खोर्याची भाग ७


७) आज्जी व व्यंकूचे भांडण


व्यंकूला वज्रेचे काळजी करणे आवडले. मघाशी सापाला पाहून घाबरणारी व आता धाडसाने पुढे होणारी वज्रा आठवली. व तो मनात म्हणाला,की परिस्थिती माणसाला शहाणपण व धाडस देते. 

ती दोघे पायवाटेने मुख्य रस्त्याला आलीत. वज्रेस जरा बरे वाटले. ती झपझप वाट चालू लागली. बघता बघता ओढा पार पडला. टेंबरणीचा चढ चढून ती वर आली. तिथं भल मोठं चिंचेचं झाड होत. त्या झाडाच्या कच्च्या हिरव्या चिंचा खुणावत होत्या. तिला शांतीची आठवण झाली. व तिचे हास्यच मावळले. तिचं काळीज धडधडयला लागले. व डोळे पाणावले. ती तशीच पुढे चालली. बघता बघता दोघे गावात पोहोचली. वाटेवर वाण सामान आणायला गेलेली शांती तिला गाठ पडली. जवळून जाताना शांतेने शुक शुक असे खुणावले. पण वज्रेन दुर्लक्ष केल. व ती घराकडे गेली.

शांतीला आपण इशारा करूनही वज्रेन न पाहिल्याचा राग आला. ती टाचा आपटत घरात गेली. व हातातली पिशवी आईसमोर हिसक्याने ठेवून पुटपुटत जोत्यावर आली. व बडबडू लागली. तिच्या मागोमाग येत आई सुंदरा म्हणाली, “ काय झालं एवढ टाचा अपटायला.”

“ टाचा आपटू नाहीतर काय करू, लई शेफारलिय बामणीन एवढं शुक्ss शुकss करूनही बघितलं नाही. आपल्याच तोऱ्यात वावरते. महाराणीच समजते. पण मी ही काही कमी नाही. चांगली सोनारीन आहे. नाही हिच कान टोचल तर बघ. नाव नाही सांगणार.”

शांत टाचा आपटत जिना चढून वर निघाली. तेव्हा सुंदरा तिला चेष्टेने म्हणाली, “आग, एवढ्या रागात वरती चिडून फास बिस लावून घेशील मैत्रीण बोलत नाही म्हणून, मला रडायला बाई वेळ नाही.”

“ कळतात टोमणे मला, फास लावून घ्यायला एवढी बुळगी नाही मी. जा जेवण कर जा. तुला तर तिचे शेण काढणे, धूनं धुणे, भांडी घासणे आवडते ना.”

“ हो ग बाई मला वज्रा आवडते. तुझ्यासारखी फटाकडी नाही ती. कशी नम्र असते ती.”

“ हो का म्हणून नदीवर धूनं धूत पाटलाच्या नम्रीन शयनग्रामचा पोऱ्या पटवला. बापाला लगीन लावस्तोवर पुरेवाट झाली.”

सुंदरा म्हणाली, “ तुझ्याशी बोलायला पायलीची पेज प्यायला पाहिजे. एक वेळ नव्हरा बायकोचं भांडण परवडल. पण तुम्हा मैत्रिणीत मध्यस्थी नको.”

“ मग मी काय तुझ्या माग वकीलपत्र घेऊन लागलेय.”

 असे बोलत कोपऱ्यात बसून शांती स्फूंदू लागली. आता लई तापायला नको. म्हणून शांतीच्या आईन गप्प बसायचं ठरवलं.

 * * * *

इकडे वज्रेन घरी आल्यावर आपल्या डोईवरची भांडी उतरून न्हाणीघरात ठेवली. तोपर्यंत परसदारी गोठ्याजवळ व्यंकूने आपल वज्ज् टाकल. व पेंड्या सुट्ट्या केल्या. व म्हशींच्या पुढील काडसर काढून त्यांना दोन चार पेंड्या टाकल्या. व विहिरीवर न जाता न्हाणीघरात येऊन हात-पाय धुवायला त्याने रांजनात हात घातला. रांजनात पाणी नाही बघून तो चिडला. व आज्जीला ओरडू लागला.

“ आजी आजी.”

तेव्हा त्याचा आवाज ऐकून शिंद्यांच्या हौसाबरोबर चकाट्या पिटत बसलेली म्हातारी म्हणाली, “ आली वाटत कारवान, जाते नाहीतर व्यंक्या घर डोक्यावर घ्यायचा.” असे म्हणत घराकडे आली.

तिला शिंद्यांच्या घराकडून येताना पाहून म्हणाला, “ काय करायला गेली होतीस. इथ हातपाय धुवायला पाणी साध नाही.”

म्हातारी म्हणाली, “ मग जा की बाबीवर परसदारात केवढी मोठी बाब हाय.”

“ बावीवर जायला माझ डोकं भनभनलय वज्ज् केवढं जड होत. व मला तू बाबीवर जायला सांगतीस व्हय.”

 तेव्हा म्हातारी म्हणाली, “  चार पेंड्या टाळूवरन आणून माझ्यावर उपकार केल्यासारखे बोलू नकोस. जा तिकडे मला जमत नाही माझा पाय मुरगळलाय.”

“ पाय मुळगळायला गेलतिस कूठे ते मला सांग.”

“ परड्यात गेलते फुलं आणायला.”

व्यंकू आणखी चिडवून म्हणाला, “म्हातारपणी बर की तुला फुलं आवडतात.”

व्यंकूचे बोल ऐकूण म्हातारी चिडली. व म्हणाली, “ मगापासून तुझ बोलणं ऐकतेय तू म्हणसील ते गपगार ऐकायला तुझी बायको नव्ह. माझ्या पोराने कधी का सुनेने मला हे कर का ते कर म्हटल नाही. व तू कोण बोलणार गणोबा जा माझं डोकं खाऊ नको.”

तसा तो चिडून कळशी घेऊन परड्याकडे निघाला व म्हणाला, “चकाट्या पिटाय जायला बर की पाय दुखत नाही. व नातवाला पाणी आणून देताना बर दुखतोय. बर सापडलय, कारण तुला आता बसशील विव्हळत महिनाभर तुला गावलिया गरीब सून म्हणून तुझा तोरा चाललाय. चहाच्या कपापासून गरम पाण्यापर्यंत सगळ हातात मिळतंय म्हंटल्यावर, तूच आळशी गणोबा.”

 हे बोल ऐकूण म्हातारी परसदारी आली व म्हणाली, “ तुझ्या का पोटात चावतय देवानं द्यावं व नशिबानं घ्यावं. माझ सुख बघवत नाही होय.”

तो तडक बावीजवळ आला. वज्रेला पाणी काढताना दिसली. तोपर्यंत वज्रेन  चांगल दोन बारड्या पाणी काढल होत. तिला पाहून तो म्हणाला, “ तू कशाला काढलस. मी काढल असत की.”

“ तुला फार ओझ झाल होत. ते मला जाणवलं. म्हणून काढले. आजीसी कशाला वाद घालत होतास. मला बोलायचं मी काढल असत. मला काढता येत. असं मोठ्यांना उलट बोलण आपली संस्कृती नव्हे.”

ते ऐकताच व्यंकूम्हणाला, “तुझ्याकडून पाणी उपसून घ्यायला तू अजून लहान आहेस. व दुसर म्हणजे आजीचे चार शब्द ऐकल्याशिवाय मला करमत नाही.”

त्याने हातपाय धुतले. वज्रा कळशी घेऊन घरात आली. ती पाणी न्हाणीतल्या रांजणात ओतू लागली. तेव्हा चुलीतला राकूंडा काढताना आजी म्हणाली, “काय झाली का बंधूसेवा.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ हो झाली की तुझी काय करू.”

“ हो आहे की सगळ घर लोटून म्हशीच शेण काढ. मी चहा ठेवते. व पाणी भरते. उगाच विहिरीवर जाऊ नको.”

आजीच बोल कानावर व्यंकूच्या पडल. तो बाहेरूनच म्हणाला, “ वज्रे तिला सांग तिथं चुलीजवळच काय ती घुटमळ म्हणावं. इकडं उगाच एक घागर भरायची. अन् महिनाभर लोळत पडायची. मी भरतो पाणी म्हणावं.”

व्यंक्याचे बोल कानावर पडताच म्हातारी म्हणाली, “ बर झाल. देव पावला.”

वज्रेन झाडू हातात घेऊन सगळ घर झाडल. शेण काढून टाकले.  व्यंकूने  पाणी भरल. ते पुन्हा आपल आवरून जेवणखोलीत आलीत. आजीनं तोपर्यंत गुळाचा चहा केला होता. तिनं कपात ओतून दोघांना दिला. तो चहा घेत व्यंकू आजीकडे पाहू लागला. ते पाहून आजी म्हणाली, “ शिंक्यावरल्या लोण्यावर टपून बसलेल्या बोक्याप्रमाणे  काय बघतोस पी गप्पवाणी.”

तसे त्याने चहा घेतला. व जाताना  म्हणाला, “ मी बोका तर बोक्याची आजी कोण.”

तेव्हा म्हातारीनं मुडगा उचलला व म्हणाली, “ पळतोस काय हाणू एक.”

व्यंकू दाणकन बाहेर पळाला. म्हातारी जेवण करू लागली. सांज व्हायला शेतातून माणसं घरी आली. भांगलण संपली होती. वज्रेन केलेलं काम पाहून पार्वतीनं तिची माया केली. डोक्यावरून हात फिरवून कडाकडा कपाळी मोडली. “शहाणी माझी बाय ग म्हणाली.”  व सांज झाल्याने घरला गेली.


क्रमशः पुढे……….


रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ६

 कथा वाकाट खोऱ्याची

६) वज्रा व व्यंकू शेताकडे

लेखक : निशिकांत हारुगले.


वज्रा आपल्या भावाबरोबर शेताला निघाली. तेव्हा व्यंकू म्हणाला, “ तू हल्ली गप्प असतेस. व शांती रोज एक दोन तरी चकरा मारणारी ही दिसत नाही. भानगड काय?”

वज्रा बोलली, “ आम्ही बोलत नाही.”

व्यंकू म्हणाला, “ का बोलत नाहीसा तुम्ही?”

वज्रा, “ तिच्यामुळे मला शिक्षा झाली.मला व्हरांड्यात कोंबडा केलं गेलं.”

व्यंकू हसला, “ ती काय शिक्षा म्हणायची. खुळीच आहेस. त्यामूळे तुमची घनिष्ट मैत्री कळते. त्यात आनंद मानत जा. मैत्री करायची तर सोसायला नको.”

“ पण वर्गात तिच्यामुळे माझी काय अवस्था झाली. माहितेय ना तुला. व तू ही आजीला सांगितलस.” वज्रा बोलली.

व्यंकू, “ ए वेडे, भोळी आहेस तू. माणसानं तुझ्यासारखं मवाळ ही असू नये, व शांती सारखं अती ताठर, परिस्थितीनुसार वागणं बदलाव.”

व्यंकू चे विचार खूप काही शिकवत होते. ती दोघे बोलत बोलत ओढ्यापर्यंत आलीत. ओढ्याच्या पांढ-याखड पाण्यात पावले धुतली. पाण्यातून जाताना तिने भावाचा हात धरला. कारण शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरू नये. रस्त्याच्या बाजूने असलेली झाडे सुखद गारवा देत होती. अधून मधून रानातली पाखरांची किलबिल ऐकू येत होती. शेतातील ऊस चांगलाच वर आला होता. तो वाऱ्यावर हेलकावे खात होता. त्याची पाने सळसळत होती. रानात कुठेतरी मोर केकावत होते. चालता चालता ती दोघे शेताजवळ आलीत. मुख्य वाट सोडून पायवाटेने ती रानात निघाली. उसाच्या कडेने रानातली हारिटी वाढली होती. ती पायवाटेवर आली होती. व्यंकू म्हणाला, “ वज्रे पायाकडे बघत ये. दुपारची वेळ लांबडी बाहेर पडतात.”

वज्रा घाबरून पायाकडे पहात चालू लागली. चालताना तिला लहान मुलांचं घाटी गाणे आठवले. ‘अबल डबल' ती हसत निघाली. ती आता सहावीत गेली होती. लहान मुलांना सापाची भीती वाटते. तेव्हा ते हे गाणं गुणगुणत. ते म्हंटल की साप आपल्या घरी न येता कावळ्याच्या घरी जातो. असं म्हणतात. ती हसतच मनातल्या मनात म्हणू लागली.

‘ अबल डबल आम्ही काय नाव काढलं नाही. त्या झाडावरच्या कावळ्याने काढलं. त्याच्या घरी जा. दही भात खा. व आल्या वाटेने निघून जा.”

ते म्हणताना तिचे हात चेहऱ्यावर फिरू लागले. ते पाहून व्यंकु म्हणाला, “ घाबरली वाटत भागुबाई. असं साप घरी आला असता तर मेलाच असता. व कावळ्याच्या घरात कुठले तांदूळ व दही असत मला दाखव बघू.”

“ आम्ही लहान असताना तूच सांगितलस ना. “ वज्रा बोलली.

“ अग, तेव्हा मी लहान होतो.”

“ आता बुद्धी आली वाटत आडग्या डोक्यात.”

बोलत चालत शेत आले.वज्रेच लक्ष ओप्यातील नदिकडच्या गजाबाईच्या आंब्याकडे लक्ष गेलं. तिच्या काळजात धस्स झालं. “जर का उठलं तर आपली काय धडगत नाही.” वज्रा बोलली. असे बोलत चालत ती भांगलन चाललेल्या ओप्यात आलीत. व्यंकूने हाक मारली. तेव्हा मेसाच्या बेटाकडून तिला आवाज आला. व्यंकू म्हणाला, “ चल तिकडे आहेत ती.”

वाढलेल्या उसातून ती दोघे निघाली. उसाची पाने अंगाला कापत होती.तशी ती जपूनच चालू लागली. एकदाची ती भांगलन चालू असलेल्या ठिकाणी आली. ऊस सगळा भांगलून होत आलेला होता. कडेच्या सात आठ सऱ्या तेवढ्या राहिल्या होत्या. बाहेरची पाच सहा माणसं कामाला होती. वज्रेला पाहून शिवानंद म्हणाला, “ हिला आणि कशाला घेऊन आलास इकडं. भर दुपारी रानात.”

वज्रा हिरमुसली व म्हणाली, “ का? मी आल्याने काही बिघडणार आहे का.”

तेव्हा वडील म्हणाले, “ नाही काळजी वाटली म्हणून म्हणतो.”

वज्र म्हणाली, “ मी काही आता लहान नाही. चांगली सहावीत आहे..”

तेव्हा रामा परटाची बायको म्हणाली, “ तस नव्ह बाळा, मुले कितीही मोठी झाली तरी ती आईबापाला लहानच असतात.”

तेवढ्यात आई म्हणाली, “ व्यंकु ती भाकरी बांधाकडेला ठेव व तेवढी कळशी नदीवरून भरून घेऊन ये जा.”

आईचे व्यंकूला सांगणे ऐकून वज्रा म्हणाली, “ मी पण येणार.”

तेव्हा शिवानंद म्हणाला,” तू आणि कशाला? आलीस तेवढी पुरे. बांधाकडेला जाऊन बस.”

असे म्हणताच ती रडू लागली. तेव्हा आई म्हणाली, “ जा पण जरा जपून.”

असे म्हणताच तिने वडिलांकडे पाहिले. तेव्हा त्यांनी नजरेनं होकार दिला. ती खुदकन हसली. ती व्यंकूच्या मागणं निघाली. बांधाकडेन मळवाच्या रानातून व्यंकू निघाला. तशी वज्रा ही त्या मागून निघाली. 

नदीकडे जाताना तो गजाबाईच्या आंब्याच्या खालून निघाला. ते भलं मोठ झाड होत. जुनी लोक त्या आंब्याविषयी बोलत. आखी मालकिणीवाणीच हाय.. पूर्वी गजलक्ष्मी नावाची एक म्हातारी होती. सगळे तिला गजाबाई म्हणत. गावात तिला खूप मान होता. आडल्या नडल्याल्या ती मदत करायची. तिचा नव्हरा पूजाविधी करी. पण तिला ते पसंत नसे. ती घरचं शेत पहात असे. राबायला घट्ट. चार गड्यांनी उचलन्या जोगे वज्ज ती न्यायची. तिच्या चार पंढरपुरी म्हैशी तिच्या वज्यात गार व्हायच्या. एकदा गावच्या पाटलाने बांधावरून भांडण काढल. व तिच्या नव्हऱ्याला मारलं. तेव्हा तिन उखळातल्या मुसळान तिनं बडीवला. चांगलाच चेचला. चांगल महिनाभर पाटील अंथरुणात होता. पाटील गावचा कारभारी असून देखील गावात गजाबाईचाच दरारा. निम्मं गाव तिच्या शेतावर पोसत होत. तिन ह्यो आंबा लावला. म्हणून तिला गजाबाईचा आंबा म्हणत. त्या आंब्याजवळच्या पायवाटेने ती दोघं भावंडं नदीच्या गोंडाला गेली. 

