मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १६

 कथा वाकाटखोर्याची भाग १६

१६) आधुनिक रामायण

लेखक : निशिकांत हारुगले

घरात आल्यावर वज्रेन डोक्यावरील धुण्याची बुट्टी खाली उतरवली. म्हशी घरात आणून बांधल्या. स्वयंपाक घरात जाऊन तेल व हळद घेऊन आली. व रेडी व म्हसिच्या झुंजीत लागलेल्या जागी लावली. नंतर वैरण घालून ती धूणं उन्हात घालायला गेली. कामाला माणस बघाय गेलेली. पार्वती तोपर्यंत आली होती. तिने हळद तेलाची वाटी पहिली. व वज्रेस कशाला हळद घेतल्याचे विचारले. वज्रेन घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा आईचे लक्ष वज्रेच्या हाताकडे गेले. तिच्या हाताला लागलेली जखम बघून पार्वतीने काळजीनं तिला जवळ बोलावले. तिला उराशी कवटाळून ती म्हणाली, “ काय ही वेळ देवा महादेवान आणली.” तिने वज्रेचे पटापट मुके घेतले. व तिचा हात हातात घेऊन त्या हातात कुठे लागले का ते तपासले. काकणांची काच कुठे लागली का ते पाहिले. जखमेवर हळद तेल लावले. त्या दिवशी खोडव वेचायला दोन बायका माणस खूप मेहनतीने मिळाली होती. आईने आपले आवरले. व ती म्हणाली, “ वज्रे मी माणसं घेऊन रानात जाते. तू घरी थांब.”

 तेव्हा वज्रा मी येणार म्हणाली. पार्वती आपले आवरून माणस घेऊन शेताला गेली. वज्रेन जेवून घेतले. व भांडी घासायला ती न्हाणी घरात गेली. व भांडी घासू लागली. इतक्यात शांती आली. ती वज्रेस हाक मारत न्हाणी घरात घुसली. वज्रेस भांडी घासताना पाहून तू घास मी धुते असे म्हणून ती भांडी धुवायला बसली. व भांडी धुवू लागली. इतक्यात तिचं लक्ष वज्रच्या हातातील जखमेकड गेलं. शांतीने तिला काय लागलं ते विचारलं. पण वज्रेन विषय टाळला. . शांती पुन्हा पुन्हा विचारू लागली. इतक्यात माजघरात झोपलेली म्हातारी धडपडत स्वयंपाक घरात आली. व शांतीला म्हणाली, “ काय सांगू बाई नदीला म्हशी घेऊन गेलती त्या कंबळीच्या म्हसिण शिंग मारलं. आमच्या माग एक झाल की दुसर संकट येतच बघ.”

असे बोलून म्हातारी आणखी काही बोलणार इतक्यात वज्रा म्हणाली, “आजी गप्प बस तू, कशाला उठलीस, गप झोप जा. तुला उगाच लागत. सापाच्या कानाची हाईस बघ.”

शांती लगेच वज्रेला म्हणाली, “ त्या कंबळीला जरा मस्तीच आलीय. एवढं नव्हरा दारु पिऊन चेचतोय तर एवढी हाय.”

तिचे बोलणे तोडत वज्रा म्हणाली, “गप्प बस शांते, तू पण उगाच तिच्याशी भांडशील तू पण, आधीच बरीच माणसं आमच्यासंगे वाकडी हाईत. सोड तो विषय.”

तेव्हा शांती विषय बदलत म्हणाली, “ बर ते जाऊ दे. चल, आपणं गप्पा मारत बसू.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ नाही मला शेताला जायचय.”

शांती म्हणाली, “ पण आई तर येऊ नकोस म्हणाली ना.”

“ ती म्हणाली पण मी जाणार पावसाळा जवळ आलाय. खोडव वेचाय हवं. एक दोन माणसांनी काय होत.” वज्रा बोलली.

तेव्हा शांती आपण येतो म्हणाली. तेव्हा वज्रा म्हणाली, “ नको बाई , तू काम कमी व दंगाच जास्त घालशील.”

तेव्हा शांती म्हणाली, “ तू आता पहिल्यासारखी नाहीस तुला चांगली गवारेड्यासारखी दोन दोन शिंगे आल्यात. लई शहाणी झालीस. मी तुला आवडत नाही. म्हणून मला टाळतीस मोठी झालीस ना.”

तेव्हा वज्र तिला म्हणाली, “ तू माझा जीव की प्राण आहेस. तुला कशी विसरेन मी. मरेपर्यंत मी कधीच तुला विसरणार नाही.” असे म्हणून तिने डोळ्यात पाणी भरले.

शांतीने तिचे डोळे पुसले. नंतर घरातील सर्व आवरून वज्रा व शांती घराबाहेर पडल्या. जाताना पुढल्या जोत्यावर अंथरूण घालून आजीला झोपवले. व प्यायच्या पाण्याचा तांब्या उशाशी ठेवून बाबा येईपर्यंत अशीच झोप, असे सांगून ती शेताला निघाली. शांती आपल्या घरी गेली. व वज्रा शेताकडे. शेतात वज्रा पोहचली तेव्हा उन्ह चढू लागली होती. दुपारच्या दोनपतुर अर्ध रान वेचून झाल. दुपारी भाकरी खायला जांभळीच्या सावलीत बसलीत. सकाळी म्हस धुवायला गेलेली कंबळा अजून घरला गेली नव्हती. रिकाम्या दिवशी ती दुपारपतुर म्हसीला चारवत असे. त्या दिवशी पण तेच करत होती. ती म्हशीच्या माग माग फिरत होती. गावातील मुले नदीच्या काठाला खेळत होती. माणसाना प्यायला पाणी हवे होत. म्हणून वज्रेला आईने नदीवरून घागर भरून आणायला सांगितले. वज्रा उठून घागर घेऊन नदीवर आली. तिने नदीच्या खळाळत्या पाण्यात घागर धुतली. व भरली. घागर घेऊन ती निघाली. तेव्हा गल्लीतली पोर तिथे खेळताना दिसली. त्यांना पाहून ती म्हणाली, “ काय रे पोरांनो, काय करताय उन्हाच.”

तेव्हा त्यातील पाटलाचा बाजा म्हणाला, “ रामायण रामायण खेळतोय.”

वज्रेला हसूच आलं. ती म्हणाली, “अरे, दुपारचं ऊन किती आहे. घरी खेळायच. रानात कुठला अध्याय खेलत्यासा रामायनातला.”

अध्याय शब्द ऐकताच ती मुले कावरी बावरी झाली. कारण तो त्याना अवघड शब्द होता. तरीपण त्यातून न्हाव्याचा हणमंता म्हणाला, “ राम सीतेचा वनवास घरी कसा खेळायचा. व घरी खेळताना आज्जा ओरडतो. त्याची झोप मोड होती म्हणून. त्याचा काव खाण्यापेक्षा रानातच खेळलेल बरं.”

वज्रेच लक्ष बाज्याच्या हातातील धनुष्याकडे गेले. त्याच्या हातातील धनुष्य हे छान मेसकाठीपासून केलेले होते. व बाण ही धारदार होते. त्याशेजारी उभारलेला शिंप्याचा सत्त्या सितेसारखा पेहराव करून बसलेला होता. अआजाचा पटका साडी म्हणून घेतलेला होता. तांबड्या मातीतून चालून तो भगवा पटका लाल झाला होता. वज्रेला पाहून तो लाजला.

वज्रेस त्यांच्या खेळाचे कौतुक वाटले. ती त्यांना जपून खेळा, असे सांगून ती शेतात आली. पाण्याची घागर सावलीत ठेवली. व माणसासंगे ती भाकरी खायला बसली.

मुले खेळत होती. इतक्यात बाजा पाटलाने एक बाण सोडला तो बाण झुळझुळ वाऱ्याच्या वेगात निघाला तो थेट गजाबाईच्या अंब्यावरील मोहोळात जाऊन घुसला. दुपारच्या तावाने माशा उठल्या व त्यांनी आकाशात काळी फौज तयार केली. व गुंजारव सुरू झाला. मव्हाच्या पोळ्यात घुसलेला बाण पाहून मुले घाबरली. व त्यांनी चांगलीच धूम ठोकली. शिंम्प्याचा सत्त्या तर आपल्या आजाचा पटका तिथंच टाकून पळाला. पळता पळता तो बाज्याला शिवा देत होता. शहाणाच आहेस. की बस आता शिमगा करत. मी पळतो. असे म्हणून एका मागून एक मुले गावच्या दिशेला पळाली. मव्हाच्या माशा उठल्यावर सगळ्यांनी भाकरी ठेवल्या. सर्वजण झाडाखाली गप्प बसून राहिली.

पार्वती म्हणाली, “कोणीही हलायच नाही. हालचाल दिसली तर आपल्याला महू चावेल. व पाठी लागल. सर्व शांत बसलित. मव्हाच्या माशा शिवारात पसरल्या.त्याना पांदित म्हस घेऊन निघालेली कंबळा दिसली. त्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तशी कंबळी जोरात ओरडत पळाली. तिच्या म्हसीन केव्हाच घर गाठल होत. ती पाणंद सोडून शिवारात घुसली. माशा पाठ सोडेनात. ती रडू लागली. ती बामनाच्या शेतात घुसली. पार्वतीला रहावलं नाही. तिने कामाला आलेल्या शेवांतीच पोत घेतल. व गोळा केलेल्या खोडव्याला काडी वडली. उन्हाच्या तावण खोडवी धुमू लागली. आतल्या ओलसर खोडव्यानी धूर झाला. एकमेका संगतीन खोडवि धुमत पेटू लागली. धुरान आकाश अच्छादाय लागले. माशांनी धुरामुळे माघार घेतली. पण या सगळ्यात पार्वतीला दोन चार माशा चावल्याच. माशा शिवारातून मागे सरल्या व त्यांनी आपला मोर्चा नदीकडे वळीवला. नदीवर मासे धरायला आलेली शयनग्रामची मुले त्यांनी हेरली. व त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या. परंतू पाण्याबाहेर तोंड काढताच माशा त्यांवर झडप घालत. कशीबशी त्यांनी सुटका करून घेऊन ती मुले नदीपार गेलीत. थोड्या वेळाने माशा शांत झाल्या. व पोळ्यात परतल्या. पार्वतीनं व बाकीच्यांनी कंबळीला झाडाखाली नेलं. कामाला आलेल्या स्त्रियांनी तसेच पार्वतीनं तिच्या अंगावरील काटे काढले. तेव्हा कंबळीला भरून आले. ती पार्वतीला म्हणाली, “ बाईसाब मी तुम्हाला नको तस बोलले, सकाळी वज्रेला ही बोलले. त्याची देवानं मला आज शिक्षा दिली. एवढं होऊनही तुम्ही मला वाचवल्यासा अगदी देवावाणी हाईसा. आमची रान थोडी असल्यानं खंडाची शेत करावी लागतात. काय करणार मालक म्हणेल तस ऐकावच लागत.”

 पार्वतीनं तिची समजूत काढली. तोपर्यंत बायजककानं बांधाकडचा टिक्कीचा पाला आणला व चोळून तिच्या महू चावलेल्या जागेवर लावला. बर वाटू लागल्यावर ती घरला गेली. वज्रेला मात्र तिची जराही दया आली नाही. तिने तिच्याकडे दुर्लक्षच केले. थोड्या वेळानं भाकरी खाऊन सर्वजण खोडव वेचू लागली. सायंकाळपर्यंतत बरच रान वेचलं. सांज झाल्यावर वज्रा व आई अन् शेतात आलेली माणसे घरी परतली.

क्रमश : पुढे….


शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १५

कथा वाकाटखोर्याची भाग १५

१५) म्हशींची झुंज

लेखक : निशिकांत हारुगले.

एके दिवशी घराच्या म्हशी खूप घाण झाल्याने वज्रेन सोडल्या. त्यातील एक म्हैस गाभण होती. बरोबर धूणं व त्या दोन म्हशी घेऊन ती नदीला गेली. धरणाला फळ्या बसवल्यान नदीला चांगलाच तूंब चढला होता. तिन म्हशी धुतल्या. व थोरल्या म्हशीला कासरा बांधला. व जवळच्या बच्चाच्या झाडाला बांधली. तिला बांधल्यामुळे बाकीच्या म्हशी व रेडकी दूर जात नसत. वज्राने धूणं घेतल व ती नदीपात्रातील रुतलेल्या दगडावर धुवू लागली. नदीवर अनेक बायका धूणं धूत होत्या. त्यातील बायजाबाई परटीनं वज्रेकड बघत शालू पवारनीला म्हणाली, “ काय बाई दिवस आल्यात शिवानंद बामनाला कवळ्या पोरांना पण रानात राबाय लागतय.”

