सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल

लेखक :  निशिकांत हारुगले.

व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी लागली होती.  व्यंकू कॉलेजचा खर्च व घरातील खर्च: भागविण्यासाठी त्याने एका दुकानात काम करायचे ठरवले. त्यासाठी तो सकाळी कॉलेज करी. व दुपारच्या पुढे कामावर जाऊ लागला. एका कापड दुकानात तो काम करत असे.

 संध्याकाळी घरी येताना अंधार होई.  व वाहन मिळत नसे, त्यामुळे त्याने एक जुनी सायकल विकत घेतली. व तो रोज ये-जा करू लागला. वज्रेला सायकल खूप आवडायची. 

पण शिकवणार कोण. दिवसभर ती दादा घेऊन जाई.व रात्री मारता येत नसे. फक्त ती शनिवारी घरी असे. पण व्यंकू तिला शिकवण्याच्या भानगडीत पडत नसे. कारण एक दिवस सुट्टीचा, त्याला भरपूर काम असे. व विश्रांती देखील हवी असे.. एके दिवशी शनिवारी सुट्टीच्या दिवशी सायकल परसातील गोठ्याच्या भिंतीला उभी होती.  वज्रा घंटी वाजवत होती. इतक्यात तिथे शांती आली. ती सायकल पाहून म्हणाली, “ वज्रे सायकल शिकायची काय?”

 तेव्हा व वज्रा 'हो' म्हणाली. तेव्हा  दोघींनी सायकल बाहेर काढली. व  शिवाराच्या वाटेवर शिकायला त्या निघाल्या. रस्त्याला त्यांना पाहून साकरी पण आली. पहिल्यांदा सायकलीची हवा तपासली. ती कमी होती. त्यात दामुशेटच्या दुकानातून  पंप घेऊन त्यांनी हवा मारली. व त्या शिवार वाटेला गेल्या. प्रथम वज्रा महादेवाच्या पाय पडली नंतर सायकलीच्या,  ते पाहून शांती म्हणाली, “ ओ भटबाई आता हळदी कुंकू लाव अन्  नारळ फोडा. व म्हणा एखादा मंत्र म्हणजे झालं.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ गप्प ग. आपली संस्कृती आहे. प्रतेक वस्तू विषयी कृतज्ञता असावी.”

साकरी म्हणाली, “ हो का, मग उद्या न्हाणीघर पण पुजशिल.”

वज्रा म्हणाली, “ पुरे झालं हळदी कुंकू पूराण, आता , मारू का सायकल.”

शांती म्हणाली, “ हा होऊन जाऊ दे.”

वज्रा म्हणाली, “ धरा ग घट्ट.” असे म्हणत ती प्यांडेल मारू लागली. त्या मागे धरत सोडत तिला मदत करू लागल्या. ती सारखी धरा धरा म्हणत होती. ती प्यांडेल मारू लागली. व थोड अंतर गेल्यावर तिने सायकल मारत मागे पाहिले. या लांब उभा होत्या. ते पाहून ती घाबरली. व तिज अवसान गळाले. व धपकन पडली सायकल उरावर घेऊन व ओरडू लागली. त्या दोघी धावल्या व सायकल बाजूला केली.. तिला थोडे खरचटले होते. ती रडवेल्या स्वरात म्हणाली, “ शांते माकडीने सोडलीस नव्ह सायकल पडलो की मी.”

लगेच साकरी म्हणाली, “ अग, सोडली नाही तर शिकणार कशी.”

शांती हसत म्हणाली, “ चला उदघाटन तरी झालं. आता उठा सुरू करा वज्राबाई.”

पुन्हा उठून ती सायकल मारू लागली. तेवढ्यात वाटेने शेताकडे येणारा रखमा पाटलीनीचा सासरा मुद्दाम आडवा आला, त्याला बाजूला हो म्हणत असताना ऐकेनात. शेवटी गेली  तेच्या ढेंगत सायकल. तसा म्हातारा दंगा करू लागला.  “आई ग, मेलो मेलो. मारल गो शिवाच्या पोरीन. कबर मोडली माझी.”

शांती व साकरीने त्याला सावरलं. सायकल बाजूस केली व म्हाताऱ्याला  शेजारील झाडाखाली बसवला. व त्याला सावरलं. तसा तो लईच दंगा करू लागला. तेव्हा शांतीच्या ध्यानात आलं की हा मुद्दामच करतोय.  तेव्हा ती मुद्दाम म्हणाली, “ चल साकरे म्हाताऱ्याला दवाखान्यात नेवू. बिचाऱ्याची कंबर मोडली. सरकारी दवाखान्यात एक नवा डॉक्टर आलाय. जो हाड बदलून देतो.चल नेऊ याला तिथं. “

तेव्हा तो म्हणाला, “ नको डाक्टर त्यापेक्षा पैसे दे तुझ्या बा कडनं.”

तेंव्हा वज्रा घाबरली. ते पाहून शांती म्हणाली, “ किती द्यायचं.”

तो पन्नास रुपये म्हणाला. त्याच बोलण साकरीच्या लक्षात आले.  तिने शांतीस खूनावल.

शांती म्हणाली, “ मामा पैसे बैसे नको त्यापेक्षा दवाखान्यात चल. दोन इंजक्शनात तयार होशील.”

तेव्हा तो नाही म्हणून पैशाला हट्ट करू लागला. तेव्हा शांती म्हणाली, “ कशाला हवेत पैसे.”

तेव्हा तो काही कबूल करेना. शेवटी घोळात घेतल्यावर त्याने दारुसाठी रुपये  पाहिजे. म्हंटल्यावर. शांती चिडली. व म्हणाली, “ तुझ्या तिर्डीचा मोडला बांबू, तू चल पळ इथून. तुला पैसे काय दवाखान्यात पण नेत नाही.”

तिनं त्याला घालवला. तस वज्राने सायकल चरितून काढून

वज्रा म्हणाली, “ बाई बास ग, नको ती सायकल उगाच भांडण यायला.”

तशी शांती म्हणाली, “ ए चल मार कोण येत अडव बघू.”

असे म्हणत ती सायकल शिकवू लागली. थोड्या दिवसात  ती उत्तम सायकल चालवू लागली ती ही डब्बल शीट. अशा तऱ्हेने वज्रा सायकल चालवायला शिकली.

......

क्रमशः पुढे......

कथा वाकाटखोर्याची भाग २६

२६गडची जत्रा

लेखक निशिकांत हारुगले.

उन्हाळा सुरू झाला. की गावांच्या जत्रा सुरू व्हायच्या. वेदगंगेच्या पंचक्रोशीत भुदरगडची जत्रा खूप मोठी भरायची. नियमाप्रमाणे या वर्षी पण जत्रा आली होती. गडाच्या जत्रेला जायचे या तिघींनी ठरवले. व्यंकू पण जाणार होता. आईने व्यंकूबरोबर जायला वज्रेला सांगितले होते. पण तिने नकार दिला. कारण शांती व साकरीसंगे जी मौज करायला मिळते ती व्यंकूबरोबर जाण्यात नाही. तेव्हा तिने आपल्या मैत्रिणी बरोबर जाणार असे स्पष्ट सांगितले. जत्रेचा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून या तिघांनी आपले आवरले. शिदोरी बांधली. व या तिघी थोड जेवण करून गडाच्या वाटेला लागल्या. गडाची जत्रा संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. संपूर्ण भागातील लोक जत्रेला येत असत. त्या दिवशी पण लोकांची रीघ लागली होती. या तिघीही निघाल्या. गडाची वाट वळणा वळणाची होती. तसेच मधून लहान पायवाटेने देखील जाता येत असे. या तिघी गड चढू लागल्या. उंच चढणीला दम लागत असे. दम भरत असे. पण जसे उंच चढावे तसे वेदेच्या खोऱ्याचे दर्शन घडे. मन भारावून जात असे. गडाचा चढ चढून या तिघी दमल्या होत्या. गडाखालची वाडी चढून त्या वरती गेल्या.

शांतीचे पाय दुखू लागले. ती म्हणाली, “ अग, थांब ग जरा माझे पाय दुःखताहेत.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ ए बाई दमलीस काय लगेच, जवळच गड आलाय.”

तेव्हा शांती म्हणाली, “ तुला काय जातंय बोलायला बाई , तुम्ही दोघी रानात रोज जाता मला नाही सवय.”

वज्रा म्हणाली, “ मग दामू अण्णाला सांग की, रान घ्यायला व तू ही रोज जा रानात.”

साकरी म्हणाली, “ हो खरंच सांग.”

वज्रा म्हणाली, “ भांडण मारामाऱ्या करायला बडा जोर येतो. अन् साध गड चढताना बरी दमलिस. तुला काय धाड भरलीय उठ चल.”

तेव्हा ती चिडली. व त्या दोघींच्या पुढे भरभर चालू लागली. तशी वज्रा तिला म्हणाली, “ ए गुपचूप माघारी, चालून पाय दुखू लागले तर कोण पाठीवर घेणार, ये या आंब्याच्या गारव्याला विसावा घेऊ.”

त्या थोडावेळ तिथे विसावल्या. शांती म्हणाली, “ तुम्ही काय बाई भीमाचा अवतार हाईसा सगळे गाव पाठवणावर घेऊन फिरशीला विंचवासारख्या.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ तू कौतुक करतेस की टोमणा मारतेस.”

शांती म्हणाली, “तुमची बाई कळ कोण काढेल. तुम्ही गड चढणार्या मावळनी.”

वज्रा म्हणाली, “ हो का अन् तू कोण?”

शांती म्हणाली, “ मी कोण असणार. एक अबला नारी.”

वज्रा म्हणाली, “ तू अन् अबला, चांगली सबला आहेस. सगळ्यांना चुना लावतीस.”

साकरी म्हणाली, “ शांते गप्प बस नाहीतर रप्पाटा खाशील. कशाला लागलीय भांडायला मांजरीनीसारखं.”

थोडावेळ विसावा घेऊन त्या गडाच्या वाटेला लागल्या. गडाची वाट लई गजबजली होती. अनेक लोक गडाला चालले होते.

पुढे पायवाटेने जाऊया असे शांती म्हणाली. वळणाने जाण्यापेक्षा आपण या पाऊलवाटेने जाऊया म्हणजे आपल्याला लवकर पोहोचता येईल.

 तेव्हा वज्रा म्हणाली, “ तुला माहित तरी आहे का ही वाट कुठे जाते ते, उगाच इकडे तिकडे घुसू नकोस. नाहीतर निघालो कोल्हापूरला व पोहोचलो सोलापूरला अस व्हायचं.”

तेव्हा शांती तिच्याकडे मारक्या म्हसीसारखी डोळे वटारून पाहत होती. ती म्हणाली, “ तू आता जरा जरी आवाज काढलास तर बडविन. गुमान चल मागून.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ शांते चल तू पुढे, आम्ही येतो मागून.”

