गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग २०

 २०) बाजाराचा दिवस अन् टवाळखोरांची गंमत

लेखक :  निशिकांत हारुगले

मुली आता चांगल्याच वयात आलेल्या होत्या. तरुणपणात त्यांचं लावण्य खुलत होत. त्यांना स्थळे चालून येत होती. घाटी भागात मुली वयात आल्यावर त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी लागत असे. साकरीला पाहायला राधानगरीकडील एक मुलगा आला होता. त्याचे दात जरा पुढे आलेले होते. त्यावेळी साकरीला नटवायला तिच्या मैत्रिणी जमल्या होत्या. तेव्हा त्याने नवरीला पाहताना साकरीला पसंत न करता त्याने वज्रेला पसंत केलं. तेव्हा एकच गोंधळ उडाला. वज्रा रडायला लागली. तेव्हा नवरदेवाची कशीबशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो तिचं पोरगी पसंत आहे. असे म्हणू लागला.जमलेल्या बायका वज्रेला आत बोलावून म्हणाल्या.” कशाला पुढे पुढे मिरवतीस तू कलमडलीस अन् साकरीच लगीन मोडल.”

तेव्हा साकरीचा बाप आत आला. त्यान वज्रेला बायकांनी धारेवर धरलेल पाहिलं व त्यो म्हणाला, “कशाला त्या पोरीला बोलता. तिची काय चूक आहे. गेला तर जाऊ दे. साकरीला एकापेक्षा एक स्थळे आणेन मी.”

इतक्यात ती मंडळी गेली. साकरीन सुटकेचा निस्वास टाकला. ती लगेच म्हणाली, “ मला तो फावड्या पसंत नव्हता. फावडे दात त्याचे, त्याने काय मी शेण काढू?”_मात्र या सर्व गोष्टीचा वज्रेवर खूप परिणाम झाला. व तिने ठरवले की आपण कधी कोणाच्या लग्नाच्या ठरावाला जायचं नाही.

 पण जसे तरुणवयात यावे तशा जबाबदाऱ्या पणं वाढतात. वय होत आल्याने पार्वतीला बाजाराला जायला जमत नव्हते. त्यामूळे घरचा बाजार वज्रेचा भाऊच बघत असे. पण कधी कधी तरी वज्रा ही बाजाराला जात असे. एके दिवशी बाजाराला जायची पाळी वज्रेवर आली. ती शांती व साकरी तिघीही बाजाराला निघाल्या. बाजाराला जाताना त्याना नदीच्या वाटेने जावे लागे. पण त्यांनी त्या जवळच्या मार्गाने न जाता कच्या सडकेने जायचे ठरवले. दुपारची उन्ह चढू लागली होती. चालून चालून उन्हाने कायली व्हायला लागली होती. वाटेत कुठेतरी झाडाखाली किंवा राईत थांबत त्या पुढे निघाल्या. बाजार पेठेत आल्यावर त्या तिघी बाजार करण्यात गुंग झाल्या. सर्व पेठ फिरून मालाची चौकशी करत त्या पेठत खालपतुर गेल्या. गारगोटी बाजारात मालाची आवक वाढल्याने दर स्वस्त होता. बाजारातील वस्तू खरेदी करत त्या पेठेच्या मध्यभागी आल्या. तिथं गणू शेटच हॉटेल होत. त्याच्या हॉटेलात भज्जी खूप चविष्ट असत. शांती वज्रा व साकरीला म्हणाली, “ चला आज गणुशेटच्या दुकानावर धाड टाकायची .”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ माझ्याकडे मोजकेच पैसे आहेत मी काही नाही.” तस साकरीन तिच्या नकार घंटेत आपला नकार मिसळला. तशी शांती चिडली. व म्हणाली, “ आता इथच थांबायचं तुमचा एक रुपया नको. मी आणतो भज्जी.”

असे बोलून तिने आपल्या जवळील पैसे पाहिले. पण ते थोडे होते. तेव्हा ती म्हणाली, “ मी आमच्या दुकानात जाऊन येतो.”

तिचे बोलणे ऐकून साक्री म्हणाली, “ नको तुझे आम्हाला दुकानातले पैसे, हे घे माझे. व जा घेऊन ये भज्जी.”

वज्रा ही आपले देऊ लागली. तेव्हा शांती म्हणाली, “ नको तुमचे पैसे वाटेला डोकं खाशीला. मी आणते दुकानातून.”

असे बोलून ती दुकानाकडे गेली. पेठतून वाट काढत ती दुकानात पोहोचली. दुकानात बाजार असल्याने खूप गर्दी होती. ती थेट गल्ल्यावर गेली. व तिने आपले बाबा दामाजीपंत यांकडे पैसे मागितले. दामजीपंत म्हणाले, “ घरी ठेवले होते की.”

शांती म्हणाली, “ ते तर केव्हाच संपले?.”

तेव्हा दामाजीपंतानी गल्ल्यात हात घातला व तिला पन्नास रुपये दिले. व सांगितले रात्री हिशेब पाहिजे.”

शांती लगेच चिडून म्हणाली, “काही पळून जात नाही, पोरगा झाल्यापासून बघतेय. लई हिशेब विचारताय. ठेवा लेकाला साठवून. मी काय लोकाची धन नव्ह.”

शांतीचे बोल दामाजीपंत यांना चांगलेच झोंबले.तिला पुढे काही न बोलता ते गप्पच राहिले.

तशी शांती दुकानातून बाहेर आली. व गर्दीतून वाट काढत निघाली. तेव्हा तिला कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवतेय असे वाटले. तशी ती पुढे गेली. गणूशेटच्या दुकानाबाहेर एका झाडाखाली वज्र व साकरी उभा होती. ती तडक आपल्या त्या मैत्रीणी जवळ आली.

 गर्दीतून आल्याने ती खूप घामावलेली होती. तिने वज्रा व शांतेजवळ पोहोचली. व चला म्हणाली. तेव्हा त्या नको भज्जी, वेळ होईल जाऊया. पायपण दुखतायेत. तेव्हा तिने त्यांच्या रट्टयाला हात घातला. व म्हणाली, “ मी झडती देऊन आलोय. अन् तुम्ही इथे नाटक करू नका.”

त्या दोघींना घेऊन ती हॉटेलात गेली. व बाकड्यावर बसून भज्ज्याची ऑर्डर एका पोऱ्याला दिली. तसा तो भज्जी घेऊन त्यापुढे ठेवून गेला. इतक्यात दोन तरुण मुले हॉटेलात आली. त्यांनी भज्ज्याची ऑर्डर दिली. व इकडे तिकडे बघत तो फिरून फिरून एखाद्या मारक्या म्हशीगत शांतीकडे पहाय लागला होता. आपल्या शेजारील मुलाकडे न पहाता तो म्हणाला, “ काय सदा आज काय आज पेठ एकदम झकाकाय लागलीय.”

तेव्हा तो दुसरा त्यास म्हणाला, “ तर काय, चांदण्याच उतरल्यात की जमिनीवर की स्वर्गातील अप्सरा बघ.” तेव्हा शांतीला व वज्रेला ही मुले आपल्याला बोलत्यात याची जाणीव झाली. तेव्हा शांतीने पाणी पित्याल्या ग्लासला हात घातला. ती तामसी स्वभावाची आहे. हे जाणून वज्रेन तिच्या हातावर हात ठेवला.  व शांत राहण्यास सांगितले. तेव्हा तिने त्या मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. व भज्जी खाल्ली.

तेव्हा त्यातील एकजण म्हणाला, “काय वर्षाची भुकेली आहेत पाखर वाटत.”