“ खर हाय तुमचं बायजाक्का, पारुन पण चांगलाच इरला प्रपंच लावलाय. लई राबतीया कुलकर्याला पण बदायची नाही.”

पण वज्रेन आपल त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. व ती आपल धूणं धुवून बुट्टी डोईवर घेतली. व आपली बचाच्या झाडाला बांधलेली म्हस सोडून वाटला लागली. मागोमाग बाकीच्या म्हशीपण निघाल्या. नदीचा टेक चढून ती वर निघाली. एका हातात कासरा व दुसऱ्या हाताने डोईवरली बुट्टी सावरत निघाली. तिच्यामाग मोठी म्हस डुलत डुलत चालली होती. दुसरी पुढे चालली होती. रेडकी मात्र मागून हुंद्डत होती. बघता बघता उंबरणीच वळण आलं गावातील गुरे पाण्यावर जात होती. शेताला जायचं असल्याने वज्र झपाझप चालत होती. थोड्या वेळानं गावची वेस दिसू लागली. डोक्यावरील धूणं व म्हशीला सावरायची कसरत करत ती निघाली होती. धूण्याची बुट्टी जड झाली होती.

इतक्यात तिला समोरून कंबळी पवारीन व तिची म्हस दिसली. वज्राच्या काळजात धस झाल. कारण कंबळीची म्हस गावातील म्हशींवर दादागिरी दाखवण्यात तरबेज होती. ती रस्त्यानं निघाली की बाकीच्या म्हशी तिला घाबरून कुंप तोडून शिवारात पळत. कमळी मात्र आपल्या म्हसीचा तोरा पाहून ढवळ्या बैलासारखी ताटत असे.

तिला पाहून माघारी गावातील लोक मारुती पवारांच्या दोन म्हशी पाण्यावर चालल्यात असे म्हणत.

ती म्हस जवळ येईल तस वज्रेन आपल्या डोक्यावरील बुट्टीचा हात सोडला व मोठ्या म्हसीची वेसण हातात धरली. व कासरा दुसऱ्या हाती घेतला. व कंबळा पवारनीस म्हणाली, “ काकू म्हस झुंज धरील पुढे या.”

तशी कमळा म्हणाली, “ लागली तर लागू देत. झेपत नाहीत तर कशाला येतीस म्हशी घेऊन नदीला. त्या दिवशी धूणं धुताना तुझी आई मला तोऱ्यात बोलत होती. पाटलाच्या जीवावर शेत मी केलं नाही म्हणून, आम्ही पाटलाच शेत करताव म्हणून म्हणती व्हय ती.अन तू खुट्यातन वर नाही आलेली प्रपंच करून दावतीस. तुझ तू बघ. नाही येत मी पुढें. बघूया लागली तर झुंज लागू दे, बघू पवारीन पावरबाज आहे का पाटलीन.” तिचे ठसक्याचे बोलणे ऐकून वज्रा रडवेली झाली.

“ का बाई अशी छळतीयास, माझी म्हसं गाभण हाय.दिसात हाय.पाया पडते मी तुझ्या.”

अस बोलून वज्रेन डोळ्यात पाणी भरलं. पण कमळी खिदळत होती. तिला पाहून वज्रेला आजीच्या कथेतील रक्षसिन हसतेय असे वाटू लागले.

तिने मन घट्ट केले. थोरल्या म्हसीची येसन घट्ट पकडली. व कासऱ्याचा सोगा दुसऱ्या हाताने फिरवायला लागली. वाऱ्यावर कासरा घरघर वाजू लागला. कंबळेची म्हस शिंगे रोखून चाल करून आली. तशी पुढली म्हस तिचा वार चुकवून कुपातून पळाली. तिने आता वज्रेकडे पाहिले. वज्रा कासरा गोफनी प्रमाणे फिरवू लागली. कासरा घर घर करू लागला. म्हस जवळ येताच तिने कासऱ्याचे दोन-चार तडाखे तिला दिले. तशी ती जरा बाजूनेच गेली.पण जाताना तिचा तडाखा वज्रेच्या हाताला लागला. शिंग लागल्यानं काकणं कचकच तुटली. काच हातात घुसली. रक्त भळभळाय लागले. पण त्याकडे लक्ष न देता. तिला मोठी म्हस वाचली याचा आनंद झाला. ती गाभण म्हस थोरवड तिने कंबळीच्या म्हसिला चांगलीच लोळवली असती, पण दिसात असल्यानं तिला काळजी वाटत होती. वज्रेस चांगलाच दणका देवून ती म्हस मागल्या रेडीवर चाल करून गेली. वज्रेन घाबरून मागे पाहिले. थोड्या अंतरावर चांगलाच धुरळा उडाला होता. नको ते घडल होत. कंबळीच्या म्हसीची व वज्रेच्या रेडीत जोरात झुंज लागली होती.

वज्रेला हात पाय गळल्यासारख झालं. कंबळीची म्हस व रेडी दोघीजणी एकमेकींना शेपट्या उगारून एकमेकींना कुपात ढकलत होत्या. दोघी पण ऐकमेकीला ऐकत नव्हत्या. कंबळी खदखद हसत होती. 

वज्रेन डोक्यावरील बुट्टी उतरली. व कुपातल्या शेवरीस हात घातला. व एक काडी मोडली. पण माराय जायचं कसं कारण गाभण म्हस जवळ होती. रेडीची व म्हसीची झुंज बघून ती थोरली म्हस वेसणीस इसके देऊ लागली. पण वज्रेन वेसण घट्ट धरली. तशी ती वाय, वाय करून ओरडू लागली. ती तिची आई होती. तिच्या पोटातली माया उफाळून येत होती. कारण ती त्या रेडकीची आई होती. कोण आई आपल्या मुलीवर आलेलं संकट पाहून गप्प बसेल. ती झुंजीत सामील होण्यासाठी प्रयत्न करत होती.

 झुंज चांगलीच रंगात आली होती. रेडी काही केल्या त्या म्हसीला लागलेली झुंज सोडत नव्हती. पण तिची ताकद कमी पडत होती. वज्रेला मात्र काळजी होती की कोवळ्या रेडकीच फर बिर मोडल तर. शेवटीला कंबळीच्या म्हसीन रेडकीला पांदिकडच्या चरीत ढकलली. रेडी पडली. तशी वज्रेच्या काळजात धस्स झालं. हे पाहून थोरल्या म्हसीन वज्रेच्या हाताला हिसडा दिला. वेसण सुटली. वज्रेन कासरा ओढला. पण म्हसीन तिला फरपटत नेले. व थोरली म्हस कंबळीच्या म्हसीवर चालून गेली. कंबळीच्या म्हसीला तिन जोरदार धडक दिली. तश्या त्या दोघी भांडायला तयार झाल्या. थोरल्या म्हसीन तिला सर्व ताकदिनिशी रेटत नेले. 

तशी कमळी घाबरून काठी घेऊन म्हसीला माराय गेली. तेव्हा वज्रेन तिची काठी धरली. व तिला रागाने कुपात ढकलली. तोपर्यंत रेडी चरीतून वर आली. तिनं व थोरल्या म्हसीन त्या कंबळीच्या म्हसीची चांगलीच जिरवली. शेवटी ती म्हस भ्याली व नदीकडे पळाली. . कंबळी वज्रेसंगे भांडू लागली. शिवा देवू लागली. तेव्हा वज्रेन दोन थोबाडीत लगावल्या. तिचे केस धरून ती ही भांडू लागली. वाटेवरुन जाणाऱ्यानी भांडण मिटवले. लोकांनी वज्रेची बाजू उचलून धरली.

 तेव्हा कंबळी गुमाण नदीकडे म्हस घेऊन गेली. वज्रा जाताना तिला म्हणाली, “मगाशी खुप बोलतीस नव्ह; परत नादाला लागशील तर तुझं पेकाटच मोडीन.” असे बोलून तिने आपली धुण्याची बुट्टी डोईवर घेतली व ती म्हशी घेऊन घरला आली. त्या दिवसा पासून कंबळीची म्हस वज्रेच्या म्हशींना पाहताच कुपातून शिवारात घुसत असे. व कंबळी खाली मान घालून जात असे.

क्रमश: .. पुढे…..



सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १४

 कथा वाकाटखोर्याची भाग १४

१४) शेताचे भांडण

लेखक : निशिकांत हारूगले.

वज्रल आता घरातल्या कामाबरोबरच शेताकडे ही जावे लागे. ऊस तुटला होता. व खोडव देखील काढल गेलं होत. मळवाच्या वाटेनं शिवानंद वैरण आणायला शेतात गेला होता. तेव्हा वाटेत उमाजी पाटील व त्याच्या बायकोने भांडण काढलं. शिवानंद सोबत व्यंकू पण होता. तो पेंडीला जाणार हे त्यांना माहीत होते. ती दोघे वाटच बघत होती. शिवानंद पेंडीला जाताना दिसला. तेव्हा मळवाची वाट का मळवलीस, पेंडीच नुकसान होत. म्हणून भांडण काढल. शिवानंद समजुतीने सांगत होता. पण त्याचे न एकता तो हमरी तुमरिवर आला. व त्याने गळपट धरली ते पाहून व्यंकू घाबरला. व रडत घरी पळाला. तो घरात आल्यावर रडत परसदारी पळाला. आई पार्वती धार काढायला बसली होती. वज्रा छोट्या रेडकाला चारा घालत होती. पळल्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. त्याला बोलता येत नव्हते. म्हातारीनं आपल्या हातातील तांदूळ निवडत्याले ताट बाजूला ठेवले. व ती व्यंकूमागे परसदारी आली. पार्वतीनं विचारलं “ का रे लगबगीनं आलास.”

व्यंकू बोलला, “ मळवाच्या वाटेला उमा पाटलान भांडण काढलाय व तो बाबांशी भांडाय लागलाय व त्यानं बाबांना आडव ….” अस बोलून तो रडू लागला. म्हातारीच तर अवसानच गळल. धार काढत्याला तांब्या पारूच्या हातून खाली पडला. ती चटकन धारची उठली. व लगबगीनं गोठ्यातून बाहेर आली. दोन ढेंगत तिन माजघर गाठल. व तिने तुळीतला इंगा काढला. व ती चटकन मळवाच्या वाटेला लागली.

वज्रा पण मागे जाऊ लागली. तेव्हा तिने माग वळून हाक देत “ वज्रे माग फिर माग माग येऊ नको असं सांगितलं.”

पण आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती मागो माग येऊ लागली.मळवाच्या शिवारात पोहोचली. मळवाच्या वाटेवर शिवानंदाला अडव पाडून त्याच्या उरावर पाटील बसला होता. व शिवानंदाचे पाय धरुन पाटलिन बसलेली होती. ती दोघे नवऱ्याला मारत्याले पाहून पार्वतीचे पित्त खवळले. तीने धावत जाऊन खोपरखळीने पाटलाला ढकलले. तो जाऊन बाजूच्या चरीत पडला. व पाटलीनीच्या बुचड्याला हात घालून चांगली फरफटत नेली. तशी ती ओरडायला लागली. शिवानंद त्यांच्या कचाट्यातून सुटला होता. त्याला जबर मारले होते. अंगावर माराचे वळ होते. पार्वतीनं शेजारच्या ऊसातील गाब भरलेला ऊस मोडला व पाटलिनिला दोन लाता घालून ती पाटलावर धावली. त्याचा वार चुकवून त्याला पायात पाय घालून खाली पाडल. व ऊसाने बडवायला सुरुवात केली. त्याला सावरू दिलाच नाही. इतक्यात शेताला जाणारी माणसं जमा झाली. त्यांनी भांडण सोडवल. दांडग्या शिवानंदाला मारणाऱ्या पाटलाचे पारुपुढे काही चालले नाही. पाटील व त्याची बायको शिवा देत निघून गेली. पारूनं आपल्या नवर्याला सावरलं. व घरी घेऊन आली. घरी आणल्यावर तिन शिवानंदाला पलंगावर झोपवला. आजूबाजूची माणसं जमा झाली होती. म्हातारी तर हाबकली होती. ती देव्हाऱ्यासमोर बसून देवाला आपल्या मुलासाठी साकडे घालत होती. “ देवा महादेवा माझ्या लेकराला वाचव.”