पावसाळा संपल्यान नदीच पाणी निवळशंख दिसत होत. धरणाला फळ्या नसल्याने नदीतील खडक उघडे बोडके दिसत होते. काठच्या तांबड्या वाळूत नदीत अंघोळ करुन लोळावे असे वाटत होते. नदी काठच्या झाडांचे उगडे सांगाडे दिसत होते. तेथून शयनग्रामचा गोंड दिसत होता. वाळूत स्त्रियांनी कपडे धुवून घातलेले होते. इतक्यात तिला व्यंकू म्हणाला, “तिथं थांब. माग माग येऊ नको. मी पाणी भरून आणतो. तशी ती थबकली. व धूणं धुवायच्या दगडावर जाऊन उभी राहिली. व्यंकूने पुढे होऊन खळाळत्या पाण्यात घागर धुवून भरली. तसा बुडबुड आवाज झाला. वज्रेला त्याच नवल वाटल. कारण तिने या आधी फक्त विहिरीच पाणी काढताना घागर दोरीला बांधून सोडणे व जड झाली की काढणे एवढंच तिला माहित होत. या आधी कधी तिने बाहेर पाणी भरले नव्हते. 

व्यंकूने पाण्याची घागर भरली. व तो नदीपात्रातून बाहेर आला. त्याने दगडावर बसून खेळणाऱ्या वज्रेस चलण्याची सूचना केली. व ती नदीच्या गोंडाचा टेक चढून वरती आलीत. नदी परिसरात अनेक प्रकारची झाड होती. त्यामधे उंबर, करंज, जांभूळ अशी निरनिराळी झाडे होती.पाखरांची किलबिल शांत झाल्याने ती निरव शांतता बोचत होती. पुढे चालता चालता अचानक पक्ष्यांचा गलका ऐकू आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर उंबरणीवर सरसर धामण चढताना त्यांनी पाहिले. वज्रेच्या काळजात धस्स झाल. ती भावाला जाऊन बिलगली. व म्हणाली, “ दादा तो बघ साप उंबरणिवर चढतोय. तो म्हणाला, “ घाबरु नकोस. तो काही आपल्याकडे येत नाही.”

“ तसे नाही रे दादा. मगाशी मी सापाचे नाव काढले. तेव्हा वाईट विचार मनात आला होता.”

“ वेडे असं काही नसतं. एवढा मोठा भाऊ असताना घाबरतेस कशाला.”

त्या दोघांनी पाहिले. धामण झाडावर सरसर चढत होती. उंबरणीवरील पोपटांनी एकच कल्लोळ केला. त्यांनी त्या धामणीवर हल्ला केला. उडत उडत ते टोचण्या मारू लागले. तेव्हा त्या सापाला वर चढणे कठीण झाले. ती धामण उतरंडीला लागली. पोपटानी तिचा पाठलाग चालवला. ही झूंज चांगली पाच-सहा मिनटे चालली. ती दोघे शेतात गेली. तेव्हा वज्रा म्हणाली, “ दादा त्या सापाबद्दल कुणाला सांगू नको. नाहीतर मला शेताला येऊ देणार नाहीत.”

“ का मी का सांगू नये. त्या दिवशी मला पाण्याने का भिजवलस? खूप गोड वाटत होते ना. तुला.”

“ मग तू का सगळ आजीला संगितलस.”

“ त्यात काय मी खर तेच बोललो ना?”

“ हो तर खर्याचा पुतळाच ना. सत्यवादी हरिशचंद्र, आमच्या घरात जन्माला आलाय.”

“ आता खरंच सांगणार म्हणजे तुला शेतात यावयास मिळणार नाही.”

वज्रेला राग आला. व ती म्हणाली, “ जा सांग जा. तुला पण गरज लागेलच की माझी.”

“ घाबरु नकोस सांगत नाही.” तेव्हा ती हसली. व ती दोघं शेतात आली. पाण्याची कळशी ठेवली. आता चांगली दुपार झाली होती. पाणी आणल्यावर सगळी जेवायला बसली. झाडाखाली बसून त्यांनी भाकरी इकडल्या तिकडल्या गप्पा मारत खाल्ली. तेव्हा बायक्कान विषय काढला.

“ काल महादून दारू पिऊन बायकोला मारली म्हण.”

सुनंदा पटलीन लगेच म्हणाली, “मी व्हते तिथंच. माझ काय धाडस झाल नाही. अडवायला. कोण जाणार आ जाईल तेला शिवा देतय. तो सदा गेला होता अडवायला तर तेलाच शिवा देऊ लागला मेला.”

“ काय सदाला शिवा दिल्या. दोन थोबाडीत लावायच्या नाहीत तेन.” शिवानंद म्हणाला.

“ एवढेच नाही. तर सदाला गुरकावून म्हणाला कसा. की माझी बाईल हाय. तिला मारीन नाहीतर वाट घालीन. तू कोण विचारणार. तुला तिचा लई पुळका का? का तुझ व तिचं हाय. असं म्हणताच सदान दोन थोबाडीत लगावल्या. तस पडल कोंबडं मळगळल्यागत. कोपऱ्यात. तवा बायकोला तेव्हा दया आली. व ती म्हणाली, की सदाभाऊ तुम्ही गप्प जावजावा. बेवड मरल बिरल. तुमच्या अंगावर यायला नको. आमची शिंद्याची भावकी लई वंगाळ हाय. म्हणतील नव्हर्याला मारायला मारेकरी घातलाय. सटविन लावलय नशीब माझं याच्याशी. भोग आणखीन काय. माझ माहेर गरीब. लगीन लागल्यापासून माझा वनवास सुरू हाय. अगदी सितवाणी. गरिबाच्या पोरी म्हणजे दावणीची ढोर. एकदा विकल की तिकडल्याच त्या. माग काय पहायचं माती. ज्या दावणी बांधल्या तिथंच आमचं मरण. म्हशीला मालक दुधासाठी मारतो. व आम्हाला नव्हरा पैशापाई मारतो. तुम्ही जावा भावजी अस म्हणून सखूनं पाणी डोळ्यात भरल.”

 “ खरच बाई एवढ्या लांबल्या मुलखाला देसोऱ्या पोरीनी संसार करायचा लई कठीण काम आसल्यासणी कोकणीच पोरी पाहिजेत फणसाला बांधणाऱ्या. म्हणजे महादेव बसला असता कोकलत. गवारेडा कुठला.” तारा उत्तरली.

तराच बोलण ऐकूण पार्वती म्हणाली, “ खरंच संत सखुवाणी हाय सखू.”

“ मी पाहिजे होते. तिथ त्या महादेवाला चांगल बांधून घाटल असत वड्याच्या कोंडीच्या झाडाला. पाण्यावरल्या चिलटानी चावून खाल्ल असत. म्हणजे समजल असत. डोक्यातली बया मग उत्तरली असती.” बायक्क म्हणाली.

बोलता बोलता सगळ्यांची भाकरी खाऊन झाली. तस पार्वतीनं व्यंकूला पाल्याच वज्ज बांधून दिलं. त्याच्या डोक्यावर ठेवलं. व वज्रेला म्हणाली, “दादा बरोबर जा. आम्हाला वेळ हाय अजून उगाच इकडं तिकडं करत जाऊ नको.”

 वज्रेन नंदीबैलासारखी मान हलवली. जातो असं म्हणून तिन भांडी बुट्टीत घेतली. व ती व्यंकूच्या पाटोपाट निघाली. तशी ती म्हणाली, “ दादा थांब मी पुढे होते. तू माझ्या माग ये. वज्ज्यातून तुला रस्ता दिसणार नाही. असे बोलून ती भावंडे वाटेला लागलो.

क्रमशः पुढे....

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ५

 5)शांता व वज्रेची घुसमट.

लेखक : निशिकांत हारुगले.

शांती वज्रेच्या घरातून आली. तिने केलेल्या श्रमावर पाणी पडले होते. ती आपल्या घरच्या खिडकीत बसून स्पुंदू लागली. दामाजीनी विचारले, “काय झालं रडायला.”

तेव्हा तिन वज्रेसंग अबोला व इतर घटना सांगितली. ते ऐकून दामाजी अश्चर्याने म्हणाले, “ काय तूम्ही दोघी बोलत नाही. सूर्य पश्चिमेला उगवला की काय? माझा विश्वास बसत नाही.”

शांती म्हणाली, “ अण्णा यावर उपाय सांगा.”

दामाजीपंत म्हणाले, “ हे बघ तुझ्यामुळे तिला शिक्षा झाली. मग ती चिडणारच. व अबोला धरलाय ना. आता थोड दिवस शांत रहा. व तिच्याशी मवाळ होऊन बोल. तुझ वागणं सुधार. मग बोलेल ती.”

त्याचं हे बोलण स्वयंपाक घरात बसून सुंदरा ऐकत होती. ती म्हणाली, “ कसले धडे देताय ती शांती नाही अशांती आहे. एक वेळ दगडावर परिणाम होईल पण या मुलीवर नाही. एक दिवस मिरी वाटेल डोक्यावर मग कळेल.”

तिचे बोल ऐकूण शांती म्हणाली, “सारखं मला पाण्यात पाहतेस. अण्णाच्या नाही पण तुझ्या निश्चित वाटीन. त्या पण काळ्या नाही तर पांढ-या व ती वज्रा स्वतःला काय समजते. ती बोलल्या शिवाय मी बोलणारच नाही. व त्या गुरुजींना पण बघून घेते, बघच तू. स्वतःला ब्रम्हदेव समजतो काय?” आम्हा दोघींमध्ये नारद होऊन भांडण निर्माण केलयं. त्या जान्याचा पुळका तेला असतो. त्या जान्यान मागल्या आठवड्यात सुताराच्या सविताला धक्का दिला होता. तेव्हा कुठे गेला होता याचा न्यायीपणा. स्वतला काय रामशास्त्री समजतो काय. याच्या शास्त्राची कात्रीच करते. की नाही बघ.” बोलून ती न्हाणीघरात गेली व चांगलं बारडीभर पाणी तिन उपसून हातपाय धुतले. दोरीवरील टॉवेलने हात पाय पुसले. व जेवण खोलीत आली. थाबड्यातील भाकरी, घेऊन त्यावर श्रावण घेवड्याची भाजी घेतली. व शिक्यावरील दही घेऊन लगबगीनं खाऊ लागली. ते पाहून सुंदरा म्हणाली, “ “ अग, हळू जेव की, काय कुत्र बित्र माग लागलं की काय?” शांतीने शाळेत जाण्याची आपली वेळ झाल्याचं सांगितल. तेव्हा सुंदरा तिला म्हणाली, “ काय दिव लावणार आहे कुणास ठावूक. त्या वज्रेकडून काही तरी शिक. तुझ्या पेक्षा एका वर्षाने मोठी आहे. पण घरकामासकट शेण घाण पण काढते.”

तेव्हा शांती म्हणाली, “ मग सांग जा बाबांना दोन म्हशी पाळायला. तू धार काढ. मी शेण काढते. मग दोघे जा वैरण वढायला.”

तेव्हा शांतीची आई म्हणाली, “उलट बोलण्यात व टोचण्यात पाहिलं नंबर येईल बघ.” तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता शांतीने आपले आवरले. नट्टापट्टा करून ती शाळेला निघाली. जाताना तिने वज्रा गेल्याची खात्री करून घेतली. व शाळेला निघाली. शाळेत गेल्यावर एखाद्या साळसूद बाईसारखी एक कोपरा धरून ती बसली. वज्रेन मात्र तिच्याकडे पाहिलं पण नाही. त्यामूळे शांतीचे पित्त खवळत होते. पण तिनं न बोलताच शांत राहणे पसंत केले. त्या ददोघतील अबोला मुलांच्या व गुरुजींच्या लक्षात आला. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. जानबाला या अबोलपनाचा खूप आनंद झाला होता. तो काही ना काही कारण काढून तो वज्रेच्या जवळ जाऊन गुलूगुलू बोलत असे. शांतीने या त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. त्या दोघी वेगवेगळ्या घरी आल्या. त्यांच्यातील अबोला काहीकेल्या मिटत नव्हता. दोन चार दिवस झाले. वज्रा बोलत नाही म्हंटल्यावर आपण एकदा बोलवून पहावं असे तिला वाटले. तिने आणखी एकदा प्रयत्न करायचा ठरवल.

रविवारचा दिवस उजाडला. वज्रेन आज शेताला जायचा निर्णय घेतला. शेतात उसाची भांगलन चालू होती. आज काहीकेल्या घरात थांबायचं नाही. असं तिने ठरवलं. व ती आईच्या पाठी लागली. कारण शांतीपासून तिने अबोला धरून चार-पाच दिवस काढले होते. आज सुट्टीचा दिवस होता. आज दिवसभर कसा घालवायचा असा प्रश्न तिच्यापुढे होता. आई सकाळपासून कामात होती. तिला घरकामात तिने बरीच मदत केली. व आता शेताकडे न्यायसाठी ती लाडीगोडी लावत होती. तेव्हा आईने तिला व्यंकूसोबत दुपारी जेवण घेऊन येण्यास सांगितल. व आई शेताला गेली. तेव्हा पासून ती दुपार होण्याची वाट पाहू लागली. दुपार झाल्यावर आजीकडून भाकरी बांधून घेऊन ती दोघे बहीण भाऊ शेताच्या वाटेला लागलीत. त्याना शेताला जाताना पाहून न पाहिल्यासारखं शांतीन केलं. ती शेताला गेल्यावर आपल काम आटोपून शांती साकरीच्या घरला गेली. साकरी धुणे धूत होती. शांतीला पाहून साकरी म्हणाली, “ शांते लवकर घरातलं काम आटोपल वाटत.” “काही नाही ग झालंय काम पण घरात करमत नव्हत. म्हणून आलेय.”

साकरी म्हणाली, “ तुझ व वज्रेच जास्तच तानलय.”

तेव्हा ती म्हणाली, “ हे बघ साकरे मी तुझ्याकडे आलेय. ते या विषयावर बोलाय नाही. मला करमत नाही म्हणून आले. तर तू माझ्या जखमेवर मिठ चोळू नको. तेव्हा साकरी इकडल्या तिकडल्या गप्पा मारू लागली. साकरीला मात्र शांतीच वागणं खटकत होत. कारण तिने एकदाही वज्रेचा विषय काढला नाही. त्यामुळे त्या दोघींत मोठी दरार पडत चाललीय याची जाणिव तिला झाली. व या दोघी मैत्रिणीना एकत्र आणायचे तिने ठरवलं. व त्यांच्यात बोलचाल घडवून आणायची तिने मनात ठरवलं. थोडावेळ गप्पा मारून शांती घरी निघाली. जाता जाता आपण उद्या सुट्टी असलेने धुणं धुवायला ओढ्याला जाऊया अस साकरी म्हणाली. तेव्हा शांती बर बर असे म्हणाली. व घरी गेली. शांतीने जरी विषय काढला नसला तरी तिची अस्वस्थता साकारीला जाणवली.

क्रमशः. पुढे……

 


मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ४

 वज्रा व शांतीचा अबोला

लेखक : निशिकांत हारुगले.


शाळेतून बाहेर पडलेली वज्रा शांतीसवे न बोलता घरी चालली होती. शांतीने ओळखले की वज्रा आपल्यावर रागावली आहे. तरी देखील ती मागोमाग तिला हाक मारत चालली. तशी रागाने वज्रा तिला म्हणाली, “ मला आजपासून तुझ्याशी बोलायचे नाही. तसेच तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. तुझ्यामुळे मला शिक्षा झाली. तुला काही फरक पडत नसेल, मात्र मला पडतो. तू राजाची लेक, मी मात्र गरीब बामणिन. तुझा व माझा स्वभाव विरुद्ध आहे. आपलं पटणार नाही.”