तेव्हा शांतीच्या डोळ्यात अंगार फुलत होते. पण ती शांत राहिली. त्या तिघींनी भज्जी खावून बिल भागवले. व बाहेर पडलीत. व त्या तिघी उरलेला बाजार करू लागल्या. तशी ती दोघे जण त्यांच्या शांततेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होती. त्या बाजारपेठेतून सरळ गावच्या वाटेला लागल्या. जशा त्या वाटेला लागल्या तशीच ती मुले ही त्या मागोमाग जाऊ लागली. एक मैलभर अंतर चालल्यावर त्यांना वाटेत राईच्या डोंगरातून आलेला ओढा लागला. त्यांनी ओढा पार केला. ती मुलेही मागोमाग होती. अचानक त्या मागे फिरल्या. तशी ती मुले थबकली. तरीपण धाडसाने त्यातील पाटलाचा मुलगा पुढे झाला. व शांतीच्या नजरेत नजर भिडवन्याचा त्याने प्रयत्न केला. तशी ती त्याला म्हणाली,  “ काय दिवस भरलेत वाटत तुझ.”

तसा तो म्हणाला, “ होय, तुला आज प्रथम बघितलं व मी तुझ्या प्रेमात पडलो.”

तशी शांती म्हणाली, “ होय का? मला पण बोलायचं आहे. इथ तू माझ्या प्रेमात पडलास. व माझ्या पायातील कापशी वाहन ही तुझ्या प्रेमात पडली. भेटणार काय तिला.”

तशी वज्रा त्याला म्हंटली, “ हे बघ तुला हाड पाहिजे असतील जाग्यावर तर माग फिर व चालता हो इथून, नाहीतर वैद्याचा पत्ता मागवून ठेव पोहचवू तुला. आमच्या नादाला लागशिल तर बरगडीच्या फुकण्या करून चुलीत कोंबायची पाळी आणू नकोस. जा गुमाण माग. या बरगड्या म्हातारं पणापर्यंत जपाव्या असं वाटतं असेल तर जा माग.”

त्यांचे हे धिटपणाचे बोलणे ऐकून तो म्हणाला, “ तुमचे हे नाजूक हात ते काय बिघडवणार माझं, ते तर पोळ्या लाटायच्या कामाचे.”

तेव्हा आतापर्यंत गप्प बसलेली साकरी तिला म्हणाली, “ काय गावाकडे लाकडे नदीवर ठेवून आलास वाटत. त्या फक्त बरगड्या मोडायच बोलतात मी तुझ्या डोक्याचा फुटबॉल करायचं म्हणते.”

तेव्हा तो कुस्तितपणे म्हणाला, “तुमच्या सारख्या छप्पन जणींना मी नाक घासायला लावलेय. तिथे तुमची काय बिशाद.”

तेव्हा शांती म्हणाली, “ त्या छप्पनजणी म्हणजे आम्ही नव्हे. सगळ्या बिळात काय उंदरे नसतात, व विरोळे ही. आम्ही सह्याद्रीच्या नागिनी आहोत नगिणी. ज्यांच्या चावण्याने पाणी सुद्धा मिळायचे नाही.”

तस तो पुढे आला व त्याने शांतीच्या रट्टयाला हात घातला. ते पाहून वज्रा चिडली. तिला शांतीला असे धरणे आवडले नाही. त्याच्या डोळ्यातील लाली त्यांनी ओळखली. तिने सर्व ताकदीनिशी त्याला ढकलले. परिस्थीती लक्षात घेता साकरी जवळच्या फडात घुसली. व तिने त्यातले दोन ऊस मोडून आणले. व शांतीकडे देत. तो उभा राहण्याच्या आधीच त्याला बडवायला सुरूवात केली. त्यावर अशा या तिघी चवताळून पडताच. त्या बरोबर आलेलं पोरग घाबरल. व मागे पळालं. त्या तिघी जवळपास काय सापडलं त्या वस्तून त्याला मारत होत्या. त्याला सावराय त्यांनी वेळच दिला नाही. इतक्यात एक सायकलस्वार तिथे आला व त्याने थांबून त्यांचे भांडण मिटविले. व त्या मुलास पिटाळले. त्याची चांगलीच जिरली होती. या अशा मुलींचा रणावतार बघून त्याचे धाबे दणाणले. दोन चार गड्यांना लोळवेल असा गडी त्याला यांनी सळो की पळो केले. तो गुमान माघारी निघून गेला.

तो जाताच त्या तिघींनी उसासा टाकला. थोड त्या पुढे चालत गेल्या. व एका झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागल्या.

शांती मात्र वज्रेकडे पाहत होती. ती वज्रेस म्हणाली, “ आज काय लक्ष्मी अंगात शिरली होती वाटत. आमच्या पेक्षा तूच त्याला लई बडवलास. वाटत नव्हत या अबोल देहात एवढी प्रचंड ताकद आहे. मारखाऊन बसेल महिनाभर पाट चोळत.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ मारू नाहीतर काय त्याची पूजा करू. सरळ अंगाला हात लावतो पोरींच्या बापाची पेंड वाटली का? तो थांबला असता अन् काय आगळीक केली असती तर त्याच उर फोडून रागातच पितो बघ.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ त्याच्या घरातली त्याला बघून काय म्हणतील.”

तेंव्हा शांती म्हणाली, “ काय म्हणतील आलाय प्रसाद घेऊन.अन काय.”

त्या तिघी हसू लागल्या. थोड्या वेळाने त्या बाजाराच्या पिसव्या घेऊन घरच्या वाटेला लागल्या. घरी जाताना त्यांनी पक्के ठरवले की झालेला प्रसंग कुठेही बोलायचा नाही.

तेव्हा पासून त्या कधीही बाजाराला एकत्रितच जायच्या. तो मात्र ह्या दिसल्या की गप्प खाल मान घालून निघून जायचा.

…… …… …… …… …… …,.. …….



सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १८

 कथा वाकाटखोर्याची भाग १८

१८) म्हसिचे दूध

लेखक: निशिकांत हारुगले

पावसाळा संपत आला होता. भाताची पिके खाचरात डोलायला लागली होती. उसाची भांगलन सुरु झाली होती. साकरीचे आई वडील शेताला गेले होते. त्या दिवशी साकरी घरात असल्याने वज्रा व शांती तिला भेटायला तिच्या घरी गेल्या होत्या. त्यांना पाहून साकरीला खूप आनंद झाला होता. घरात येताना साकरीच्या घरातील म्हस त्यांना बघून शिंगे हलवत होती. वज्रा जरा भिंतिकडूनच गोठ्यात आली. शांती मात्र म्हणाली, “ काय लई शिंग हलवतीस. नवीन नवरीवाणी नाटकं करू नकोस. नाहीतर मुरगूडचा बाजार दाखवीन.”

तशी साकरी तिला म्हणाली, “ व्हय बाई, दाखवायलाच पाहिजे तिला बाजार. घरात दूध मिळावं व खर्च चालावा म्हणून कवडी कवडी जमवून साठवलेल्या पैशातून कडगावच्या बाजारातून आणली म्हटल पहिल्या येतची हाय. कमी दरात पण मिळल व तयार पण होईल. दोन चार येत खावून पैसा होईल. पण कुठल काय? यायल्या पासून धार तर सोडाच साध रेडकाला पण दूध देईना झालीया. कासत हात घातला तर अड्यापातूर उडी घेती. कास पण तुंबलिया, बसायला पण येत नाही. नखराच करतेय. महाराणी. कोकणातील डोंगर दर्यातला झाडाचा पाला खाणारी, इथली कणाची पेंडी खावून मजलिया नुसती. दुधाची हाय मारायची कशी?”

तेव्हा शांती म्हणाली, “ मारू नकोस आरती उतार तिची. काय पण ध्यान, चल तिची आज मस्तीच उतारू.”

शांतीने गल्लीतल्या चार-पाच पोरांना बोलावले. व त्या म्हशीला भिंतीकडे बांधले. वज्रेला धारेचे भांडे आणायला सांगितले. व आपण काठी घेऊन उभा राहिली. वज्रा जरा जपूनच म्हसीच्या मागे बसली. कासत हात घालताच म्हसीन टुणकन उडी मारली. तशी शांतीने दोन चार काठ्या लगावल्या. वज्रेस बाजूला व्हायला सांगून तिने तिची शेपटी धरली. तशी ती जास्तच उड्या मारू लागली. शांती म्हणाली, “ मार उड्या काय मारायच्या त्या.”