शिवानंदाच्या डोक्याला लागले होते. पार्वतीनं नवऱ्याच अंग पुसल. त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. इतक्यात दामाजी व सुंदरा आली. ती त्याना धीर देऊ लागली. पार्वतीनं जखमेवर टिक्कीचा पाला व हळद लावली. सुंदरा तिला मदत करत होती. पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते. वज्रा वार घालत होती. थोडया वेळाने शिवानंदाला हुशारी आली. तेव्हा जरा पार्वतीला बरे वाटले. ती नवर्याला म्हणाली, “आता पोथी पुराण सोडा. घरचं खाऊन दुसऱ्याचा मार खायला अंगात ताकद नाही. त्या पाटलाचा मार खायला. तेला हिंमत असेल तर माझी कळ काढ म्हणावं. मग दाखवते. माझा नमूना तेला खपावतेच.

‘ तेला वाटल असेल की ही दुबळ्या घरची असेल. पण तेला पुरून उरेल.म्हणावं.’ असं म्हणत ती गोठ्यात गेली. तिने म्हसिचे दुध काढले. पण पानेव सरल्याने कमी निघाले. ती आपले काम आवरून घरात आली. इतक्यात मालू गुरवीन आली. शिवानंदाला पाहून म्हणाली, “लई मारल काय ग बाळासाबांना.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ मी असताना तो काय मारतोय भाडखाऊ. त्याची हाड मोडून ठेवीन मी.”

थोडा वेळ चौकशी करून मालू गूरविण निघून गेली

पार्वतीने म्हातारीला सावध केलं. व म्हणाली, “ ही पारी असताना भितीस काय? तुझ्या लेकाला कायपण होऊ द्यायची नाही. त्या पाटलाला चांगलच गाडील ही वाघीण. असे बोलून ती जेवण करायला गेली. व्यंकू कोपऱ्यात रडत बसला होता. त्याला ती म्हणाली, “असा बुळ्यासारखा कशाला रडतोस. जा बाहेर ह्यांच्याजवळ जाऊन बस जा. जाण्या आधी म्हसीला वैरण घाल.” असे सांगून ती जेवणखोलित गेली. थोड्या वेळाने शांती आली. तिला पाहून वज्रेला रडूच कोसळले. शांतीला तिन मिठीच मारली. शांतीन तिची समजूत घातली. थोड्या वेळाने ती घरी गेली.

दिवस झप झप सरू लागले. शिवानंदाला आता बरे वाटू लागले होते. तो आता चालू फिरू शकत होता. पण उमा पाटील आपल्या मनात चांगलीच अढी धरून होता. गावात त्याचे शेत जास्त असलेने अनेक लोक त्याचे शेत कसत. त्या लोकांना तो दमदाटी करी. शिवानंदाच्या शेतात कामाला जायचं नाही असे सांगी. त्यानं साऱ्या गावभर लोकांना शिवानंदाच्या घरावर बहिष्कार घालायला सांगितला होता. गावातील औतवाले देखील शेतात येईनात. पण शिवानंद व पार्वती कच खाणारी नव्हती. ती देखील पणाला पेटली होती.

नदीवर धूण धूयाला पवाराची कमळी आली होती. ती पाटलाच शेत करत होती. तेव्हा पार्वती शेताला गेली होती. व पाणी न्यायला नदीवर गेली होती. तिला पाहून कंबळी म्हणाली, “ आता कोण शेतात कामाला येत नाहीत. त्यापेक्षा पेंडी कापा जावा रान पाडून.”

 तिचं बोलणं ऐकून पार्वती तिला म्हणाली, “ कमळे तुझी बोलणी कळतात मला. जाऊन सांग त्या पाटलाला ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. माझं शेत पडायचं की ठेवायचं ते बघते मी, बघतेच कस पडत ते.”

“ तो किती पण आडकाठी आणुदेत. मी काय कुणाच्या जीवावर शेत करत नाही.”

तशी कमळा म्हणाली, “ सगळ्यांचा शेतातच रात्र दिवस तळ ठोकायचा विचार दिसतोय.”

तेव्हा पाण्याची घागर घेऊन निघालेली पार्वती म्हणाली, “ तळ ठोकाय लागला तरी चाललं पण सोडत नाही.” पार्वती शेताला गेली.

 त्या घटनेनंतर म्हातारीनं अंथरूण धरल होत. त्यामुळे घरातील सर्व काम वज्रेला करावी लागे. ती आता धार देखील काढत होती. शिवानंदाचा मारामारीत पाय दुखावला होता. यामुळे व्यंकू व पार्वती रोज जनावरांची वैरण आणायला जात असत. ती माय लेकर संसाराचा गाडा रेटण्यासाठी प्रयत्न करत होती. .

ऊस तुटला. मळवातल खोडव काढायचं होत. पण गावातील औतवाले येईनात. पार्वतीनं किती जणांना विनवले. शेवटी वाडीची औत सांगून खोडव काढल. औतवाल्याने डब्बल पैसे घेतल. म्हणतात ना संकटे आली की एकमेकाचे हात धरून येतात. तशी गत पार्वतीची झाली होती. थोडीफार माणुसकी असणारी लोकं मदत करीत होती. खोडव वेचायला आता वज्रेला जाव लागत होत. रोज लवकर उठून घरातलं काम करून ती आई सोबत रानात जाई. जाताना धूणं घेऊन जाई. नदीवर जाऊन धूणं धूत असे. व ते शेतात वाळत घालून काम करत असे. सुंदरा कधीतरी मदतीला यायची. पण एवढा व्याप तोलन अवघडच पण मनाच्या जिद्दीनं त्या माय लेकींनी शेत तयार केलं.

क्रमशः पुढे…. ….


कथा वाकाटखोर्याची भाग १३

 कथा वाकाटखोर्याची भाग १३

१३)शांतीचा भाऊ

लेखक : निशिकांत हारूगले.

वज्रा व शांतीची दहावी झाली. वज्रेच्या घरची परिस्थिती गरीब असल्याने यापुढचे शिक्षण वज्रा घेऊ शकत नव्हती. त्यामूळे तिने शाळा सोडणेचा निर्णय घेतला. कारण व्यंकू व तिचे, दोघांचे शिक्षण घरच्यांना पेलणारे नव्हते. शेती भरपूर असली तरी उत्पन्न कमी येत असे. 

गावातील माणसे जास्त करून गावच्या पाटलाकडे कामाला जात. गावचा उमाजी पाटील शिवानंदाच्या विहिरीच्या शेतावर डोळा ठेवून होता. त्यासाठी त्याने भांडण देखील केले होते. घरचं व शेताच काम करण्यासाठी वज्रेन स्वतः शाळा सोडली. शिवानंदाला वाईट वाटत होत. शांतीला पण खटकले. तीन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण वज्रेनच नाही म्हणाली. शिवानंदाची इच्छा होती पण नाईलाज होता. व्यंकू किरकोळ कामे करून शाळा शिकत होता. वज्रा सोबत नसल्याने शांतीला पण नकोस वाटू लागले. कसेतरी पाच सहा महिने ती शाळेला गेली. नंतर मात्र तिनेही शाळेस रामराम ठोकला. व वडीलांसवे ती सोनारकामात लक्ष देवू लागली. तिने त्यात कौशल्य हस्तगत केले. ती त्यात तरबेज झाली. दामाजी पण खुश होता. तो तिला म्हणायचा, “अस काम करू लागलीस तर एक दिवशी मोठी सोनारीन होशील. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा हे चांगल.”

दामाजीला शांतीच्या पाठीवर लवकर मूल झाले नव्हते. दहावीत गेल्यावर तिचा भाऊ तिन वर्षाचा झाला होता. आपण मोठी व भाऊ लहान हे तिला आवडायचं नाही. तिला लाज वाटायची.

एके दिवशी सकाळी महादेवास जाताना आई म्हणाली,की बाळाला घेऊन जा. तेव्हा तिच्या कपाळावर आट्यांचे जाळे पडले. शेवटी नाईलाजाने तिने त्याला घेऊन ती देवाला गेली. तेव्हा देवदर्शनाला वाडीच्या बायका येत. त्या दिवशी पण आल्या होत्या. लहान गोंडस बाळ पाहून म्हणाल्या, “ कोणाचं बाळ ग हे?”

तेव्हा शांतीची पंचाईत झाली. व ती ताडकन बोलली, “ आमच्या काकींच.”

वज्रेन तिच्याकडे पाहिले तेव्हा तिने डोळे लिंबावानी मोठे करुन पाहिले.”

देवदर्शन झाले. थोड्या वेळाने त्या दोघी घरी निघाल्या. तेव्हा वज्रा वाटेत तिला म्हणाली, “ शांते खोटारडे खोटं का ग सांगितलस काकांचा मुलगा म्हणून.”

“ अगं, वज्रे तुला कळत कसं नाही. मी एवढी मोठी व हा किती लहान बायका नाही का हसणार मला, हा माझा लहान भाऊ आहे असं म्हंटल्यावर. पण तू यातील एखादा शब्द पण कोणाला सांगू नकोस. तुला महादेवाची शपथ आहे.” शांती बोलली.

“ वा ग वा, तू कर कुरघोड्या व मला शपथ घाल. मी काही सांगणार नाही. पण आभाळातून पडली गोठी शांतीची शपथ खोटी.”

पण शांतीचे बोलणे पुजाऱ्याने देवळात ऐकलं होत. घरी जाताना त्यानें शांतीच्या आईला सगळ काही सांगितल. तेव्हा शांतीवर आई चिडून होती. संध्याकाळी शांती घरात आलेली पाहून तिची आई तिच्या मागे लाकूड घेऊन मागे लागली. व म्हणाली,

“ कारटे काकूंचा मुलगा म्हणतीस होय का? उद्या मामांचा म्हणशील. थांब दाखवते. तुला असे म्हणताच शांतीने चांगलीच धूम ठोकली. व थेट वज्रेच्या घरी गेली. तेव्हा वज्रा अंगण झाडत होती. तिला पाहून शांती ओरडली, “ वज्रे लगेच चोंबडे पणा केलीस. शपथ घालून पण घरी सांगितलस. काय गरज होती. रामायण सांगायची. जा बघ माझ्या माग अर्जुनासारखे लाकडाचे पेटते बाण घेऊन लागलीय. चांगलच महाभारत होणार.”

वज्रा लगेच म्हणाली, “ मी काही सांगितले नाही. दुसऱ्या कुणीतरी चुगली केली असेल.”

तेव्हा शांतीने कशीबशी आईची समजूत काढली. व हे प्रकरण निभावून नेले. सांजेला शांता वाण्याच्या दुकानात खरेदीला गेली. तेव्हा तिथे पुजारीबुवा तिला चिडवून म्हणाले, “ काय म्हणतोय काकांचा मुलगा.”

तेव्हा शांतीच्या लक्षात आलं. की या पुजाऱ्यानच आग लावली. ती म्हणाली, “ म्हणजे तुम्हीच काडी टाकली तर. देह देवळात चित्त मात्र पायतानात. तुमचं. पूजाअर्चा सोडून वस्तरा केव्हापासून चालवायला लागलात.”

तेव्हा पुजाऱ्याला थोबाडीत मारल्यासारखे झालं. तेथील कट्ट्यावरील बसलेली टवाळ पोर खिदळायला लागली. दुकानातील माल घेऊन घरी जाताना तिचे लक्ष पुजाऱ्याकडे गेले. त्याचे डोळे लाल होते. ते पाहून ती म्हणाली, “तुमच्या डोळ्यांना बघून घाबरायला मी तुमची लग्नाची बाई नव्ह. परत पुजारपण सोडून माझ्या नादाला लागलं तर पुजारपण सोडाच मी नारळाची शेंडी पण कढण्यालायक सोडणार नाही.”

असे बोलून घरला परतली.

क्रमशः पुढे……



गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १२

 कथा वाकाटखोर्याची भाग १२

१२) सागवणीवरील भूत व लक्ष्मीची गंमत.

लेखक : निशिकांत हारुगले.

रविवार उजाडला त्या दिवशी महादेवाचा पाळक होता. शेतातील कामाला सुट्टी होती. तसेच शाळेलाही. त्या दिवशी स्त्रिया घरातील सडासारवण तसेच दळप कांडप करतात. त्या दिवशी वज्रा व शांती घरीच होत्या. वज्रेला तिच्या आईने हाक मारली. व तिला तट्यातिल भात काढायला सांगितले. तट्ट्या म्हणजे बांबूच्या कांबट्टयापासून बनवलेलं जाड तगडासारखे साधन ज्याचा उपयोग भात व धान्य ठेवण्यासाठी केला जातो. तसेच कणुगले ही वापरत.