तशी शांती पुढे चालू लागली. तेव्हा साकरी वज्रेला म्हणाली, “ मला ही वाट माहीत आहे. चल गप गडावर जातीय.”

त्या मागोमाग निघाल्या. शेवटी घनदाट झाडीतून वाट काढत ती टेक चढून वर रस्त्याला आल्या. तसे गडावरील पेठ शिवापूर दिसले. त्या लगेच गावातून गडाच्या दिशेला निघाल्या. थोड्याच वेळात गडावर पोहोचल्या. गडावर गर्दी होती. वेगवेगळी दुकाने नटली होती, सजली होती. अनेक खेळण्याची खाद्य पदार्थांची दुकानात रेलचेल होती. प्रथम देवदर्शन घ्यायचं व नंतर जत्रा करायची असे ठरवून त्या मंदिरात आल्या. यात्रेमध्ये गर्दी होती. गर्दीत घुसून त्यांनी भैरवनाथाचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन त्या बाहेर आल्या. नारळ वाढवला व अंगारा, गुलाल लावून त्याची पुडी व भकल आपल्या पिशवीत घेतले. बाहेर येऊन पाहतात तो एक पोरग साकरीचे चप्पल नेताना शांतीला दिसलं. शांतीने त्याला पकडल. ते पोरग निसटण्यासाठी धडपडत होत. तेव्हा वज्रा म्हणाली, “ चप्पल घे व सोड त्याला”

तेव्हा शांती म्हणाली, “ वज्रा चोरी करण वाईट. याला सोडायला खुळ लागलं नाही. वज्ज्याला व चोराला लटक सोडू नये अशी आपली घाटी म्हण हाय.”

तशी साकरी म्हणाली, “ सोडू नकोस त्याला. चल गडाच्या कोपऱ्यात घेऊन.”

त्याकडे माणसे पहात होती. त्याला त्या तिघींनी ऐका कोपऱ्यात नेल. साकरीन त्याच्या कानशिलात लगावली. व म्हणाली, “ शाळा सोडून हेच धंदे करतोस व्हय.”

तेव्हा ते रडायला लागलं. मी पुन्हा करीत नाही असे बोलू लागले.

तेव्हा साकरी म्हणाली, “ वा रे वा चप्पल घेऊन पळाला असतास तर अनवाणी गड मला उतरायला लावला असतास. थांब तुझी गंमत करते.”

असे बोलून तिने त्याचे चप्पल काढून घेतले. व ते गडतटावरून टाकू लागली. इतक्यात वज्राने तिचा हात धरला. व म्हणाली, “ फेकू नकोस त्या चप्पल नाहीतर तो पुन्हा चोरी करेल. व त्याचा चेहरा सांगतोय. अंगावरील कपडे बघ, त्याच्या चोरी करण्यामागे काहीतरी कारण असेल सोड त्याला.”

शांती मध्येच बोलली, “ ओ संतबाई हा काय स्वतः साठी चप्पल चोरत नव्हता. मुलींची चप्पल हव्यात कशाला याला.”असे म्हणत तिने दोन लगावल्या. व त्याला सोडून दिले. तो मुलगा पळून गेला.

या तिघी जत्रेत फिरू लागल्या. तेव्हा त्यांना तालुक्याच्या पेठतील भामट्या दिसला. त्यांना पाहून तो बाजूला खाली मान घालून गेला. त्याना त्या गोष्टीचं हसू आलं.त्या मुलाचे मित्र मात्र त्याकडे कुतूहलाने पाहत होते. इतक्यात शांती म्हणाली, “ साकरे वज्रेला तोंडाचा पट्टा चालवता येत नसला तरी उसाच्या कांड्या घुमवून मारायला बेस जमत.”

तेव्हा वज्रेने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. तेव्हा शांती म्हणाली, “आता काय आपले खरे नाही बुवा.”

तेव्हा वज्रा बोलली, “ हे बघ शांता तुझी नाटक पुरे झाली. चला उठा तळ्यावर जाऊन जेवण करून घेऊ.”

त्या तेथून उठून तळ्यावर आल्या. त्यांनी तेथील मंदिरात आपल्या शिदोरी सोडल्या. व जेवण केलं. त्यानंतर त्या गडाचा तट्ट फिरू लागल्या. गड फिरताना त्यांना एक इसम एका स्त्रीशी बोलताना दिसला. त्यांमध्ये तणाव असल्याचे जाणवले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गडतटावरून सगळ्या पंचक्रोशीच दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी थोडीफार खरेदी करून पुन्हा गड उतरणीला लागल्या. हळूहळू मुख्य रस्ता ओलांडून त्या आडवळणी वाटेला लागल्या. पण चालता चालता त्यांची पायवाट चुकली. व भलत्याच पायवाटेला लागल्या.

वाट चुकल्याची जाणीव खूप अंतर चालून गेल्यावर त्यांना झाली. वज्रेला बोलायला अवसर मिळाला. ती म्हणाली, “ काय ग लई मोठ बोलत असतीस. मघाशी आलेली वाट तुझ्या लक्षात नाही. पुढे जत्रेला नव्हऱ्यासंगे आलीस. तर स्वतः चार नव्हरा विसरून दुसराच घेऊन जायचिस.”

तेव्हा शांती म्हणाली, “ तुला व्यवस्थीत पोहोचवली म्हणजे झालं ना.”

वज्रा म्हणाली, “ घरला पोहोचवतीस की एखाद्या वाघाच्या गुहेत देव जाणे. या झाडीतून वाट शोधता शोधता रात नाही झाली म्हणजे झाल.व एखाद्या हिस्त्र प्राण्याने नाही खाल्ले म्हणजे झालं.”

साकरी म्हणाली, “ ये बाई शुभ शुभ बोल जरा. व तिला एवढं बोलायला, तू पण त्याच वाटेने आलीस मघाशी मग तुझ्या का लक्षात नाही राहिली वाट.”

वज्रा म्हणाली, “ मगाशी बुद्धी जरा गंजली माझी. मला वाटल सगळीकडे पुढे असती. नेईल व्यवस्थित.”

शांती म्हणाली, “ आता आलोय ना वाटेने. काढू वाट शोधून या झांजडीतून.”

तशी शांती वाटेने झांजडीतून वाट काढत निघाली. तशी वज्रा म्हणाली,” ये बघत चल इकडे तिकडे.”

शांती म्हणाली, “ हे बघ उगाच भ्या घालू नकोस. अन् एखाद आलच तर हाय की रामपुरी. अण्णाच्या कपाटातून आणलाय मी. बघितलास नव्ह. काढू कोथळा बाहेर.”

वज्रा म्हणाली, “ कोथळा काढती. तोपर्यंत तुझच तोंड धरायचं ते.”

साकरी बोलली, “ हे बघ भांडण्यापेक्षा तूच काढ वाट.”

वज्रा म्हणाली, “ अस म्हणतेस तर मग चला, आपण पूर्वेकडे सरकलाव आता आपण मावळतीकडे जाऊया. या बाजूला म्हणजे वाट सापडेल.”

बोट दाखवत वज्रा बोलली. त्या त्या मार्गाने निघाल्या. थोडे अंतर गेल्यावर त्याना कोणाच्या तरी भांडत्याला आवाज ऐकू येवू लागला. तशा त्या पुढे गेल्यावर उतरंडीतून खाली सरकली. त्यांनी पुढे आल्यावर पाहिले.मघाशी गडावर वावरत्याले ते जोडपे त्यांना दिसलं. त्यातील स्त्री व पुरूष साथीदार यात जोरदार जुंपली होती. तो इसम त्या स्त्रीला म्हणत होता. तुला आता जित्तीच सोडत नाही. संपवतोच तुला. त्याने आपल्या साथीदाराला इशारा दिला. तशी त्याने लपवलेली कुराड काढली व त्याच्या दिशेनं फेकली. तो तिला मारणार इतक्यात वज्रा ओरडली, तिचा आवाज ऐकून त्या माणसाने इकडे तिकडे पाहिले. त्याला या तिघी दिसल्या. तो म्हणाला, “इकडे काय मरायला आल्यासा. थांब तुम्हाला पण दाखवतो. आधी हिचा काटा काढतो.”

तेव्हा शांतीने रामपुरी चाकू काढला. तो पाहून तो हसत म्हणाला, “याने काय करणार कांदे कापणार. ये शाम्या धर तिला.”

तसं परिस्थिती पाहून साकरीने आजूबाजूची दगडे गोळा केली. व एक दगड झेलत ती म्हणाली, “हाय तिथंच थांब. नाहीतर टकुर फोडीन. आम्हाला सोडायचं राहू दे तुझा जीव वाचीव आधी.”

तेव्हा तो दुसरा इसम म्हणाला, “तुला काय कैरी वाटलो काय मी?नेम आहे का?”

साकरी म्हणाली, “ आजमावून बघ. एक वेळ महाभारतातील अर्जुनाचा बाण चुकल पण या साकरीचा नेम अख्ख्या पेठत प्रसिद्ध आहे.”

तरी देखील  तो पुढे येऊ लागला. साकरीने नेम धरून दगड मारला. एखादी भिंगरी फिरवू तसा तो दगड निघाला. बघता बघता त्याच्या टक्कुर्यात बसला. तो रक्तबंबाळ होऊन खाली बसला. ते पाहून त्याचा मित्र हबकला. व रागाने त्याकडे पाहू लागला. इतक्यात ती स्त्री त्याला धकलून या तिघिंजवळ आली.  तो रागाने त्याच्या अंगावर धावून आला. साकरीने जोराचा दगड त्याच्या गुडघ्याचा नेम धरून मारला. त्याच्या गुडघ्याची वाटी फुटली.  तो कोकलू लागला. याच संधीचा  फायदा या तिघींनी घेतला. शांतीने इशारा करताच त्या  धावू लागल्या. शांती व साकरी मागोमाग धावू लागली. पळता पळता. त्याना वाट सापडली. तशा त्या पायवाटेन धावू लागल्या. त्याना गड उतरणीची वाट पुढे सापडली. तस  त्या वाटेनं पुढे पळाल्या. थोड अंतर गेल्यावर लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले. त्याना मुख्य सडक मिळाली. सडकला अनेक लोक गड उतरताना दिसू लागले. तस त्याना बर वाटल. त्या लोकांमध्ये मिसळल्या. थोड अंतर गेल्यावर शांती म्हणाली, “काय पण म्हण साकरे नेम भारी आहे हा तुझा.”

साकरी म्हणाली, “ असनारच शाळू राखाय जाते ना मी आज्या बरोबर. त्यानेच मला नेम शिकवला.आता माझा आज्जापेक्षा मस्त नेम आहे. अन् भांडणात गडी कसा घायाळ करायचा ते मी आज्जी कडून शिकले. कशी गुडघ्याची वाटी फोडली.”