बराच वेळ उड्या मारून झाल्या. चांगला तास झाला. ती दमली. व भिंतीला जाऊन उभा राहिली.

वज्रेला पुन्हा हात घालाय सांगितले वज्रा जशी हात घाली. ती पाय उचलत असे. परत दोन काठया शांतीने लगावल्या. तशी ती टवकारून शिंगे हलवू लागली. शांतीने साकरीला घरातील दोऱ्या आणायला सांगितले. शेजारच्या शिरप्याने दोरीची म्होरकी केली व म्हसीला घातली. व तिची शिंगे धरून तोंड समोरच्या खांबनीला बांधले. वमगाचेे पाय एकत्र बांधून घातले. तिला आता जास्त हालचाल व लात उचलत येईना. शिरप्याने तिला भिंतीकडे रेटली. वज्रा धारेला बसली. तिने कासेत हात घातला, पण ती पानेव घालीना. पानेव देत नाही म्हणून तिने कासे जवळ चिमटे काढायला सुरुवात केली. तशी ती म्हस ओरडू लागली. तशी साकरी म्हणाली, “ बाई र्हावूदे ती धार.जाऊ दे धड घरातून ती. तशी शांती म्हणाली, “ तू गप्प बस कोंबडीवाणी. येवढा आटापिटा हिला सोडाय केला नाही.

असे बोलून तिने त्या म्हशीला एक गुच्चीही घातली. तसा तिने घाबरून पानेव घातला. वज्रा, शांती व साकरी फेरा फेराने धार पिळायला लागल्या. चांगलं दोन दिवसाच तुंबलेले असेल नसेल तेवढे दूध त्यांनी काढलं. या बायानी दूध द्यावी म्हणून जस त्या म्हशीला दमवल. तसच त्या म्हसिन या बायांना धारा पिळाय लावून घाम आणला. ती मात्र रवंथ करत शांत उभा होती. शेवटी म्हशीच्या मुसक्या सोडल्या. व तिला कोंडा व पेंड खायला घातली. साक्री ते दूध घेऊन जोत्यावर आली. व सगळ्यांना म्हणाली, “आज माझ्याकडून तुम्हाला दुधाची पार्टी.”

तेव्हा शांती म्हणाली, “ व्हय तर राणी उधार झाली, अन् काकडी वाटायला लागली. तोंड बघा.”

“ गप्प ग तू, बस इथ, आणते लगेच.”

साकरी म्हणाली व ती आत गेली. त्या किटलितील सार दूध काढून तिने चुलीवर ठेवलं. सगळी दूध प्यायला मिळणार म्हणून आनंदी होती. थोड्या वेळाने साकरी काळ तोंड करून बाहेर आली. तिचं तोंड पाहून शांती म्हणाली, “ काय साकरी ताई मांजर दूध प्यायल वाटतं.”

तस साकरी रडवेली होऊन म्हणाली, “ तुझ झालं काळ तोंड ते, तू बोललीस म्हणून हे सगळ झालं. अन् दूध फुटलं.”

तस शांती म्हणाली, “ कवळ दूध ते फुटेल नाहीतर काय होईल. त्यात घाल गूळ व कर चांगला खरवस.”

तस शांती व वज्रा स्वयंपाक घरात गेल्या. व त्यांनी त्या फुटलेल्या दुधाचा खरवस केला. व मगाशी मदत करणाऱ्या मुलांबरोबर खाल्ला. पण शांती मात्र खरवस खाण्यापेक्षा तिला दूध हवे होते. ती म्हणाली,

शांती, “कवळ दूध पाजून काय पोट बिघडवायचा बेत दिसतोय. जा दुसऱ्या म्हशीचं दूध आन जा. शिक्यावरलं.”

तशी साकरी आत गेली. व वाटीतून दूध घेऊन आली. ते पाहून शांती म्हणाली, “ तू काय मला बाळ समजतेस. वाटीतन दूध द्यायला. जा आण जा पेला भरून.”

तशी साकरी म्हणाली, “ काय बोका घुसलाय का पोटात.”

“ हो घुसलाय जा आन जा.” शांती म्हणाली. साकरीने आत जाऊन पेलाभर दूध घेऊन आली. एखाद मांजर मटकाव तस शांती दूध प्याली. तिच्या वटावर फुटलेल्या मिशा बघून मुले हसू लागली.

तोंडावरून हात फिरवून शांती म्हणाली, “वा मज्जा आली. साकरीबाई तुमची कृपा दूध मिळाला. नाहीतर थोड्या दिवसांनी ढेरीलाच जाणार होत ते. आता घरातल्यांना काय सांगशील.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ सांगेन की बोका प्याला म्हणून.”

शांती म्हणाली, “ साकरे तुझं बर हाय बघ, रोज दूध प्यायला मिळत.”

तेव्हा साकरी म्हणाली, “ कुठलं दूध अन् काय सोसायटीच कर्ज फेडायला व घरखर्चाला पैसे मिळावे म्हणून डेअरीला घालावे लागते. घाटी कुनब्याच्या घरात जन्म घेतला असतीस ना, कळलं असतं मग तुला.”

शेवटी गप्पा टप्पा करत त्या थोडावेळ खेळून आपापल्या घरी गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी म्हासिकडे पाहिले. त्यांना बघून ती घाबरून भिंतीकडे सरकली. व शांती व वज्रा हसत घरी गेल्या.


शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १७

 कथा वाकाटखोर्याची भाग १७

१७)पेरणी

लेखक : निशिकांत हारुगले.

सर्व गावची शेत तयार झाली होती, पण पार्वतीच्या शेतात कोणीही औत घालण्यास तयार नव्हते. प्रत्येकाची काही ना काही अडचण होती. वाडीची औत पण आपल्या आपल्या कामात मग्न होती. पेरणीचे दिवस म्हंटले की औतवाल्यांची चांदीच.

शिवानंद व पार्वतीन कित्तेक लोकांची विनवनी केली. पण कोणीही शेतात येईना. यामुळे पाटील चांगलाच खुश होता. तो दिसेल त्याला म्हणे शिवानंदाला म्हणावं अवंदा रानात पेंडी काप.

बाजारचा दिवस उजाडला. पार्वती बाजाराला गेली. बाजारात तिला गावच्या मानलेल्या भावाची बायको हौसा भेटली. दोघीत इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. शेवटी पार्वती म्हणाली, “काय सांगू बाई. रान पडायची पाळी आलीया. कोणी औतवाला येईना झालाय.रान पडायची पाळी आलीय.”

तवा हौसा म्हणाली, “ दोन दिवस कड काढ. मी लावून देतो मालकाला बैल घेऊन. जवा वैरण नव्हती तवा तून तूझ्या शेतातल पयान दिलस.