वज्रेस भात काढणीस सांगितले. तेव्हा ती नाखुशिने तट्टयाजवळ गेली. तेथे खूप अंधार होता. आईने दिवा दाखवला तरच मी भात काढणार असे तिने सांगितले.

तेव्हा आई म्हणाली, “ तुला काही कोणी तिथे खाणार नाही चल गप्प उतार आत. मला कांडाप करायचं आहे. उगाच नखरे करू नकोस?”

तिने आईला दिवा आणायला सांगितला. तशी आई चिमणी लावून घेऊन आली. चिमणीच्या उजेडात वज्रा माळीतील तट्टयाजवळ आली. तिने आईला दिवा दाखवायला सांगितला. तसा आईने दिवा वर धरला. त्याच्या प्रकशात वज्रा चटकन स्टूलावर पाय ठेवून दिवळीत दुसरा ठेवून भींतीच्या खुंटिच्या सहाय्याने ती तट्टयात चढली. तट्ट्यात अंधार असलेने. तिने आईस दिवा दाखवनेस सांगितला. तस आई म्हणाली, “ काढ गपचुप.”

वज्रा छोट्या बुट्टीच्या साहाय्याने भरभर भात काढू लागली. भाताचा बुस्सा उडून नाका तोंडात जात होता. तिचा वेग पाहून आई म्हणाली, “ अग, हळू काढ. काय कुत्र बित्र पाठी लागलय काय?”

पण तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती झपझप काढत होती. तिने पहाता पहाता दोन हारे भात काढले. तेव्हा आई म्हणाली, “ बास बाई. सगळा तट्ट्या उपसाशिल चल बाहेर पड आता. “ आईचे बोलणे ऐकून तिने लगबगीने खालचे राहिलेले भात सरळ लावून ती बाहेर उतरली. बाहेर उजेडात आल्यावर तिला बरे वाटले. तेव्हा आई तिला म्हणाली, “ एवढी कसली घाई लागली होती.”

वज्रा बोलली, “ मागच्या महिन्यात त्या सदू पाटलाच्या कणगीत साप सापडला. तेव्हापासून मला बाई अंधारात भात काढायला भीती वाटते. आपला तट्ट्या पण माजघरात आहे. सगळा अंधार, जर एखादा साप असता तर मला चावला असता ना? म्हणून मी तुला दिवा आणायला सांगितला.”

तेव्हा आईने कपाळावर हात मारला. ती म्हणाली, “ शहाणी आहेस. त्या पाटलाच घर भरलय आसकाटान भोवताली वाढलेल गवत, तिथे साप सापडला म्हणून तुझ्याघरी नाही सापडणार.” तेव्हा वज्रा हसतच परसदारी अंग झाडत गेली. तिने न्हाणी घरात जाऊन भूस्याने माखलेले तोंड व हात पाय खसाखसा धुतले. तेव्हा आईची हाक आली. “वज्रा कांडप करून ठेवते. थोड्या वेळाने माझ्या बरोबर चल.”

तेव्हा वज्रा येतो म्हणाली. व परसदारी गेली. परसातील पेरवनीवर चढून तिने पेरू काढले. दोन चार लालेलाल पेरू तिला मिळाले. ते घेऊन माजघरात गेली. व तिने मीठ लावून ते पेरु खाऊ लागली. इतक्यात थोडया वेळाने तिला आईची हाक आली. व आईने तिला गिरणीला जाण्यास बोलावले होते. ती तिझ्याबरोबर गिरणीला निघाली. त्या गिरणीत पोहोचल्या. पाळक असल्याने सर्व आया बाया गिरणीत जमा झाल्या होत्या. शांती सुद्धा जोंधळे घेऊन आली होती. गिरणीचा मालक फुशारकी मारत होता. वज्रेन व तिच्या आईने शिंद्यांच्या लक्ष्मीच्या मदतीने डोक्यावरील हारा उतरून घेतला. वज्राच्या आईने वज्रेला जायला सांगितले. पण शांती गिरणीत असल्याने तिचा पाय काय निघता निघेना. ती गिरणीच्या दारात कोपऱ्यात उभा राहिली. तिला बघून नंबरच्या पाळीत आपले दळप ठेवून शांती तिच्याजवळ आली. सगळ्या बायका आपल्या आपल्या दळपा कांडपा जवळ बसल्या. होत्या.

इतक्यात शिंद्याची लक्ष्मी गिरणीत दळाप टाकत शेजारच्या मालूला म्हणाली, “ काय सांगू बाई, आता भगटायला उठायचे दिवस नाही राहिलेत.”

तिचं हे बोलण ऐकताच शेजारच्या बायका तिच्याकडे आश्चर्याने टक्का मक्का बघु लागल्या. इतक्यात शिंप्याची बायक्का म्हणाली, “ काय ग, काय झालं, ते सवन सांग की.”

तशी ती म्हणाली, “ काय सांगू बायाक्का मावशी, काल रोजच्याप्रमाणे कोंबडा अरावला. तवा शेण काढायला उठले होते. परसदराची बुट्टी आणायला गेले. तवा पाटलीनीच्या परड्यात मला दिसलं.”

“ काय दिसलं ग लक्ष्मी.” जना पाटलीन म्हणाली, “ अव बाईसाब, काय सांगू तुम्हाला पाटलीनीच्या मेसाजवळ, ते सागवणीच झाड आहे ना, ते गारीजवळ, तिथं मला बाई बसलेली दिसली बघा. मला काकणांचा आवाज पण ऐकू आला बघा. तिन माझ्याकडे पण बघितलं”

“ मग काय झाल ग?” बायक्का म्हणाली.

“ मग मी झटकन मागे फिरले. व घरात येऊन दार झटकन लावलं. बघा तवापासून सूर्याचं किरण दिसल्या शिवाय मी शेणच काय धार बी काढत नाही. म्या नवर्याला स्पष्ट सांगितलं, मला भगाटल्याशिवाय शेण काढायला जमणार नाय. नांदण गेलं तरी चाललं.” लक्ष्मी म्हणाली.

 तेव्हा मालू गुरवीन म्हणाली, “काय ग बाई, हे आणि नवीनच म्हणायचं, कलयुगच नव्ह का? अशी दिसाची भूत फिराय लागली. तर माणसानं कसं जगावं म्हणायचं.”

शांता व वज्रा सगळ कान देवून ऐकत होत्या. वज्रा रामरक्षा मनात पुटपुटू लागली. ते बघून शांती म्हणाली, “ हे बघा, खुळ लागलं बडबडायला. वज्रे भूतबित काही नसतं. त्या लक्ष्मीच्या अंगात शिरलाय आळस, काम नको करायला. कोकण याड नुसतं. कोकण्या कडगावची आहे ना ती. असल्या कल्ड्या पिकवल्यावर नवरा कशाला उठवतोय, शेण काढायला. चांगली सूर्याची उन्ह येईतोपर्यंत घोरत पडत असेल नुसती म्हशीसारखी.”

शांतीच बोलणं लक्ष्मीने ऐकलं. ती लगेच म्हणाली, “खुट्टयातन वर आलीस काय ग? मला म्हैस म्हणतीस काय सोनारणी. एवढं मी कलड्या पिकवतोय अस वाटत ना तुला, तर जा की त्या पाटलीनीच्या परड्यात रात्रीला.बाजल टाकून झोपून दाखीव बघू. अन् मग बोल मला कल्डया पिकवतोय म्हणून.” लक्ष्मीचा आवेश पाहून पार्वती म्हणाली, “शांते गप्प बस की, थोरा मोठ्यांच्या बोलण्यात आपण अस काही नाही बोलू नये. मोठ्या माणसांनी चार ध्याड पाहून अनुभव घेतलेला असतोया. तेच ते बोलतात. तू गप्प बसत जा.”

तशी शांती गप्प बसली. तशी वज्रा कावरी बावरी झाली. व म्हणाली, “शांते तू गप्प बस की. उगीचच मधी मधी नाक खुपसतेस.”

इतक्यात मालूबाई पाटलाच्या रखमाला म्हणाली, “ रुक्मिणीबाईसाब जरा जपून जावा परड्यात.”

तेव्हा रुक्मिणी पाटलीन बोलली, “माले तुला पण काय याड लागलंय. तू शांत बस, तुला काय पण ठाव नाय.”

तिचं बोलणं ऐकून लक्ष्मीला राग आला.ती म्हणाली,

“ एवढं माझ म्हणणं खोटं वाटतंय तर तू व ती शांती दोघीजणी जावा त्या सागवनीखाली बांधा झोपाळा व येत्या पूनवेला जागर करा म्हणजे माझा विश्वास पटलं. तुम्हाला त्या शिवाय माझं म्हणणं पटायचं नाही.” असं बोलून तिने गिरणी खालच दळप काढल. व दंडाच्या धडीतील दोन रुपड्या काढून गिरणीवल्यांच्या हातावर टेकवल्या. व ती टाचा आपटत गिरणीतून बाहेर गेली.

तेव्हा मालू रुक्मिणीला म्हणाली, “का हो रुक्मिणी बाईसाब तुम्ही असं लक्ष्मीला बोलल्यासा.”

तेव्हा रुक्मिणी म्हणाली, “ काय सांगू बाई तुला त्या दिवशी गारव्याच्या भेटीची पोळी अन भाकरी पवारांच्या शोभीन आणून दिली होती. तिचा भाऊ केंबळीसंन घेऊन आलता नव्ह. त्या भेटीची पोळी नको म्हणताना सासून खायला लावली. व लागला की पहाटे पोटात मुरडा मारायला. सासूला कशी उठवायची. नवऱ्याला उठवायला गेले तर नाही म्हणाला. व लागला भिंतिकडं तोंड करून घोरायला. तवा शेवटी भित भित उठले. रकेल तेलाची चिमणी पेटवली. अन् गेले परसात.आमचं परड म्हणजे कोकणातली हर तऱ्हेची झाड आमच्या अज सासऱ्यान लावलेली. घुडूपच नव्ह अंधाराचा. तवा त्या सागवणीच्या जवळच्या पायदानात निघाले. पायदाण्यात जायच्या आधी मेल कुठून वार आल् अन् चिमणी विझली. कळ आवरली नाही, म्हणून गारीवरच बसले. तवा शिंद्याची लक्ष्मी दार उघडून बाहेर आलती. तिने माझ्याकडे बघितल अन् माग वळून झपकन दार लावून घेतलं. तेव्हाच मी समजले की लक्ष्मी मला बघून भ्याली. म्या मघाशी उगाच बोलले नाही. कारण राबतय ढोरासारख. त्या निमित्तान का असेना सूर्य उगवतोवर झोपायला तरी मिळत तिला, नाहीतर रोजचा प्रपंच आहेच की. खुरपं, चूल, बांध अन् शेण पाचवीलाच पुजलेल आम्हा बायकांच्या. मागल्या शनिवारी नवऱ्यानं बाई कोळपा वढायला येत नाही म्हणून पायावर इसकी मारली, अजून पायावर वळ आहेत बघ तिच्या. आमच्या घाट कोकणच्या पोरी शेवाटी साऱ्या राबण्यास देसोऱ्यासनी सुद्धा नाही कामाला बदायच्या. तिच्या बापाच्या घरात कधी कोळपा बघितला नाही. रोपची रान तेंची. तिची निपाणीची सासू आपलाच तोरा मिरवती असती. कोळपा वढला तर शेत काम आलं नव्ह. हिंमत असेल तर ये म्हणावं आमच्या नाळीत, मग बघू गुडघाभर चिखलात रोप टवायला तवा बघते. लक्ष्मी पुढं जाती का ती ते. माळा मुर्डाच्या रानाच्या भांगलनीच कवतिक सांगती.