असे बोलून ती तरा तरा चालू लागली. शांतीला वाईट वाटले. कोण तरी काळजावर घाव घालत होते अशी जाणीव झाली. तिला शाळेतल्या मास्तरांचा राग आला. त्याना शुक्राचार्य म्हणजे राक्षसांचा गुरू असे म्हणू लागली. ती चालत राहिली. वज्रा पासून काही अंतर ठेवून ती चालत राहिली. गल्लीत आल्यावर तरी बोलेल असं वाटलं. पण नाही वज्रेनं तिचं नावच टाकल. शेवटी ती घरात आली. वज्रा ही गेली. घरात आल्यावर शांतीचा जीव कशातच रमेना. वडिलांनी आणलेली बाजारातून केळी ती ही खाववेना घशातून उतरेनात. काही केल्या तिचा जीव कशातच रमेना. इकडे वज्रेन घरी आल्यावर जोत्यावरील कपाटात आपले दप्तर ठेवले. आई शेताला गेली होती. आजी परसातील अंगणात तांदूळ निवडत होती. तिनं घरातील केरसुनी घेतली. व घर लोटले. नंतर गोठ्यात जाऊन शेण फेरा फेरान परसातील गारीवर बुट्टीतून टाकल. तिला पाहून रेडकी ओरडू लागली होती. धारेची वेळ जवळ असल्याने तिने तिला काही टाकले नाही. तिचा भाऊ व्यंकू शाळेतून आल्यावर खेळायला गेला होता. त्याने आजीला सर्व सांगितले होते. पण आजीने तिचा चेहरा बघून विचारायचे टाळले. तिचा व्यंकूपेक्षा वज्रेवर विश्वास होता. अंगणातील पेरवीचे पेरू आजीने काठीने दुपारी पाडले होते. वज्रा शेण काढताना आजीने चहा चुलीवर ठेवला. शेण काढल्यावर ती बावीवर हातपाय धुवाय गेली. तिथं व्यंकू खेळून आला. तो ही हातपाय धुवायला बावीवर आला होता. त्याने हातपाय धुताना वज्रीस चिडवल.” आज एका माणसाची धडगत नाही बुवा, मी आजीला सर्व सांगितले आहे.की शाळेत दोन कोंबड्या व्हरांड्यात उभ्या होत्या. त्यातील एक बामणाची व दूसरी सोनाराची.”

त्याच बोलण वज्रेस लागल ती त्याला म्हणाली, “ तुला पंचामृतापेक्षा शेणात चांगला चमचा फिरवायला येतो. भटाच्या पोटाला येण्यापेक्षा हेड्या का नाही झालास. जा बाजारात शयनग्रामच्या किंवा कडगावच्या. मला कोंबडी म्हणतोस. लाज नाही वाटत तुला. हुप्प्या कुठला? जा सांग जा मी भीत नाही कुणाला?”

“ होय खरंच तू कुणाला भीत नाहीस? वाघीणच आहेस ना बिन शेपटीची. तुझी मैत्रीण शांतीचे चांगलेच गुण उचललीस.” व्यंकू बोलला. शांतीच नाव घेताच वज्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. व्यंकूला पाठमोरा उभा राहून हात पाय धुताना पाहून बावीतली बारडी काढली व व्यंकूच्या अंगावर उपडी केली. व तिथेच बारडी टाकून ती घरात धावत आली. व आजी जवळ येऊन रडू लागली. तसा भिजलेल्या अवस्थेत व्यंकू तिथं आला. तो चिडलेला होता. आजीला पाहून म्हणाला, “ आज्जी हे बघ काय केलं तिन, मी वज्रेला मारणार..” आज्जीने वज्रेस जवळ घेतले होते ती म्हणाली, “ व्यंक्या मी ऐकलेय सगळं. तू काय बोललास ते. शाळेतल्या मास्तरांची पारख चुकेल. मात्र माझी नाही. मला माणसं परखता येतात. माझी वज्रा कुणाची उगीच कळ काढणार नाही. तू मगाशी तिला टोचून बोलत होतास. ते ऐकलेय मी. उलट तुला पाणी ओतून शुद्ध केलाय तिन बाहेरून स्वच्छ झालास आतल्या मनाच काय.” आजीच आताचं बोलण तसेच मगाशी वज्रेच बोलण ऐकूण तो गप्पगार झाला होता. त्याला काही सुचत नव्हते. भिजल्याने थंडी वाजत होती. तो थरथरत होता. तो टाचा आपटत माजघरात कपडे बदलण्यास गेला. इतक्यात त्याचे आईवडील शेतावरुन आले. आल्याबरोबर हातपाय धुतले. व पार्वती धारला गेली. तर शिवानंद टेकून भिंतीला बसला. त्याने वज्रेचा हिरमुसला चेहरा पाहिला. व तो आपल्या आईला म्हणाला, “ ही अशी का बसलीय येथे.” तेव्हा वज्रा म्हणाली, “ व्यंकू मला चिडवतो.” तेव्हा शिवानंद म्हणाला, “ त्याचे घर उन्हात बांधू. देवाजवळ सांजवात लाव जा.” तेव्हा आज्जी म्हणाली, “ त्या व्यंकूला सांग देवाजवळ सांजवात लावायला. आताच वज्रीन अंघोळ घातली तेला व शुद्ध केला.” इतक्यात व्यंकू बोलला, “ आजी मला सांगायची गरज नाही. मी दिवा लावलाय व शुभंकरोती पण म्हणतोय. त्या मांजरीला म्हणावं ओणव शाळेत उभारून पाय दुखायचे बंद झाले असतील तर ये म्हणावं शुभंकरोती म्हणायला.” शिवानंदाने वज्रेला शुभंकरोती म्हणायला पाठीवले. ती दोघे भावंडे छान पद्मासनात बसून शुभंकरोती म्हणू लागले. इकडे धारला निघालेल्या पारुला म्हातारी चहा घेऊन जा असे म्हणाली. पण धारला वेळ झाल्याने ती नंतर घेते अस म्हणाली. व ती धारला गेली. थोडया वेळाने शुभंकरोती म्हणून आलेल्या मुलांना म्हातारीनं चहा दिला तसच शिवानंदाला सुध्दा दिला. तो लागवड ठेवाय म्हसीला गेला. काही वेळाने पारू धार काढून आली. तिने चहा घेतला. व ती स्वयंपाकाला लागली. म्हातारी व दोघी भांगलनीच्या गप्पात जेवण तयार करु लागल्या. थोड्या वेळानं व्यंकू दूध घालायला ढेरीला गेला. वज्रा अभ्यासाला बसली. थोड्या वेळानं व्यंकू दुध घालून आला. तो ही अभ्यासाला बसला. अंधार पडू लागला होता त्याने वज्रेस शिक्षा का केली होती असे विचारले. तेव्हा ती म्हणाली, “ तू नको त्या चौकशा करु नको. तुझा तू अभ्यास कर.” असे म्हणताच तो अभ्यास करू लागला . इकडे शांता घरी आल्यापासून तिचे घरातच नव्हे तर अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नव्हते. डोळ्या समोर वज्रेची सोज्वळ मुर्ती दिसत होती. व मनामध्ये आपल्यामुळे तिला शिक्षा झाल्याची खंत जाणवत होती. तिला समजावयाचे कसे हाच प्रश्न तिला पडला होता. संपूर्ण रात्रभर ती अंथरुणावर लोळत होती. कारण तिची जिवलग मैत्रीण तिच्यावर प्रथमच रागावली होती. तिच्या पासून तुटक राहण तिला जमणार नव्हत. सकाळ झाली. पहाते जर डोळा लागला होता. चिमण्यांची चिवचिवाटाने तिला जाग आली तिन आपले आवरले. व ती परसात गेली. तेथून पुढे जवळच शिंद्यांचे परडे होते. त्यांच्या परड्यात मोगर्याची वेल होती. ती वेल कसली चांगली जाळीच होती. शिंद्यांच्या परड्यात अनेक झाड, फणस, आंबा, जांभूळ यांनी भरलेली. फुलांच्या झाडांची तर पर्वणीच असायची. शांती फुले काढायला गेली. तिनेने आपल्या पलकराचा ओठा केला. व ती फुले काढणार इतक्यात तिला वज्रेची आठवण झाली. चोरून काढलेली फुले तिला आवडणार नाहीत. तेव्हा विचारून फुले काढल्यास त्याचा गजरा आपण वज्रेस दिला तर ती बोलेल या विचाराने ती शिंद्यांच्या घरात गेली. शिंद्याची हौसा धार काढत होती. वाटोळ्या शिंगाची म्हस बकाबक सुग्रासचे तोब्रे मारत होती. हौसेने मसरी लावली होती. कोल्हापूर सोलापूर करत पिचकारी मसरीची ती मारत होती. तिलां म्हणाली, “ पिचकारी जपून मार. दुधात जाईल.”

अचानक आलेल्या हाळीने हौसेने मागे पाहिले तिला शांती दिसली. तिच्या मनात आले सकाळच्या रामाधर्माच्या पाळी ही का आली असेल. दामूअण्णान तर लावुन दिली नसेल उसन पैसे आणायला. मालक पण घरात नाहीत. तरी पण तिन विचारलं.

“ शांते सकाळी सकाळी बरी उगवलीस ग.”

शांतीन तिच्या कपाळावरील आट्या पाहून ओळखले. ती तिला म्हणाली, “ बाबांनी नाही पाठवलं. मी आलते थोडी फुले हवी होती. घेऊ का?”


हे ऐकताच हौसेच्या जीवात जीव आला.  ती म्हणाली, “ एवढंच होय घे जा की, त्यात काय विचारायचं अंथरूण होतंय रोज.”  ती निघाली. तिच्या पायातील पैंजण छुम छुम वाजत होते. खाटेवर झोपलेला हौसेचा मुलगा म्हणाला, “ कोण आहे?”

 शांती म्हणाली, “ मी वेलणकरांची शांता  थोडी फुले हवी होती.”

तो म्हणाला, “ मग घे जा की पण जरा जपून सकाळच्या पारी सपाकिरड्याच भ्या, दुसरं काय.”

त्याच बोलण एकतच ती परड्यात गेली. फुले काढताना तिच्या मनात आले.  'परवा साकरीने फुले काढली तेव्हा हिच हौसा व गण्या तिला मारायला धावली होती. मला कशी गोगलगाईसारखी बोलती.’ हा विचार करत तिने फुले काढली. फुले घेऊन ती घरच्या दिशेने गेली. जाताना तिला साक्रीने खालेला मार आठवला. नंतर तिच्या लक्षात आले की हौसेचा नव्हरा आपल्या अण्णा कडून उसने पैसे घेऊन गेलाय. म्हणूनच म्हातारी मांजरी सारखी होती. नाहीतर या चार फुलांसाठी म्हातारीनं फाडून खाल्ली असती. सोडा तो विषय  आपल्याला फुले मिळाली याचा छान गजरा करू. व वज्रेला खुश करू. बघू बामणाच्या बेडकीची हवा किती उशीर राहते ती व थोडासा गजरा साक्री करता व माझ्यासाठी पण करते.

शांती  घरी आली. व सुईदोरा घेऊन गजरा विनू लागली. ते सुंदराने पाहिले ती म्हणाली, “ आज काय शिंद्यांच्या परड्यावर धाड टाकली वाटत. ती हौसा भांडत आली. म्हणजे बापालाच पुढे करते. स्वतच्या परड्यात अबोलीची फुले असताना ती नकोत. व दुसऱ्याच्या परड्यातली हवी. मी केलेला गजरा घालताना तुझ्याकडे वेळ नसतो. व आज अचानक फुले आणून गजरा विणतेस काय माळीन व्हायचा बेत तर नाही ना.”

आईचे टोचून बोलणे तिला लागले. ती म्हणाली, “ चोरून बिरून आणायला नाहीत मागून आणलेत. व परड्यात अबोलीला बहर संपलाय.”

सुंदरा, “ हो का विचारू काकूंना.”

तेव्हा शांता बोलली, “ बोलावून आणू का? उगाच शंका नको.”

 सुंदरा म्हणाली, “ नको मी विचारेन. व ती आपल्या कामाला लागली.”

शांतीने तिन गजरे विणले. व त्यातील एक घेऊन ती वज्रेच्या घरी गेली. वज्रा आपले काम आटोपुन गजरा विनत होती. व साक्री तिला मदत करत होती. ते पाहिल्यावर तिला काहीच सुचेना. ती तडक तिथं आली. व आपल्या हातातील गजरा दाखवत म्हणाली, “  हा घे मी तुझ्यासाठी विणलाय.” तेव्हा तोंड फिरवत वज्रा म्हणाली, “ मी गुंफलाय मला,  नको तो, तूच घाल. कुणाच्या तरी वेलीवर धाड टाकून आणली असतील फुले ती.  त्यापेक्षा न घातलेलाच बरा.” शांतीला वज्रेच बोलण जिव्हारी लागत होत,  मात्र ती शांतपणे म्हणाली, “ महादेवा शपथ,  मी फुले चोरून नाही आणली. मागून आणल्यात. विचार वाटल्यास शिंदे काकूंना.”

वज्रा म्हणाली, “ माझा तुझ्यावर विश्वास नाही. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल. पण तू सुधारणार नाहीस. मला तुझ्याशी काही बोलायचे नाही. असं म्हणून ती आत मध्ये उठून गेली. शांतीला कससच वाटल. पण या सर्वांमुळे साकरीला धक्काच बसला. कारण या दोघींची अतूट मैत्री सर्व मुलाना माहीत होती. त्या दोघींचे स्वभाव भिन्न मात्र त्यांची मैत्री घनिष्ट होती. वज्राचे बोल ऐकूण शांतीच्या हातचे बळच निघून गेलं. तिच्या हातातील गजरा गळून पडला.  ती रडवेली झाली. व नाराज होऊन निघून गेली. वज्रेच वागणं साकरीला खटकत होत. वज्रा आत गेल्यावर ती तिच्या मागे गेली. तेव्हा तिला वज्रा परसात बावीजवळ असणाऱ्या रामफळीखाली बसली होती. तिचे डोळे पाणावले होते. तिला पाहताच साकरी म्हणाली, “ का ग असं तू शांतीला बोललेल मला नाही आवडलं.”

वज्रा म्हणाली, “ तिने तिचा स्वभाव बदलावा म्हणून बोलले.”

साकरी म्हणाली, “ काय वाईट आहे ग ती.”

 वज्रा बोलली, “ ती मुलांशी भांडते. तिच्यामुळे तिच्या आईला व मला लोकांची बोलणी खावी लागतात. ती सुधारावी म्हणून बोललो. मुलीच्या जातीन वेळूसारखं असावं. वेळ येईल तस वाकाव. वादळात मोठी झाडे उन्मळून पडतात. वेळू टिकतात. ही तर कायम सगळ्यांपुढे नागणी वाणी फणा काढून असते. ती सुदरावी म्हणून बोलले.”

“ आज मी तिला शिंद्यांच्या मोग्ऱ्याची फुले काढताना पहिली. ही मला खुश कराय बघणार हे मी जानल. म्हणून मी तुला बोलवून हा घाट घातला. कारण मला तिला तोंडघशी पाडायचे होते.”

तेव्हा साकरी बोलली, “ तू काय करायला गेलतीस तिकडे.”

वज्रा बोलली, “ आईला अळवाचे वडे करायचे होते. म्हणून मी सगुनाताईंच्या परड्यात गेले होते. तेव्हा या बयेला फुले तोडताना पाहिलं.”

साकरी म्हणाली, “कल्याण आहे बुवा तुझ. विद्वान पंडितच आहेस की. तुमच्या भांडणात मला ओढलास. काय वाटलं असेल तिला? व एवढी काही ती वाईट नाही ह. व माणसानं वेळेनुसार झाड पणं झाल पाहिजे. वेळूसारख सदा नी कदा वाकू नये.”

वज्रा म्हणाली, “ तिला काय वाटायचे ते वाटू देत. तुझ अवर जा आपण शाळेला जाऊ.”

साकरी म्हणाली, “ मलापण जायला हवं. आबांच्या दुकानातून तंबाखूची पुडी व सुपारी आणायची आहे. बर निघते.”

असे बोलून ती निघून गेली.

क्रमशः पुढे……


शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ३

 जानबाची फजिती व शांता व वज्रेला शिक्षा

लेखक : निशिकांत हारुगले

सकाळ झाली. शांतीला जाग आली. तिने डोळे चोळत पाहिले. तेव्हा ती घरी असल्याचे जाणवले. तिला वज्राच्या घरून इकडे आणलं आहे. हे तिला जाणवलं. कालचा राग होताच. तिला उठलेलं पाहून तिची आई तिला म्हणाली, “ झाली झोप उठ व दात घास इसवान काढते. अंघोळ कर.”

शांती बोलली, “ मला नाही करायची.”

तेव्हा तिची आई म्हणाली, “ अजून राग गेला नाही वाटत. बाईसाहेबांचा.”