तवा आमची गुर जगली. अन् आता तुमच्या वाईट वेळेत आम्ही कस माग राहावं. काळजी नको सांगते मी यांना.” पार्वतीचा निरोप घेऊन हौसा गेली. पार्वती ही बाजार करून घरला आली. दोन चार दिवसात गावातील माणसांनी पेरा पूर्ण केला. सर्व लोक शिवानंदाची अगतिकता बघून हसत होती. रातीला पाऊस गडगडे पण पेठच्या हद्दीवर पडत नसे. पाटील मात्र ताठ तोरा दाखवत गावातून फिरत असे. बाजारानंतर चार पाच दिवसांनी भगटायला बैलगाडी घेऊन हौसेचा नव्हरा भीमा हजर झाला. भीमा आल्याचं पाहून पार्वतीला आनंद झाला. बैलगाडीतून उतरून झटपट चहा घेतला. व व्यंकूला घेऊन त्याने बैल शिवाराच्या दिशेनं दामटली. व पेरणीला माणसं बघायला पार्वतीला सांगितले. तिने नव्हर्याला वाडीच्या बायकांना टोकणाय मिळतात का ते पाहायला सांगितले. व्यंकू बैलगाडीत बसून रानाकडे निघाला. अमृतमहल बैल डिरक्या फोडत मेन गल्लीतन शिवाराच्या वाटला निघाली. उमा पाटलाच्या दारावरुन जाताना तो काळ तोंड करुन व डोळे वटारून पहात होता. शिवारात आल्यावर भीमान खळ्याच्या ओप्यात बैलं सोडली. व औताला झुंपली. सात मोटीच्या शिवारात काळवाट रान तयार करायला सुरवात केली. वज्रेकडून न्याहारी पाठवून तिन दिली. ती उभ्या उभ्या खाऊन त्यानं काम चालू ठेवलं. सकाळी दहा वाजेपर्यंत त्यानं रान तयार केलं. घरातील काम आवरून पारू भाकरी करायला बसली. इतक्यात शिवानंद आला सात बायका मिळाल्याचं त्यांनी सांगितल. वाडीची सुनंदा अक्का मधल्या वाटेन येताव म्हणाली. पारून परसातल्या चुलीवर झपाझप भाकरी केल्या. व छान पिठल केलं. व शिदोरी बांधली. व नव्हर्याला पेरणीचे भात व तिकाटन घेऊन शेताला जेवून पाठवलं. व आपणही आवरून तिने म्हातारीला जेवाय घालून ती रानात निघाली. जाण्यापूर्वी देवार्यावर तीन भाताची चिमट ठेवली. शेताला जाताना शांती व तिची आई आपणही मदतीला येतो असं सांगून गेली.

शेतात गेल्यावर भवरमागी पेरणीच पाट फिरवताना भीमा दिसला. पार्वतीला पाहताच तो म्हणाला, “आक्के इथल रान पेरून मळवात ये. आज सगळं रान तयार करून पेरुयाच.”

पेरणीच पाट मारून तो व व्यंकू माळवाच्या वाटेला लागलीत.

इकडे पार्वती व तिचा नव्हरा शिवानंद तिकाटन फिरवू लागली. थोड्याच वेळात वाडीच्या बायका आल्या. त्या अन् वज्रा टोकानाय लागल्या. बघता बघता दुपारपर्यंत त्यांनी सगळं रान पेरल व त्या एकत्र बसून जेवल्या. व सर्वजन मळवाच्या वाटेला लागल्या. मळवातील ओपे खूप मोठे होते. ती येईपर्यंत भीमाने एक एक करत मळवाच रान तयार करायला सुरवात केली. बैलं नेटाची असल्यान बघता बघता त्यानं दोनपतूर मळवाच शेत तयार केलं. एवढं रान पेरून होणार नाही हे भीमा ओळखून होता. त्याने पाट मारल्यावर अर्ध रान हाडगी घालूया म्हणाला. “ भिमाने बैलाना हाडगी बांधून अर्ध रान पेरल. वाडीच्या बायका कामाला घट्ट होत्या. शांती व तिची आईही मदतीला आली होती. त्यांनी बघता बघता सांजपतूर राहिलेलं रान टोकनून टाकलं. पाच वाजता सगळ रान टोकणल्यावर पार्वती वाडीच्या बायकांना कृतज्ञेन म्हणाली, “ बायाव लई मदत केल्यासा देवच तुमच्या रूपान धावून आला.”

तेव्हा वाडीची सुनंदा म्हणाली, “असं काय बोलू नका आमच्या वाईट वेळी तुम्ही आम्हाला जातपात न बघता मदत केलीसा. तुझी सासू देवावाणी हाय बघ. तिन कित्येक वेळा डागतील पयान व लाकडी आम्हाला दिली त. व आमची जनावर जोगली. व चुली पेटल्या आम्ही विसरू कशी. व सगळी घरला निघालीत. वाडीच्या बायकांनी निरोप घेतला. व त्या मधल्या वाटेनं घरला निघाल्या. भीमाने बैलं पाण्यावर सोडली. वेदगंगेच झुळझुळ वाहणार पाणी बैलानां सुखद गोडवा देत होत. पाणी पिल्यावर सर्व साहित्य बैलगाडीत भरलं. व ती सगळी गावात आलीत. एकदाचा पेरा सरला होता. गावात आल्यावर बैल मांगरात बांधली. त्यांना वैरण घातली. भीमा व शिवानंद बाहेरच्या सोप्यात आपले हातपाय धुवून बोलत बसलीत. दिवसभर पेरून वज्रेचे पाय दुखत होते. पण आई जेवण करणार होती. तिने धार काढायला वज्रेस सांगितलं. वज्रेन कशीबशी धार काढली. सगळ गोठ्यातील काम आटोपुन ती घरात आली. पार्वतीनं जेवण केले. सगळ्यांनी जेवून घेतले. जेवण झाल्यावर सगळी आरामात गप्पा मारत बसली होती. बाहेर वीज व्हायला लागली होती. वज्रा बाहेर जाऊन आली. ती म्हणाली, “ आई अंधारून आलंय. गड तटाला वीज व्हयालीया.”

वज्रा बोले पर्यंत गडतटाचा पाऊस पेठवर चालून आला. बघता बघता अंबेसरी कोसळू लागल्या. मातीला सुगंध सुटला.

तेव्हा पार्वतीला शेजारच्या बायक्काच बोलण आठवलं. ती रोज पार्वतीला टोमणे मारी. आज रातीला पाऊस पडणार. व तुझ रान टोकणायच राहणार.

तेव्हा पार्वती म्हणाली होती. “माझ शेत टोकनल्याशिवाय पाऊस काही येत नाही. अन् तसच झाल होत. पेठच्या शिवारात. पार्वतीच शेत पेरल्यावर पाऊस आला होता. पार्वती पेरा सरल्यान सुखावली होती. थोड्या वेळाने सगळी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी भीमाने निरोप घेतला. जाताना पार्वतीने त्याला गाडीभर वैरण दिली. व ती घेऊन तो गावी निघाला.

अशा पद्धतीने पेरणी पूर्ण झाली.


मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १६

 कथा वाकाटखोर्याची भाग १६

१६) आधुनिक रामायण

लेखक : निशिकांत हारुगले

घरात आल्यावर वज्रेन डोक्यावरील धुण्याची बुट्टी खाली उतरवली. म्हशी घरात आणून बांधल्या. स्वयंपाक घरात जाऊन तेल व हळद घेऊन आली. व रेडी व म्हसिच्या झुंजीत लागलेल्या जागी लावली. नंतर वैरण घालून ती धूणं उन्हात घालायला गेली. कामाला माणस बघाय गेलेली. पार्वती तोपर्यंत आली होती. तिने हळद तेलाची वाटी पहिली. व वज्रेस कशाला हळद घेतल्याचे विचारले. वज्रेन घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा आईचे लक्ष वज्रेच्या हाताकडे गेले. तिच्या हाताला लागलेली जखम बघून पार्वतीने काळजीनं तिला जवळ बोलावले. तिला उराशी कवटाळून ती म्हणाली, “ काय ही वेळ देवा महादेवान आणली.” तिने वज्रेचे पटापट मुके घेतले. व तिचा हात हातात घेऊन त्या हातात कुठे लागले का ते तपासले. काकणांची काच कुठे लागली का ते पाहिले. जखमेवर हळद तेल लावले. त्या दिवशी खोडव वेचायला दोन बायका माणस खूप मेहनतीने मिळाली होती. आईने आपले आवरले. व ती म्हणाली, “ वज्रे मी माणसं घेऊन रानात जाते. तू घरी थांब.”

 तेव्हा वज्रा मी येणार म्हणाली. पार्वती आपले आवरून माणस घेऊन शेताला गेली. वज्रेन जेवून घेतले. व भांडी घासायला ती न्हाणी घरात गेली. व भांडी घासू लागली. इतक्यात शांती आली. ती वज्रेस हाक मारत न्हाणी घरात घुसली. वज्रेस भांडी घासताना पाहून तू घास मी धुते असे म्हणून ती भांडी धुवायला बसली. व भांडी धुवू लागली. इतक्यात तिचं लक्ष वज्रच्या हातातील जखमेकड गेलं. शांतीने तिला काय लागलं ते विचारलं. पण वज्रेन विषय टाळला. . शांती पुन्हा पुन्हा विचारू लागली. इतक्यात माजघरात झोपलेली म्हातारी धडपडत स्वयंपाक घरात आली. व शांतीला म्हणाली, “ काय सांगू बाई नदीला म्हशी घेऊन गेलती त्या कंबळीच्या म्हसिण शिंग मारलं. आमच्या माग एक झाल की दुसर संकट येतच बघ.”