चालता चालता शांतीने त्या बाईला विचारल, “कोण ग बाई तू? अन् तो मारणारा कोण?”

ती म्हणाली, “ काय सांगू बाई. आज देव पाठीशी म्हणून वाचले. माझा नवरा  मूल लहान असताना मरून गेला. भावकी इस्टेट लाटल म्हणून या पाटलाचा नाद धरला. पण हाच उलटला. व  माझी इस्टेट लाटण्याचा प्रयत्न करू लागला. मी जरी अडाणी असेल तरी माझ्या मुलाचं भविष्य मलाच पहिलं पहिजेत. हा मला फसवत होता. याने मला जत्रेच्या बहाण्याने आणले. व कागदावर अंगठा उठवून घेतला. मी भांडते म्हंटल्यावर माझा काटा काढाय पहात होता.

 तेव्हा वज्रा म्हणाली, “ तुला कोणी सांगितलं होत. त्याच्या नादाला लागायला.”

तेव्हा शांतीने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. तेव्हा ती स्त्री म्हणाली, “ व्हय बाई तुझं बरोबर हाय, पण भावकी लई वंगाळ माझी. तिच्यासंग लढा द्यायसाठी म्हणून हा सोगा धराय गेले. पण तोच माझ्या मानगुटीवर पडेल याच मला भानच राहील नाही.”

शांती म्हणाली, “ झाल गेलं गंगेला मिळालं. पण त्यान तुझा अंगठा घेतलाय म्हंटल्यावर तुझी इस्टेट लाटील की तो.”

तेव्हा ती म्हणाली, “ कसा लाटील मी त्याला लाटू दिली तर.”

साकरी तिचं बोलण ऐकूण म्हणाली, “आर्ध्या डोचक्याची बाई कधीच कडेला जात नाही.”

ती बाई म्हणाली, “ मी काही अडगी नाही. माझा कागद माझ्या जवळच आहे. बघितल नव्ह तो मला माराय कुराड घेऊन टपला होता. का माहिताय. मी तो कागद त्याच्या हाताला लागणार नाही अशा पेटीत बंद केलाय.”

असे म्हणत तिने आपल्या पोटावरून हात फिरवून घेतला.

वज्रा म्हणाली, “ बरोबर हाय हुशार हाईस म्हणायची.”

“ हो हाईच मी हुशार, उगाच त्याच्या मागून गोडगोड बोलत फिरत नव्हते. तो कागद मघाशी मी घेतला व हया पेटीत बंद केला. तो मला आडगी समजत होता. पण मला माझ्या पोराचं भविष्य उध्वस्त करायचं नाही. त्याला वाटलं असल डोंगरातून फिरणारी करवंदाच्या जाळीतील फुलं घालणारी ही फसल. पण मी जरी डोंगरी असले तरी याला गाडून उरीन.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ होय तू गाडणारी माझा नेम बसला म्हणून बर झाल, नाहीतर आता बसली असतीस ढगात राम कृष्ण हरी म्हणत. मड देखील मिळालं नसतं कुणाला. त्या पेठच्या महादेवाची कृपा झाली तुझ्यावर व या शांतीची वाट चुकली. व आम्ही तिघी दत्त होऊन उभ्या ठाक लव.”

तेव्हा ती म्हणाली, “ खरंच हाय, महादेवाची कृपा झाली.तुमच्या तिघिंचे उपकार जन्मभर विसरणार नाही मी.”

 शांती म्हणाली, “हे बघ आता त्या पाटलाचा नाद सोड. उगाच विस्तवाशी खेळ नको. तुला जर कामधंदा नसलं तर ये आठवड्याच्या बाजाराला तुला मी मदत करते. व माळव विकणाऱ्या हाणमाकडून तुला माल घेऊन देते. तो विक अन् चालावं तुझा प्रपंचा. उद्याच्या बाजारी आलीस की तुला ते दामा वेलणकरांच दुकान माहीत आहे नव्ह. तिथ ये. मी तुला मदत करेन. बोलता बोलता गड केव्हा उतरला. याचे भानच राहिले नाही.

पुढें त्या बाईच्या गावाकडे निघालेल्या ट्रॅक्टर मध्ये तिला चढवली. व या आपल्या गावी पोहोचल्या.

समारोप

काळ सरत चालला होता आता या तिघींना मागण्या येऊ लागल्या होत्या. साकरीच्या बापाने साकरीचे लग्न जमवले होते. तिला चांगला करवीर भागातील नव्हरा शोधून काढला होता. चार तोळे सोने व दारात अक्षता टाकून त्याने लग्न लावून दिले. वज्रेला पण स्थळे येत असत. पण बरीच भट असणारी. त्यांची शेंडी पाहून शांती नाक मुर्डे व ती स्थळे मोडी कारण एखादा चांगला नोकरदार तिला मिळावा असे तिला वाटे. शेवटी दूधगंगा काठचे एक स्थळ आले होते. शांतीला ते पसंत नव्हते. तिने नवऱ्याच्या चहात मुद्दाम मीठ घातले. पण तो मुलगा पण बिलंदर होता. तो चहा गटागटा प्यायला. व मुलगी पसंत आहे असे त्याने ठासून सांगितले. व सुपारी फोडली लगीन ठरले. वेदेच्या खोऱ्यातील वज्रा दूधगंगा काठी नांदायला गेली. वज्रेच लग्न झाल्यावर शांती उदास राहू लागली. तिच्या वडिलांनी पण तिचा विरोध असूनही तिचे लग्न एका सोनार पेठेतील मित्राच्या मुलाशी ठरवले. शेवटी थोरांच्या पुढे तिचे काही चालले नाही. शेवटी लग्न झाले. नाखुशिने शांतीने त्या मुलाच्या गळ्यात हार घातला. तो मुलगा हसत होता. शांती मात्र मनात म्हणत होती की अरे, बेट्या आजचा दिवस हसशील नंतर आयुष्यभर रडशील. तिच्या लग्नास साकरी व वज्रा पण आली होती. पण लग्न झाल्याने त्या मनमोकळ्या वागू शकत नव्हत्या. लग्न झाल्यावर घासभर खाऊन आश्रुपुर्ण डोळ्यांनी त्यांनी एकमेकींचा निरोप घेतला. आता त्या कधीतरी माहेरी आल्या की भेटत असतं. आता त्यांच्या आयुष्यातील स्वातंत्र्याची बंधने हरवली होती. व लग्नाच्या बेडीत त्या अडकल्या होत्या. व स्वतःचा संसार पाहण्यात मग्न होत्या. लहानपणी व लग्नाआधी केलेल्या गंमती जमती त्यांना आठवत व हसू येई. आपल्या पुढील आयुष्याच्या वाटेवर आपली मुलंबाळं यामध्ये आपले बालपण त्या शोधत होत्या. कधीतरी माहेरी आल्यावर गाठीभेटी व्हायच्या. जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या. व त्या आठवणीच्या हिंदोळ्यावर त्या पुन्हा आपल्या सासरी संसाराचा गाडा चालवायला सिद्ध व तयार व्हायच्या. जीवनातील अनेक संकटाना सामोऱ्या जात त्या मार्ग काढत जगत होत्या. देवघरातील समईतील वातीसारख्या तेवत होत्या.

… … …



रविवार, १८ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २४

 कथा वाकाटखोर्याची भाग २४

२४) उतारा

लेखक: निशिकांत हारुगले

दुसऱ्या दिवशी सकाळी वज्रा, साकरी व शांतीने धूणं धूवायला नदीला जायचे ठरवले. त्या तिघीजनी नदीच्या वाटेला लागल्या. नदीच्या वाटेवर उंबरणीच वळण लागलं. तिथे झाडाखाली मापट्याचा भात व बाजूला उताऱ्याच समान ठेवलेलं दिसलं.

साकरी म्हणाली, “ कुणी ग बाई ह्यो निवद ठेवलाय म्हणायचा.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ काल बुधवार होता कुणीतरी ठेवला असल.”

तशा त्या तिघी नदीला पुढे गेल्या. नदीवर अनेक बाया धुणं धुवायला जमल्या होत्या. रखमा पाटलीन मालुला धुणं धूत म्हणाली, “ काय बाई लक्ष्मीची झडती मला पहावतच नाही. नुसत ढोरावानी राबतय नुसतं. अन् तिचा त्यो बिनकामाचा नव्हरा पडलाय डोचक फोडून नव्ह. कधी म्हशीला पेंडी पण सोडून न घालणारा, नुसता कपाळा पुरताच हाय म्हणायचा. पडल्यापासून लक्ष्मीन पायाला भिंगरी बांधलीय या देवरुष्याकडे जा तो भट बघ सगळ केलं. शेवटी तालुक्याचा डाक्टर पण बघितला. आता कुठं सरळ झालाय.”

तेवढ्यात मालू म्हणाली, “तयार होऊन काय उपयोग साधी वज्जाची गाठ सोडत नाही. काय कामाचा ना धामाचा.”

इतक्यात साकरी म्हणाली, “मालूअक्का कामाचा नाही कसा, दारूची बाटली एका दणक्यात रीचवतो नव्ह.”

तेव्हा रखमा पाटलीन म्हणाली, “गप्प साकरे, थोरा मोठ्या माणसा विषयी अस बोलू नये.”

तेव्हा मालू म्हणाली, “ काय चुकीचं बोलतेय साकरी , खर तेच बोलतीय दारू प्यायच्या कामाचाच आहे. या दारू पाई भुतनिंच्या मेळ्यात सापडला नव्हे.”

अशा गप्पा टप्प करत त्या धूणं धुवू लागल्या. वज्रा शांती साकरी यांनी झपझप धुण धुतलं. व घरला यायला निघाल्या. मालू गुरवीनीच धुणं धुवून झाल होत. ती पण वाटेला धुणं घेऊन लागली. उंबरनीच्या वळणावर त्यांनी पाहिलं तिथं जना पाटलीनीची म्हस् उंबारणी खालच्या निवदावर यथेच्छ ताव मारत होती. व जना पाटलीन तिथे काठी घेऊन उभा होती. ते पाहून मालू तिला म्हणाली, “ आग ये म्हातारे, म्हशीन निवद खाल्ला नव्ह. म्हसीच्या माग भुतावळ लागलं नव्ह,दूध द्यायची बंद होईल. अन् तू काय बघत उभारलीयास.”

तेव्हा जना पाटलीन म्हणाली, “भूतावळ की फितावळ. आजपतूर माझ्या म्हशीन या उंबरानी खालचे निवद कितीदा तरी खाल्ले असतील, कवा दुधाला तक्रार जमायची नाही. उलट खोगलाभर जास्तच देती. मला भुतावळ लागायला माझ्या म्हातारी जवळ हाय तरी काय. खुट्या एवढी असल्या पासन प्रपंच करतेय. मला नाही कवा लागीर फागीर झाल.”