तस तिन उठून अंथरूण काढलं. व ती दातून घेऊन ब्रश करायला न्हाणीघरात गेली. तिथल्या चुलीवरल्या हंड्यात पाणी चांगलच तापलं होत. तीने दात घासातच पाणी बादलीत काढल. व ती अंघोळ करायला गेली. तीने दात घासले. व अंघोळीच इस्वान काढल. ती अंघोळ करतेय पाहून तिची आई तिच्या पाठीला साबण लावायला आली. आज सोमवार होता. ती डोक्यावरून अंघोळ करत होती. तिने सर्व केस सोडले होते. आईने स्पर्श करताच तिने तिचा हात झिडकारला. व म्हणाली, “ माझी मला येते अंघोळ करायला. व आईच्या हातचा तांब्या तिन काढून घेतला. मुलीच्या अंगावरल्या माराचे वळ पाहून तसेच शांतीचे कडवे बोल ऐकून तिला वाईट वाटले. ती ओल्या डोळ्यांनी आतमध्ये आली. इकडे शांतेनं अंघोळ आटोपली. वज्रा तिला बोलावय आली. पेठच्या बाहेर महादेवाचं देऊळ होत. त्या शिवारातील भात खाचरात ते शोभुन ते प्राचीन मंदिर दिसत होते. त्या दोघींना शिनभक्ती आवडायची. वज्रीनं तामनातून पूजेचं साहित्य आणलं होत. शांतिन त्यात साळी, गंध, फूले व साखर मिसळली. व त्या दोघी निघाल्या. वाटेत लागणाऱ्या झुळूझुळू ओढ्याच्या पात्रातील कातळ दगडावर वज्रीन तामन ठेवले. व दोघींनी आपले पाय धुतले. इतक्यात तिथे सदू पाटील म्हस धुवाय आला होता. ती म्हस त्यां दोघींकडे डोळे वटारून पहात होती. ते पाहून वज्रा घाबरली ती शंतिला म्हणाली,

“ ती म्हस बघ कशी बघतेय. मारायलाच येईल अस वाटतय.”

शांती म्हणाली, “ घरात म्हसी असताना घाबरतीस कसली. आली तर मारायचा दगड. जाईल पळून. लई नखरे केलं तर बाजारच दाखवायचा.”

तेव्हा सदू म्हणाला, “ बाजार दाखवायला फुकट नाही आणली.”

इतक्यात ती म्हस मारायला त्या दोघींकडे धावली. तेव्हा शांतीने एक दगड मारताच घाबरली व कोंडिकडे गेली.”

वज्रा, “ काय मामा मारली असती नव्ह.बांधून आणता येत नाही.”

सदुमा, “ तशी मारत नाही. फक्त धावती नुसती अंगावर.”

तेव्हा शांती म्हणाली, “ हो का धावते व शिंग अंगाला लावते म्हण की म्हाताऱ्या, म्हणूनच सून गोठ्यात झोपवती तुला बेवड्या जा धू जा तिला.”

वज्रा, “ शांते मोठ्या माणसांना अस बोलू नये.”

शांती, “ चल गप घे ते तामण . तस वज्रीन तामण घेतल व त्या पुढे गेल्या. पुढे त्यांनी बेलाच्या झाडाची पाने व काही अनंताची फुले घेतली. व त्या पुढे निघाल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुललेली फुलझाडे व शिवारी वाऱ्यावर डोलणारे ऊस मन प्रसन्न करत होते. कोकिळेच कुजन ऐकू येत होतं. मंदिराकडे जाणाऱ्या त्या वाटेवर सुखद गारवा मिळत होता. देवाला गेलेली माणसं परत चालली होती. वाटेत त्यांना ज्ञानदेव पाटलाची साक्री भेटली. वज्रा तिला म्हणाली, “ आम्हाला चुकवून आलीस व्हय.”

तेव्हा साक्री त्यांना म्हणाली, “घरात मरणाचं काम हाय. आई आजारी हाय. व बाबा शेताला गेल्यात. भगाटल्या पासून शेणा पासून ते स्वयंपाकापर्यंत मलाच पाहावं लागत. येताना तुमच्या घरात हाक मारली. तेव्हा तू अंघोळ कराय गेल्याचं समजल. व शांतीच्या घरातील पराक्रम माहीत झाला म्हणून तिकडे गेलो नाही. शांता कशी आहेस. आईने लई मारलं म्हण.”

शांती म्हणाली, “ तुला ग कोणी सांगितल.”

साक्री म्हणाली, “ रात्री जान्या म्हणाला.”

हे ऐकताच शांती चिडून म्हणाली, “तूझ्यापर्यंत बातमी पोहोचली म्हणायची तर. त्या जान्याला म्हणावं शाळा सोड व गावची पोस्टमनकी करत फिर जा. तू आता जा. तुला घरी कामे असतील.”

तिच्या डोक्यात आता महादेवाऐवजी जान्याचा विषय घोळायला लागला. त्याला कसा धडा शिकवायचा हाच विचार करू लागली. वज्रा तिला म्हणाली, “ झाल गेलं विसर.”

शांति, “तुला काय जातंय बोलायला मार मला बसलाय.”

त्या दोघी मंदिर परिसरात पोहोचल्या. तेथील आवारातील अंधार बावीजवळून त्या पुढे आल्या. तेथील जुनी व मोठी झाड अरण्यागत होती. रात्रीच तिथं कोणी जात नसे. हिंस्र स्वापद तसेच सापांचा तिथे वावर असे. त्या दोघी देवळात गेल्या देव दर्शन घेतलं. पूजा केली. गणू पुजाऱ्याकडून तीर्थ घेतल. मंदिराच्या भोवती अर्ध प्रदक्षिणा घालून त्या घरी निघाल्या. वाटेत वज्रा तिला म्हणाली, “ आज शाळेला येणार ना.”

शांती उत्तरली, “ न येऊन कसं चालेल. आज तर माझं महत्त्वाचं काम आहे.”

“ कोणत महत्त्वाचं काम?”

“ कळेलच तुला.” ती हसली. व त्या दोघी घरी परतल्या. घरात आल्यावर आई शांतीला म्हणाली, “शाळेची वेळ झालीय. जेवून घे.”

शांती, “ नको मला भूक नाहीये.”

“ का, बाजारी वड्यानी पोट भरले वाटतं. नखर नकोत गुमान जेव. व जा शाळेला. करणी तुझी व बोल मला. कालचं सट्ट कमी पडलं वाटत.” आई करड्या आवाजात बोलली.

तेव्हा शांतीन शस्त्र खाली ठेवणं पसंत केलं. व गपचुप जेवून तिने आपले आटोपले. व दप्तर घेऊन ती वज्राच्या घरी आली. वज्रा तयारच होती. त्या दोघी एकत्र शाळेत गेल्या. शाळेत मैत्रिणीत गप्पा रंगल्या. थोड्या वेळानं प्रार्थनेची बेल झाली. प्रार्थना झाली. प्रार्थनेच्या वेळी तसेच वर्गात सुद्धा शांतीच लक्ष नव्हते. बाराची छोटी बेल झाली. शाळेजवळील बोळात जान्या गेल्याच लक्षात येताच शांती पाठोपाठ गेली. व तिने त्याला बडवायला सुरुवात केली. जान्या मोठ्याने ओरडायलाला लागला. तस त्याच्या तोंडात रुमाल कोंबला. तस तिन दोन चार लाथा पण हाणल्या तिची दोन चार काकन पण फुटली. त्याची तमा न बाळगता तिन त्याला लई चोपला.. खिडमिड असल्याने तिच्यापुढे तो टिकला नाही. तो खूप घाबरला व भेदरला. मन शांत झाल्यावर ती तेथून बाहेर आली. व मुलींच्या घोळक्यात सामील झाली. वज्रा तिला शोधत होती. ती तिला भेटल्यावर म्हणाली, “कूठे होतीस मगाठावण उडकतोय.”

“ गेले होते उसने घेतलेले पैसे फेडायला. व्याजासकट परत.”

तिचे ते कोड्यातील बोलणे वज्रेला समजले नाही. इतक्यात बेल झाली. मुले वर्गात गेली. जानबा पण आला. त्याचा अवतार व फाटलेला खिसा व हाता पायावरले वळ बघून मुले हसायला लागली. वज्रा समजून गेली ही बया कुणाचे उट्टे व उसने फेडाय गेली होती. गुरुजी ऑफीस मधून वर्गात आले. मुले शांत झाली. त्यांनी वर्गातून नजर फिरवली. त्याना एका कोपऱ्यात भेदरलेल्या अवस्थेत रडणारा जानबा दिसला. गुरुजींनी आपल्या जवळ बोलावून त्यास विचारले. पण तो काहीच बोलला नाही. त्याला शांतीचे शब्द आठवले. ‘जर यातील काय बी गुरुजींना सांगितलस तर वटाडाच्या विहिरीत ढकलून देईन.’ त्याची नजर मात्र शांतीकडे होती. गुरुजी समजायचे ते समजले. त्यांनी त्याला जागेवर बसायला सांगितले. व शांता व वज्रा दोघींना उठवून दोघींना सहा सहा छड्या दिल्या व वर्गाबाहेर अंगठे धरून उभा रहायला सांगितले. हे सर्व व्यंकूने पाहिले. चांगले तासभर अंगठे धरल्यावर त्या दोघींना वर्गात घेतले. वज्रा निमूटपणे एक शब्द न काढता. आपल्या जागेवर जाऊन बसली. पहिल्यांदाच तिला शांतेची संगत नडली होती. मराठीच्या पुस्तकातील ‘कोरड्या सवे ओले जळते' या म्हणीची प्रचिती तिला आली होती. दुपारची सुट्टी झाली. वज्रेन शांतपणे आपला डबा व्हरांड्यात एका कोपऱ्यात बसून खाल्ला. तो खाताना शांती कोरट्याची चटणी देण्यास आली. मात्र तिने ती नाकारली. इकडे हुशार वज्रेला शिक्षा केल्याची खंत गुरुजींना वाटत होती. त्यांनी शाळा सुटन्या अगोदर एका मुलाला वज्रेस स्टाफरूम मध्ये बोलावले. वज्रा घाबरली कशाला बोलावले असेल. ती दबक्या पावलाने स्टाफरूम गेली. वज्राच्या मागे आलेल्या मुलांना गुरुजींनी वर्गात जायला सांगितले. मुले निघून गेली. शांती मात्र दाराच्या मागे उभा राहिली. गुरुजींनी तिला ओरडताच ती नाईलाजाने वर्गात गेली. वज्रा स्टाफरूममध्ये आली. गुरुजींनी तिला बाकावर बसायला सांगीतले. तिला रडू कोसळले. गुरुजी तिला म्हणाले, “ तू हुशार मुलगी आहेस व शांतीपण, पण तू अभ्यास करतेस, मात्र त्या शांतीची हुशारी मारामारी पासून भांडण तंट्यापर्यंत आहे. तू वर्गात प्रथम येतेस. मात्र या शांतेच्या सहवासामुळे तुझे नुकसान होते. तू तिचा सहवास सोड व तुझा मार्ग बदल. ती आग व तू पाणी तुम्हा दोघींचं पटतच कस. यावर विचार कर व निर्णय घे. कारण सहामाही परीक्षेत तुला मार्क कमी भेटले. ते या बयेच्या नादाने. आता डोळे पूस, अन् जा वर्गात. वज्रा तेथून डोळे पुसत बाहेर आली. व वर्गात गेली. आपले दप्तर नीट केले. इतक्यात शाळा सुटली. मुले वर्गाबाहेर पडली. वज्रा निमूटपणे घरी चालली. शांतीन तिचा हात धरला. पण तिने तो झिडकारला. व ती घरला निघाली.

क्रमशः पुढे…


रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची २

 भातुकलीचा खेळ

लेखक : निशिकांत हारुगले


हळूहळू दिवस सरू लागले. बघता बघता मुले मोठी होऊ लागली. तसा लुटूपुटू भातुकलीचा खेळ रंगू लागला. शांता व वज्रा या जिवलग मैत्रिणी, दोघींचे स्वभाव मात्र भिन्न होते. वज्रीच्या परसबागेत भल मोठ आंब्याचं झाड होत. आंब्याशेजारी ओसरी होती. तिथे पांढ-या शाडूच्या मातीच्या भिंतीशी मुले जेवणापाणी म्हणजे भातुकली खेळत होती. प्रत्येक मुलाने काही ना काही आणले होतें. वज्रेन गुळ आणला होता. पाटलाच्या सुरेखान भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. पण शांतेन काहीच आणल नव्हत. वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. व आई बाजाराला गेली होती. वज्राची आई ही गेली होती. त्यामुळे खेळायला आडवणारे कोणी नव्हते. वज्रेची आज्जी शेजारच्या बायकांशी गप्पा मारत होती. शांतीस मात्र वाईट वाटत होत. तिला आपण ही काहीतरी आणावे असे वाटत होत. तिच्यातील नेतृत्व गाजवयची वृत्ती तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिला शंकरआबाच्या परड्यातील चिंचेचं झाड आठवलं. त्या चिंचेच्या चिंचा खूप गोड असत. लहान तसेच मोठ्या मुलींना त्या खूप आवडत. मुली कधी मागून तर कधी चोरून आणत. वज्रा कधी चोरत नसे ती मागून घेई. शांती मात्र तिच्या उलट वागे मागून भीक मागणे तिला पसंत नव्हते. त्या पेक्षा चोरून आणलेले बरे हे तिचे ठाम मत होते. ती आले, असे सांगून ती तेथून घरला आली. घराला भलं मोठ कुलूप. बाबा बाहेर गावाला सोन्याच्या वसुलीला गेले होते. तितक्यात तिचे लक्ष शंकर आबाच्या परड्यातील चींचेच्या शेंड्याकडे गेलं. शेंड्याला लोंबणाऱ्या चिंचा तिला खूणावत होत्या. ती तडक तिथून शेजारील विलास अण्णांच्या घरात शिरली. व परसदारी निघाली. तेव्हा तिला बायक्का पाटलिन म्हणाली. “ काय कराय निघालीस ग शांते.”

शांता, “ काम आहे परड्यात जरा. ती तडक मागल्या सोप्यात आली. तिथं औतासन आणलेली बैलं बांधली होती. ती रवंथ करत होती. शेजारी पंढरपुरी – सांगोला म्हैस उभी होती. जवळच चारपाई पलंगावर औतासन येऊन विलासअण्णा झोपलेला होता. चांगला डाराडूर पडला होता. शांतेला पाहताच त्या म्हशीन शिंग हलवली. व ती वैरणीसाठी रेकू लागली. शांती तिला बघून बोलली, “ माझ्याकडे काय मागतीस तिथं झोपलेल्या मालकाला उठव जा हलवून. कसा बैलोबा झोपलाय बघ.” शांती परसदारी आली. पाटलिनीच्या परड्यात रामफळ, लिंबू, पेरू अशी कितीतरी झाडे होती. तेथून पुढे पायवाटेने गेल्यावर शेणाची गार ओलांडल्यावर शंकर आबाच्या परड्यात ती पोहोचली. शंकर आबाच्या परड्याचे दार बंद होते. ती तडक चिंचेकडे गेली. खारुताई सारखी झाडावर झपझप चढली. तिने पटापटा चिंचा काढल्या काही ओठयात काही खिशात व उरलेल्या तोंडात धरुन ती खाली उतरली. . तेंव्हा तिला जाधवांच्या जानबानं पाहिलं. व तो तिला म्हणाला,

“ मी सांगणार शंकरआबाला.”

शांता,

“ सांग जा, मी भित नाही कुणाच्या बापाला. जा चोमड्या.”

व ती तेथून तडक मुले खेळतात तिथे आली. तिच्याकडल्या चिंचा पाहून वज्रा तिला म्हणाली, “ काय डाका टाकून आलीस वाटतं.”

“ हो, तू चिंचा खा उगाच झाड मोजू नकोस.”

“ तुझ्या या धाडीत आम्ही पण भरडले गेलो नाही म्हणजे झालं.”

“ काही झाल तरी मी निस्तरेन . तू नको काळजी करू. व उगाच खेळताना भांडण उकरून काढू नकोस.”