असे बोलून म्हातारी आणखी काही बोलणार इतक्यात वज्रा म्हणाली, “आजी गप्प बस तू, कशाला उठलीस, गप झोप जा. तुला उगाच लागत. सापाच्या कानाची हाईस बघ.”

शांती लगेच वज्रेला म्हणाली, “ त्या कंबळीला जरा मस्तीच आलीय. एवढं नव्हरा दारु पिऊन चेचतोय तर एवढी हाय.”

तिचे बोलणे तोडत वज्रा म्हणाली, “गप्प बस शांते, तू पण उगाच तिच्याशी भांडशील तू पण, आधीच बरीच माणसं आमच्यासंगे वाकडी हाईत. सोड तो विषय.”

तेव्हा शांती विषय बदलत म्हणाली, “ बर ते जाऊ दे. चल, आपणं गप्पा मारत बसू.”

तेव्हा वज्रा म्हणाली, “ नाही मला शेताला जायचय.”

शांती म्हणाली, “ पण आई तर येऊ नकोस म्हणाली ना.”

“ ती म्हणाली पण मी जाणार पावसाळा जवळ आलाय. खोडव वेचाय हवं. एक दोन माणसांनी काय होत.” वज्रा बोलली.

तेव्हा शांती आपण येतो म्हणाली. तेव्हा वज्रा म्हणाली, “ नको बाई , तू काम कमी व दंगाच जास्त घालशील.”

तेव्हा शांती म्हणाली, “ तू आता पहिल्यासारखी नाहीस तुला चांगली गवारेड्यासारखी दोन दोन शिंगे आल्यात. लई शहाणी झालीस. मी तुला आवडत नाही. म्हणून मला टाळतीस मोठी झालीस ना.”

तेव्हा वज्र तिला म्हणाली, “ तू माझा जीव की प्राण आहेस. तुला कशी विसरेन मी. मरेपर्यंत मी कधीच तुला विसरणार नाही.” असे म्हणून तिने डोळ्यात पाणी भरले.

शांतीने तिचे डोळे पुसले. नंतर घरातील सर्व आवरून वज्रा व शांती घराबाहेर पडल्या. जाताना पुढल्या जोत्यावर अंथरूण घालून आजीला झोपवले. व प्यायच्या पाण्याचा तांब्या उशाशी ठेवून बाबा येईपर्यंत अशीच झोप, असे सांगून ती शेताला निघाली. शांती आपल्या घरी गेली. व वज्रा शेताकडे. शेतात वज्रा पोहचली तेव्हा उन्ह चढू लागली होती. दुपारच्या दोनपतुर अर्ध रान वेचून झाल. दुपारी भाकरी खायला जांभळीच्या सावलीत बसलीत. सकाळी म्हस धुवायला गेलेली कंबळा अजून घरला गेली नव्हती. रिकाम्या दिवशी ती दुपारपतुर म्हसीला चारवत असे. त्या दिवशी पण तेच करत होती. ती म्हशीच्या माग माग फिरत होती. गावातील मुले नदीच्या काठाला खेळत होती. माणसाना प्यायला पाणी हवे होत. म्हणून वज्रेला आईने नदीवरून घागर भरून आणायला सांगितले. वज्रा उठून घागर घेऊन नदीवर आली. तिने नदीच्या खळाळत्या पाण्यात घागर धुतली. व भरली. घागर घेऊन ती निघाली. तेव्हा गल्लीतली पोर तिथे खेळताना दिसली. त्यांना पाहून ती म्हणाली, “ काय रे पोरांनो, काय करताय उन्हाच.”

तेव्हा त्यातील पाटलाचा बाजा म्हणाला, “ रामायण रामायण खेळतोय.”

वज्रेला हसूच आलं. ती म्हणाली, “अरे, दुपारचं ऊन किती आहे. घरी खेळायच. रानात कुठला अध्याय खेलत्यासा रामायनातला.”

अध्याय शब्द ऐकताच ती मुले कावरी बावरी झाली. कारण तो त्याना अवघड शब्द होता. तरीपण त्यातून न्हाव्याचा हणमंता म्हणाला, “ राम सीतेचा वनवास घरी कसा खेळायचा. व घरी खेळताना आज्जा ओरडतो. त्याची झोप मोड होती म्हणून. त्याचा काव खाण्यापेक्षा रानातच खेळलेल बरं.”

वज्रेच लक्ष बाज्याच्या हातातील धनुष्याकडे गेले. त्याच्या हातातील धनुष्य हे छान मेसकाठीपासून केलेले होते. व बाण ही धारदार होते. त्याशेजारी उभारलेला शिंप्याचा सत्त्या सितेसारखा पेहराव करून बसलेला होता. अआजाचा पटका साडी म्हणून घेतलेला होता. तांबड्या मातीतून चालून तो भगवा पटका लाल झाला होता. वज्रेला पाहून तो लाजला.

वज्रेस त्यांच्या खेळाचे कौतुक वाटले. ती त्यांना जपून खेळा, असे सांगून ती शेतात आली. पाण्याची घागर सावलीत ठेवली. व माणसासंगे ती भाकरी खायला बसली.

मुले खेळत होती. इतक्यात बाजा पाटलाने एक बाण सोडला तो बाण झुळझुळ वाऱ्याच्या वेगात निघाला तो थेट गजाबाईच्या अंब्यावरील मोहोळात जाऊन घुसला. दुपारच्या तावाने माशा उठल्या व त्यांनी आकाशात काळी फौज तयार केली. व गुंजारव सुरू झाला. मव्हाच्या पोळ्यात घुसलेला बाण पाहून मुले घाबरली. व त्यांनी चांगलीच धूम ठोकली. शिंम्प्याचा सत्त्या तर आपल्या आजाचा पटका तिथंच टाकून पळाला. पळता पळता तो बाज्याला शिवा देत होता. शहाणाच आहेस. की बस आता शिमगा करत. मी पळतो. असे म्हणून एका मागून एक मुले गावच्या दिशेला पळाली. मव्हाच्या माशा उठल्यावर सगळ्यांनी भाकरी ठेवल्या. सर्वजण झाडाखाली गप्प बसून राहिली.

पार्वती म्हणाली, “कोणीही हलायच नाही. हालचाल दिसली तर आपल्याला महू चावेल. व पाठी लागल. सर्व शांत बसलित. मव्हाच्या माशा शिवारात पसरल्या.त्याना पांदित म्हस घेऊन निघालेली कंबळा दिसली. त्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तशी कंबळी जोरात ओरडत पळाली. तिच्या म्हसीन केव्हाच घर गाठल होत. ती पाणंद सोडून शिवारात घुसली. माशा पाठ सोडेनात. ती रडू लागली. ती बामनाच्या शेतात घुसली. पार्वतीला रहावलं नाही. तिने कामाला आलेल्या शेवांतीच पोत घेतल. व गोळा केलेल्या खोडव्याला काडी वडली. उन्हाच्या तावण खोडवी धुमू लागली. आतल्या ओलसर खोडव्यानी धूर झाला. एकमेका संगतीन खोडवि धुमत पेटू लागली. धुरान आकाश अच्छादाय लागले. माशांनी धुरामुळे माघार घेतली. पण या सगळ्यात पार्वतीला दोन चार माशा चावल्याच. माशा शिवारातून मागे सरल्या व त्यांनी आपला मोर्चा नदीकडे वळीवला. नदीवर मासे धरायला आलेली शयनग्रामची मुले त्यांनी हेरली. व त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या. परंतू पाण्याबाहेर तोंड काढताच माशा त्यांवर झडप घालत. कशीबशी त्यांनी सुटका करून घेऊन ती मुले नदीपार गेलीत. थोड्या वेळाने माशा शांत झाल्या. व पोळ्यात परतल्या. पार्वतीनं व बाकीच्यांनी कंबळीला झाडाखाली नेलं. कामाला आलेल्या स्त्रियांनी तसेच पार्वतीनं तिच्या अंगावरील काटे काढले. तेव्हा कंबळीला भरून आले. ती पार्वतीला म्हणाली, “ बाईसाब मी तुम्हाला नको तस बोलले, सकाळी वज्रेला ही बोलले. त्याची देवानं मला आज शिक्षा दिली. एवढं होऊनही तुम्ही मला वाचवल्यासा अगदी देवावाणी हाईसा. आमची रान थोडी असल्यानं खंडाची शेत करावी लागतात. काय करणार मालक म्हणेल तस ऐकावच लागत.”