तेव्हा मालू म्हणाली, “ तुला कशाला लागारतील, तुलाच बघून पळतील. त्या लक्ष्मीन ठेवलाय निवद तिच्या नवऱ्यावरुन उतरून. आता बस वरडत.”

जना म्हणाली, “ त्या लक्ष्मीचं व तुझ कौतुक पुरे. तिला अन् तुला नाही काम. बेवड धडपडल अन् तंगडी मोडून बाजल्यावर पडल. त्या परड्यातनी मी कितीदा वावरते. हजारदा त्या परड्याजवळच्या कुडाण्यातील वैरण आणून बैलासनी अन् म्हशीसनी घातली असल. दाल्याच्या पाटन भाताच्या मळणीसाठी हजारदा रातीच बारा बारा वाजेपर्यंत शिवारात राहिले. आम्ही नाय कवा भूतं बघितली. अन् असल्या दारुड्यांना बर लागीरतात. ती लक्ष्मी म्हणजे कोकणी सुपारी. त्या कडगाव, पाटगावच्या बायका अर्ध्या घागरी साऱ्या, ना व्यवहाराच्या, ना कामाधामाच्या देवळात व भुतावळीत वावरणाऱ्या. तिला पण चांगल कारण गावल असल निवद ठेवायला. अन् अंगार धुपार फुकायला. त्या बिनकामाच्या नव्हत्याच कवतिक करतीय. ढोरासारख नुसतं राबल म्हणजे संसार होत नाही. ना धड शेंडा ना बुडका, कसलं राबन म्हणायचं. नुसत बैलासारख राबल म्हणजे संसार होत नाही. मी पाहिजे होते तिच्या जागेला. त्या बेवड्याची दारूच उतरून, चांगला सुतासारखा सरळ केला असता तेला.”

तेव्हा मालू म्हणाली, “ लई बोलती म्हातारी पोपटावाणी पिंपळावरची हाडळ कुठली.”

तेव्हा म्हातारी जना म्हणाली, “ माले मला हडळ म्हणतीस व्हय, जा बघ जा तुझं थोबाड आयन्यामधी, तुझ्यासारख दोन दोन दिवसांनी अंघोळ नाही करत मी. रोज सूर्य उगवायच्या आधी अंघोळ करून तयार असते. तुझ्या सारखी देसोरी नाही मी. जा गप्प वाटणं. खाऊ दे माझी म्हस् निवद, अन् लागरु दे मला भुतावळ. तुला उतारा टाकाय बोलावत नाही मी जा.”

तेव्हा मालू तिला म्हणाली, “ तुझ्या नादाला लागायला कुणाला वेळ आहे. जाते मी.”

असे बोलून ती वाटेला लागली. तिच्या माग या तिघी हसू येत असताना तोंड दाबून गुमानं मांजरागत घरच्या वाटेला लागल्या.

क्रमशः पुढे…….


शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २३

 कथा वाकाटखोर्याची भाग २३

२३) लक्ष्मीच्या नव्हर्याची दशा

लेखक : निशिकांत हारुगले.



सकाळ झाली. चुलीच्या धुराने या तिघींची साखर झोप चांगलीच उडाली होती. वज्रा व साकरी आपले अंथरूण घेऊन खाली आल्या. पाठोपाठ शांतीपण आली. दमाजीपंत पूजा करत होते. साकरी व वज्रेला जाताना पाहून शांतीची आई म्हणाली, “ पोरीओ चहा तरी घेऊन जावा.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ नको काकू आधीच उशीर झालाय. घरी काम ही आहे.”

त्या दोघी निघून गेल्या. शांती दात घासायला न्हाणीघरात गेली. तेव्हा सुंदरी म्हणाली, “ सारखी भूतावाणी फिरतीस, बोलले तर एकत नाहीस. काल त्या लक्ष्मी शिंदीचा नव्हरा भुतनींच्या मेळ्यात गावला. रात्री पासून बोबडीच ववलीय त्याची, लक्ष्मीन पांगिरला मानसं पाठवली भूत उतरवायला. अन् तो नाम्या पळाला, पाय मुरगळला त्याचा, टकुर फोडून बसलाय. त्याची बायको भगाटल्या पासून बसलीय रडत. तुला हजारदा सांगितलं त्या शिंद्यांच्या परड्यात जात जाऊ नको फुलबिल आणायला.नाहीतर एक दिवस तुलाच झपाटायचं.”

शांतीला हसू येत होत. पण तिन ते दाबून धरलं. ती म्हणाली, “ बेवड दारू पिऊन कुठं तरी धडपडल असल. व जिरायला थापा लावत असल.”

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ हो तर तुला सगळ्याच थापा वाटतात. तू तेवढी खर्याची पुतली नव्हं. उगाच खिदळतय एक दिवस तुलाच धराय पाहिजे, तवा राम आठवलं.”

“मला लागराय त्या भुतांची पितर जरी उतरली तरी त्यांना पण चिरडून टाकीन एखाद्या चीलटासारखं. उगा मला भ्या घालू नकोस. आशा गोष्टींनी मी घाबरणार नाही.. तू बस भाकऱ्या बडवत. “

तेव्हा सुंदरा म्हणाली, “ हो मी भाकऱ्या बडवते, तू त्या खा अन् जा गाव फिरायला.”

तेव्हा शांती म्हणाली, “ होय , जाणारच आहे. तू येतेस काय मागून फिरायला”

तेव्हा शांतीची आई चिडली व म्हणाली, “उगाच वटवट करू नको. तोंड बंद कर नी गुमान आटप नाहीतर पेटत कोलीत बघितलस काय?”

तेव्हा तवा तापलय हे जाणून शांती शांतपणे दात घासत आवरु लागली.

वज्रेला पण घरी गेल्यावर शिंद्यांच्या घरातील रामायण समजले होते. ती गुपचूप आपल्या कामाला लागली.

शिंद्यांच्या घरात माणसांची रीघ लागली होती. या मात्र आपले जेवणखाण करून बारा वाजता एकत्र आल्या. शिंद्यांच्या घरला जायच्या आधी साकरीच्या परड्यात जमा झाल्या. पोटभर हसून घेऊन या शिंद्यांच्या लक्ष्मीच्या घरी जायला निघाल्या. तिच्या घरात अनेक आया बाया जमल्या होत्या. बाप्या मानस कट्टीवर बसली होती. लक्ष्मी जोत्यावर बसून रडत होती. बाजूला नव्ह र झोपला होता. सारखी वळवळ करत होता. वज्रा शांती साकरी क्रमाने आत आल्या.

वज्रा शिंद्यांच्या लक्ष्मीला म्हणाली, “ काकू काकांना खूप लागलंय का?”

तेव्हा लक्ष्मी म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. माझा वनवस अगदी सितवाणी हाय बघ. काल गावच्या पोरांनी सिनेमा आणला. म्हणून गेले पाहायला. अन् हया बाबाला दारू प्यायला रान मोकळं भेटल. रातच्याला परड्यात नाम्या शिंप्या बरोबर गेला. अन् गावला नव्ह भुतांच्या मेळ्यात. रातपासून बोबडीच वळलीय नव्ह.”

इतक्यात लक्ष्मीचा सासरा म्हणाला, “ बर झालं. आता समजल दारू प्यायची.”

तेव्हा लक्ष्मीची सासू डोळे वटारून म्हणाली, “ तुम्हाला नुसतं टोचून बोलायला लई येते. पोरग हातच जाईल. तेच काय नाही. माझं पोर दारू पिऊ दे, नाहीतर गडागडा लोळणा. तुम्हाला पोराचं कधी कवतुकच नाही. लेकी पाहिजेत लेकी नुसत्या. काय करायच्या त्या, आम्ही मेल्यावर वेशितन टाळा पगळून येवून रडायच्या अन् बारा दिवसाला पातळ नेसून जायच्या. माझं पोर बारा मुलुख हिंडून येवु दे, अन् माझ्या मड्यावर लाथेन माती सारु देत. फिटलं माझं पांग म्हणीन.”

तेव्हा लक्ष्मीचा सासरा म्हणाला, “मड्यावर का जिवंतपणी माती घालील बघ. दारूची बाटली काळी का गोरी बापजन्मात मी कधी पाहिली नाही. कवा सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही मला. अन् हे कारट दारूच्या बाटल्या ओतून घेतय घाट्यात. अन् ही लागली फूस लावाय तेला. अशानच वाटोळं व्हायची पाळी आलीय. दारू प्यायला गेला नसता तर असा तंगड्या वर करुन बाजल धरून पडला नसता.”

“ ती गरीब बिचारी लक्ष्मी राबती म्हणून आम्हाला म्हातारपणी चार घास खायला मिळतात.घरात दाणापाणी दुध दुभत दिसतंय नाहीतर तुझ्या लेकाच्या दारून फास तेवढा ठेवलाय घाटयाला लावायचा.”

असे लक्ष्मीचा सासरा बोलताच सासू गप्प मांजरीणीसारखी बसली. साकरी व वज्रा गुपचूप ऐकत होत्या. इतक्यात शांती बोलली, “झाल गेलं गंगेला मिळालं. आता सुदरेल तो, नाही प्यायला परत जायचा दारू.”

तेव्हा लक्ष्मी म्हणाली, “ हू.. ही सांगती मला, एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवल, पण ह्यो काय बाबा दारू सोडायचा नाही. ह्यान मांडलेला खेळ आता मलाच निस्तराय पाहिजेत. आता अस बसून भागत नाही. आता भटाबिटाकड, देवरश्याकड जाऊन काय उपयोग नाही. मीच जावून एखादा चांगला डाक्टर आणते. अन् या बाबाला सरळ करते. बिन नवहऱ्याचा संसार काय माझ्या कामाचा.”

असे बोलून आपल्या दंड घातलेल्या लुगड्याचा पदर तीने डोईवर घेतला अन् ती उठली. अन् घरातून बाहेर पडली अन् वरल्या आळीच्या दिशेनं निघाली.तिच्या मागोमाग या तिघी बाहेर पडल्या. व घरी निघाल्या. थोड अंतर गेल्यावर शांती म्हणाली, “ कालच्या भूतनिंनी चांगलीच गंमत केली. म्हणायची.”

शांती म्हणाली, " गंमत तर झाली. पण लक्ष्मीकड पाहिल्यावर वाईट वाटत. ही गंमत तिला चांगलीच महागात पडणार.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ चला गप, ती लक्ष्मी माप घट्ट हाय हे निस्तरायला. अन् तुमचं कुणी ऐकलं तर तुमचीच गम्मत व्हायची. या विषयाला येथेच पूर्णविराम चला आता.” त्या तिघी आपापल्या घरला निघून गेल्या.

क्रमशः पुढे….