सर्वजण खेळात रमून गेले.संध्याकाळ होत आलेली त्यांना कळलंच नाही. बाजाराला गेलेली वज्रा व शांतीची आई परतल्या होत्या. चलून आल्याने त्या खूप दमल्या होता. थोडी विश्रांती घेऊन त्या लगेच घरकामाला लागल्या. इतक्यात शंकर आबा वटवट करत शांताच्या घरी आला. बरोबर जानबापण होता. त्याने फूनगी टाकून आग लावायचे काम चांगलेच केले होते. शंकरआबा सुंदरा काकूंना म्हणाला,

“ तुझ्या लाडक्या बयेन माझ्या झाडाच्या चिंचा काढल्या. चींच उतरली. तो जास्तच तणतणत होता तेव्हा सुंदरान त्याच्या हातावर रुपये टेकवले. व त्याला परत पाठवले. दामाजीपंत खूप थकल्याने ते काही बोलले नाहीत. संध्याकाळ झाली. मुलांनी डाव मोडला. व घरी निघाली. वज्रेन आपली खेळणी परसात ठेवली. व आईला मदत करायला स्वयंपाक घरात गेली. वज्रेच्या आईन गुळाचा चहा चुलीवर ठेवला. व बाजारातील आणलेला वडा व्यंकू व वज्रेला वाटून दिला. व्यंकूस चहा पाहायला सांगून ती शेण काढायला गोठ्यात गेली. इकडे वज्रेन सगळ घर, आंगण झाडून काढलं. व ती परसदारी आली. परसदारातील विहिरीचे पाणी दोघा भावंडांनी काढले. व हातपाय धुवून दोन्ही भावंडे शुभंकरोती म्हणायला देवखोलित आले. व दिवा लावून शुभंकरोती म्हणू लागले. शांता घरी गेली. वज्रेच्या घरापासून आठ दहा पावलावर शांतीच घर होत. अन् घराच्या अंगणात यायला तिच्या कानावर आई आणि बाबांचे बोलणे ऐकू आले. ती बोलत होती. “तुमच्या लाडाने ही पोरगी बिघडत चालली आहे. बाप जन्मात कधी कुणाच्या वल्या पातोऱ्यावर मी पाय ठेवला नाही. का कुठली चोरी लबाडी केली नाही. अन् कुठून ही अंबाबाई पदरात पडली नुसती.घरात येऊ देत नाही तिला आज धडा शिकवला तर नावाची सुंदरा नाही.” असे बोलून ती आत चालली. तेव्हा दामाजीपंत म्हणाले., “ काढल्या असतील पोरीन दोन चार चिंचा याबद्दल त्या शंकर्यान कशाला गाव पेटवायचं एवढं. त्याला पैसे दिलेस ना. गप्प बस आता.”

अस बोलून राम कृष्ण हरी असं म्हणत ते पलंगावर बसले.

सुंदरा म्हणाली, “ हे सगळं तुमची फूस असल्यानं झालंय. येऊ देत गाव हिंडून टवळी दाखवते.” असे बोलून ती स्वयंपाक घरात गेली.

आई आत गेल्याचे पाहताच शांता हळूच घरात आली. दामाजीपंतानी तिला माडीवर जाण्यास सांगीतले. ती वर गेली. नंतर त्यांनी पाठीमागून येऊन तिला बाजारातून आणलेला खाऊ दिला. व तिथेच गप्प बसून खाण्यास सांगितले. व खाली येऊ नकोस. व ते खाली आले. गच्चीवरल्या सोप्यात शांतेन पुडी उगडली. व त्यातील वडा खाऊ लागली. शांतीने बघता बघता त्या वड्यावर हात साफ करून कागद परकराच्या खिशात घातला. गचका लागला तरी तिनं तो आवरला व ती हळूच खाली येऊ लागली. पण घरातील मांजर तिच्या पायात घुटमळू लागले. ते तिचे लाडके होते. पण आता यावेळी तिला त्याचा भरपूर राग आला होता. कारण आई मारेल याची भीती वाटत होती. ते शेवटी कलमडलेच. ती त्याला जिना उतरताना पायात आले म्हणून लाथेने बाजूला सारू लागली. व शेवटी रागाने ढकलले. त्यावेळी आई काही कामानिमित्त बाहेरील खोलीत आली होती. दामाजीपंत पोथी वाचत बसले होते. जसा कावळा बसावा अन ढांपी मोडावी. तस झाल. अन् शांतीने फेकलेले ते मांजर आईच्या पायात पडले. आईची नजर वर गेली शांती जिन्यावर दिसली. अनायासे जाळ्यात सापडली. आईने तिच्या वेणीला हात घातला. तशी ती ओरडली. दामजीपंत पोथी अर्ध्यात ठेऊन उठत्याले पाहून सुंदरा म्हणाली,

“ माझ्या व शांतीच्यामधी पडलात तर माझं मडं बघशिला. व शांतीची शपथ आहे तुम्हाला.”

तीनं तिला फरफटत आत नेली. व तट्टयाच्या कोपऱ्यातील काठी घेऊन चांगलीच बदडली. शांती ओरडू लागली.

“ आई ग मेलो मेलो, बाबा वाचव रे.”

पण सुंदरा कुठली ऐकते. दामाजी केविलवाणे होऊन पाहत होता.

शांती चिडून बोलली,

“ काठीण मारण्यापेक्षा नख लाव घाट्याला माझ्या. व टाक ठार मारून.”

सुंदरा म्हणाली, “ वेळ आली तर तेही करेन समजल काय.”

“अशा गुणांनी मिर्या वाटशील डोक्यावर. काय गरज होती त्या भाडखाऊच्या चिंचेच्या चिंचा काढायची. व त्या ही चोरून आजून म्हातारी झाले नाही की मेले नाही मी. चोऱ्या करतेय. तुझ्या कारणाने बापजन्मात कधी ऐकल्या नाहीत अशा शिवा ऐकायची पाळी आणलीस माझ्यावर. देवा महादेव, असली कसली बया पदरात टाकलीस माझ्या.” असं बडबडत तिन तिला माराय सुरुवात केली. इतक्यात बाजारातून आणलेली तंबाखूची पुडी व गूळ जो वज्रेरेच्या आईच्या पिशवीत ठेवला होता तो द्यायला वज्रा शांतीच्या घरी आली होती.

शांताला मारताना पाहून वज्रा वर डोंगरच कोसळला. आणलेले साहित्य दामाजीपंताकडे देऊन ती शांताकडे धावली. व तिला मिठी मारली. तिच्या आईच्या हातची काठी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तशा तिलाही दोन चार प्रसाद रूपाने मिळाल्या. वज्रीला लागताच शांतीच्या आईने आटोपते घेतले. तिच्या डोळ्यातून पाणी गळत होते. दामाजी केविलवाण्या नजरेने पहात होते. वज्रा शांतेला घेऊन आपल्या घरला निघाली. घरातून बाहेर पडल्यावर गल्लीत आल्यावर शांतीने आपले डोळे पुसले. व ती शंकरआण्णाच्या घरच्या दिशेनं निघाली. तिच्या मागून जात वज्रा तिला म्हणाली, “शांते नको जाऊस आता उगाच विजलेला विस्तव फुकून कशाला पेटवतेस.”

“तू गप्प बस वज्रे त्या शंकर्याची मस्तीच जिरवतो बघ.” शांता म्हणाली.

ती शंकर आण्णाच्या घरात शिरली. त्याची शेताहून आलेली बायको राधाबाई धारला बसली होती. शांता तडक परसदारी गेली. तिथं शंकर अण्णा वैरण कुठत बसला होता. त्याला पाहताच शांता चिडून म्हणाली,

“ काय रे म्हाताऱ्या, ओंजळभर चिंचा काढल्या असताना चिंच झाडली असं सांगत गेलास व्हय. तुझी पोरगी पाय घसरून ओट्यावरून पडली. तेव्हा तुझी पणजी आभाळातून रगत चंदनाची बाहुली घेऊन आली होती का? तेव्हा तुला कोणी मदत केली. मी, माझ्या घरातून चोरून लपवून आणून तुला दिली. तवा तुझी पोरगी चांगली झाली. व चार चिंचा पाई मला मार बसवलास. तुझ दांडक निखळल तुझ ते. थांब तुला दाखवतेच. माझ्या आईकडून पैसे घेऊन आलास व्हय भिकार्या पयल पैसे दे. नाहीतर तुझी धडगत नाही. माझा बाबा डोंगरकट्टा चालून धंदा करतोय. व पैसे कमावतो. त्याची कमाई तुला फुकट खायला देऊ काय. जर पैसे परत केले नाहीस तर तुझं व त्या तारीचं प्रकरण सगळ्या गावभर करीन. इतकं बोलताच शंकरच्या हातापायातील पाणी पळालं. त्याने कनवटीला गोपात अडकवलेला बटवा काढला. व शांतीच्या हातावर शंभर रुपये ठेवत हळूच म्हणाला,

“ तू तेवढी बाई गप्प बस. त्या जानबानं दोनीत चार घालून सांगीतले. म्हणून बाई म्या बोललो. तेवढी तू बाई शांत हो. उगाच माझी अब्रू घालवू नको.”

शांती परत निघाली. जाताना धार काढणाऱ्या राधाबाईन तिला विचारलं, “ का ग अशी नागिनीवाणी आली होतीस.”

शांता,

“ तुझा मालक आला होता काडी टाकून त्याला आलते डसायला.” त्या जान्याला उद्या बघून घेते.

“ अग, चिंचा काढल्यास त्या काढल्यास. व उलट आम्हालाच बोलातीस. आत काय म्हणालीस मालकाला मला नीट ऐकायला आलं नाही.”

तेव्हा शांता म्हणाली,

“ धार काढतीस काय नको ते उद्योग कर्तीस. व एवढं चिंचेचं झाड माझं माझं म्हणतीस. काय माहेरासन आणली होतीस काय हुंड्यात आंदण म्हणून लावणारा गेला मरून तू नको दाखवू तुझा टेंभा.”

राधाबाई,

“ बोलणारा राहिला बाजूला व तू मला गरीब गाईला बोलतेस होय.”

शांता म्हणाली, “ मग जरा गरीब गाईने आपली पांगिर पाटीची शिंगे दाखवावित. व नव्हऱ्याला ताब्यात ठेवावं.”

तेव्हा राधाबाई म्हणाली, “ शांता अजून लई ध्याड बघायचे आहेत तुला. डोईवर अक्षता पडल्या की कळलं तुला.”

तिचं ते बोलण शांतीला चांगलच लागल. तिला आपणं उगाच राधाबाईला बोलल्याचे वाईट वाटले. ती बाहेर पडली. वज्रा दारात आली होती. तिनं ते ऐकलं होत. थोड पुढे गेल्यावर ती शांतील म्हणाली, “मोठ्या माणसाला असं बोलू नये.”

शांता म्हणाली, “ मी राधाबाईला बोलले त्याच मला वाईट वाटत. पण त्या शंकर्याचं तंगड तोडाव असं वाटतं होत. राधा सारखी नाकासमोर चालणारी आपल काम भल व आपण भल अशी चांगली बायको असताना हा बाहेर शेण खात फिरतो.”

इतक्यात शांतेचा झगा कोणीतरी ओढत होत. तिन मग पाहिलं तर तिला पांडू दिसला. ती त्याला म्हणाली, “ काय रे काय पाहिजे तुला?”

तेव्हा ते पोरगं म्हणाल, “ तू मगाशी आमच्या काकांना दांडक निखळल म्हणालीस व काका घाबरले. मला ते दांडक कुठं मिळल ते सांग. म्हणजे मी ते दाखविन तेव्हा काका घाबरल. व मला मसराकड पाठवणार नाही.”

 तेव्हा शांता त्याला म्हणाली, “बाळा ते दांडक साध सुध नाही चांगल तिर्डीच दांडक आहे. ते तुला आता नाही कळायचं.”

त्या दोघी हसत वज्रेच्या घरी गेल्या. वज्रेच्या जोत्यावरील झूल्यावर बसून झोके घेऊ लागल्या. शांतीला बराच प्रसाद मिळाला होता. अंग दुखत होत; पण तिनं तसं काही दाखवलं नाही. पण वज्रेस रहावलं नाही. तिन शांतेच्या घरात घडलेला सगळा वृत्तांत आईला सांगितला. वज्रेच्या आईने शांतीच्या पाठीवर व पायावर पडलेले वळ पाहिले. व ती म्हणाली, “ सुंदरीला काहीच कळत नाही. कसं ढोराला बडवावेत तस बडवलय पोरीला.”

इतक्यात वज्रेची आजी तेथें आली व म्हणाली, “ पोटातल्या चिंचा पाठीवर आल्या जणू.”

वज्रा म्हणाली, “ तुला ग कसं कळालं?”

“ कसं म्हणजे मघाशी सदुवाण्याच्या दुकानाला वाणसामान आणायला गेले होते तेव्हा जान्या म्हणत होता. की शांतीला मारली तिच्या आईन.”

हे ऐकताच शांती चिडली. तिचा झोपलेला क्रोधाग्नी जागा झाला. ती दात ओठ खात म्हणाली, “ जान्या उद्या दाखवतो तुला शाळेत येच आता.”

इतक्यात पार्वती तेला व हळद वाटीतून घेऊन आली. तशी म्हातारी तिच्याकडून ती घेत म्हणाली, “ दे इकडे मी लावते. तू जा तुझ्या कामाला.”

व तिने शांतीला बोलावले ती जवळ गेली. म्हातारीनं तिच्या पाठीवरून हात फिरवला. व म्हणाली, “दामाजीला मुलं नव्हते तेव्हा त्याची अवस्था काय होती. अन् आता त्या फडतूस चिंचेसाठी पोरीला मारलं. त्या शंकर्याला बिगर राहायची नाही मी.” तेव्हा वज्रा म्हणाली, “ तू बोलायच्या आधीच सार झालंय. मॅडम सत्कार करून आल्यात.”

आजी आपल्या खरबरीत हातानी तेल लावत होती. त्या हातात शांतीला गोडवा जाणवत होता. आजीनं तेल लावल्यावर तिच्या व वज्रीच्या डोक्यावरून हात फिरवला. व म्हणाली, “ माझी वज्रा शांती दोन्ही कोंदणातली हिरकच जणू” तेल लावल्यावर आजी उठून वाटी ठेवायला आत गेली. रात्र चांगलीच झाली होती. वज्रेच्या आईने स्वयंपाक केला होता. तिने जेवायला बोलावले. शांतीस पण बोलावले. पण शांता म्हणाली, “ काकू तुम्ही जेवा.” तेव्हा वज्रेच्या आईने तिला आत घरात नेले व जेवणास वाढले. आज केळ्याच शिकरण व सुजीच्या पोळ्या केल्या होत्या. सर्व जेवलीत. वज्रा व शांता या बाहेरील पलंगावर पहुडल्या बघता बघता त्यांना झोप लागली. ते त्याना समजलच नाही.

खूप वेळ शांता घराबाहेर गेल्यानं व आपण तिला मारल्याची बोचणी शांताच्या आईला इंगळ्या डसल्यागत डसत होत्या. तिला राहवलं नाही. व तिने आपल्या नव्हर्यास. हाक मारली. व म्हणाली, “ जरा बघा की शांती किती उशीर झाला बाहेर गेली अजून परत आली नाही. मला बाई भीती वाटते.”

तेव्हा दामाजी पंत म्हणाले, “ मगाशी बडबडताना कुठे गेली होती तुझी भीती. जा आता शोध व आणजा. मला शपथ घालतेस. सुंदराला रडू आले . ती घराबाहेर पडली. ती हाक मारणार इतक्यात दामाजी तिला मागून म्हणाला, “ काळजी तुलाच फक्त दिली का? मगाशी मी पाहिलं ती शिवानंद बामनाच्या घरी आहे. काळजी नको. तुला काय वाटलं काळजी फक्त तुलाच आहे. जा. घेऊन ये जा.” ती म्हणाली, “स्वत:च्या नजरेनं पहिल्या शिवाय मला खात्री पटणार नाही. जेवणाची वेळ झाली आहे. मी जाते व तिला घेऊन येते.” ती घराबाहेर पडली व वज्रीच्या घरी आली. तिने वज्रा व शांतीला ऐकत्र मिठी मारून झोपलेल्या पाहिलं. तिला पाहून म्हातारी म्हणाली, “ त्या शंकर्याच्या चार चिंचा साठी पोरीला इतकं ढोरा सारख बडवलस तुझे हात कसे झडले नाहीत.”

 सुंदरा म्हणाली, “ काय सांगू काकू तो शंकर्या नाही नाहीये घालून पाडून बोलत होता आदी बाजारासन चालून आलताव त्यात त्याच बोलण या पोरीमुळे तो माझ्या कुळीचा उध्दार करायला निघाला. तेव्हा मला राग आला. म्हणून मी मारलं मला सहनच झालं नाही.”

शांतीला तिच्या आईनं सहज उचलून घेतले. व ती निघाली. इतक्यात पार्वती जेवणखोलितन आली. तीने दोन सुजीच्या पोळ्या सुंदरीच्या हातावर ठेवल्या. व शांती इथे जेवल्याचे सांगितले.

“ अक्कासाब तुमच्या सारखी मानसं आहेत म्हणून बर नाहीतर आम्हा सारख्यानी काय करायचं होत. जगाच्या या रहाटगाडग्यात कसा टिकाव लागला असता. भावकी ती तसली म्हणून इथे आलो. तर शेजारी पण बाद लागले. काहितरी भांडण आहेच. पण तुमच्यामुळे बराच आधार मिळाला.”

पार्वती म्हणाली, “ उगाच काय बाय बोलू नका. ती जेवलीय इकडे. काळजी नको.”