 पार्वतीनं तिची समजूत काढली. तोपर्यंत बायजककानं बांधाकडचा टिक्कीचा पाला आणला व चोळून तिच्या महू चावलेल्या जागेवर लावला. बर वाटू लागल्यावर ती घरला गेली. वज्रेला मात्र तिची जराही दया आली नाही. तिने तिच्याकडे दुर्लक्षच केले. थोड्या वेळानं भाकरी खाऊन सर्वजण खोडव वेचू लागली. सायंकाळपर्यंतत बरच रान वेचलं. सांज झाल्यावर वज्रा व आई अन् शेतात आलेली माणसे घरी परतली.

क्रमश : पुढे….


शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १५

कथा वाकाटखोर्याची भाग १५

१५) म्हशींची झुंज

लेखक : निशिकांत हारुगले.

एके दिवशी घराच्या म्हशी खूप घाण झाल्याने वज्रेन सोडल्या. त्यातील एक म्हैस गाभण होती. बरोबर धूणं व त्या दोन म्हशी घेऊन ती नदीला गेली. धरणाला फळ्या बसवल्यान नदीला चांगलाच तूंब चढला होता. तिन म्हशी धुतल्या. व थोरल्या म्हशीला कासरा बांधला. व जवळच्या बच्चाच्या झाडाला बांधली. तिला बांधल्यामुळे बाकीच्या म्हशी व रेडकी दूर जात नसत. वज्राने धूणं घेतल व ती नदीपात्रातील रुतलेल्या दगडावर धुवू लागली. नदीवर अनेक बायका धूणं धूत होत्या. त्यातील बायजाबाई परटीनं वज्रेकड बघत शालू पवारनीला म्हणाली, “ काय बाई दिवस आल्यात शिवानंद बामनाला कवळ्या पोरांना पण रानात राबाय लागतय.”

“ खर हाय तुमचं बायजाक्का, पारुन पण चांगलाच इरला प्रपंच लावलाय. लई राबतीया कुलकर्याला पण बदायची नाही.”

पण वज्रेन आपल त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. व ती आपल धूणं धुवून बुट्टी डोईवर घेतली. व आपली बचाच्या झाडाला बांधलेली म्हस सोडून वाटला लागली. मागोमाग बाकीच्या म्हशीपण निघाल्या. नदीचा टेक चढून ती वर निघाली. एका हातात कासरा व दुसऱ्या हाताने डोईवरली बुट्टी सावरत निघाली. तिच्यामाग मोठी म्हस डुलत डुलत चालली होती. दुसरी पुढे चालली होती. रेडकी मात्र मागून हुंद्डत होती. बघता बघता उंबरणीच वळण आलं गावातील गुरे पाण्यावर जात होती. शेताला जायचं असल्याने वज्र झपाझप चालत होती. थोड्या वेळानं गावची वेस दिसू लागली. डोक्यावरील धूणं व म्हशीला सावरायची कसरत करत ती निघाली होती. धूण्याची बुट्टी जड झाली होती.

इतक्यात तिला समोरून कंबळी पवारीन व तिची म्हस दिसली. वज्राच्या काळजात धस झाल. कारण कंबळीची म्हस गावातील म्हशींवर दादागिरी दाखवण्यात तरबेज होती. ती रस्त्यानं निघाली की बाकीच्या म्हशी तिला घाबरून कुंप तोडून शिवारात पळत. कमळी मात्र आपल्या म्हसीचा तोरा पाहून ढवळ्या बैलासारखी ताटत असे.

तिला पाहून माघारी गावातील लोक मारुती पवारांच्या दोन म्हशी पाण्यावर चालल्यात असे म्हणत.

ती म्हस जवळ येईल तस वज्रेन आपल्या डोक्यावरील बुट्टीचा हात सोडला व मोठ्या म्हसीची वेसण हातात धरली. व कासरा दुसऱ्या हाती घेतला. व कंबळा पवारनीस म्हणाली, “ काकू म्हस झुंज धरील पुढे या.”

तशी कमळा म्हणाली, “ लागली तर लागू देत. झेपत नाहीत तर कशाला येतीस म्हशी घेऊन नदीला. त्या दिवशी धूणं धुताना तुझी आई मला तोऱ्यात बोलत होती. पाटलाच्या जीवावर शेत मी केलं नाही म्हणून, आम्ही पाटलाच शेत करताव म्हणून म्हणती व्हय ती.अन तू खुट्यातन वर नाही आलेली प्रपंच करून दावतीस. तुझ तू बघ. नाही येत मी पुढें. बघूया लागली तर झुंज लागू दे, बघू पवारीन पावरबाज आहे का पाटलीन.” तिचे ठसक्याचे बोलणे ऐकून वज्रा रडवेली झाली.

“ का बाई अशी छळतीयास, माझी म्हसं गाभण हाय.दिसात हाय.पाया पडते मी तुझ्या.”

अस बोलून वज्रेन डोळ्यात पाणी भरलं. पण कमळी खिदळत होती. तिला पाहून वज्रेला आजीच्या कथेतील रक्षसिन हसतेय असे वाटू लागले.

तिने मन घट्ट केले. थोरल्या म्हसीची येसन घट्ट पकडली. व कासऱ्याचा सोगा दुसऱ्या हाताने फिरवायला लागली. वाऱ्यावर कासरा घरघर वाजू लागला. कंबळेची म्हस शिंगे रोखून चाल करून आली. तशी पुढली म्हस तिचा वार चुकवून कुपातून पळाली. तिने आता वज्रेकडे पाहिले. वज्रा कासरा गोफनी प्रमाणे फिरवू लागली. कासरा घर घर करू लागला. म्हस जवळ येताच तिने कासऱ्याचे दोन-चार तडाखे तिला दिले. तशी ती जरा बाजूनेच गेली.पण जाताना तिचा तडाखा वज्रेच्या हाताला लागला. शिंग लागल्यानं काकणं कचकच तुटली. काच हातात घुसली. रक्त भळभळाय लागले. पण त्याकडे लक्ष न देता. तिला मोठी म्हस वाचली याचा आनंद झाला. ती गाभण म्हस थोरवड तिने कंबळीच्या म्हसिला चांगलीच लोळवली असती, पण दिसात असल्यानं तिला काळजी वाटत होती. वज्रेस चांगलाच दणका देवून ती म्हस मागल्या रेडीवर चाल करून गेली. वज्रेन घाबरून मागे पाहिले. थोड्या अंतरावर चांगलाच धुरळा उडाला होता. नको ते घडल होत. कंबळीच्या म्हसीची व वज्रेच्या रेडीत जोरात झुंज लागली होती.

वज्रेला हात पाय गळल्यासारख झालं. कंबळीची म्हस व रेडी दोघीजणी एकमेकींना शेपट्या उगारून एकमेकींना कुपात ढकलत होत्या. दोघी पण ऐकमेकीला ऐकत नव्हत्या. कंबळी खदखद हसत होती. 