कथा वाकाटखोर्याची भाग २२

 २२)गावतंबुतील सिनेमा

लेखक:  निशिकांत हारुगले


उन्हाळ्याचे दिवस होते. गावातल्या तरुण मुलांनी पैसे गोळा करून सिनेमा आणला होता. व तो तिकीट काढून पाहण्यासाठी ठेवला होता. साकरी व वज्राच्या घरातल्यांनी त्यांना सिनेमा पाहायला जायचे नाही असा सज्जड दम भरला होता. त्यामूळे त्या हिरमुसल्या होत्या. कारण सिनेमा पाहून मुली बिघडतात असे कोणीतरी त्यांना सांगितले होते.

दुपार झाली शांती, वज्रा व साकरी वज्रेच्या घरी जमल्या होत्या. त्या वज्राच्या परड्यात आंब्याच्या झाडाखाली गेल्या. आंब्याला चांगल्याच मोठाल्या कैऱ्या लागल्या होत्या. शांती झपझप झाडावर चढली. व तिने कैऱ्या काढून त्या दोघींकडे टाकल्या. व ती खाली उतरली. त्या दोघींचा चेहरा पडलेला पाहून ती म्हणाली, “ काय एका सिनेमासाठी तुमचा हा अवतार.”

तेव्हा साकरी म्हणाली, “तुझ  आपलं बर हाय, तुझे बाबा तुला काय सुट देतात. तशी आम्हाला नाही.”

तेव्हा शांती म्हणाली, “ माझ्या बापाण काय मला पहिल्या नंबरच तिकीट आणून दिल्यासारखच बोलतेस.”

तेव्हा वज्रा बोलली, “काय तुला पण परवानगी नाही.”

शांती नाही म्हणाली.

वज्रा बोलली, “ मग आता काय करायचं?”

तेव्हा शांती म्हणाली, “ हे बघा आपल्या घरातील मोठी माणसे सिनेमा पाहायला जाणार. तेव्हा आपण तिघी आमच्या घरी झोपायच. मग नंतर काय करायचे ते मी सांगेन.”

तेव्हा त्या तिघी आपली खलबत्ते योजून आपापल्या घरी गेल्या.  संध्याकाळ झाली. साक्री आपल्या वडिलांना म्हणाली, “ मी घरात एकटी राहणार नाही. जर मला सिनेमा पाहायला नेणार नसालं तर मी शांतीकडे झोपायला जाणार. व हे जर मंजूर नसेल तर मला पण सिनेमाला न्या.”

असे म्हणताच घरातल्यांनी परवानगी दिली .

इकडे वज्रा पण घरात परवानगी मागू लागली. तेव्हा वडील तिला म्हणाले, “ की आजी जवळ कोण तरी हवे.”

तेव्हा वज्रेला मोठे कोडे पडले. तेव्हा ती म्हणाली, “ वा.. वा तुम्ही करा मज्जा मी तेवढी इथ बसते एकटी आजीजवळ. ते काही नाही मी शांतीकडे झोपायला जाणार.”

शेवटी पार्वती म्हणाली, “ मी थांबते. तू जा शांतीकडे झोपायला.”

असे म्हणताच वज्रा खुश झाली. तिने आईला मिठी मारली. रात्री जेवण आटोपल्यावर  साकरी वज्रेच्या  घरी अंथरूण घेऊन आली. व त्या दोघी शांतीच्या घरी झोपायला गेल्या.

शांती त्यांची घरामध्ये वाटच पाहत होती. त्या आल्यानंतर तिने त्यांचे अंथरूण पांघरूण वरती माडीवर ठेवण्यास सांगितले. तेव्हा दामजीपांत जेवण करून पलंगावर पान खायला बसले होते. ते या तिघींनी पाहून म्हणाले, “ काय ब्रम्हा, विष्णू ,महेश आज एकत्र आलेत.”

तेव्हा शांती म्हणाली, “ ते तर रोजच येतात. तुम्ही खावा गप्प पान.”

तेवढ्यात आतील काम आटोपून सुंदरा बाहेर आली.या तिघींनी पाहून ती म्हणाली, “या तिघी एकत्र आल्या.की मला भीतीच वाटते बघा.”

तेव्हा शांती म्हणाली, “ तुझ्या घरात काही धाड नाही टाकत आम्ही “

असे म्हणून त्या तिघी माडीवर गेल्या. शांतीने घोंगड अंथरल. वर धुपटे टाकले. व त्याना अंथरूण व्यवस्थित कराय सांगून ती पाण्याचा तांब्या आणायला गेली. तेव्हा सुंदरा व दामाजी सिनेमाला निघाले होते. मुलाला झोपवून जातो म्हणाले. तेव्हा तो उठला की दंगा करेल असे तिने सांगितले. तेव्हा त्यांनी बाळाला आपल्या बरोबर न्यायचे ठरवले. व ती दोघे राऊळाच्या पटांगणाकडे सिनेमा पाहायला गेले. 

राऊळाचे भव्य पटांगण पांढ-या कपड्याच्या कनातीने वेधले होते.  तिकिटे घेऊन लोक आत जाऊन बसत होती. लहान मुले दंगा करत होती. लोक सिनेमा पाहायला मिळणार म्हणून आनंदी होती. प्रत्येक जण आनंदी होता  थोड्या वेळाने सिनेमा सुरू झाला.

इकडे शांतीने वज्रा व साक्रीला झोपण्याचे नाटक करायला लावले. व ती खाली आली. आई बाबा गेल्याची खात्री करून तिने पुढील दार बंद आहे का पाहून ती मागील दारी आली. तेथील दाराला भले मोठे कुलूप होते. ती ते पाहून पेचात पडली. व मागे फिरून ती माडीवर आली. 

आता काय करायचे या विचारात ती त्यांपुढे बसली.  वज्रा व साकरी अंथरुणावर बसल्या होत्या. ती त्यांना म्हणाली, “ इथं झोपा काढायला नाही बोलावले तुम्हाला, उठा चला माझ्याबरोबर व तीने खाली जाऊन दोन्ही दारे बंद असल्याची खात्री केली. व पुन्हा जिन्याच्या दाराची कडी लावून ती माडीवर आली.

त्या दोघींना माडीवरल्या दरवाजाने माळीतून मागल्या सोप्यात आली.तेथील माळा उंचीला लहान होता.त्या माळ्यावरील बेंगलोरी खापर्या काढल्या. व आपण प्रथम तेथून बाहेर आली. नंतर वज्रा व साक्रीला बाहेर येण्यास सांगितले. त्या ही पाठोपाठ आल्या. खापरीच्या जोडावर पाय देत हळूहळू न्हाणीघराच्या कोपऱ्यात आल्या. तेथील पेरवनीच्या झाडावरून खाली उतरल्या. व रखमा पाटलिनीच्या परड्यातन पुढे निघाल्या. तिथे आल्यावर वज्रेला गिरणीत लक्ष्मीने सांगितलेली गंमत आठवली. ते पाहून शांती म्हणाली, “ आधीच अंधार अन् त्यात तुला खोकळायला काय झालं.”

तशी वज्रा शांत चालली. साकरी लगेच म्हणाली, “ शांते, राहू दे चल सिनेमा तो उगाच रात्रीच या परड्यात सापकिरड असतात.”

शांती म्हणाली, “ गप चला आता सिनेमा पहायचा म्हणजे पाहायचाच.”

पाटलीनीच परड संपल. अन् शिंद्याच लागलं. त्या परड्यात परसदारी उंच करंजीच झाड होत. त्यावर पहिल्यांदा शांती चढली. त्या पाठोपाठ वज्रा व साकरी पण चढल्या. वरती चढायला लई सोपं झाड होत. वर जाऊन फांद्यांच्या गेचक्यात जाऊन त्या बसल्या. तेथून देवळाच्या दारातील सिनेमाचा पडदा दिसत होता आवाज पण थोडा थोडा ऐकू येत होता. शांतीच्या पुढे ऐक डहाळी करंजीची आडवी येत होती. ती तिने मुरगळून खाली टाकली . 

सिनेमा अर्धा झाला. तस त्या फांदीच्या गेचकात बसून त्या अवघडल्या. थोड्या वेळाने शिवाराच गार वार सुटलं. तसी थंडी जाणवू लागली. वज्रेला थंडी वाजू लागली. तशी तिला हुडहुडी भरली ती थरथरू लागली. तेव्हा शांती म्हणाली, “काय झालय, थरथरायला. परत आवाज केलास तर दिन ढकलून खाली.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “तुला काय तुझ्यासारख नाही माझं. तुला काय बर्फाच्या लादिवर जरी झोपवली तरी काय व्हायचं नाही. एकवेळ तो बर्फ वितळेल. पण तुला थंडी वाजायची नाही.”

तेव्हा शांती हसू लागली. व त्या तिघी सिनेमा पाहायला लागल्या. तेवढ्यात त्यांना कोणतरी घोरत्याला आवाज आला. तेव्हा आवाज कुणीकडून येतो ते शांतीने पाहिलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं. की दुसऱ्या ढांपीच्या गेच्क्यात बसलेली साकरी घोरत होती. 

शांतीने डोक्यावर हात मारून घेतला. व म्हणाली, “ देवा महादेवा कसल्या मैत्रिणी पदरात बांधल्यास यांच्यासाठी एवढा आटापिटा केला. अन् मी यांना इथपर्यंत आणल्या. व या सिनेमा पाहायचा सोडून एक लागलंय मांजरीणीसारख कुडकुडाय व दुसर लागलंय घोराय.”

शांतीने करंजीची डहाळी मोडली. व साकरीला खुचकाय सुरू केलं. तशी ती निजच्या तंद्रीत बडबडू लागली. ‘आबा मी शेण काढते, धारा काढते. पण जरा झोपते. नंतर काढते…’

तिचे बडबडणे ऐकून वज्रा हसाय लागली. व म्हणाली, “ अग बाई, आता अन् ही काय गंमत म्हणायची, हिला आता गोठा दिसाय लागला वाटत. जाबडाय लागलीय.” तशी तिला जागी केली. ती म्हणाली, “वाजवत जाऊ दे तो सिनेमा, चल झोपायला जाऊ.”

शांती म्हणाली, “ आणखी थोडा वेळ बघुया.”

थोड्या वेळाने शांती म्हणाली, “ इथ आलो सिनेमा पाहायला अन् आमचाच सिनेमा व्हायची पाळी आली. चला जाऊया.”

त्या करंजीवरून खाली उतरू लागल्या. पण तेवढ्यात शिंद्याच परडच दार उघडल. अन् लक्ष्मीचा नव्हरा अन् शिंप्याचा बेवडा नाम्या परडला आलीत. ती थेट परसपरड्यापर्यंत. नाम्यान कमरेला लपवलेली दारूची बाटली काढली. व आपल्या घाट्यात वतली तशी ती दोघं फेराफेरान पिवू लागली. या तिघी आता चांगल्याच पेचात पडल्या.

तशी साकरी म्हणाली, “ आता काय करायचं ग शांते. आपणं गावलो तर बा मला पहार्यातच ठेवील.”