सुंदरा,

“ उगाच नाही योग्य तेच बोलते.”

अस बोलून ती घरी शांतीला घेऊन आली. आल्यावर तिला पलंगावर झोपवले. व तिने जेवणखोलित आली. नव्हर्याला जेवण वाढले. व पुन्हा शांती झोपल्या ठिकाणी आली. तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण शांती गाढ झोपली होती. एखादा हत्ती जरी चित्कारत गेला तरी उठणार नव्हती. मग ती जेवणखोलीत आली. नव्हऱ्या बरोबर जेवायला बसली. तो म्हणाला, “ ती शिवानंदाच्या घरी…,.”

सुंदरा म्हणाली, “ होय जेवली पण रहावलं नाही.”

दामजिपंत, “ बरं. जेव आता. मला उद्या दागिन्यांची ऑर्डर द्यायला जायचं आहे.” त्या दोघांनी आपले जेवण केले. सुंदराने आपली कामे आटोपली व ती ही झोपायला गेली.

……. …… ….. ….

क्रमशः 


शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची १)

 कथा वाकाटखोऱ्याची वेदगंगेकाठची

लेखक : निशिकांत हारुगले.

१) वज्रा व शांतीचा जन्म



वेदगंगेचं पाणी निथळून स्वच्छ दिसत होत. बंधार्यास फळ्या घातल्यामुळे नदीला चांगलाच तुंब चढला होता. दोन्ही दरडणा घासणारे पाणी निरव शांतता निर्माण करत होते. मात्र या शांततेत भंग पावण्यास सकाळीच सुरवात झाली होती. इंजिनाची बकबक चालू होती. शिवानंद बामण पाणी पाजण्यात मग्न होता. दिवस कलू लागल्याचे त्याला काहीच भान नव्हते. वाडीस लग्न लावायला गेलेला गणेशचंद्र भट शयनग्रामला निघाला होता. शिवानंदाला शिवारात पाहून कपाळावर अट्ट्या आणून तो बोलला.

“ शिवा तू इथ पाणी पाजतच बस. तिकडे तुझी बायको बाळंतपणाच्या वेण्णा देतेय व सिंच्या तू इथं खोडव काय भिजवतोयस. तुला लाज नाही वाटत. खोर टाक व जा बघू घरला. भटा बामनान होम हवन करावी, पूजा अर्चा करावी. श्राद्ध करावी. ते सोडून तू हे काय करतोयस. माझ्या सारखी भिक्षुकी केली असतीस. तर आज चांगला गोलगट्टम झाला असतास. तू पालाच काढून मरणार. जा आधी पहिला, अमावशेचा दिवस आहे. आशा वेळी पुरुषाने आपल्या स्त्री जवळ असावे. तेवढाच तिला आधार मिळतो.”

एवढं बोलून गणेशचंद्र भट पुढे मार्गस्थ झाला. शिवानंदान पाणी पाजायच खोरं जाळीत लपवले. तो इंजिनाकडे गेला. व त्याने इंजिन बंद केलं. डोक्यात दिवस भरलेल्या बायकोचे विचार. व डोळ्यासमोर तिची सोज्वळ मुर्ती दिसत होती. मातीची घागर घेऊन तो नदीकाठी आला. सूर्य पार अस्थाला चालला होता. मावळतीच्या किरनामुळे नदीचं पाणी चकाकत होत. नदीकाठची बच्चाची झाडे. व त्याच्या बुडक्याची केसरे भयावह दिसत होती. पण धाडशी शिवा नंदाला याच काहीच वाटत नव्हत.तेथे त्याने आपले दिवसभरच्या कष्टाने घामावलेले हातपाय स्वच्छ धुतले व मातीची घागर भरून अलगत घेतली. व तो घरी निघाला. घरी देवपुजेला नित्य नदीचं पाणी सलग तिन वर्ष घालण्याचा त्याने केलेला प्राण होता. तो घागर घेऊन गावाकडे मार्गस्थ झाला. ओढ्याच्या वाटेपर्यंत येईतोवर चांगलाच अंधार झाला होता. अंधारी ती वाट ओळखीची असलेने तो झप झप चालत गावच्या वेशित पोहोचला. तोपर्यंत त्याला एक दिवा सुद्धा दिसला नव्हता. गावच्या वेशीत पिंपळाचे झाड होते. ते वेशीचे प्रवेशद्वार होते.. तेथे आल्यावर

 त्याच्या आज्जीने सांगितलेली पिंपळणीच्या भुताची गोष्ट आठवली. व तो गालातल्या गालात विनोदी हसू लागला. कारण म्हातारीनं सांगितलेल्या गोष्टीत रात्रीचे बारा वाजता दिवट्यांचा नाच व झिन्झ्या पसरून नाचणाऱ्या हाडळी व त्यांच्या करामती त्याने ऐकल्या होत्या. पण कित्येक वेळा रात्रीचे त्या झाडाखाली जाताना त्याने कधीच तो नाच पहिला नव्हता. त्या विचारातच तो पुढे घरच्या दिशेने चालू लागला. देवळातील घंटा ऐकू येत होती. गावातील माळकरी तिथे जमा झाले होते. त्यांचं भजन कीर्तन चालू झाले होते. शिवानंदाने तिकडे पाहिले व डोळे बंद करून अंतरमनाने नमस्कार केला. व पुढे चालला. बघता बघता तो अंगणात येऊन पोहोचला. अंगणात अनेक लहान मोठी फुलं व फळझाडे होती. काळ्याकुट्ट अंधारात घरात व तुळशी शेजारी लावलेले दिवे हाच काय तो उजेडाचा स्त्रोत होता. घरातून पार्वतिच्या कन्हण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याने आपल्या खांद्यावरील घागर ज्योत्यावर नेऊन ठेवली. व अंगणातील बादलितील पाणी पायावर घेऊन आत आला. पार्वती विव्हळत होती. तिच्या शेजारी गल्लीतल्या बायका बसल्या होत्या. त्यात बसलेल्या त्याच्या आईचे लक्ष त्याच्याकडे गेले. ती त्याच्याकडे डोळे वटारून बोलू लागली.

“ बघत काय उभरलाईस, जा त्या गंगू सुईनीला बोलावून आण जा. एखादे दिवशी नदीच्या पाण्याऐवजी परसदारातील विहिरीचे पाणी घातलं असतास तर काय घरातील देव धोतर धरून पळून जाणार नव्हते. व आजच नडलं होत काय खोडव्याला पाणी पाजायचे. त्या गंगीला मगाठावून दहा निरोप धाडले. तरी ती उगवेना झालीय. तू आपला शेत शेत कर. मी मात्र निस्तरते घरातील गोष्टी जा आदी पहिला.”

इतक्यात वेलणकरांची सुंदरा म्हणाली,

“ गप्प बस म्हातारे, वेळ काय बोलतीस काय. तुम्ही जावा हो भावजी आम्ही बघतो पारुकडे.”

तसा शिवानंद घरातून बाहेर पडला. व लगबगीनं गंगू सुईनीच्या घरला निघाला. तिच्या घराजवळ पोहोचलाच असेल. तेवढ्यात गंगू सुईन बाहेर पडत होती. तिला पाहून शिवानंदला जरा बरं वाटलं.तो तिला म्हणाला,

“ काकू काय घोड पाठवाय हवं होत का?”

गंगू,

“ अरे, लेकरा मला काय एकच काम आहे व्हय, आताच थोड्या वेळापूर्वी शेताहून आले. मोळी लाकडाची घेऊन. म्हशीची धार काढली. तेच निघाले बघ. चहा सुद्धा घेतला नाही. मी पण बाईचं आहे. मला कळत नाही का? अशा वेळी काय करायला हवं ते. आता चल लवकर अशी झटक्यात पारुला रिकामी करते बघतच राहा.”

तशी ती दोघं कंदिलाच्या उजेडात चालू लागली. देवळात आता टाळ वाजायला लागले होते.

शिवानंद,

“ हरी भकतांचा मेळा भरला वाटत.”

तशी म्हातारीच्या डोक्यातील शीर झटकली. व ती शिवानंदाला म्हणाली,

“ त्या मेल्याना काम आहे कुठे, त्यानं चांगल सत्यवाच्या घाण्याला जुंपाय पाहिजे दिवसभर दुसऱ्यांना शिवा द्यायच्या, नको त्या चकाट्या पिटायच्या. अन् रात्री पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी पारायण करायचे. देवा पांडुरंगा यांना अक्कल दे थोडी.”

तेव्हा शिवानंद म्हणाला,

“असे बोलू नये काकू.”

“ अजून तुला खूप ध्याडे बघायचे आहेत. या डोईची केंस काय अशीच पांढरी झाली नाहीत. हू चल आता सरळ हो.” गंगू उत्तरली.

“ चालतो की पण तू अशी काय म्हणतेस.”

“ हे बघ बाळ, त्या ज्ञानु पाटलान विधवा बायजाची जमीन लाटली.”

तो शिरप्या आपल्या बहिणीला मुलबाळ होऊ नये. व आपल्याला तिची इस्टेट मिळावी म्हणून वेशितल्या म्हासोबाला रोज पाय पडतो. अन त्या तुक्यान तुझी जमीन कूळ कायद्याच्या नावाखाली काळबेळ करून नाही का लाटली. ते सगळे या भजनात आहेत बघ. जमलेत की नाहीत बोल आता.”

“ अग, काकू तो सगळा नशिबाचा भाग आला. चल आता.”

बोलता बोलता ते दोघे घरापर्यंत आले. गंगू तर आत मध्ये गेली. खोलीचं दार तीनं लावलं. आत गेल्या गेल्या म्हातारी तिला म्हणाली, “ गंगे तुला एवढा कसला भाव आलाय ग. माझी सून इथं विव्हळतेय अन तू एवढा उशीर केलास काय, मोटला जुंपली होती काय तुला.”

गंगू,

 “ हे बघ मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही. वाद घालू नकोस.जा गरम पाणी आन जा.”

रात सरत होती. तसं गावातील मिणमिणते दिवे बंद होत होते. अंधाऱ्या रात्री फक्त पार्वतीच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. शिवानंद जोत्यावर येरझार्या मारत होता. मध्यरात्रीचा प्रहर झाला. तरी देखील पार्वतीची सुटका झाली नव्हती. . मध्यरात्रीनंतर तिसरा प्रहर आला. व बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शिवानंदाचा छोटा मुलगा व्यंकटेश झोपी गेला होता शेवटी गंगू सुईन अन् वेलंकरांची सुंदराबाई बाहेर आली.

सुंदरा, “ लक्ष्मी आली घरात.”

हे ऐकताच शिवानंदाला खूप आनंद झाला. कारण खूप वर्षांनी त्याच्या घरात मुलगी झाली होती. रात्रभर तळमळणाऱ्या म्हातारीने गंगुला विचारले.

“ पारू कशी हाय ग?”

गंगू,

“ आहे व्यवस्थित काळजी करू नको.”

तशी म्हातारी तडक उठून माजघरात गेली. पार्वती व बाळाला सुखरूप पाहून तिचा आत्मा थंड झाला होता. तिच्या पाठोपाठ शिवानंद ही आतमध्ये गेला. व आनंदी मुद्रेने त्याने पार्वतीकडे पाहिले. या सर्व त्रासाने ती शांत पडली होती. शेजारची हिरा व सुंदरा पाणी तापवून आणायला गेली. म्हातारी व शेजारील बायकका स्वयंपाकाला लागल्या. शिवानंद तिथेच बसून कधी बाळाकडे तर कधी पार्वतीकडे पहात होता. भर अमावस्येला मुलगी झाली. घरात लक्ष्मीचं आली होती. बाळबाळंतीनीची अंघोळ घालून व्यवस्था लावून घासभर जेवून बायका घरला गेल्या. तवा तांबड फुटायला लागल होत. कोंबड्यांच आरवन ऐकू येत होत. दिवस उजाडला. गावातील ओळखीच्या पाळखीच्या स्त्रिया येऊन बाळबाळंतीनीची चौकशी करून जात होत्या. दिवस सरू लागले.

पाचवा दिवस उजाडला. पाचवी पुजली गेली. मुटके व घुगऱ्या बनवून पाच घरच्या बायकांना बोलावून पूजा केली. बाराव्या दिवशी बारसे केले. पै पाहुण्यांना बोलावून मुलाला पाळण्यात घालायचे ठरले होते. गोड शिरा व जेवण केले. गंगू सूईन पण आली होती. तिला साडी नेसून पेरावा केला. बाळाला पाळण्यात घातले. त्याचे नाव काय ठेवायचं हे जमलेल्या बायकांनी शिवानंदाला विचारले. तेव्हा त्याने वज्रेश्वरी ठेवा असे सांगितले. बायकांनी पाच देवांची नावे घेऊन बाळाला पाळण्यात घातले. व बाळाचे नाव वज्रेश्वरी ठेवले. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. पुढे वेलणकरांच्या घरात देखील पाळणा हलला. दामाजीपंत वेलंकरांच्या घरी खूप दिवसांनी पाळणा हलला होता. मुलीचं नाव स्नेहशांता ठेवले होते. पण सगळे तिला शांता म्हणत. मुलीला पाहून शांताची आई खूप खुश झाली. कारण तिच्या वांझोट्या पणावर फुल उमलले होते. त्यामुळे तिला नावे ठेवणाऱ्या स्त्रियांची तोंडे बंद झाली होती. दामाजीपंत खुश होते. मात्र त्यांच्या भावांचे व पै-पाहुण्यांचे तोंड पडले होते. कारण हे सगळे दामाजीच्या इस्टेटीवर डोळे ठेवून होते. सर्वांच्या आयत्या पिटावर रेगोट्या ओढायच्या मनसुब्यावर पाणी पडले होते. या एकट्या मुलीच्या जन्माने त्याच्या व त्याची राबणारी पत्नी यांना बांधणार असं कोणीतरी होत. दामाजी हा मूळचा गरीब देशाहून आलेला. तेव्हा शिवानंदान त्याला राहायला जागा दिली. गावोगावी फिरून त्याने सोनारकीचा धंदा केला. आता तो तालुक्याला आपली पेढी काढून आहे. पण आता मोठा पैसेवाला झाला म्हणून माणुसकी विसरला नाही. आडल्या नडल्यांसाठी मदत कराय नेहमी पुढं असायचा.

क्रमशः

शनिवार, १८ जून, २०२२

९)डोंगराची मोळी

९) डोंगराची मोळी

लेखक : निशिकांत हारुगले.

              एम. ए. बी. एड.




  सह्याद्रीच कुशीत असलेल्या या पेठत सर्व लोकांना जमिनी काही समान नाहीत. काही लोकांना कमी काहीना जास्त अशा आहेत. तर काहींना तर जमिनीचं नाहीत. अशा या लोकांचं राहणं सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात जास्त जात. पावसाळा म्हंटला की भात खाचरात राबायचं व चार महिन्यात वर्षभराच पिकवायच. व पुढचे सहा महिने लोकांच्यात किंवा आपल्या शेतातील राहिलेली कामे करायची. पेठेच्या गावातील अनेक कुटुंबे शेती करत असल्याने घरात चुलीच्या जळणाची समस्या उद्भवत असे. फेब्रुवारी महिना उलटला की डोंगरच फासल पाणी अटायचं. त्यामूळे शेत कामातून थोडा विसावा मिळत असे.

 लागोपाठ जत्रा यायच्या व शिमग्या पर्यंत घरातील जळण संपत असे.

तेव्हा घरातल्या बायांना राईतील तसेच भुदरगडला लागूनच असलेला डोंगर खुणावू लागे. व बायाबापड्या राईच्या डोंगराची पायवाट चढू लागत. अशीच एक कथा पेठेच्या गावातील बायांची लाकडापायी होणारी झडती कशी होते ती सांगते.

रब्बीचा हंगाम निघाला. व जत्रांचा ओघ सुरू झाला. गाव देव जोतिबाची पण जत्रा झाली. व गडच्या भैरवनाथाची सुद्धा.

रिकाम्या वेळात काय करायचं तर वाकळ शिवण चालू होई. अशाच या एकमेकींच्या शेजारील बायाबापड्या आपले घरकाम आटोपून शेजारच्या तानुबाईच्या परस अंगणात ओसरीत वाकाळ शिवत बसल्या होत्या. यामध्ये चव्हाणांची तानुबाई, गुरवाची सखूबाई, नाव्ह्याची बायजाक्का होत्या.

बोलता बोलता त्यांच्यात विषय निघाला. गुरवाची सखूबाई बायजाक्काला म्हणाली, “ काय सांगू बाई घरात जळणाचा एक तुकडा पण नाही. म्हाताऱ्यानं पावसात वाहून आलेला ओंडका आणला होता. तो पण संपला.”