वज्रेन डोक्यावरील बुट्टी उतरली. व कुपातल्या शेवरीस हात घातला. व एक काडी मोडली. पण माराय जायचं कसं कारण गाभण म्हस जवळ होती. रेडीची व म्हसीची झुंज बघून ती थोरली म्हस वेसणीस इसके देऊ लागली. पण वज्रेन वेसण घट्ट धरली. तशी ती वाय, वाय करून ओरडू लागली. ती तिची आई होती. तिच्या पोटातली माया उफाळून येत होती. कारण ती त्या रेडकीची आई होती. कोण आई आपल्या मुलीवर आलेलं संकट पाहून गप्प बसेल. ती झुंजीत सामील होण्यासाठी प्रयत्न करत होती.

 झुंज चांगलीच रंगात आली होती. रेडी काही केल्या त्या म्हसीला लागलेली झुंज सोडत नव्हती. पण तिची ताकद कमी पडत होती. वज्रेला मात्र काळजी होती की कोवळ्या रेडकीच फर बिर मोडल तर. शेवटीला कंबळीच्या म्हसीन रेडकीला पांदिकडच्या चरीत ढकलली. रेडी पडली. तशी वज्रेच्या काळजात धस्स झालं. हे पाहून थोरल्या म्हसीन वज्रेच्या हाताला हिसडा दिला. वेसण सुटली. वज्रेन कासरा ओढला. पण म्हसीन तिला फरपटत नेले. व थोरली म्हस कंबळीच्या म्हसीवर चालून गेली. कंबळीच्या म्हसीला तिन जोरदार धडक दिली. तश्या त्या दोघी भांडायला तयार झाल्या. थोरल्या म्हसीन तिला सर्व ताकदिनिशी रेटत नेले. 

तशी कमळी घाबरून काठी घेऊन म्हसीला माराय गेली. तेव्हा वज्रेन तिची काठी धरली. व तिला रागाने कुपात ढकलली. तोपर्यंत रेडी चरीतून वर आली. तिनं व थोरल्या म्हसीन त्या कंबळीच्या म्हसीची चांगलीच जिरवली. शेवटी ती म्हस भ्याली व नदीकडे पळाली. . कंबळी वज्रेसंगे भांडू लागली. शिवा देवू लागली. तेव्हा वज्रेन दोन थोबाडीत लगावल्या. तिचे केस धरून ती ही भांडू लागली. वाटेवरुन जाणाऱ्यानी भांडण मिटवले. लोकांनी वज्रेची बाजू उचलून धरली.

 तेव्हा कंबळी गुमाण नदीकडे म्हस घेऊन गेली. वज्रा जाताना तिला म्हणाली, “मगाशी खुप बोलतीस नव्ह; परत नादाला लागशील तर तुझं पेकाटच मोडीन.” असे बोलून तिने आपली धुण्याची बुट्टी डोईवर घेतली व ती म्हशी घेऊन घरला आली. त्या दिवसा पासून कंबळीची म्हस वज्रेच्या म्हशींना पाहताच कुपातून शिवारात घुसत असे. व कंबळी खाली मान घालून जात असे.

क्रमश: .. पुढे…..



सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १४

 कथा वाकाटखोर्याची भाग १४

१४) शेताचे भांडण

लेखक : निशिकांत हारूगले.

वज्रल आता घरातल्या कामाबरोबरच शेताकडे ही जावे लागे. ऊस तुटला होता. व खोडव देखील काढल गेलं होत. मळवाच्या वाटेनं शिवानंद वैरण आणायला शेतात गेला होता. तेव्हा वाटेत उमाजी पाटील व त्याच्या बायकोने भांडण काढलं. शिवानंद सोबत व्यंकू पण होता. तो पेंडीला जाणार हे त्यांना माहीत होते. ती दोघे वाटच बघत होती. शिवानंद पेंडीला जाताना दिसला. तेव्हा मळवाची वाट का मळवलीस, पेंडीच नुकसान होत. म्हणून भांडण काढल. शिवानंद समजुतीने सांगत होता. पण त्याचे न एकता तो हमरी तुमरिवर आला. व त्याने गळपट धरली ते पाहून व्यंकू घाबरला. व रडत घरी पळाला. तो घरात आल्यावर रडत परसदारी पळाला. आई पार्वती धार काढायला बसली होती. वज्रा छोट्या रेडकाला चारा घालत होती. पळल्यामुळे त्याचा श्वास फुलला होता. त्याला बोलता येत नव्हते. म्हातारीनं आपल्या हातातील तांदूळ निवडत्याले ताट बाजूला ठेवले. व ती व्यंकूमागे परसदारी आली. पार्वतीनं विचारलं “ का रे लगबगीनं आलास.”

व्यंकू बोलला, “ मळवाच्या वाटेला उमा पाटलान भांडण काढलाय व तो बाबांशी भांडाय लागलाय व त्यानं बाबांना आडव ….” अस बोलून तो रडू लागला. म्हातारीच तर अवसानच गळल. धार काढत्याला तांब्या पारूच्या हातून खाली पडला. ती चटकन धारची उठली. व लगबगीनं गोठ्यातून बाहेर आली. दोन ढेंगत तिन माजघर गाठल. व तिने तुळीतला इंगा काढला. व ती चटकन मळवाच्या वाटेला लागली.

वज्रा पण मागे जाऊ लागली. तेव्हा तिने माग वळून हाक देत “ वज्रे माग फिर माग माग येऊ नको असं सांगितलं.”

पण आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती मागो माग येऊ लागली.मळवाच्या शिवारात पोहोचली. मळवाच्या वाटेवर शिवानंदाला अडव पाडून त्याच्या उरावर पाटील बसला होता. व शिवानंदाचे पाय धरुन पाटलिन बसलेली होती. ती दोघे नवऱ्याला मारत्याले पाहून पार्वतीचे पित्त खवळले. तीने धावत जाऊन खोपरखळीने पाटलाला ढकलले. तो जाऊन बाजूच्या चरीत पडला. व पाटलीनीच्या बुचड्याला हात घालून चांगली फरफटत नेली. तशी ती ओरडायला लागली. शिवानंद त्यांच्या कचाट्यातून सुटला होता. त्याला जबर मारले होते. अंगावर माराचे वळ होते. पार्वतीनं शेजारच्या ऊसातील गाब भरलेला ऊस मोडला व पाटलिनिला दोन लाता घालून ती पाटलावर धावली. त्याचा वार चुकवून त्याला पायात पाय घालून खाली पाडल. व ऊसाने बडवायला सुरुवात केली. त्याला सावरू दिलाच नाही. इतक्यात शेताला जाणारी माणसं जमा झाली. त्यांनी भांडण सोडवल. दांडग्या शिवानंदाला मारणाऱ्या पाटलाचे पारुपुढे काही चालले नाही. पाटील व त्याची बायको शिवा देत निघून गेली. पारूनं आपल्या नवर्याला सावरलं. व घरी घेऊन आली. घरी आणल्यावर तिन शिवानंदाला पलंगावर झोपवला. आजूबाजूची माणसं जमा झाली होती. म्हातारी तर हाबकली होती. ती देव्हाऱ्यासमोर बसून देवाला आपल्या मुलासाठी साकडे घालत होती. “ देवा महादेवा माझ्या लेकराला वाचव.”

शिवानंदाच्या डोक्याला लागले होते. पार्वतीनं नवऱ्याच अंग पुसल. त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. इतक्यात दामाजी व सुंदरा आली. ती त्याना धीर देऊ लागली. पार्वतीनं जखमेवर टिक्कीचा पाला व हळद लावली. सुंदरा तिला मदत करत होती. पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते. वज्रा वार घालत होती. थोडया वेळाने शिवानंदाला हुशारी आली. तेव्हा जरा पार्वतीला बरे वाटले. ती नवर्याला म्हणाली, “आता पोथी पुराण सोडा. घरचं खाऊन दुसऱ्याचा मार खायला अंगात ताकद नाही. त्या पाटलाचा मार खायला. तेला हिंमत असेल तर माझी कळ काढ म्हणावं. मग दाखवते. माझा नमूना तेला खपावतेच.