वज्रेच काळीज धडधडायला लागलं. त्यांचा आवाज त्या बेवड्या नाम्याला अस्पष्ट ऐकू आला. तो दारूच्या तंद्रीत बडबडला, “ कोण हाई. .ती..ती..थ.”

तस शांतीन मनात ठरवल आता याची गंमतच करायची.तीन करंजाची डहाळी हालवली व मोठ्यानं किंचाळली.अन् म्हणाली, “अरे माकडा, मला विचारतोस कोण हाय ते. थांब दाखवते तुला, बर झाल आलास इथं, माझ्या मेळ्यात एक मुंजा पाहिजेच होता. तुलाच घेते थांब आलोच.”

असे मोठ्यानं ओरडताच त्या दोघांची दारू दणक्यात उतरली. त्यांचे हातपाय लटलट कापू लागले. ते पाहून शांतीने वज्रा व साकरीला किचळायला सांगितले. त्या ओरडू लागल्या. त्यांच्या आवाजाने ती निरव शांतता भंग पावली.त्या आवाजात रातकिड्यांची किरकिर भर घालत होती. 

ते दोघे घाबरून दारूची बाटली तिथेच टाकून पळाले. त्या तिघी खाली उतरल्या. त्यांना हसू येत होत. पण त्यांनी ते तोंड धरून दाबून धरल. साकरीची मात्र झोप चांगलीच उडाली होती. अंधारातून वाट काढत त्या तिघी शांतीच्या परड्यात आल्या. 

या गडबडीत वज्राचा पाय शेणाच्या गारीत गेला. तिने तो बाहेर काढून माती लावून सुका केला व ती त्यांच्या पाठोपाठ पेरवनी जवळ आली.

 एकामागून एक झाडावर त्या चढल्या. व नंतर खापरीवरून पुन्हा खाप्र्या काढलेल्या ठिकाणातून आत उतरल्या. शांतीन एक पोतेर दिले. त्याने वज्राने पाय सुका केला. नंतर न्हाणीघरात जाऊन तिने तो धुतला. तोपर्यंत शांतीने खाप्र्या घातल्या. व अंग झाडले. त्यांनी पण हातपाय धुतले. व सूके करून पुढील दार तपासले. बाहेरून कडी घालुन आई कुलूप लावून गेली होती. ते तपासून त्या अंथरुणावर आल्या.

साकरी म्हणाली, “ त्या दोघांनी आपल्याला पाहिलं तर नसेल ना?”

शांती म्हणाली, “ ते काय बघत्यात. त्यांना आज्जा आठवला असेल बघ..”

त्या हसू लागल्या. व झोपी गेल्या.

….. ….. ……




रविवार, ११ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २१

 २१)पितृ पंधरवडा व सत्यवादी माणसे

लेखक : निशिकांत हारुगले


गणपती पाण्यात पडले की पितृ पंधरवडा चालू होतो. दरवर्षी नियमाप्रमाणे यावर्षी ही तो आला. सुगिची सुरवात व पित्रांचे श्राध्द नेमाने येई. वज्राचे घरी श्राध्द असल्याने सकाळपासून लगबग होती. श्राद्धविधी करण्यासाठी शयनग्रामहून गणेश चंद्र भटाला बोलावले होते. यथाविधी श्राध्द झाले. गणेशचंद्रभट जेवायला बसला. चांगला गोलमटोल त्याचा देह, ढेरी नगार्यासारखी पुढे आलेली, गळ्यात रुद्र्माला अन् मुखात शिवनाम असा हा भट दिसायला साधापण गुण चांगले कपटी असणारा हा भट्ट पायाने लंगडत चालला की सगळे त्याला शयनग्रामचा लंगडा घोडा म्हणत. कोणाचेही लग्न, मुंज असे नाना विधी पार पाडणे व आपली खळगी भरणे यात भारी पटाईत होता. त्याची पहिली बायको नदीत बुडून मेली होती. म्हणून याने दुसरे लग्न केले होते. पण पाहिली बरी मात्र दुसरी नको अशी गत याची झाली होती. 

शयनग्रामच्या बायका त्याला कधीही नावजत नसत. वेदगंगेच पाणी उन्हाळ्यात अटायच. तेव्हा इकडल्या तिकडल्या लोकांच्या वार्या होत असत. वज्रा म्हशी घेऊन नदीला जात असे. तेव्हा लोक भेटायचे. जनाई कुंभारीण नेहमी चुली विकाय येत असे. एकदा म्हशी घेऊन जाताना जनाबाई कुंभारीण पेठला चुली विकायला आली होती. तेव्हा गणेशचंद्र भट कोणाची तरी पूजा उरकून निघाला होता. वाटेत त्याला जनाबाई कुंभारीण चूल घेऊन आलेली भेटली. वाटेत तिला पाहून हा तिला म्हणाला, “ काय, नव्हरा मेल्यापासून लई व्याप बघ तुला, काय पैशाची हाव म्हणायची. तुम्हा सारख्यांना किती जरी दिले तरी तुमची हाव काय संपत नाही.”

आधीच उन्हाचा तडाखा त्यात डोक्यावरील चूल जड झालेली, व हा असं म्हणतोय म्हंटल्यावर जनाबाईला राग आला. ती त्याला म्हणाली, “ तुझ्यासारख बायकोच्या इस्टेटीवर जगत नाही. बिचारी गेली मरून व तू डोमकावळा येऊन बसलास. तस मी नाही खात श्रमाच खाते.”

तसा तो चिडला व जनावर धावून गेला. पण वाटेल म्हशी घेऊन निघालेली वज्रा दिसताच माग फिरला व आपल्या वाटेला लागला. जाता जाता तिला म्हणाला, “ ब्रम्ह निंदेने नरकात जाशील.”

तेव्हा जनाई त्याला म्हणाली , “बघूया कोण जात ते.”

तो गेल्यावर डोईवरली चूल तिन नदीवाटच्या आंब्याखाली उतरून घ्यायला वज्रेला हाक मारली. तशी ती थोडावेळ सावलीत विसावली. व आपल्या फाटक्या दंड घातलेल्या लुगड्याच्या पदरान तिन आपल्या अंगावरील घाम टिपला. तशी वज्रा तिला म्हणाली, “ काकू, ते भटजी बोवा तुमच्या अंगावर का धावून आले होते.”

तेव्हा जनाबाई वज्रेला म्हणाली, “खर बोलणं पाप हाय या जगात. त्यो मला डिवचाय गेला. म्हणून मी त्याचे गुण गायले. म्हणून तोटक माझ्या अंगावर धावून आलत, चूल पाडत नव्ह माझी. भडवा मला म्हणतोय नरकात जाशील.”

तशी वज्रा तिला म्हणाली, “ पण ते काका चांगले आहेत. कित्येक गरीब मुलांची लग्न केलीत त्यांनी.”

वज्राचे बोलणे तोडत ती म्हणाली, “वज्राबाई तू अजून लई ध्याड बघायची हाईस. हा गेलेला दिवटा सज्जन म्हणू नकोस. देवानं लंगड उगाच केल नाही. याची बायको अगदी पार्वतीवाणी होती. पडल त्या धंद्यात उभी असायची. कोणत्याही कामास तयार. बापाला पोरगा नाही म्हणून या तोटक्याला तिच्या गळ्यात बांधला. एके दिवशी तिन या तोटक्याला वाडीच्या बाईसंग रासलीला करताना पकडला. म्हणून याने नदीच्या वाटेनं जाताना तिला पाण्यात ढकलली. व कालवा करून गाव जमा केला. बायको पाण्यात पडून मेली म्हणून गलका केला. बिचारी पोहायला येत नसल्याने वेदेच्या पाण्यात सामावून गेली. चार दिवस लोक उडकत होते. शेवटी तिचं मड तालुक्याच्या धरणाला तटलेल मिळालं. लंगड असल्याने याच्यावर कुणाचा संशय आला नाही. म्हणतात ना, मरणारी गेली मरून अन् भट राहिला दडून.” असे बोलून तिने चूल आपल्या डोक्यावर घेतली. व ती पेठच्या वाटेला लागली. 

तेव्हा पासून गणेशचंद्र भटाचा राग तिला येत असे. आज योगायोगाने श्राध्दाच्या निमित्तानं त्याला जेवाय वाढण्याचा प्रसंग वज्रेवर आला होता. ती जेवण वाढताना बरोबर आलेल्या मुलाला खुणवून गणेशचंद्रभट वज्रेविषयी बोलत होता. वज्रेला ते खटकल. वज्रा काय समजायचे ते समजली. त्याच्याबरोबर आलेला मुलगा वज्रेकडे पाहून हसत होता. वज्रा जेवण वाढून आत गेली. व नंतर तिने जेवण वाढायला आई पार्वतीला पाठवले. व परसदारी जाऊन बसली. जेवण झाल्यावर जाताना गणेशचंद्रभटाने वज्रेच्या लग्नाचा विषय काढला. तो गेल्यावर वज्रेने स्पष्ट घरातल्यांना सांगितलें त्या गणेशचंद्र भटाने आणलेल्या मुलाशी ती लग्न करणार नाही. त्यापेक्षा नदीत उडी घेऊन जीव देईन. सारे जन तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. शेवटीं आई पार्वती म्हणाली, “ हे बघ वज्रा तुला आवडेल त्या मुलाशीच लग्न लावून देवू. तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस.”

तेव्हा वज्रा शांत झाली. व शांतीच्या घरला निघाली. जाताना तिला वाटेत गंगू सुईन भेटली. ती पुटपुटत चालली होती.तिला पुटपुटताना पाहून वज्रा म्हणाली,, काय झालं ग पुटपुटायला.”

तेव्हा गंगू तिला म्हणाली, “ काय सांगू बाळा तो उमा पाटील हाय नव्हं, आला होता माझ्या घरला बोलवायला म्हाळ घालतोय नव्हं बापाचा. मी फक्त तेला म्हटल. व्हय रं उमा जिवंत असताना म्हातार्याला धड आन घातलं नाहीस. अन् आता मेल्यावर कशाला अड्यावर कागावळी ठेवून कावळं बोलवतोयास. , एवढच म्हटल अन् मला शिवा द्यायला लागला. मी म्हटल तूझ्या जन्माच्या वेळी तूझ्या आईच बाळंतपण मीच केलं. तवा तुझ्या घाट्याला नख लावलं असत. तर त्या पाटलाच म्हातारपण चांगल गेलं असत. अन् मला शिवा द्यायला पण तू जिवंत राहिला नसतास. तसा गेला मांजरागत.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ तू तरी कशाला नको ते बोललीस. यामुळे त्याच्या घरच्या जेवणाला मुकलीस नव्ह.”