राबाय तेवढी पाहिजे  व खायला घालायला माग का सरती. मला तर बाई लई राग येतोय. तिला बघितलं तर खाऊ की गिळू वाटतंय. मी तर परवा धूणं धुयाला गेल्यावर जाताना लुगड्याच्या धडितन भाजी भाकरी चोरून नेऊन दिली. कशी वर्षाची भुकेली असल्यासारखी तिन खाल्ली.  डोळ्यातन पडणार पाणी सगळ काही सांगत होत. तिची सासू मला कशी म्हणती की तूझीच फूस हाय तिला. तिच्या भागातील आहे ना मी. म्हणती कशी सासूला सांगून तुला चांगलीच निपाणी दाखवाय लावते. तेव्हा मला पण तिचा राग आला. मी पण वाटच बघते, ही बया कवा  मला बोलतीया याचे. मी पण म्हंटले मला काय निपाणी दाखवतीय. ज्या नदीचं पाणी पिवून तू वाढलीस त्या नदीच्या उगमाच्या व्हळीची मी हाय. तुलाच चांगल कडगाव पाटगावच पाणी दाखवीन, चांगल वेताच्या बेटातल.  माझी पण आई निपणीची व ही पण बया, खरं दोघित जमीन अस्मानाचा फरक आहे.  तवा मला  म्हणती कशी. सासू गरीब गावलिया म्हणून टेंबा मिरवू नकोस. तुला चांगली माझ्यासारखी मिळाय पाहिजे होती. चांगली नालाची वेसण घालणारी. मलापण राग आला. मी म्हटलं वाटेवरची आक्कूबाईची विहीर बघून पवायला येतय का? तेव्हा म्हणती कशी पवायला यायला बाप्याची जात नव्ह माझी, तवा मी पण म्हटल गुमान वाटण जा, नाहीतर अक्कुबाईच्या विहिरीत ढकलिन. कुणाच्या बाला पण कळणार नाही. तवा गेली गप्प मांजरागत. मी म्हटल पडल्या झडल्यावर लक्ष्मीचं पाहिलं तुझ. तुझी लेक येणार नाही निस्तरायला तेव्हा गपचूप घरला गेली.”

तेव्हा मालू गुरवीन म्हणाली, “ बर झाल हान्न मोडलस म्हातारीच. लई नाटकं करतिया. भांगलायला स्वतःच्या शेतात दोन्ही हातांनी रान वरबाडती. अन् दुसऱ्याच्या शेतात गेल्यावर नवशिक्या  पोरींच्या मागच, कामचुकार मेली.”

वज्रा व शांता शांतपणे हे सार बोलण ऐकत होत्या. वज्रेन ते ऐकूण  रामरक्षा म्हणायचं विसरली. व शांतीकडे बघत खुदकन हसू लागली.

शांतीला पण आपण लक्ष्मी काकूंना असं बोलल्याच वाईट वाटल. थोड्या वेळाने त्या दोघींनी आपापली दळप कांडप आटोपली.  व वज्रा आपल्या आईसोबत व शांती आपल्या घरला गेली. घरी आल्यावर वज्रेन आपल कांडप ठेवलं. व ती बाहेर शांतीसवे खेळायला निघून गेली.

…. ….. ….. …..

क्रमशः पुढे….




कथा वाकाटखोर्याची भाग ११

 कथा वाकाटखोर्याची भाग ११

११) साकरीची शाळा सुटली

लेखक : निशिकांत हारुगले

सातवी इयत्ता पार पडली. आठवीहून पुढे तालुक्याला शिक्षणासाठी जावे लागे. तेव्हा सातवीचा निकाल लागला. मुले वर्गात जमली. गुरुजींनी निकाल वाटला. वज्रा, शांती, साकरीला चांगले मार्क भेटले होते. गुरुजींनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व मुला-मुलींना पुढे कसे वागावे? याविषयी गुरुजींनी मार्गदर्शन केले. शेवटी त्यांचे डोळे पाणावले. मुलांनाही रडू आले. शेवटी निकाल व निरोप समारंभ झाला. आता आपण या शाळेत पुन्हा कधीच शिकायला येणार नाही याची खंत वज्रा व साकरीला वाटत होती. 

निकालपत्रक घेऊन मुले घरी चालली. साकरी, वज्रा व शांता पण चालली. जाताना त्यांच्यात पुढील शिक्षणाची चर्चा सुरू झाली. शांतीन आपण पुढे तालुक्याला शिकण्यास जाणार हे आधीच ठरवल होत. वज्रेच काही निश्चित नव्हत. कारण पुढील निर्णय तिचे वडिलच घेणार होते. साकरी मात्र नाराज होती. तिचे वडील पुढील शिक्षणाची परवानगी देतील असे वाटत नव्हते.

 चालत बोलत केवढ्यात घर आले हे कळलेच नाही. साकरी, वज्रा व शांतीचा निरोप घेऊन घरला निघून गेली. त्या दोघीही घरी गेल्या. जाताना मात्र संध्याकाळी वाज्रीच्या घरी खेळायला जमायचं ठरवल. घरात यायला दुपारचे दोन वाजले होते. घरी आल्यावर वज्रेने आपल्या वडिलांकडे निकाल दिला. व ती हातपाय धुवायला म्होरीत गेली. हातपाय धुवून ती बाहेर आली. तेव्हा वडिलांनी तिचे अभिनंदन केले. नंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन थाबड्यातील जेवण घेतले. व जेवण केले. जेवताना अण्णा म्हणजे तिचे वडील शेजारी बसले होते. ते म्हणाले, “ वज्रा आता सातवी झाली पुढे काय करणार?”

ती म्हणाली, “पुढे काय म्हणजे?”

तेव्हा शिवानंद म्हणाला, “ पुढील शिक्षण गावी नाही. तालुक्याला जावे लागणार. त्यासाठी खर्च आला…”

आण्णाचे वाक्य पूर्ण होण्याअगोदर ती म्हणाली, “ तुम्ही मला शाळेत घालणार नाही का?”

“ तसे नाही बाळ घालणार की?” शिवानंद अडखळत बोलला.

तेव्हा वज्रा चिडली. व म्हणाली, “ का दादाला घालताना तेवढा पैसा खर्च दिसत नाही. व मला घालताना दिसतोय होय. ते काही नाही. मी पुढे शिकणार .जर का मला शाळेत घातले नाही तर मी घरातील काहीच काम करणार नाही बसा.”

तिचा अवतार पाहून शिवानंद गप्प बसला. मात्र आजी बोलली, “ अग, तू पोरीची जात. तालुक्याला ये-जा तुला जमेल का. त्यासाठी खर्च आला. आपली परिस्थिती बेताची शेतातील धान्य व दुधाचा रतीब एवढंच आपल उत्पन्न. म्हणून तुला विचारले.”

तेव्हा वज्रा हिरमुसली. ते पाहून शिवानंदाला वाईट वाटले. त्याने तिला पुढे शिकवण्याच ठरवल. त्या बदल्यात वज्रेन घरातील कामात मदत करायची. ठरल. आपल्याला पुढे शिकवणार म्हंटल्यावर वज्रेला बरे वाटले. तिने जेवण आटोपले. व ती परसदारी गेली.

सांज झाल्यावर शांती व साकरी वज्रेकडे आल्या. वज्रेच्या परसदारी त्यांनी सारीपाटाचा डाव मांडला. शांतीन वज्रेस विचारलं, “ आण्णांनी परवानगी दिली का?”

वज्रा म्हणाली, “ हो विचारलं.”

तेवढ्यात त्यांचे लक्ष शेजारील साकरीकडे गेले. तिचे डोळे टिचले होते. तेव्हा वज्रेन तिला रडण्याचे कारण विचारले. “ काही नाही ग मला आता परत तुम्हाला सकाळीच व संध्याकाळीच भेटायला मिळेल. कारण मला पुढे शिकता येणार नाही.”

शांती व वज्रेस् वाईट वाटले. पण त्याच परावलंबी असलेने काही करू शकत नव्हत्या. त्यांचा आता खेळात जीव रमेना. त्यांनी डाव बंद केला. व त्या आपापल्या घरी निघून गेल्या. वज्रा व शांतीने तालुक्याच्या शाळेत प्रवेश केला. वज्रेस घरातील कामे आटोपून शाळा जावे लागत होते. तालुक्याला त्या चालत ये-जा करत होत्या. वज्रा सकाळी लवकर उठून घरातील झाडलोट करायची. शेण काढून आजीला घरकामात मदत करायची. व नऊ वाजेपर्यंत सर्व आटोपुन शांतीसवे शाळेस जाई. 

साकरी मात्र घरकाम करी. व शेताला जात असे.तिच्या घरची परिस्थिती गरीब असलेने घरच्या जमिनीबरोबर खंडाची जमीन तिच्या घरचे करत. तिची उणीव वज्रेस शाळेला जाताना जाणवत असे. मात्र ती काही करू शकत नव्हती. शांता मात्र वज्रा आपल्या सोबत येते म्हणून खुश होती. त्या नियमित शाळेला जात असत. 

नवीन शाळा सुंदर व तिची इमारत सुसज्ज होती. पण तेथील शहरी वातावरण व तेथील मुलांचे इस्त्री केलेले कपडे व आपल ग्रामीण राहणे पाहून वज्रेस अवघडल्यासारखं वाटे. हळूहळू त्या वातावरणाची त्यांना सवय झाली. त्या दोघी व वाटेवर भेट नाऱ्या इतर गावच्या मुली संगे असत. नियमित तिन मैल चालून त्यांचा खूप व्यायाम होई. शांता जरा धाडशीच होती. तिच्यामुळे वज्रेस भीती वाटत नसे. तिच्यामुळे ती थोडी धाडसी होत चालली होती. पण कधीतरी शांती तिला भित्री भागुबाई म्हणायची. 

व्यंकूचे तास असलेने तो सायकली ने जाई. थोडया दिवसांनी शांतीने ही सायकल घेतली. त्या दोघी सायकल शिकल्या. व फेरा फराने त्या डब्बल शिट सायकल मारत जाऊ लागल्या.साकरीला रोज रानात जावे लागे. तिची शाळाच सुटली होती. एकदा शाळेतून परतताना गावच्या वाटेवरील शेतातून घरी जाताना साकरी दिसली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती. त्यावर शिराट्यांचा भरा होता. तो घेऊन ती घरला निघाली होती. तिला वाटेवर वज्रेन हाक मारली. तेव्हा लाजून तिने पाहिले. तेव्हा वज्रेन विचारलं, “ काय करायला गेली होतीस.”

तेव्हा तिने रानात गेले होते. व घरी शेण काढायचे आहे असे सांगून ती घरी गेली. तिचे नजरेन भिडवणारे डोळे सर्व काही सांगत होते. तिच्यासाठी काहीतरी दुसरे कौशल्य शिकून मदत करायचे तिने व शांतीने ठरवले. 

साकरीसारख्या मुलीला हुशार असून देखील घरी राहावे लागत होते. कारण तिची घरची परिस्थिती बेताची होती. तिचे बाबा घरची तसेच दुसऱ्याची शेती करत. म्हसीचे दूध व शेतातील धान्य हेच काय ते उत्पन्न. त्यावरच संसाराचा सारीपाट चालत असे. 

वज्रेस आठवले. आपल्याही घरची परिस्थिती बेताचीच आहे. आपले बाबा आई चांगले म्हणून सर्व चाललय. नाहीतर आपली ही अशीच गत. हा विचार तिच्या मनात आला. व अंगावर शहारा उठला शांतीच मात्र बरे होते. तिचे बाबा सोनारकाम करत. या विचारात ती घरी गेली. व घरात गेल्यावर कामाला लागली.



कथा वाकाटखोर्याची भाग १०

 कथा वाकाटखोर्याची भाग १०

 १०)लागीर 

लेखक : निशिकांत हारुगले 


शांती व वज्रेतील अबोला मिटला होता. घरी आनंदात आलेल्या शांतीला पाहून तिची आई म्हणाली, “ काय शांता आज काय घबाड सापडलय वाटत. एवढी आनंदात आहेस.”

शांती म्हणाली, “ होय, सापडलेय मी जरा वज्रेकडे जाऊन येते.”

असे म्हणून तिन धूम ठोकली. तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आले व ती बोलली, “ बापरे! या महाराणीत तह झाला. आता गावात धुडगूसच नुसता. गाव पेटवाय रिकाम्या झाल्या म्हणायच्या.”

तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती वज्रेच्या घरी आली. तोपर्यंत वज्रा म्हशी बांधून आली. शांतीला पाहून म्हणाली, “ चल जाऊ परसदारी खेळायला.”

तेव्हा ती म्हणाली, “ नको चल वडाच्या झाडाखाली पारावर.”

त्या दोघींना एकत्र जाताना पाहून वज्रेच्या आईला व आजीला आनंद झाला. आजी म्हणाली, “ या दोघी बोलत नव्हत्या तेव्हा घर खायला उठायच. आता गुळात खोबरं घातल्यासारख वाटत.”

तेव्हा वज्रेची आई पार्वती म्हणाली, “होय खर हाय तुमचं.”