तेव्हा बायजाक्का म्हणाली, “ तर काय बाई फेब्रुवारी महिन्यात माही झाली. पावन रावळं जेवलीत. त्यात माझी पण लाकड संपलित बघ. आमचा काय खंडोळ कमी हाय हो. जमली की चांगली भुतावळच नव्हं.”

तेवढ्यात तिथे पोऱ्याची सुंदरा आली. व म्हणाली, “ काय तान्याक्का वाकाळ शिवतेस म्हणं.”

तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “काय दिसत नाही.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ दिसतेय की पण विचारायची एक पद्धत असतीया. कुणासाठी शिवतीस ग.”

तेव्हा तानुबाई म्हणाली, “ माझ्या लेकीसाठी.”

तेव्हा गुरवाची सखू म्हणाली, “तर.. लेकीलाच दे. तिचं तिथं खाऊन संपना एवढं असताना हीची पोर मुलखातनं राबून आणत्यात. व ही लागली लेकीला वाकाळ द्यायला.”

तेव्हा तानुबाई म्हणाली, “ काय सांगू जावई म्हणाला म्हणून, नाहीतर मला कुठली हौस. आलिया. तरुणपणात शिवल्या होत्या वीस पंचवीस वाकळी. आता नाही जमत. म्हटल कवा मागत नाही. आता मागितलीया तवा देऊया एखादी शिवून. “

तेवढ्यात सखू म्हणाली, “ तर तर तो लागला गोड गोड बोलायला, व ही लागली म्हातारी डोलायला तेच्या तालावर. शहरवस्तीला बंगला बांधला. चिमुटभर कुंकू लावायला तरी बोलावलं का तुला. राधानगरीचा चिक्कू कोंबडा त्यो कवा येताना पावाची पिशवी तरी आणतो का तो.”

तेव्हा म्हातारी म्हणाली, “ जाऊ दे तिकड. नाहीतर तेच्या खादिन कुठं माझी झाड व्हायचीत. पोरगी सुखात असली म्हणजे झालं.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ सखू बोलती ते खर हाय. तेच्या घरात नाही काय तेची आई. तिला इत नाही का वाकाळ शिवायला. तुला लई व्याप बघ.”

तेवढ्यात बायजाक्का म्हणाली, “ ते सर्व जाऊ देत लाकडाचं काय करायचं. तेवढं सांग.”

तेव्हा सखूबाई म्हणाली, “ काय करायचं म्हणजे आणायची डोंगरातून नाहीतर काय.”

तेव्हा सुंदरा पण म्हणाली, “आमच्यात काटकीचा एक नार पण नाही.तवा परवा दिवशी सोमवार हाय. जाऊया काय लाकडाला.”

तेव्हा त्या बायकांच्यात चर्चा झाली. व लाकडाला जायचं ठरलं.”

सोमवारचा दिवस उजाडला. तस त्या सर्वजणी आपापली कामे आटोपून डोंगराला निघाल्या. प्रत्येकिन आपल्या घरातील कोयते व दोऱ्या घेतल्या या सर्वजणी डोंगराला निघाल्या. एकमेकींशी गप्पा करत त्या डोंगर चढू लागल्या. चालता चालता सखू तानुबाईच्या सुनेला म्हणाली, “ काय सुने माहेराला कधी गेलतिस का लाकडाला.”

सुनिता म्हणाली, “नाही बाई आमच्या गावाला डोंगर कुठला.सगळा सपाट माळ हाय. ऊसातील रानात खोडव्याबिगर कायपण मिळत नाही.”

तेव्हा बायजाक्का म्हणाली, “डोंगरची मोळी इल काय तुला.”

“न यायला काय झाल. मी आमच्या गावाला नदीच्या रानातनं वाड्याची वज्जी व उसाच्या मोळ्या वडल्यात. ऊसाच्या मोळ्या पण वडाय जाईते की. मी काय वज्ज्याला हलकी नाही.”

सुनिताच उत्तर ऐकूण बायजाकका म्हणाली, “ पोरगी घट्ट हाय. शंकर्याचा संसार लई चांगला करील.”

इतक्यात सुंदरा म्हणाली, “ तुझा नव्हरा लई साधा माणूस, कोण पण फसवल बघ तेला. तवा डोळ्यात तेल घालून संसार कराय पाहिजे बघ तुला. नाहीतर ही तानी लई जावई जावई करतेय. कधी नाही विचारणार जावई तिला. पण तुला जरा आधार हाय तिचा.”

सुनिता म्हणाली, “ तिच्या जिवावर तर पोर टाकून मला बाहेर पडता येत.”

अशा गप्पा मारत त्या डोंगर चढून गावमिरीच्या रानात आल्या. गवमिरीच रान सपाट असल्याने तिथं भाताची शेतं केली जायची. रानगव्यांच्या मुळे नुकसान होत असे. त्यात मोरांचा वावर असल्याने तर भात पिकाची चांगलीच मळणी व्हायची. गावमिरीला लागून असलेल्या जंगलाच्या रानात गेल्या. व लाकडाच्या मोळ्या काढल्या. व घेऊन आल्या. अस त्यानी आठवडा भरात भरपूर जळण गोळा केलं. हे तुळजाईच्या तुक्यान बघितलं. व त्यानं वन खात्याला चहाडी केली. एकदा जळणाला गेल्या असताना. त्या जळण काढू लागल्या इकडून तिकडून त्यांनी जळण जमा कराय सुरवात केली.

सखूबाई झाडावर चढण्यात तरबेज असल्याने तिन झाडावर चढून वाळलेला मोठा ढापा पाडला. आपल्या वज्ज्याची जोडणी केली. व सुनीताला म्हणाली, “ तू लाकड तोडून मोळी बांध. मी तुला पण एखादा ढापा बघते. अशा तऱ्हेनं त्यानी आपली वज्जी तयार केली. वज्जी केल्यावर त्या एका झाडाखाली जाऊन विसावल्या. आपापल्या भाकरी सोडल्या. एकमेकींना सांबार व कालवण वाटून त्यानी भाकरी खाल्या. व तेथील जवळच्या झरीच पाणी प्यायल्या. रानातली बोर, करवंद, तोरणं गोळा करून ते खात आपल्या वज्जा जवळ आल्या.सूनितांन त्यातली थोडी करवंद आपल्या मुलीसाठी पदरात बांधली.”

 बघून सुंदरा म्हणाली, “ काय नव्हऱ्याला नेऊन देतेस वाटत.”

तर सुनिता म्हणाली, “ नाही पोरसनी घेते.”

तेवढ्यात सखू गुरविन म्हणाली, “लई पोर पोर करू नकोस, स्वतच्या पोटाला देखील खात जा. या जगात कोण बी कुणाचं नसतं. माझं वय बघितलंस नव्हं. तुझ्या सासुबरोबर नांदायला आले. तवापासन हा वनवस हाय बघ. आदी सासूच्या राज्यात राबूनच मेले. व आता पोरग्याच्या राज्यात तरी डोंगराची मोळी चुकली नाही बघ.”

“ मी पण माझ्या पोरासनी तुझ्यासारखी जपते. या रानातनं पिशव्या भरून करवांद नेईते. पण आता लगीन झाल्यापासून बघितलस नव्हं, दोन दोन सूना असून आम्हा म्हातारा म्हातारीला राबाय लागतेय. मी मरायच्या आधी माझा नव्हरा कलमडला तर बर. नाहीतर त्याच वाळवान लागल माझ्या मागं.”

“बरं घ्या आता मोळ्या व चला लागूया गावच्या वाटेला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ शेवटला देवान आईपण दिलंय नव्हं. तू अस बोलतीस. व पदराआडनं सांबार नेऊन लेकाला देतीस नव्हं. “

तेव्हा सखू म्हणाली, “ व्हय बाई खर हाय तुझं. कवा वनवास संपतोया देवा जोतिबाला ठावं.”

असे म्हणून वज्जी घेऊन त्या गावच्या वाटेला लागल्या. गावमिरीच्या शिवरातून त्या खाली उतरल्या. व विश्रांतीसाठी थोडावेळ मेसकाट्यांच्या दाटीच्या बेटाच्या जागेवर बसल्या.

इतक्यात तपासणीला निघालेला वनरक्षक त्यांना गाठ पडला. व त्यांना बघून म्हणाला, “ लाकड कुठून आणल्यासा मला माहीत आहे. खूप दिवस शोधतोय तवा आज सापडल्यासा मुद्देमालासह.”

तेव्हा सुनीता हळूच म्हणाली, “आता काय करायचं ग.”

सकू म्हणाली, “ गप्प बस भिऊ नको.“

तेव्हा तो आपल्या तोऱ्यात जास्तच बोलू लागला.या सगळ्या त्याच्याकडं पाहू लागल्या.”

त्यात बायक्का म्हणाली, “ एक वार माफ करा साहेब. आम्ही गरीब माणसं आहोत. पोटासाठी एवढं डोंगर कट्टा चढताव काय करावं.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ एवढ्या डाव सोडा साहेब आम्ही काय वल्ली लाकड नाही काढलीत. वाळलेल ढाक पाडल्यात. तवा आम्हाला सोडा.”

तेव्हा तो दोनचार शिवा हासडत मोळीतील कोयते काढून घेऊ लागला.”

 तशी सखू म्हणाली, “ पाया पडते साहेब कोयत तेवढे काढून घेऊ नका.”

“तुमचे कोयते काढून घेतल्या शिवाय तुमची मस्ती उतरायची नाही.” तो म्हणाला.

कितीतरी वेळा गया वया केली तरी तो ऐकायला तयार नव्हता. व जास्तच अरेरावी करायला लागला.

ते पाहून सखू म्हणाली, “ लई सरकारच जंगल सरकारच जंगल म्हणतोस. सरकार कुणाचं गा आम्ही निवडून दिलेलच नव्ह. चार फुकण्या कांडग्या पाई गरीबाच कोयत काढून घेऊन बायकांवर पुरुषार्थ दाखवतोस व्हय रं.”

तेव्हा तो म्हणाला, “ एक तर चोरी व वरती बरी चाललीय शिरजोरी.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ मगाठावण ओरडुन सांगताव की आम्ही वाळलेली लाकड काढल्यात. तुला एक तरी वल लाकूड दिसतय का. आम्ही गरीब मानस गावात धड घर नाही की शिवारात धड शेत नाही कुठं जावाव.”

तेव्हा तो म्हणाला, “ जावा की मसणात.”

तेव्हा बायजा म्हणाली, “ हे बघा मसणात तर सगळीच जात्यात. तू पण जाशील.”

शेवटी सखू म्हणाली, “ हे बघ आम्ही आता गावमिरीत हाय तू काय आम्हाला जंगलातली लाकड काढताना पकडलास काय. आमचं म्हणणं हाय की आम्ही जंगलातील लाकड काढली नाहीत. जा आता काय म्हणणं हाय तुझ.”

तेव्हा तो म्हणाला, “मग कुठली काढल्यासा सांगा.”

तेव्हा ती म्हणाली, “ ते तुला विचारायचा संबंध नाही. व एवढी रखवाली करतोस रात्रीची सागवानाची लाकड व चंदनाची लाकड कुठं पळून नेत्यात त्यांनां पकड की. तेव्हा पडत असशील डाराडूर घोरत. व आम्हा बायकांना बघून शड्डू ठोकतोस व्हय र.”

तेवढ्यात सुंदरा म्हणाली, “ मला काय ठाव नाही त्या लाकडविक्या तुक्यासंग तुझ काय संधाण हाय ते. जंगलातली सागवानाची लाकड कुठं जात्यात ते माहीत नाही व्हय आम्हाला. गुमाण कोयत दे नाहीतर उभा इतच जाळताव तुला..”

तेव्हा तो म्हणाला, “ सरकारी अधिकाऱ्याला अस बोलण गुन्हा हाय.”

तेव्हा सखू म्हणाली, “ होय गुन्हा हाय खर तर कायदा तुम्हाला पण लागू हाय. तुम्ही इकता ते चालत. व आम्ही पोटासाठी कांडग्या काढताव ते चुकीचं.”

हे बोलणं ऐकूण हुज्ज्जत घालत्याला त्यो वनरक्षक ओशाळला. व त्यांचे त्याने कोयते परत केले. व निघून गेला.”

तेव्हा सुनिता म्हणाली, “ आता तो आपली तक्रार करणार.”

सखू म्हणाली, “ सुने हा साधापणा सोड. बघितलंस काय कसा फुगलेल्या बैलागत आलता. व गेला कसा भिजलेल्या उंदरागत याला एकीच बळ म्हणत्यात.”

बायजा म्हणाली, “ आता काय या वर्षाची जोडणी झाली. उद्यापासनं खोडव्याला जायचं. इकडली वाट जगला वाचलाव तर पुढल्या वर्षी.”

लाकडाच्या मोळ्या घेऊन त्या घरला आल्या. त्यानी आता सुटकेचा निःश्वास टाकला होता. संध्याकाळ झाली. सांजेच्या जेवणाला सुनिता लागली. इतक्यात शेजारील मंगलाची पोरगी सांगत आली. तुम्हा लाकड आणायला जात्याली चाडी तुळजाबाईच्या तुक्यान केली. मगाशी मी दामू अण्णाच्या दुकानात गेले. तेव्हा संगप्पा आजाला तो सांगताना ऐकलं.

तेव्हा सुनिता चिडली. व तिने हातातलं काम सोडलं. व तिने सखुला सांगितलं. तशी सखू चिडली. व तिने लाकडाला जाणाऱ्या बायकांना बोलावलं. व हे सांगितलं. तशा सगळ्या बायका चिडल्या. व व एक एक लाकूड घेऊन तावा सरशा तुळजाईच्या घरात शिरल्या. व तुळजाईच्या सुनेला त्यानी विचारलं. ‘तुक्या कुठं हाय?’ तेव्हा ती म्हणाली, “ काय काम हाय?”

तेव्हा सखू म्हणाली, “ त्याची पूजा बांधायची हाय.”

इतक्यात त्यांना चुलवानाला बसलेला तुकाराम दिसला. त्यानी आत जाऊन त्याला जाब विचारला.

तसा तो म्हणाला, “ तुला कुणी सांगितलं म्या.. म्ह.. टल म्हणून.”

तेव्हा ती म्हणाली, “ त्या ऑफिसरन सांगितल जातोस काय विचारायला लेका.”

तुझ्या बाबन डबोल करून ठेवलंय तस आमच्या सासऱ्यान नाही. तुझ मड बसवलं ते.” असे म्हणत. त्यानी तुक्याला बडवायला सुरुवात केली. तस त्याची बायको मधी पडली. तशी तिला धरत सुनिता म्हणाली, “ तू गप्प बसलीस तर बर नाहीतर तुला पण निपाणी दाखवीन.”

शेवटी तुक्या बोंबलायला लागला. तवा तुळजा म्हणाली, “ सखे सोड बाई तेला. तुझ्या पाया पडते.”

तेव्हा सखू म्हणाली, “ म्हातारे तुझ्याकडं बघून याला आता सोडताव जर याने असा परत चमचा ढवळला तर डोचक्याची पाक केस निघतील तेच्या.”

शेवटी त्या सगळ्या त्या घरातून बाहेर पडल्या. व आपापल्या घरला निघून गेल्या.

अशा प्रकारे डोंगरची मोळी पेठतील लोकांच्या मनोरंजनाचे कारण बनली.

लेखक : निशिकांत हारुगले


रविवार, १२ जून, २०२२

८) नर्स बाई

८) नर्सबाई

लेखक : निशिकांत हारुगले.

         एम. ए. बी.एड.




पूर्वीच्या काळी डॉक्टरकीचे काम वैद्य लोक करत असत. राजेरजवाडे असोत. वा सामान्य माणसं निसर्गात मिळणारा झाडपाला हिरडा, बेहडा, तुळस या सारख्या औषधी वनस्पतींचा वापर करत असत. पुढे आधुनिक जगात वेगवेगळ्या रसायनांचा शोध लागत गेला. व झाडपाल्यांच्या औषधांना आयुर्वेदिक गोळ्यांचे रुप प्राप्त झाले. व उपाय म्हणून वेगवेगळ्या रसायनाने निर्माण गोळ्यांचा वापर होऊ लागला.

भारत सरकारने वेगवेगळ्या शिक्षणाद्वारे नवीन डिग्री तयार केली. त्याद्वारे नवीन डॉक्टर निर्माण झाले. पण हे डॉक्टर शहरी भागातच आपले बस्तान मांडून बसले. ग्रामीण भागात पेशंट कमी, त्या मानाने शहरी भागात पेशंट जास्त व इतर सुखसोयी त्यामुळे शिक्षणाला घातलेला पैसा पण वसूल होई. त्यामुळे डॉक्टर ग्रामीण भागात जास्त नसत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी एकमेव आधार असे तो तेथील नर्सबाईचा. व तिच्या जोडीला असणारा मलेरिया अधिकारी किंवा कुष्टरोग तंत्रज्ञ. हे त्रिकुटच ग्रामीण भागात जास्त राबताना दिसते.