तेव्हा गंगू सुईन तिला म्हणाली, “त्याच्या चार शितापाई सतपन सोडायला मी गाव भवानी नव्ह. त्याच्या शिताणी माझं मड काय वेदगंगेवर जायचं राहणार नाही. झींज्या साराय येत नव्हत्या तेव्हापासून प्रपंच करतेय. कोंड्याचा मांडा करून खाईन. पण चार शितापाई खोटं कधीच रुचायच नाही मला. तेव्हा वज्रा तिला म्हणाली, “धन्य आहे बाई तुझी, चल आमच्या घरी जेवायला.”

गंगू म्हणाली, “ आता नाही येत रात्री येते. मला हाय बोलावंन एकीकडून सवास्नीच. तुझी म्हातारी वरडल तिला सांग रात्री येते म्हणून जेवायला.” असे बोलून ती म्हातारी काठी टेकत घरला गेली.

तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघून वज्राने नमस्कार केला. व मनात म्हणाली, “ धन्य आहे देवा तुझी. अशी सतपन असणारी मानसं तू निर्माण केलीस.जी राबून खातील पण चोरी मारी नाही करणार.”

वज्रा शांतीच्या घरला गेली. शांतीची आई दळण तयार करत होती. वज्रा तिला म्हणाली, “ काय हे काकू. तुम्ही का नाही आल्यासा. शांती तेवढी जेवायला आली.”

शांतीची आई सुंदरा म्हणाली, “बाळा आज माझा उपवास असल्याने नाही येता आलं.”

इतक्यात शांती आतून बाहेर आली. व त्या दोघी गच्चीवर गप्पा मारण्यास निघून गेल्या.

…… …… …… ……

क्रमशः पुढे…….



गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १९

 कथा वाकाटखोर्याची भाग १९

१९) हादगा

लेखक : निशिकांत हारुगले.

पावसाळी दिवस म्हटले की घाटोरी मुलखात लोकांना सवड नसायची. कारण शेतातील खरिपाची पिके शेतात असायची. त्यामूळे लोकांना सवड मिळायची नाही. जसा श्रावण आला, की भाताची पिके शेतात डोलू लागायची. पुढे गणपती पाण्यात पडल. की दसऱ्याच्या दरम्यान भात कापणी सुरू व्हायची. माळामुरडाची लव्ह्या हावळ्या भाताची सुगीची घाई सुरू होत असे. त्याच दरम्यान सुरू झालेला परतीचा मान्सून सुरू झाला की शेतकऱ्यांची दमछाक होत असे. यावेळी पावसाला अधिक जोर चढे. कधी कधी तो नदीपात्राबाहेर पाणी निघावे असा जोर धरत असे. याच काळात हस्त नक्षत्र निघत असल्याने मुली हादगा देवाची पूजा करत असत. हादगा म्हणजे हस्त. यालाच हत्ती देवाचा पाऊस म्हणत. हत्तीवर बसून भुलोजी नाईक म्हणजे महादेव येतो. व मुलींना भावी आयष्यासाठी भरभराटीचा आशीर्वाद देतो असे म्हणतात. अशी भोळी समजूत रुजल्याने मुली एकत्र जमून एखादया मैत्रिणीच्या घरी हादगा बसवत. दरवर्षी हादगा प्रत्येकीच्या घरी नेमाने चालत यायचा. तेव्हा तगडी पुटट्यावर किंवा पाटावर साळीच्या पीठाने, कोळशाने, व हळदी कुंकवाने सुंदर चित्र काढत.

व त्याची पूजा करत.

एके वर्षी हादगा पूजेचा मान साकरीकडे आला. होता. मुलींनी रानातून वेगवेगळ्या धान्याच्या लोंब्याची जमवाजमव केली. चीरमोऱ्याची माळ तसेच इतर धान्याच्या माळा बनवल्या. व हादगा बसवला. रोज फेर धरून हादग्याची गाणी म्हंटली जाऊ लागली. जसे दिवस वाढतील तसे गाण्यांची संख्या वाढू लागली. रोज नवीन खिरापत त्यामुळे मुलांची चैन होत असे. सर्व काही मजेत चालले होते. पण त्याच दरम्यान भाताची कापणी चालू झाली. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे लोक टोकण पद्धतीने पीके घेत. त्यामूळे परतीच्या मान्सून काळात भाते कापणीस येत. परतीचा मान्सून याच दरम्यान धाड टाकत असे.

साकरीचे घरचे शेत बुरंबाट माळ रानाचे, तांबुळ जमिनीचे होते. रानातील कर्जत भाताची कापणी सुरू झाली होती. तिचे आई अन् वडील पैरेकऱ्याबरोबर भात कापणी त गुंतली होती. पण रोज येणाऱ्या पावसाने मळणीत अडथळे येत असत. एके दिवशी साकरीच्या वडिलांनी मळणीचा घाट घातला होता. कारण पावसाच्या थेंबांनी कर्जतीच भात झडत असे.

 काय व्हायचे ते होऊदे. आज मळणी करायचीच या ईर्षेने साकरीचा बाबा हणमंत पाटील जिद्दीने पेटला होता. सूर्याची किरणं पडल्याने त्याने माणसे जमवून कापणी सुरू केली. दोन मोठे वाफे कापले. व मळणी सुरू झाली. बघता बघता दोन मळण्या दुपारपर्यंत काढल्या. मळणी काढणारे गडी माणसे व बायका झपाझप हलत होत्या. दुपारचे तीन वाजले शेवटची मळणी सुरू झाली. मळणी निम्यावर यायला गड तटावर पावसाची फळी धरली. व हादग्याचा पाऊस पूर्व दिशेच्या वाऱ्याने रेटायला सूरवात केली.

काळवंडलेले ढग कधी उत्तरेला तर कधी दक्षिणेला सरकू लागले. बघता बघता ढग एवढा पसरला की त्याने गडकोपर्यावर फळी कधी धरली. हे समजलच नाही. व तो सरळ पेठच्या शिवारावर चाल करुन आला. टपोऱ्या थेंबांनी मळणी भिजवायला सुरुवात केली. आधीच दमलेली गडी माणसे यांनी मळणी कशीबशी गोळा केली. हनमा पाटलाने बैल सोडली व शेतावरील मांगरात बांधली. डोक्यात पावसाचा चांगलाच राग आला होता. व त्यात डिवचण्याच काम टपोरे थेंब करत होते. त्यानं तंबाखू घेतला व त्याची तळहातावर चीमट घेऊन तो मळू लागला. माणसांना काम सांगून तो तडक गावच्या वाटेला लागला. थोड्या वेळानं घरी पोहोचला. व भिंतीवरील हद्ग्याचे चित्र ओढून काढले. व ओढ्यावर घेऊन आला व त्याने तो पाण्यात बुडवला.

संध्याकाळ झाली. सर्व मुली एकत्र जमल्या. बघतात तर काय हादगा नाहीये. साकरी मांजरीगत गपचीप बसली होती. इतक्यात वज्रा पुढे झाली व तिने हादगा कुठे हाय विचारले. तेव्हा बाहेर ओट्यावर शेतातील पसारा आवरून येऊन बसलेला तिचा बाप म्हणाला, “हादगा नव्हं, गेला असल आता पर्यंत चांगला मुरगूडच्या पुढे पोचला असेल.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ बाबान हादगा पाण्यात बुडवला. आता काय करायचं.”

तेव्हा सर्व मुलींना वाईट वाटले. त्यातून शांती म्हणाली, “ तुझ्या काय बाबाला पाऊस बघून भात कापाय घालाय येत नव्हत. आमचा हादगा बुडवून कापणीत पाऊस पडायचा थांबणार नाही. त्याच भात पिकलं तरी मावळच्या रोपा सजायच्या हाईत. म्हणून हादगा पडतोय. तो रोपास पोस्वायला पडतोय.”

तेव्हा हनमा पाटील म्हणाला, “नाही थांबला तरी चालेल. मी घाबरत नाही त्याला. चांगलच ओढ्याच्य पाणी पाजलं.”

तेव्हा सर्व मुलींनी खलबते केली. व पुन्हा जोडणी करून हादगा बसवला. पण तो पेटीत. चांगल हात्ती देवाला कुलपात बसावं लागलं. कारण मुलींनी पुन्हा आपला हादग्यावर दुसऱ्याच्या हातून विसर्जनाची वेळ येऊ नये.म्हणून त्या हद्ग्याचे चित्र व साहित्य पेटीमध्ये त्या पुजू लागल्या. अशा रीतीने हादगा बंधिस्त झाला.

…. ….. ….. ……

क्रमशः पुढे....

कथा वाकाटखोर्याची भाग २०

 २०) बाजाराचा दिवस अन् टवाळखोरांची गंमत

लेखक :  निशिकांत हारुगले

मुली आता चांगल्याच वयात आलेल्या होत्या. तरुणपणात त्यांचं लावण्य खुलत होत. त्यांना स्थळे चालून येत होती. घाटी भागात मुली वयात आल्यावर त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी लागत असे. साकरीला पाहायला राधानगरीकडील एक मुलगा आला होता. त्याचे दात जरा पुढे आलेले होते. त्यावेळी साकरीला नटवायला तिच्या मैत्रिणी जमल्या होत्या. तेव्हा त्याने नवरीला पाहताना साकरीला पसंत न करता त्याने वज्रेला पसंत केलं. तेव्हा एकच गोंधळ उडाला. वज्रा रडायला लागली. तेव्हा नवरदेवाची कशीबशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो तिचं पोरगी पसंत आहे. असे म्हणू लागला.जमलेल्या बायका वज्रेला आत बोलावून म्हणाल्या.” कशाला पुढे पुढे मिरवतीस तू कलमडलीस अन् साकरीच लगीन मोडल.”

तेव्हा साकरीचा बाप आत आला. त्यान वज्रेला बायकांनी धारेवर धरलेल पाहिलं व त्यो म्हणाला, “कशाला त्या पोरीला बोलता. तिची काय चूक आहे. गेला तर जाऊ दे. साकरीला एकापेक्षा एक स्थळे आणेन मी.”

इतक्यात ती मंडळी गेली. साकरीन सुटकेचा निस्वास टाकला. ती लगेच म्हणाली, “ मला तो फावड्या पसंत नव्हता. फावडे दात त्याचे, त्याने काय मी शेण काढू?”_मात्र या सर्व गोष्टीचा वज्रेवर खूप परिणाम झाला. व तिने ठरवले की आपण कधी कोणाच्या लग्नाच्या ठरावाला जायचं नाही.