वज्रा व शांती वडाखाली खेळायला आल्या. तेव्हा त्यांना केरूअण्णाच्या दारात गर्दी दिसली. तिथे काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी त्या गर्दीत शिरल्या. व वाट काढत पुढे आल्या. बायकांच्या घोळक्यात जाताना तानुबाई न्हावीन म्हणाली, “ काय नडलय बारक्या पोरांचं इथे जावा तिकडे खेळा जावा.”

तिच्याकडे लक्ष न देता त्या तशाच पुढे गेल्या. तेव्हा त्यांना केरुआण्णाची सून भिंतीला टेकून बसलेली दिसली. तिला साऊ मावशी वार घालताना दिसली. केरुआण्णाची बायको वटवट करत होती. तशी ती दातओठ खात मुठी आपटत तिला शिवा देत होती.

गोंद्याच्या हिरान पारू पाटलीनीला विचारलं, “ काय झाल ग हिला घुमायला.”

तेव्हा ती म्हणाली, “ सकाळी देवपुजेला फूले आणायला रखमा पाटलीनीच्या परड्यात गेली होती. तिथं पाय घासरून पडली. तवा रखमेच्या नवऱ्यान दंडाला धरून आणली. तेव्हापासून अशी घुमायला लागलीय.”

तेव्हा हिरा म्हणाली, “ मग काय तिच असणार चिंचणीवरची अवदसा माली. स्वतः माती खाऊन फास लावून मेली. अन् आता कोवळ्या जीवांना धरतिया.”

“ तर काय बाईसाहेब सहा महिने पण झाले नसतील लग्नाला. चुडा पण उतरला नाही बघ.” पारू पाटलीन उत्तरली.

इतक्यात केरु आण्णाची बायको म्हणाली, “ तुला घर घुसायला दुसर मिळालं नाही वाटत. माझ्यापुढे तुझ चाळ चालायचं नाहीत. आल्या वाटेने निघून गेलीस तर बर. नाहीतर राधा खेळवीन तुझी. ती पण वेताच्या काठीने. ह.सांगून ठेवते.”

असे म्हंटल्यावर तिची सून दात-ओठ खात म्हणाली, “ बघतेच मी तू मला खेळवतेस की मी तुला खेळवते. “ असे म्हणून तिने केसांचा पुंजका केला. व ती आपलं डोचक खांबनीवर आपटणार इतक्यात साऊमावसीन तिला धरल. व म्हणाली, “ हे बघ ही नाटक माझ्यापुढे चालणार नाहीत. जास्त दंगा केलास तर खरोसीला नेईन ह. काय पायजे ते मागून घे व आल्या पावली परत जा. असे बोलून तिने पार्वतीनं आणलेला महादेवाचा अंगारा तिच्या कपाळावर लावला. तेवढ्यात शिंद्यांचा दामू तिथे आला. व बारक्या मुलांना तिथून बाहेर पिटाळू लागला. तस वज्रा व शांती हातात हात धरून बाहेर आल्या. शांतीस बाहेर आल्यावर वज्रा म्हणाली, “ पाहिलस केरुआण्णाची सून काय बिचारीचे हाल.”

तेव्हा शांती म्हणाली, “ काय हाल बिल नाहीत तिचे, काय लागिर वगैरे नाही ह तिला. नाटकं आहेत नुसती. अशी भूत लागाय लागली असती. अन् ठेवलेला निवद खायला लागली असती तर चैनीच झाली असती त्यांची. केरू आण्णाची सून आधी कोकणातली. तिची नाटक कळायची नाहीत तुला. काल शेताला जाताना वटवटत होती. सासूला शिवा देत होती. या म्हातारीला उगळाच पाणी दावते म्हणून.”

“ काय भयंकर आहे नाही हे.” वज्रा बोलली.

“ मी ऐकलंय काल रात्री नवर्याशी भांडली. वेगळं राहूया म्हणून. नव्हरा ऐकत नाही म्हंटल्यावर व आपला डाव फसतोय म्हंटल्यावर लागीर झाल्याचं नाटक करतिया.”

तेव्हा वज्रा बोलली, “ खरंच काय?”

“ कोकणचं याड तुला कळायचं नाहीत. वज्राबाई. रखमा पाटलीनीच्या परसातील चिंचेच्या चिंचा मी कित्येक वेळा काढल्यात. मला का बर माली झपाटली नाही.परवा त्या शिरप्याच्या बायकोन बुट्टीभर चिंचा नेल्या कोळ करायला. तिला बर ही माली झपाटली नाही. व ही सतीसावित्री नाही का हिला झपाटली काय? चल तिकडे खेळूया, तेंच ते निस्तरू देत. काय तू तिथे जाऊन रामरक्षा म्हणणार आहेस?”

“ नाही बा. मी तिथे जाणार परत, चल तुझ बरोबर हाय. पण तुला हे सगळं कसं माहीत.” वज्रा बोलली.

“ ते आहे ना गावातील चालत बोलत वर्तमानपत्र, गणू पुजाऱ्याची सावित्री, ती काल आईला सांगत होती.”

“ ती होय, बर असुदेत चल जाऊया आपण खेळायला. “

त्या दोघी वडाच्या पारवर खेळू लागल्या. पण त्यांचा जीव रमेना. शेवटी त्यांनी खेळ थांबवला व त्या घरी गेल्या.

… … …. …

क्रमशः. पुढे…….





कथा वाकाटखोर्याची भाग ९

 कथा वाकाटखोर्याची भाग ९

९) वज्रा व शांतीची बोलाबोली 

लेखक : निशिकांत हारुगले.

दिवस सरत चालले होते. व्यंकू आता मोठा झाला होता. तो आता नववीत होता. पेठत फक्त सातव्या इयत्तेपर्यंत शाळा होती. तिथून पुढे शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागत असे. शिवानंदाने त्याचे नाव आठवीतच घातले होते. तो नियमित जात असे. 

आता मोठा होऊ लागल्याने शिवानंदाने त्याची मुंज करायचे ठरवले. जास्त खर्चात न पडता शयनग्रामला मुंज करू असे बोलताच त्याचा मेव्हणा अडूनच बसला. की ते काही नाही वाडीला जाऊन करायची. पण आपल्यावर कर्जाचे ओझे आहे व आपल्याला ते काही जमणार नाही असे म्हणताच तो मवाळला. व शेवटी शयनग्रामला त्याने मुंज केली. जेवणावळ झाली. अनेक पंगती जेवण झाल. मुंजिमुळे व्यंकूची हालत बघण्यासारखी होती. त्याला गावातील मुले चिडवत असत. शांती या सगळ्यात पुढे होती. ती सर्व त्यास शिवानंद बामनाची चक्की म्हणू लागले.शांती त्यास दुकानातील शेंगदाण्याची चिक्की दाखवी व चिडवी. व वाकुल्या दाखवीत असे. तेव्हा तो रागाने पाही. पण याचा तिच्यावर काही परिणाम झाला नाही. तेव्हा त्याने महिनाभर घरातून बाहेर न पडायचे ठरवले.

उन्हाळ्याचे दिवस आले. एके दिवशी शांती व साकरी नदीला धुणे धुवायला गेल्या. वज्रेने घरातील काम आटोपले. आईने म्हशीला फिरवून आणायला सांगितले. म्हैस गाभण असल्याने तिला फिरवले की तिचा व्यायाम होतो. व्यंकूस बोलावले. पण त्याने नकार दिला. कारण मुली त्याला हसतात. व चिडवतात.

वाटेत तिला राधाबाई भेटली. ती तिला म्हणाली, “एवढ्या सकाळी म्हस घेऊन कूठे निघालीस.”

“ नदीवर जरा घेऊन जाते तिचं पाय जरा हलके होतील.”

“पण घरात बाव असताना तिथेच धुवायची. अन् अंगणात फिरवायची.सकाळी गावची जनावरे असतात. तेव्हा झुंज लागायची.”

वज्रा म्हणाली, “ मी काठी आणली आहे.”

असे बोलून ती पुढे नदीवर गेली. नदीवर धुणे धुवायला अनेक स्त्रिया जमल्या होत्या. अनेक जनावरे असलेने नदीचं पाणी ढवळल होत. ते तांबडभडक दिसत होत. वज्रेला म्हस घेऊन येताना पाहून पवाराची सावित्री म्हणाली, “ तू आणि कोठून उगावलिस पाणी खदळायला. घरच्या बावीच पाणी सिंदून म्हस धुवायची सोडून तुला बरी नदी गावली.”

तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून वज्रेन पलकराचा काचा खोवला. व ती पाण्यात उतरली. तिने म्हसीच्या अंगावर पाणी मारले. तसं त्या पाण्यात जाऊन बसल्या. रेड्की मात्र तिच्या भोवताली गोल गोल फेऱ्या मारू लागली. तिने म्हसीला एका पाठोपाठ एक धुवायला सुरुवात केली. म्हशी धुवून झाल्यावर तिचं लक्ष धुणे धुणाऱ्या शांती व साकरीकडे गेले. ती साकरीला म्हणाली, “ काय साकरे हल्ली माझ्याबरोबर जास्त नस्तीयास.”

तिचे ते बोल साकरीला लागले. ती तिला म्हणाली, “ वज्रे तुझे टोमणे कळतात. रोज शाळेला तुझ्यासंगे जाते. व मला म्हणतेस की तुझ्याबरोबर नसते म्हणून. तुझ्यासारख प्रत्येक गोष्ट मनाला लावून धरल, म्हणजे झालंच की चांगभलं.”

वज्रा म्हणाली, “ एवढं कशाला बोलतीयास. मी काही तुला सुळावर चढवले नाही.”

 “ हो तर तू शांतीसंग बोलत नाहीस म्हणून मी काय मूग गिळून बसू होय. मला सगळी सारखीच.”

वज्रेस आपण नागिनीच्या बिळावर पाय ठेवल्यासारखं वाटू लागलं. तिचं लक्ष शांतीकडे गेले. ती गपचूप धुणे धूत होती. वज्रेन काही पुढे न बोलता आपल्या म्हशी पुढे दामटल्या. म्हशी नदीचा गोंड चढून वर आल्या. व वाटेला लागल्या. वज्रेन उगवत्या सूर्याला नमस्कार केला. नंतर वेदगंगेला नमस्कार करून ती वाटेला लागली. पुढे वाटेला रेडकी शंकर आबाच्या शेतात डोकावताना तिला दिसली. तस वज्रेन धावत जाऊन एक काठी लगावताच. ती उड्या मारत पळाली. ती मागोमाग निघाली. इतक्यात मागून हाक आली. “ वज्रे थांब, वज्रे थांब.”

तिने मागे वळून पाहिले तर तिला साकरी बोलावताना दिसली. तिचे डोळे पाणावले होते. ते पाहून साकरी म्हणाली, “ काय झालं रडायला.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ मी काय तुमची शत्रू आहे काय? एवढं घालून पाडून बोलायला.”

“ हे बघ तू वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस. तू जशी बोललीस तसच मी पण बोलले. सोड तो विचार, चल आपण जाऊ.”

शांती तोपर्यंत तिथे आली होती. तिचे मुकेपण तिला खटकत होते. ती म्हणाली, “ बघितलंस किती ताटतेय. चांगल सहा सात महिने झाल असतील कशी मूग गिळून बसलेय.”

 तेव्हा साकरी म्हणाली, “ तूच बोलतीस म्हणून बरं, आधी आपण बेडकासारखं फुगायच व नंतर कांगावा करायचा.”

तेव्हा ती म्हणाली, “ होय तर मी कांगावा करतेय. पिंपळावर बसलेली हाडळच नाही का?”

साकरीला राहावलं नाही.  ती शांतीला म्हणाली, “ शांते बोल की वज्रेसंगे.”

तेव्हा शांतीला त्या दोघींचा राग आला. ती म्हणाली, “ही काय महाराणी आहे. चांगल महिनाभर हिच्यामाग बोलण्यासाठी हिंडलो. कधी मागून काही न आणणारी मी हिच्यासाठी मी मोग्रीचा गजरा पण गुंफला. पण या बयेला माझी किंमत नाही. हे सगळ माहीत असून देखील तू मला बोलतेस होय.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ होय माझेच चुकले, माफ कर मला. की पाय धरू तुझे.”

शांती म्हणाली, “ नको धरुस.”

त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रु पडू लागले. शांतीने आपल्या डोक्यावरील धुण्याची बुट्टी बाजूला ठेवली. व तिने गच्च जाऊन वज्रेस मिठी मारली. व आपला खूप दिवसाचा अबोला संपवला.”