नर्स व तिच्या बरोबर फिरणारा डॉक्टर पाहिला की त्यांच्या बाबत माणुसकी सोडून चर्चा करणारी माणसे आपण पाहतो. पण कोळशाच्या खाणीत जसे हिरे असतात. तसे आपल्या काळ्या केसांचे पांढरे पण होई पर्यंत प्रामाणिक राबणाऱ्या नर्सा अनेक आहेत.

अशा या क्षेत्रात राबणारी एक नर्स तिची ही कहाणी. माधुरी ही एक नर्स पेठत असणाऱ्या केंद्रावर तिची नेमणूक झाली. दिसायला देखणी , पश्चिम महाराष्ट्रात एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली, व्यवसायाने ती नर्स होती. प्रतिकूल परिस्थितीमुळे ती या व्यवसायात पडली होती. अशा या नर्सची नेमणूक पेठच्या गावात झाली होती.

नोकरीवर रुजू झाल्यानंतर गावातील लहानापासून वृधापर्यंत सगळ्यांचे आरोग्य तपासणी , नसबंदीची कामे व इतर नेमलेली कामे करण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

तिच्याकडे नवनवीन पेशंट येत असत. कधी क्वालरा कधी टायफॉइड व इतर त्यांना तपासताना तिची हसून दमछाक होत असे.

एके दिवशी ती गावातून फिरत असताना प्रत्येक घरावर नोंदणी करण्याचं व लहान मुलांच्या पोलिओसाठी नोंदीची ती काम करत चालली होती. गाव व आसपासच्या वाड्या ती फिराय लागली.

पेठतून फिरत एका घरावर ती नोंदणी करताना एक म्हातारी तिला बघून तिला म्हणाली, “ डॉक्टर बाई मला पण औषधं द्या.”

नर्स, “ काय होतंय ते सांगा.”

म्हातारी बाई, “ माझ्या की नाही पोटात तोडल्यासारख होतंय.”

नर्सन निरिक्षण केलं व ती म्हणाली, “ संध्याकाळी लावून द्या एखाद्या पोराला, देते औषध पोटावरील कळीचं.”

एका घरात तर तिला वेगळाच अनुभव आला. त्या घरातील स्त्रीचा नव्हरा नोकरीला बाहेरगावी गेला होता. त्यामुळे तिला करमत नव्हते. दारावर नोंद करताना तिने नर्सेला आत बोलावले. ती बाई नर्सला म्हणाली, “ बाई काय सांगू मला कससच होतंय.”

नर्सबाई “ कससच म्हणजे नेमकं काय होतंय.”

ती बाई, “ काय सांगू बाई मागल्या महिन्यात धनी होतं तवा झोप चांगली लागायची. पण आता झोपच येत नाही. मला करमत नाही.”

नर्स, “ अहो हे मानसिक दुःखन झाल. शारीरिक नाही. यावर माझ्याकडे इलाज नाही.”

अशा प्रकारे ती सर्व गावचा सर्वे करत गावाबाहेर एका मांगाच्या घरात आली. गावच्या खालच्या बाजूला असणारे हे मांगाचे घर म्हणजे दोन तीन सोपे. त्याला ताट बेळ्याच दार त्यावर लिहिणार कसं. म्हणून बाजूच्या भिंतीवर रंगीत खडूने तपासणी नंबर टाकला. व ती म्हणाली, “ घरात कोण आहे का?”

तेव्हा आतून एक बाई बाहेर आली. व त्या नर्सला बघत म्हणाली, “ काय हाय डागतरीन बाई.”

नर्स, “ घरात मुले किती हाईत. “

ती बाई लाजून म्हणाली, “ चार पोरी हाईत मला.”

घरामाग चामड धूणारा तिचा नव्हरा आला. व म्हणाला, “ चार पोरी हाईत, अजून पोरगा झाला नाही.”

माधुरी नर्स तेला म्हणाली, “ आव पोरगा आन पोरगी असा भेद करू नये. घरात नाही खायला आन उगाच ढीगभर पोर कशाला, शिवा आदी तिला. भारताची लोकसंख्या वाढतिया.”

तेव्हा तो मांग म्हणाला, “ वाढली तर वाढूदेत. आम्ही मेल्यावर तिटव धरायला नको का कोण.”

तेव्हा वाद न घालता ती पुढल्या घरावर गेली. अशीच ती नोंद करत पाटलाच्या घरला गेली. दारावर नोंद करत तिन हाक मारली. तेव्हा पाटलाची मुक्ताबाई बाहेर आली. व म्हणाली, “काय काम हाय हो.”

नर्सबाई, “ जरा डोसाच काम आहे. तेव्हा घरात मूल किती आहेत?”

तेव्हा पाटलीन म्हणाली, “ आमच्या घरात होय थोरल्याला दोन गंडे हाईत व धाकट्याला चार पोरी हाईत.”

नर्सबाई, “ दोन मुलांचा कायदा असताना इतकी पोर काढणं गुन्हा हाय. अशान तुमचं रेशन बंद होईल.”

मुक्ता पाटलीन म्हणाली, “ हू मला शहाणपण शिकवत्यात शाळा शिकली नसली तरी अक्कल हाय मला बाई, माझ्या धाकट्याला मुलगा नको.”

नर्सबाई म्हणाली, “ पण मावशी पुढला पोरगा होईल कशावरून. अन् पोरगी झाली तर.”

नर्सच बोलण तोडत ती म्हणाली, “ तुम्हाला काय ठाव पोरग्याच महत्त्व. पोरी पोरी काय कामाच्या आम्ही मेल्यावर वेशीतून रडत यायच्या व बारादिवसाला पातळ नेसायच्या. माझा पोरगा माझ्या मड्यावर लाथेन माती सारू दे. फिटल माझं. माझ्या माहेरच्या देवीला नवस केलाय मी. माझ्या धाकल्याला पोरगा होऊंदे, मी दंडवत घालेन म्हणून. माझी देवी मला पावल्याबिगर रहायची नाही.”

नर्स बाईला काय बोलावं ते सुचेना गुपचूप दारावर नंबर टाकला. व ती पुढल्या दाराला निघाली. मनातल्या मनात म्हणाली, “ देवा परमेश्वरा हीच्या पोराला पुढली पोरगीच होऊ दे.” व ती पुढे मार्गस्थ झाली.

लसीकरणाचा दिवस उजाडला. की तिची तारांबळ होत असे. गावातिल बायकांना दहा बारा वेळा तरी डोसला बुलवावे लागे. पावसाळ्याचे दिवस असले की साथीचे रोग थैमान मांडत. गावात कोंबड्यांना रोग आला तर लोक नर्सबाईकडे धाव घेत असत. आपल्या पोटात चावतय, डोकं दुखतंय, ताप आलाय अशी कारणे सांगून गोळ्या नेत.

पेठच्या गावात मे महिन्यात गरमीत कोंबड्यांचे रोग थैमान घालत आसत. व गोल मटोल आंडी घालणाऱ्या कोंबड्या झिंगायला लागत. तसेच बुळकायला लागत. पेठत राहणाऱ्या ज्ञानु जगतापला पण कोंबड्या पाळायची खूप हौस. गावातील कोंबड्यांच्या पाठोपाठ त्याच्या कोंबडीला पण रोगाने पकडले. त्या पाठोपाठ त्याचा कोंबडा पण झिंगायला लागला. त्याला काय करावे ते सुचेना. शेवटी त्याने नर्स बाईकडून गोळी आणायचे ठरवले. व तो नर्स बाईच्या सरकारी निवासस्थानी गेला. व म्हणाला. की आमच्या आईला ताप आलाय. व त्यावरील गोळी द्या. तेव्हा नर्स बाईने विचारले, “ केव्हापासून ताप आलाय.”

तेव्हा ज्ञानु म्हणाला, “ मघासी शेतातून आली. तेव्हापासून ताप आलाय. व त्यावर गोळी द्या.”

तेव्हा नर्सबाई तेला म्हणाली, “ रक्त लगवी तपासायला पाहिजे. मग औषध देता येईल.”

तेंव्हा तो म्हणाला, “ एवढ्याशा तापाला कशाला पाहिजे रगात, द्या की गोळी एखादी.”

तेव्हा नर्स बाईन आपल्या जवळील दोन गोळ्या त्याच्या हातावर टेकवल्या. तो घरला निघून गेला. दुसऱ्या दिवशी नर्सबाई वाडीच्या गावांना तपासणीसाठी निघाली. तेव्हा वाटेत तिला ज्ञानुची आई भेटली. तेव्हा तिने तिला विचारले. की काल तर ताप होता. व आज कुठं गेला होता. औषध घेतल्यानंतर एक दिवस तरी विश्रांती घ्यायची.”

ती म्हणाली, “ मला बरं नसायला काय झालं. चांगली हट्टी कट्टी हाय.”

तेव्हा नर्स म्हणाली, “ मग ज्ञानु काल तुमचं नाव सांगून कोणाला गोळ्या घेऊन गेला. तेव्हा ती काही न बोलता निघून गेली. सर्वेवरून येताना ज्ञान्याला खेळताना तीनं बघितला. तेव्हा ती तेला म्हणाली, “ ये ज्ञान्या काल आई आजारी आहे. म्हणून खोटं सांगून गोळ्या आणल्यास नव्हं. काय केलंस त्या गोळ्यांचे.”

इतक्यात तिथे खेळत्याला पवाराचा गणू म्हणाला, “ बाई त्यानं ती गोळी आपल्या झिंगत्याल्या कोंबड्याला घातली. त्त्यो बघा कोंबडा झाडाखाली बसलाय.”

नर्सबाई चिडली व तेला म्हणाली, “ व्हय रे गाढवा इथ माणसाना द्यायला गोळ्या मिळत नाहीत आन तुझ आपल बर चाललय. ये आता परत गोळ्या मागायला.तुला दाखवतो.” असे म्हणून ती आपल्या रूमवर गेली.

सरकारी नियमानुसार ऑपरेशन टार्गेट पूर्ण करावं लागतं असे. त्यामुळे ती इकडल्या तिकडल्या पेशंटना गोळा करत असे. पण पुरुष नसबंदी म्हंटल की आपल्या पुरुषत्वावर हल्ला समजला जात असे.

एकदा सरकारी नियमानुसार पुरुष नसबंदीची केस हवी होती.तेव्हा गावातल्या तसेच वाडीतल्या अनेक पुरुषांची चौकशी केली. पण कोण तयार नव्हता. शेवटी एक दोन मध्यमवयीन माणसाना तयार केलं. ती ऑपरेशनला घेऊन गेली. तेव्हा डॉक्टर तिला म्हणाला, “ यासनी कशाला घेऊन आल्यासा यांची काय झाड व्हायचीत , आताच मर्तुकडी दिसत्यात.”

ती डॉक्टरला म्हणाली, “ हे बघा दोन पेशंट पाहिजेत ना मग हे घ्या. नाहीतर माझ्याकडे पेशंट नाहीत.उगाच वाडाचार लावू नका.”

तेव्हा त्या डॉक्टरने त्यांची नसबंदी करायला घेतली. तेव्हा असे जाणवले की, त्यांची आधीच नसबंदी झाली होती. डॉक्टरने तिला चांगलेच धारेवर धरले.

नर्स चिडून म्हणाली, आता मी काय त्यांना तपासून आणायचं राहिलय. आधी पुरुष नसबंदीची केस मिळत नाही. व मिळाल्या तर या अशा आम्ही काय करावं. वरच्यासणी नुसतं बोलता येते. त्या अधिकाऱ्याना म्हणा आधी तुमची नसबंदी करा. व मग आमच्याकडे केसेस मागा. डॉक्टर त्यावर गप्प बसला. व त्या दोघांची नोंद घेतली. व त्याना अनुदान दिले. व रिकामा झाला. सरकारी अधिकारी म्हणजे वार वार बदल्या या ठरलेल्या त्यानं वैद्यकीय अधिकारी म्हंटले म्हणजे बदली नसेल असे होणारच नाही. सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टरची बदली झाली. व त्या ठिकाणी एक साखरदांडे नावाचा अधिकारी रुजू झाला. तो जरा रंगेल असल्याने बायकांच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन विचित्र होता. नेहमीप्रमाणे माधुरी नर्स रिपोर्ट जमा करणेस आली. तेव्हा तिला पाहताच याच्या मनात विचित्र विचार आले. व हा रंगेल चेंडू लागला की गोंडा घोळायला. मुद्दाम एखाद्या सामान्य केसची जास्तच चौकशी करणार. त्यातून लगट करायचा प्रयत्न करायचा. कोणत्या न कोणत्या कामासाठी हा तालुक्याला बोलवायचा. याच्या बोलण्याने नर्स जाम वैतागून गेली होती. तिला अवघडल्या सारखं व्हायचं. पहिलं ज्या सरकारी दवाखान्यात अगदी आनंदात जायची तोच आता जेल सारखा वाटाय लागला होता. त्याच्या या वागणुकीमुळे सगळे डॉक्टर व इतर स्टॉप तिच्याकडे संशयाने पाहू लागला.

तिच्या बरोबर काम करणारा मलेरिया अधिकारी तिला डिवचून बोलू लागला. एकेदिवशी त्या मलेरिया अधिकाऱ्याने तिला खुणावले. तेव्हा तिने त्याच्या एक कानफटात लगावली. तिचा नाजूक हात असा जोराचा बसला की एखाद्या राकट माणसाचा बसावा. त्याने त्याला दिवसाच्या चांदण्या दिसायला लागल्या..तेव्हापासून तो तिच्या पुढ्यात एखाद्या मांजरासारखा राहायला लागला.

आपल्या शुद्ध चारित्र्यावर हा डाग पडतोय. तेव्हा या साखरदांडेचा कारलेदांडा करायचा व याचा एम बी बी एस डिग्रीचा नक्षा उतरायचा चंगच माधुरीने बांधला. एके दिवशी तिने आपल्या नव्हर्याल हे सगळं सांगितलं. व यावर उपाय काय करायचं ते ठरवू लागली. तेव्हा तिच्या ध्यानात आले. की तिच्या नव्हत्याच्या एक राकट मित्र संजय जो भांडखोर आहे त्या द्वारे याला धडा शिकवायच तिने ठरवले.

एके दिवशी तिने संजयला जेवायला बोलवून घेतले. व चांगला मटणाचा बेत केला. जेवता जेवता त्यापुढे विषय काढला. तेव्हा संजय म्हणाला, “माधुरी ताई तो डॉक्टर कधी रिकामा असतो ते सांग.”

माधुरीने आधीच माहिती काढली होती. तिने सांगितले. की तो रोज सकाळी पालीच्या घाटाकडे फिरायला जातो. तेव्हा संजू म्हणाला, “ मग काम फत्ते होणार.”

दुसऱ्या दिवशी पालीच्या राईच्या वाटेला संजू व त्याचा मित्र गाडी घेऊन भगटायला थांबले. गाडीची नंबरप्लेट काढली होती. थोड्या वेळाने धावत घाटाकडे निघालेला डॉक्टर दिसला. संजयचा मित्र मागे जाऊन त्याला म्हणाला, “ नमस्कार साखरदांडे डॉक्टर साहेब”

डॉक्टर म्हणाला, “ नमस्कार.”

तो डॉक्टर आहे याची खात्री पटताच. त्याने संजयला खून केली. तसा संजय मागून आला व डॉक्टरच्या डोक्यात टपली मारली. व रस्त्यावर कोण नाही बघून बाजूच्या झाडीत डॉक्टरला ते घेऊन गेले. डॉक्टर घाबरला, “ तुम्ही कोण आहात.”

इतक्यात संजय थोबाडात एक लगावली. व म्हणाला, “ बायकांच्या लई खोड्या काढतोस, पेशंट असो नर्स असो लई वाघटा सारख्या जिभल्या चाटतोस." असे म्हणून बडिवला. व ते निघून आले.

त्या दिवसापासून त्याचे वागणे बदलले. बायकांकडे तो नजर वरकरून बघायचे सोडाच. माधुरी नर्सबाई न म्हणता नर्सताई म्हणू लागला. थोड्या दिवसांनी त्याने बदली करून घेतली.

थोड्या दिवसांनी माधुरी नर्सेची पण बदली झाली. व ती सुद्धा आपले बस्तान गुंडाळून पेठचं गाव सोडून आपल्या बदली झालेल्या ठिकाणी गेली. व आपल्या आयुष्यातील आठवणी तीनं पेठत ठेवल्या.

लेखक. : निशिकांत हारुगले.


कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...