 पण जसे तरुणवयात यावे तशा जबाबदाऱ्या पणं वाढतात. वय होत आल्याने पार्वतीला बाजाराला जायला जमत नव्हते. त्यामूळे घरचा बाजार वज्रेचा भाऊच बघत असे. पण कधी कधी तरी वज्रा ही बाजाराला जात असे. एके दिवशी बाजाराला जायची पाळी वज्रेवर आली. ती शांती व साकरी तिघीही बाजाराला निघाल्या. बाजाराला जाताना त्याना नदीच्या वाटेने जावे लागे. पण त्यांनी त्या जवळच्या मार्गाने न जाता कच्या सडकेने जायचे ठरवले. दुपारची उन्ह चढू लागली होती. चालून चालून उन्हाने कायली व्हायला लागली होती. वाटेत कुठेतरी झाडाखाली किंवा राईत थांबत त्या पुढे निघाल्या. बाजार पेठेत आल्यावर त्या तिघी बाजार करण्यात गुंग झाल्या. सर्व पेठ फिरून मालाची चौकशी करत त्या पेठत खालपतुर गेल्या. गारगोटी बाजारात मालाची आवक वाढल्याने दर स्वस्त होता. बाजारातील वस्तू खरेदी करत त्या पेठेच्या मध्यभागी आल्या. तिथं गणू शेटच हॉटेल होत. त्याच्या हॉटेलात भज्जी खूप चविष्ट असत. शांती वज्रा व साकरीला म्हणाली, “ चला आज गणुशेटच्या दुकानावर धाड टाकायची .”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ माझ्याकडे मोजकेच पैसे आहेत मी काही नाही.” तस साकरीन तिच्या नकार घंटेत आपला नकार मिसळला. तशी शांती चिडली. व म्हणाली, “ आता इथच थांबायचं तुमचा एक रुपया नको. मी आणतो भज्जी.”

असे बोलून तिने आपल्या जवळील पैसे पाहिले. पण ते थोडे होते. तेव्हा ती म्हणाली, “ मी आमच्या दुकानात जाऊन येतो.”

तिचे बोलणे ऐकून साक्री म्हणाली, “ नको तुझे आम्हाला दुकानातले पैसे, हे घे माझे. व जा घेऊन ये भज्जी.”

वज्रा ही आपले देऊ लागली. तेव्हा शांती म्हणाली, “ नको तुमचे पैसे वाटेला डोकं खाशीला. मी आणते दुकानातून.”

असे बोलून ती दुकानाकडे गेली. पेठतून वाट काढत ती दुकानात पोहोचली. दुकानात बाजार असल्याने खूप गर्दी होती. ती थेट गल्ल्यावर गेली. व तिने आपले बाबा दामाजीपंत यांकडे पैसे मागितले. दामजीपंत म्हणाले, “ घरी ठेवले होते की.”

शांती म्हणाली, “ ते तर केव्हाच संपले?.”

तेव्हा दामाजीपंतानी गल्ल्यात हात घातला व तिला पन्नास रुपये दिले. व सांगितले रात्री हिशेब पाहिजे.”

शांती लगेच चिडून म्हणाली, “काही पळून जात नाही, पोरगा झाल्यापासून बघतेय. लई हिशेब विचारताय. ठेवा लेकाला साठवून. मी काय लोकाची धन नव्ह.”

शांतीचे बोल दामाजीपंत यांना चांगलेच झोंबले.तिला पुढे काही न बोलता ते गप्पच राहिले.

तशी शांती दुकानातून बाहेर आली. व गर्दीतून वाट काढत निघाली. तेव्हा तिला कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवतेय असे वाटले. तशी ती पुढे गेली. गणूशेटच्या दुकानाबाहेर एका झाडाखाली वज्र व साकरी उभा होती. ती तडक आपल्या त्या मैत्रीणी जवळ आली.

 गर्दीतून आल्याने ती खूप घामावलेली होती. तिने वज्रा व शांतेजवळ पोहोचली. व चला म्हणाली. तेव्हा त्या नको भज्जी, वेळ होईल जाऊया. पायपण दुखतायेत. तेव्हा तिने त्यांच्या रट्टयाला हात घातला. व म्हणाली, “ मी झडती देऊन आलोय. अन् तुम्ही इथे नाटक करू नका.”

त्या दोघींना घेऊन ती हॉटेलात गेली. व बाकड्यावर बसून भज्ज्याची ऑर्डर एका पोऱ्याला दिली. तसा तो भज्जी घेऊन त्यापुढे ठेवून गेला. इतक्यात दोन तरुण मुले हॉटेलात आली. त्यांनी भज्ज्याची ऑर्डर दिली. व इकडे तिकडे बघत तो फिरून फिरून एखाद्या मारक्या म्हशीगत शांतीकडे पहाय लागला होता. आपल्या शेजारील मुलाकडे न पहाता तो म्हणाला, “ काय सदा आज काय आज पेठ एकदम झकाकाय लागलीय.”

तेव्हा तो दुसरा त्यास म्हणाला, “ तर काय, चांदण्याच उतरल्यात की जमिनीवर की स्वर्गातील अप्सरा बघ.” तेव्हा शांतीला व वज्रेला ही मुले आपल्याला बोलत्यात याची जाणीव झाली. तेव्हा शांतीने पाणी पित्याल्या ग्लासला हात घातला. ती तामसी स्वभावाची आहे. हे जाणून वज्रेन तिच्या हातावर हात ठेवला.  व शांत राहण्यास सांगितले. तेव्हा तिने त्या मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. व भज्जी खाल्ली.

तेव्हा त्यातील एकजण म्हणाला, “काय वर्षाची भुकेली आहेत पाखर वाटत.”

तेव्हा शांतीच्या डोळ्यात अंगार फुलत होते. पण ती शांत राहिली. त्या तिघींनी भज्जी खावून बिल भागवले. व बाहेर पडलीत. व त्या तिघी उरलेला बाजार करू लागल्या. तशी ती दोघे जण त्यांच्या शांततेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होती. त्या बाजारपेठेतून सरळ गावच्या वाटेला लागल्या. जशा त्या वाटेला लागल्या तशीच ती मुले ही त्या मागोमाग जाऊ लागली. एक मैलभर अंतर चालल्यावर त्यांना वाटेत राईच्या डोंगरातून आलेला ओढा लागला. त्यांनी ओढा पार केला. ती मुलेही मागोमाग होती. अचानक त्या मागे फिरल्या. तशी ती मुले थबकली. तरीपण धाडसाने त्यातील पाटलाचा मुलगा पुढे झाला. व शांतीच्या नजरेत नजर भिडवन्याचा त्याने प्रयत्न केला. तशी ती त्याला म्हणाली,  “ काय दिवस भरलेत वाटत तुझ.”

तसा तो म्हणाला, “ होय, तुला आज प्रथम बघितलं व मी तुझ्या प्रेमात पडलो.”

तशी शांती म्हणाली, “ होय का? मला पण बोलायचं आहे. इथ तू माझ्या प्रेमात पडलास. व माझ्या पायातील कापशी वाहन ही तुझ्या प्रेमात पडली. भेटणार काय तिला.”

तशी वज्रा त्याला म्हंटली, “ हे बघ तुला हाड पाहिजे असतील जाग्यावर तर माग फिर व चालता हो इथून, नाहीतर वैद्याचा पत्ता मागवून ठेव पोहचवू तुला. आमच्या नादाला लागशिल तर बरगडीच्या फुकण्या करून चुलीत कोंबायची पाळी आणू नकोस. जा गुमाण माग. या बरगड्या म्हातारं पणापर्यंत जपाव्या असं वाटतं असेल तर जा माग.”

त्यांचे हे धिटपणाचे बोलणे ऐकून तो म्हणाला, “ तुमचे हे नाजूक हात ते काय बिघडवणार माझं, ते तर पोळ्या लाटायच्या कामाचे.”

तेव्हा आतापर्यंत गप्प बसलेली साकरी तिला म्हणाली, “ काय गावाकडे लाकडे नदीवर ठेवून आलास वाटत. त्या फक्त बरगड्या मोडायच बोलतात मी तुझ्या डोक्याचा फुटबॉल करायचं म्हणते.”

तेव्हा तो कुस्तितपणे म्हणाला, “तुमच्या सारख्या छप्पन जणींना मी नाक घासायला लावलेय. तिथे तुमची काय बिशाद.”

तेव्हा शांती म्हणाली, “ त्या छप्पनजणी म्हणजे आम्ही नव्हे. सगळ्या बिळात काय उंदरे नसतात, व विरोळे ही. आम्ही सह्याद्रीच्या नागिनी आहोत नगिणी. ज्यांच्या चावण्याने पाणी सुद्धा मिळायचे नाही.”

तस तो पुढे आला व त्याने शांतीच्या रट्टयाला हात घातला. ते पाहून वज्रा चिडली. तिला शांतीला असे धरणे आवडले नाही. त्याच्या डोळ्यातील लाली त्यांनी ओळखली. तिने सर्व ताकदीनिशी त्याला ढकलले. परिस्थीती लक्षात घेता साकरी जवळच्या फडात घुसली. व तिने त्यातले दोन ऊस मोडून आणले. व शांतीकडे देत. तो उभा राहण्याच्या आधीच त्याला बडवायला सुरूवात केली. त्यावर अशा या तिघी चवताळून पडताच. त्या बरोबर आलेलं पोरग घाबरल. व मागे पळालं. त्या तिघी जवळपास काय सापडलं त्या वस्तून त्याला मारत होत्या. त्याला सावराय त्यांनी वेळच दिला नाही. इतक्यात एक सायकलस्वार तिथे आला व त्याने थांबून त्यांचे भांडण मिटविले. व त्या मुलास पिटाळले. त्याची चांगलीच जिरली होती. या अशा मुलींचा रणावतार बघून त्याचे धाबे दणाणले. दोन चार गड्यांना लोळवेल असा गडी त्याला यांनी सळो की पळो केले. तो गुमान माघारी निघून गेला.

तो जाताच त्या तिघींनी उसासा टाकला. थोड त्या पुढे चालत गेल्या. व एका झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागल्या.

शांती मात्र वज्रेकडे पाहत होती. ती वज्रेस म्हणाली, “ आज काय लक्ष्मी अंगात शिरली होती वाटत. आमच्या पेक्षा तूच त्याला लई बडवलास. वाटत नव्हत या अबोल देहात एवढी प्रचंड ताकद आहे. मारखाऊन बसेल महिनाभर पाट चोळत.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ मारू नाहीतर काय त्याची पूजा करू. सरळ अंगाला हात लावतो पोरींच्या बापाची पेंड वाटली का? तो थांबला असता अन् काय आगळीक केली असती तर त्याच उर फोडून रागातच पितो बघ.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ त्याच्या घरातली त्याला बघून काय म्हणतील.”

तेंव्हा शांती म्हणाली, “ काय म्हणतील आलाय प्रसाद घेऊन.अन काय.”

त्या तिघी हसू लागल्या. थोड्या वेळाने त्या बाजाराच्या पिसव्या घेऊन घरच्या वाटेला लागल्या. घरी जाताना त्यांनी पक्के ठरवले की झालेला प्रसंग कुठेही बोलायचा नाही.

तेव्हा पासून त्या कधीही बाजाराला एकत्रितच जायच्या. तो मात्र ह्या दिसल्या की गप्प खाल मान घालून निघून जायचा.

…… …… …… …… …… …,.. …….



कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...