थोडा वेळ झाल्यावर साकरी म्हणाली, “ तुम्हा सोनार बामणीनीच्या एकित मला मात्र बाजूला ठेवू नका म्हणजे झाल.” तेव्हा त्या हसल्या. व डोळे पुसत घरी निघाल्या. या तिघींना एकत्र येताना पाहून म्हस धुवायला गेलेल्या जानबान पाहिलं. तो म्हणाला, “ काय दोन ओहोळ एकत्र आले वाटत.”

तेव्हा साकरी त्याला म्हणाली, “तुला काय वाटले तू बांध घातलास, म्हणून काय फुटायचा राहतोय का? जा की गपगुमान मुकाट्याने तुझ्या कामाला.” तेव्हा तो खाली मान घालून निघाला. त्याला शांती जाता जाता म्हणाली,” त्या दिवशीचा प्रसाद विसरलास वाटत. तेव्हा तो मुकाट्याने निघून गेला.” आज त्या तिघी आनंदात घरी गेल्या.

क्रमश : पुढे....


सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग ८

८) गुरुजींना शिक्षा

लेखक : निशिकांत हारुगले.

दिवस सरत चालले होते. एके दिवशी आई वज्रेला व व्यंकूला म्हणाली, “ म्हशी सोडा, जरा त्यांचे पाय हलके होवू देत. व धुवून आणा.”

तसे वज्रेन थोरल्या म्हशीला लोडना बांधला. व तिचे दावे सोडून वेसणीला दोर बांधला. व दादाने दुसऱ्या म्हशीला व रेडकीला सोडलं. व बाहेर म्हशी काढल्या. ती दोघे नदीच्या वाटेला लागलीत. ओढ्याला पाणी असलेने अनेक जण जनावरे व धूणं धुवायला ओढ्याला जात असत. शांती व साकरी धूण धूत होत्या. वज्रेन आपली म्हस वरल्या कोंडीकडे नेली. तेथें जाताच म्हस फतकल मांडून बसली. त्या दोघा भनी भावंडांनी म्हशी धुतल्या. व बाहेर काढल्या. म्हस धुवून जाताना शांती न शुक शुक अशी साद दिली. पण तिने लक्ष दिले नाही. साकरी मात्र म्हणाली, “ काय वज्राबाई लवकर म्हस धुवायला आलीस वड्यावर.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ माझ्या अगोदर तूच आलीस व मला म्हणतेस लवकर कशी आलीस. तुला तर माझी गरजच नाही बघ. नाहीतर मला बोलवायच्या आधी आली नसतीस.”

वज्रेच टोचून बोलण जाणवल्यावर साकरी तिला म्हणाली, “ बघुया किती दिवस अबोला टिकतोय ते, मी पण याच गावात राहते.”

“ हो तर मग रोज भिंतीवर काठ्या

रोज ओढत जा.” असे म्हणत वज्रेन शांतीकडे भुईतून बघितलं. व ती पुढे गेली. तिच्या पाठोपाठ तिच्या भावाने रेडकी व दुसरी म्हस काढली. व तो ही निघाला. जाता जाता मात्र एक टोमणा मारून गेला. “ बिचाऱ्या मैत्रिणीत किती चांगल चाललं होत. कोण्या नारदाने कळ लावली. देव जाणे.”

व्यंकूचे शब्द कानावर पडल्यावर शांता विचार करू लागली. व तिला आठवलं. की गुरुजींच्यामुळे हे सगळ झाल. तरी देखील आपण वज्रेला बोलती करायचं तिनं ठरवले. ती वज्रा दिसेल तिथे बोलावण्याचा प्रयत्न करी. पण वज्रा तिच्याकडे लक्ष देत नसे.

संध्याकाळी शांता दुकानातून गूळ आणायला चालली होती. तेव्हा तिला वज्रा शेवग्याच्या शेंगा काढताना दिसली. तेव्हा तिने शुक शुक करत बोलावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वज्रा शेजारी असलेल्या गणूस म्हणाली, की बाळा चिचुंद्री कुठे दिसते का बघ पाहू. तेव्हा तो मुलगा झाडाच्या बुंध्याभोवती फिरून चिचुंद्री, चिचुंद्री असे बोलत फिरू लागला. शांतीचा मात्र आता चांगलाच स्वाभिमान दुखावला. ती दुकानाला गेली. व परत घरी जाताना वज्रेस तिचा लालबुंद चेहरा दिसला तिला ती रागवल्याच जाणवलं. व वाईट वाटल. आपण हा अबोला जास्तच तानतोय हे तिला जाणवल. आपण साध झाड वेलींना दुखावत नाही. अन् आपल्या जिवलग मैत्रिणीला अस बोलायचं तिला वाईट वाटल. पण यामुळे आपण जास्तच मवाळ झाल्याचं शांतीस जाणवलं. व तिने इथून पुढे ती स्वतःहून बोलल्या शिवाय आपण बोलायचं नाही असं ठरवल. व इथून पुढे तिच्याकडे बोलण सोडाच पहायचं देखील नाही असं तिन ठरवल.

त्या दिवसापासून शांती अत्यंत शांत वागू लागली. घरात आईला कामात मदत करणे. वडिलांना सोनारकामात मदत करणे. बाजारापासून झाडलोटीपर्यंत सर्व कामे ती करू लागली. शाळेला नियमित जाणे. वेळच्यावेळी अभ्यास करणे. यामुळे तिचा दिवस कसा जातो हे तिलाच कळेना.तिचे हे बदललेले वागणे पाहून दामाजीपंत व सुंदरा दोघेही खुश होते. वज्रेलाल देखील शांतेत झालेला बदल जाणवला.तिला वाटायचे हा अबोला संपवला तर तिला जाऊन गच्च मिठी मारावी व आपले हे अबोल दुःख संपवावे. पण तिच्या नजरेस नजर भिडवण्याचे धाडस मात्र आता वज्रेत नव्हते.

 शांतीचा स्वभाव जरी बदलला तरी तिच्या मनात वर्गशिक्षकाविषयी बराच राग होता. बघता बघता दिवस सरू लागले. सहामाही परीक्षा झाली. व मार्क आले. शांतीला वज्राचे तोडीस तोड मार्क मिळाले होते. वज्रेस वाटले की तिला जाऊन आपण खूप शुभेच्छा द्याव्यात. पण शांतीन आपला जर सर्वांसमोर पाणउतारा केला तर. असे अनेक प्रश्न ही तिच्या मनात उठत होते. दीपावलीच्या आनंदात पण या अबोलपनाचे विरजण जाणवत होते. सुट्टी संपली. पुन्हा शाळा सुरू झाली. एके दिवशी सकाळी सकाळी शांती आईला म्हणाली, “ मला थोडी कोराटीची फुले हवी होती. मी जाऊन आणू का?”

आईचा होकार मिळताच ती घरातून बाहेर पडली. व शिवाराच्या वाटेला लागली. पावसाळा संपला असला तरी अंधळशाहीच्या सरी अधूनमधून येत होत्या. अचानक रात्री कोसळलेल्या पावसामुळे गारवा सुटला होता. पायात झालेल्या चिखल वाटेतून वाट काढत ती शिवारात चालली होती. मोर रानात केकावत होते. ती लगेच तुकाआण्णाच्या घाळीकडे गेली. तिथे कोराटीची जाळी होती. तिथली फुले पटापट काढून तिने आपल्या पिशवीत घेतली. सकाळची वेळ असल्याने शिवारात कोणी नव्हते. ती निरव शांतता भीतीदायक व एकलेपणाची जाणीव करुन देत होती. कशीबशी तिन एका गजर्याची फुले गोळा केली व ती वाटेला लागली. जरा पुढे आल्यावर पळसाच्या झाडाची काही पाने तोडून तिने गवत काड्यांनी तिचा द्रोण केला. वाटेत सगुणाआत्तीच शेत लागत असे. त्याला वाटेकडून काळ्या मेहंदीच्या जाळीन आच्छादलेले होते. तिथं आल्यावर त्या मेहंदीत असणाऱ्या एरड मुगलीचा डहाळा तिन मोडला. तेव्हा तिचे लक्ष त्या झाडाच्या हिरव्या बियांकडे गेले. तिला आजोळच्या आजीचे बोल आठवले. की ती सांगत असे. “पोरीवो एरंडमुगळीच्या काड्या जशा दात घासायला चांगल्या. तितक्याच तिच्या बिया विषारी त्यानें विषबाधा होते. त्यांच्या वाटेला जाऊ नका हो.”

  तिला ते आठवले. तिने ती काडी घेतली. दातावरून फिरवत पुढे आली. पुढे तिला कुंपनात कावशीची वेल दिसली. तिने इकडे तिकडे पाहिले रस्त्यावर व वळणावर कोण आहे का? कोणी नाही याची खात्री पटताच तिने जाळीत हात घालून अलगद कावशी काढून पळस पानात बांधली. व आपल्या पिशवीच्या तळाला टाकली. व वाटेला लागली. पुढे वळणावर बाबू पेंटर पेंडीला निघालेला गाठ पडला. त्याचे डोळे लाल लाल कुल्फीगत होते. तो शांतीला पाहून खेकसला.

“ सकाळी सकाळी सापकिरड्याच भुतावाणी कशाला फिरतेस.”

“ थोडी कोराटीची फूल हवी होती.”

शांती उत्तरली.

“ काय गजरा घालून नव्या नवरीवाणी मिरवायला जायची आहेस का? पायाखालचं झाल असत म्हणजे. आज्जा आठवला असता.”

तेव्हा शांतीने डोळे वट्टारून त्याकडे पहिलं.

“ तुम्हा मुलींना फुलं म्हणजे सोन्याहून प्रिय बुवा.पण या वासाच्या फुलांच्या जाळ्यामध्ये भुजांगाचा वास असतो. तो डसला तर पाणीही मागू द्यायचा नाही. जा आता माघारी.”

त्याच्या बोलण्यात करडेपणा होता. पण पोटात फणसावाणी माया होती. शांती हसतच पुढे गेली. थोडया वेळात ती घरात पोहोचली. आई वाट पाहत उभी होती. तिला येताच म्हणाली, “ काय फुलं उमलायची वाट पाहत होतीस काय? मला वाटल इथ जवळ कुठेतरी गेली अससिल तर तिकडे शिवारात गेलतीस होय. चल आटप लवकर अंघोळ करून घे.”

तशी तिने ती पिशवी कणगीच्या कोपऱ्यात ठेवली. व अंघोळीला गेली. पटापट अंघोळ करून तिने आपले आवरले. व सुईदोरा घेऊन ती फुलाच्या पिशवीसवे जिन्यावर गेली. तिने पटपट गजरा विणला. व कोणी पहात नाही हे बघून आपले दप्तर काढून एका कागदात ती कावशी बांधली. व सुरक्षित तळाला ठेवून वर दप्तर भरल. व ती मांजरीच्या पायांनी खाली आली. दप्तर ठेवून तिने नट्टापट्टा केला. व गजरा माळला. आपले आवरले. जेवण केलं. व ती शाळेला गेली. शाळेत गेल्यावर तिला पाहून इतर मुली कौतुक करू लागल्या. वज्रेस वाटत होत की आपणही जावे व शांतीसी बोलावे. मात्र तिचे ताठणे पाहून तिने गप्प राहणे पसंत केले. दिवस कसा गेला हे कळलंच नाही. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. सर्व मुलांनी आपापले दप्तर भरले गुरुजी ऑफीस मध्ये गेले. वज्राही साकरीसोबत बाहेर गेली. शांती मात्र हळूच शाळेजवळील मोगळात गेली.

मुले गेल्यावर ती हळूच वर्गात गेली. तिने आपल्या दप्तरातील कावशी अलगत काढून टेबल व खुर्चीवर टाकली. कागदाने ती पसरली. तिचे लव्हाळीसारखे काटे पसरले. व कुणी यायच्या आत सगळा कारभार आटोपुन ती वर्गाबाहेर पडली. व घरला गेली. घरी आल्यावर तिने परसात न्हाणीत जाऊन आपले दप्तर धुतले. व उनात घातले. 

दुसऱ्या दिवशी तिने शाळेला जाताना दुसऱ्या जुन्या दप्तरातील आपले शालेय साहित्य घेऊन ती गेली. शालेय प्रार्थना झाली. मुले वर्गात आली. गुरुजी आले. त्यांनी मुलांकडून वर्ग लोटून घेतला. व स्वतः टेबल व खुर्ची झाडून ते त्यावर बसले. थोड्या वेळाने त्यांना खाजवू लागले. ते तडक वर्गातून ऑफिसमध्ये गेले. तिथे हेडमास्तरांना सांगून ते रजा मंजूर करून गावी गेले. हेडमास्तरांनी मुलांना दुसऱ्या वर्गात बसवले. व वर्ग स्वच्छ धुवून घेतला. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. मुले घरी निघून गेली. शांतीला आनंद झाला. पण तो तिने कुणालाही दाखवला नाही. वज्रेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिला काहीतरी घडले आहे .याची जाणीव झाली. कारण गुरुजी खाजवतच बाहेर पडले होते. पुढे दोन दिवस काही गुरुजी शाळेला आले नाहीत. दोन दिवसानंतर गुरुजी शाळेत आले.

  वज्रेन त्यांना विचारले, “ दोन दिवस कुठे होता?”

आजारी असल्याचे कारण त्यांनी सांगितले. तिचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले. त्यांनी कोणतेतरी तेल लावल्याचे जाणवले. पुढे तिने काही विचारले नाही. वर्गात पुढे बसत असल्याने खुर्चीवर गुरुजी बसल्यावर विजार थोडी उचलल्यावर त्यांच्या पायावर ओरखडे दिसू लागले होते. जे त्यांनी खांजळल्यामुळे निर्माण झाले होते. बाकीची मुले अभ्यास करताना वज्रा मात्र विचारात गढून गेली होती. तिचे अभ्यासात लक्ष लागेना. संध्याकाळ झाली. शाळा सुटली. तसे वज्रेन आपले दप्तर भरले. व ती साकरीसोबत निघाली. नेहमी तिच्यामागे दोन पावले असणारी शांती सगळ्यांच्या पुढे होती. व ती आज आनंदात होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. तिच्यापासून दूर न राहणारी. व न करमनारी शांती आज एवढ्या आनंदात कशी याचा विचार करत ती गल्लीत आली. तेव्हा तिचे लक्ष पाटलांच्या गुलमोहराच्या झाडाकडे गेलं. गगुलमोहराची लालेलाल फुले मांडवात झालरीसाठी वापरतात. तेव्हा तिला गुरुजी रजा टाकून गेलेल्या आदल्या दिवशी शांतीन घातलेला कोराटीच्या फुलांचा गजरा घातलेला तिला आठवला. ही फुले शिवारात मिळतात. व शांतीनच खुजलीची कावशी आणली असल का? असा विचार मनात आला. कारण वर्गात असा टारगटपणा कोण करणार नव्हत. व गुरुजींनी शांतीला शिक्षा केली त्यामूळे तिनं असं केल असेल तर तिला आपण गुरुजींची माफी मागण्यास लावायच असं ठरवून ती घरी आली.

पुढे क्रमशः....

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

कथा वाकाट खोर्याची भाग ७

 कथा वाकाट खोर्याची भाग ७


७) आज्जी व व्यंकूचे भांडण


व्यंकूला वज्रेचे काळजी करणे आवडले. मघाशी सापाला पाहून घाबरणारी व आता धाडसाने पुढे होणारी वज्रा आठवली. व तो मनात म्हणाला,की परिस्थिती माणसाला शहाणपण व धाडस देते. 

ती दोघे पायवाटेने मुख्य रस्त्याला आलीत. वज्रेस जरा बरे वाटले. ती झपझप वाट चालू लागली. बघता बघता ओढा पार पडला. टेंबरणीचा चढ चढून ती वर आली. तिथं भल मोठं चिंचेचं झाड होत. त्या झाडाच्या कच्च्या हिरव्या चिंचा खुणावत होत्या. तिला शांतीची आठवण झाली. व तिचे हास्यच मावळले. तिचं काळीज धडधडयला लागले. व डोळे पाणावले. ती तशीच पुढे चालली. बघता बघता दोघे गावात पोहोचली. वाटेवर वाण सामान आणायला गेलेली शांती तिला गाठ पडली. जवळून जाताना शांतेने शुक शुक असे खुणावले. पण वज्रेन दुर्लक्ष केल. व ती घराकडे गेली.

शांतीला आपण इशारा करूनही वज्रेन न पाहिल्याचा राग आला. ती टाचा आपटत घरात गेली. व हातातली पिशवी आईसमोर हिसक्याने ठेवून पुटपुटत जोत्यावर आली. व बडबडू लागली. तिच्या मागोमाग येत आई सुंदरा म्हणाली, “ काय झालं एवढ टाचा अपटायला.”

“ टाचा आपटू नाहीतर काय करू, लई शेफारलिय बामणीन एवढं शुक्ss शुकss करूनही बघितलं नाही. आपल्याच तोऱ्यात वावरते. महाराणीच समजते. पण मी ही काही कमी नाही. चांगली सोनारीन आहे. नाही हिच कान टोचल तर बघ. नाव नाही सांगणार.”

शांत टाचा आपटत जिना चढून वर निघाली. तेव्हा सुंदरा तिला चेष्टेने म्हणाली, “आग, एवढ्या रागात वरती चिडून फास बिस लावून घेशील मैत्रीण बोलत नाही म्हणून, मला रडायला बाई वेळ नाही.”

“ कळतात टोमणे मला, फास लावून घ्यायला एवढी बुळगी नाही मी. जा जेवण कर जा. तुला तर तिचे शेण काढणे, धूनं धुणे, भांडी घासणे आवडते ना.”

“ हो ग बाई मला वज्रा आवडते. तुझ्यासारखी फटाकडी नाही ती. कशी नम्र असते ती.”

“ हो का म्हणून नदीवर धूनं धूत पाटलाच्या नम्रीन शयनग्रामचा पोऱ्या पटवला. बापाला लगीन लावस्तोवर पुरेवाट झाली.”

सुंदरा म्हणाली, “ तुझ्याशी बोलायला पायलीची पेज प्यायला पाहिजे. एक वेळ नव्हरा बायकोचं भांडण परवडल. पण तुम्हा मैत्रिणीत मध्यस्थी नको.”

“ मग मी काय तुझ्या माग वकीलपत्र घेऊन लागलेय.”

 असे बोलत कोपऱ्यात बसून शांती स्फूंदू लागली. आता लई तापायला नको. म्हणून शांतीच्या आईन गप्प बसायचं ठरवलं.

 * * * *

इकडे वज्रेन घरी आल्यावर आपल्या डोईवरची भांडी उतरून न्हाणीघरात ठेवली. तोपर्यंत परसदारी गोठ्याजवळ व्यंकूने आपल वज्ज् टाकल. व पेंड्या सुट्ट्या केल्या. व म्हशींच्या पुढील काडसर काढून त्यांना दोन चार पेंड्या टाकल्या. व विहिरीवर न जाता न्हाणीघरात येऊन हात-पाय धुवायला त्याने रांजनात हात घातला. रांजनात पाणी नाही बघून तो चिडला. व आज्जीला ओरडू लागला.

“ आजी आजी.”

तेव्हा त्याचा आवाज ऐकून शिंद्यांच्या हौसाबरोबर चकाट्या पिटत बसलेली म्हातारी म्हणाली, “ आली वाटत कारवान, जाते नाहीतर व्यंक्या घर डोक्यावर घ्यायचा.” असे म्हणत घराकडे आली.

तिला शिंद्यांच्या घराकडून येताना पाहून म्हणाला, “ काय करायला गेली होतीस. इथ हातपाय धुवायला पाणी साध नाही.”

म्हातारी म्हणाली, “ मग जा की बाबीवर परसदारात केवढी मोठी बाब हाय.”

“ बावीवर जायला माझ डोकं भनभनलय वज्ज् केवढं जड होत. व मला तू बाबीवर जायला सांगतीस व्हय.”

 तेव्हा म्हातारी म्हणाली, “  चार पेंड्या टाळूवरन आणून माझ्यावर उपकार केल्यासारखे बोलू नकोस. जा तिकडे मला जमत नाही माझा पाय मुरगळलाय.”

“ पाय मुळगळायला गेलतिस कूठे ते मला सांग.”

“ परड्यात गेलते फुलं आणायला.”

व्यंकू आणखी चिडवून म्हणाला, “म्हातारपणी बर की तुला फुलं आवडतात.”

व्यंकूचे बोल ऐकूण म्हातारी चिडली. व म्हणाली, “ मगापासून तुझ बोलणं ऐकतेय तू म्हणसील ते गपगार ऐकायला तुझी बायको नव्ह. माझ्या पोराने कधी का सुनेने मला हे कर का ते कर म्हटल नाही. व तू कोण बोलणार गणोबा जा माझं डोकं खाऊ नको.”

तसा तो चिडून कळशी घेऊन परड्याकडे निघाला व म्हणाला, “चकाट्या पिटाय जायला बर की पाय दुखत नाही. व नातवाला पाणी आणून देताना बर दुखतोय. बर सापडलय, कारण तुला आता बसशील विव्हळत महिनाभर तुला गावलिया गरीब सून म्हणून तुझा तोरा चाललाय. चहाच्या कपापासून गरम पाण्यापर्यंत सगळ हातात मिळतंय म्हंटल्यावर, तूच आळशी गणोबा.”

 हे बोल ऐकूण म्हातारी परसदारी आली व म्हणाली, “ तुझ्या का पोटात चावतय देवानं द्यावं व नशिबानं घ्यावं. माझ सुख बघवत नाही होय.”

तो तडक बावीजवळ आला. वज्रेला पाणी काढताना दिसली. तोपर्यंत वज्रेन  चांगल दोन बारड्या पाणी काढल होत. तिला पाहून तो म्हणाला, “ तू कशाला काढलस. मी काढल असत की.”

“ तुला फार ओझ झाल होत. ते मला जाणवलं. म्हणून काढले. आजीसी कशाला वाद घालत होतास. मला बोलायचं मी काढल असत. मला काढता येत. असं मोठ्यांना उलट बोलण आपली संस्कृती नव्हे.”

ते ऐकताच व्यंकूम्हणाला, “तुझ्याकडून पाणी उपसून घ्यायला तू अजून लहान आहेस. व दुसर म्हणजे आजीचे चार शब्द ऐकल्याशिवाय मला करमत नाही.”

त्याने हातपाय धुतले. वज्रा कळशी घेऊन घरात आली. ती पाणी न्हाणीतल्या रांजणात ओतू लागली. तेव्हा चुलीतला राकूंडा काढताना आजी म्हणाली, “काय झाली का बंधूसेवा.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ हो झाली की तुझी काय करू.”

“ हो आहे की सगळ घर लोटून म्हशीच शेण काढ. मी चहा ठेवते. व पाणी भरते. उगाच विहिरीवर जाऊ नको.”

आजीच बोल कानावर व्यंकूच्या पडल. तो बाहेरूनच म्हणाला, “ वज्रे तिला सांग तिथं चुलीजवळच काय ती घुटमळ म्हणावं. इकडं उगाच एक घागर भरायची. अन् महिनाभर लोळत पडायची. मी भरतो पाणी म्हणावं.”

व्यंक्याचे बोल कानावर पडताच म्हातारी म्हणाली, “ बर झाल. देव पावला.”

वज्रेन झाडू हातात घेऊन सगळ घर झाडल. शेण काढून टाकले.  व्यंकूने  पाणी भरल. ते पुन्हा आपल आवरून जेवणखोलीत आलीत. आजीनं तोपर्यंत गुळाचा चहा केला होता. तिनं कपात ओतून दोघांना दिला. तो चहा घेत व्यंकू आजीकडे पाहू लागला. ते पाहून आजी म्हणाली, “ शिंक्यावरल्या लोण्यावर टपून बसलेल्या बोक्याप्रमाणे  काय बघतोस पी गप्पवाणी.”

तसे त्याने चहा घेतला. व जाताना  म्हणाला, “ मी बोका तर बोक्याची आजी कोण.”

तेव्हा म्हातारीनं मुडगा उचलला व म्हणाली, “ पळतोस काय हाणू एक.”

व्यंकू दाणकन बाहेर पळाला. म्हातारी जेवण करू लागली. सांज व्हायला शेतातून माणसं घरी आली. भांगलण संपली होती. वज्रेन केलेलं काम पाहून पार्वतीनं तिची माया केली. डोक्यावरून हात फिरवून कडाकडा कपाळी मोडली. “शहाणी माझी बाय ग म्हणाली.”  व सांज झाल्याने घरला गेली.


क्रमशः पुढे……….


कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...