‘ तेला वाटल असेल की ही दुबळ्या घरची असेल. पण तेला पुरून उरेल.म्हणावं.’ असं म्हणत ती गोठ्यात गेली. तिने म्हसिचे दुध काढले. पण पानेव सरल्याने कमी निघाले. ती आपले काम आवरून घरात आली. इतक्यात मालू गुरवीन आली. शिवानंदाला पाहून म्हणाली, “लई मारल काय ग बाळासाबांना.”

तेव्हा पार्वती म्हणाली, “ मी असताना तो काय मारतोय भाडखाऊ. त्याची हाड मोडून ठेवीन मी.”

थोडा वेळ चौकशी करून मालू गूरविण निघून गेली

पार्वतीने म्हातारीला सावध केलं. व म्हणाली, “ ही पारी असताना भितीस काय? तुझ्या लेकाला कायपण होऊ द्यायची नाही. त्या पाटलाला चांगलच गाडील ही वाघीण. असे बोलून ती जेवण करायला गेली. व्यंकू कोपऱ्यात रडत बसला होता. त्याला ती म्हणाली, “असा बुळ्यासारखा कशाला रडतोस. जा बाहेर ह्यांच्याजवळ जाऊन बस जा. जाण्या आधी म्हसीला वैरण घाल.” असे सांगून ती जेवणखोलित गेली. थोड्या वेळाने शांती आली. तिला पाहून वज्रेला रडूच कोसळले. शांतीला तिन मिठीच मारली. शांतीन तिची समजूत घातली. थोड्या वेळाने ती घरी गेली.

दिवस झप झप सरू लागले. शिवानंदाला आता बरे वाटू लागले होते. तो आता चालू फिरू शकत होता. पण उमा पाटील आपल्या मनात चांगलीच अढी धरून होता. गावात त्याचे शेत जास्त असलेने अनेक लोक त्याचे शेत कसत. त्या लोकांना तो दमदाटी करी. शिवानंदाच्या शेतात कामाला जायचं नाही असे सांगी. त्यानं साऱ्या गावभर लोकांना शिवानंदाच्या घरावर बहिष्कार घालायला सांगितला होता. गावातील औतवाले देखील शेतात येईनात. पण शिवानंद व पार्वती कच खाणारी नव्हती. ती देखील पणाला पेटली होती.

नदीवर धूण धूयाला पवाराची कमळी आली होती. ती पाटलाच शेत करत होती. तेव्हा पार्वती शेताला गेली होती. व पाणी न्यायला नदीवर गेली होती. तिला पाहून कंबळी म्हणाली, “ आता कोण शेतात कामाला येत नाहीत. त्यापेक्षा पेंडी कापा जावा रान पाडून.”

 तिचं बोलणं ऐकून पार्वती तिला म्हणाली, “ कमळे तुझी बोलणी कळतात मला. जाऊन सांग त्या पाटलाला ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. माझं शेत पडायचं की ठेवायचं ते बघते मी, बघतेच कस पडत ते.”

“ तो किती पण आडकाठी आणुदेत. मी काय कुणाच्या जीवावर शेत करत नाही.”

तशी कमळा म्हणाली, “ सगळ्यांचा शेतातच रात्र दिवस तळ ठोकायचा विचार दिसतोय.”

तेव्हा पाण्याची घागर घेऊन निघालेली पार्वती म्हणाली, “ तळ ठोकाय लागला तरी चाललं पण सोडत नाही.” पार्वती शेताला गेली.

 त्या घटनेनंतर म्हातारीनं अंथरूण धरल होत. त्यामुळे घरातील सर्व काम वज्रेला करावी लागे. ती आता धार देखील काढत होती. शिवानंदाचा मारामारीत पाय दुखावला होता. यामुळे व्यंकू व पार्वती रोज जनावरांची वैरण आणायला जात असत. ती माय लेकर संसाराचा गाडा रेटण्यासाठी प्रयत्न करत होती. .

ऊस तुटला. मळवातल खोडव काढायचं होत. पण गावातील औतवाले येईनात. पार्वतीनं किती जणांना विनवले. शेवटी वाडीची औत सांगून खोडव काढल. औतवाल्याने डब्बल पैसे घेतल. म्हणतात ना संकटे आली की एकमेकाचे हात धरून येतात. तशी गत पार्वतीची झाली होती. थोडीफार माणुसकी असणारी लोकं मदत करीत होती. खोडव वेचायला आता वज्रेला जाव लागत होत. रोज लवकर उठून घरातलं काम करून ती आई सोबत रानात जाई. जाताना धूणं घेऊन जाई. नदीवर जाऊन धूणं धूत असे. व ते शेतात वाळत घालून काम करत असे. सुंदरा कधीतरी मदतीला यायची. पण एवढा व्याप तोलन अवघडच पण मनाच्या जिद्दीनं त्या माय लेकींनी शेत तयार केलं.

क्रमशः पुढे…. ….


कथा वाकाटखोर्याची भाग १३

 कथा वाकाटखोर्याची भाग १३

१३)शांतीचा भाऊ

लेखक : निशिकांत हारूगले.

वज्रा व शांतीची दहावी झाली. वज्रेच्या घरची परिस्थिती गरीब असल्याने यापुढचे शिक्षण वज्रा घेऊ शकत नव्हती. त्यामूळे तिने शाळा सोडणेचा निर्णय घेतला. कारण व्यंकू व तिचे, दोघांचे शिक्षण घरच्यांना पेलणारे नव्हते. शेती भरपूर असली तरी उत्पन्न कमी येत असे. 

गावातील माणसे जास्त करून गावच्या पाटलाकडे कामाला जात. गावचा उमाजी पाटील शिवानंदाच्या विहिरीच्या शेतावर डोळा ठेवून होता. त्यासाठी त्याने भांडण देखील केले होते. घरचं व शेताच काम करण्यासाठी वज्रेन स्वतः शाळा सोडली. शिवानंदाला वाईट वाटत होत. शांतीला पण खटकले. तीन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण वज्रेनच नाही म्हणाली. शिवानंदाची इच्छा होती पण नाईलाज होता. व्यंकू किरकोळ कामे करून शाळा शिकत होता. वज्रा सोबत नसल्याने शांतीला पण नकोस वाटू लागले. कसेतरी पाच सहा महिने ती शाळेला गेली. नंतर मात्र तिनेही शाळेस रामराम ठोकला. व वडीलांसवे ती सोनारकामात लक्ष देवू लागली. तिने त्यात कौशल्य हस्तगत केले. ती त्यात तरबेज झाली. दामाजी पण खुश होता. तो तिला म्हणायचा, “अस काम करू लागलीस तर एक दिवशी मोठी सोनारीन होशील. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा हे चांगल.”

दामाजीला शांतीच्या पाठीवर लवकर मूल झाले नव्हते. दहावीत गेल्यावर तिचा भाऊ तिन वर्षाचा झाला होता. आपण मोठी व भाऊ लहान हे तिला आवडायचं नाही. तिला लाज वाटायची.

एके दिवशी सकाळी महादेवास जाताना आई म्हणाली,की बाळाला घेऊन जा. तेव्हा तिच्या कपाळावर आट्यांचे जाळे पडले. शेवटी नाईलाजाने तिने त्याला घेऊन ती देवाला गेली. तेव्हा देवदर्शनाला वाडीच्या बायका येत. त्या दिवशी पण आल्या होत्या. लहान गोंडस बाळ पाहून म्हणाल्या, “ कोणाचं बाळ ग हे?”

तेव्हा शांतीची पंचाईत झाली. व ती ताडकन बोलली, “ आमच्या काकींच.”

वज्रेन तिच्याकडे पाहिले तेव्हा तिने डोळे लिंबावानी मोठे करुन पाहिले.”

देवदर्शन झाले. थोड्या वेळाने त्या दोघी घरी निघाल्या. तेव्हा वज्रा वाटेत तिला म्हणाली, “ शांते खोटारडे खोटं का ग सांगितलस काकांचा मुलगा म्हणून.”

“ अगं, वज्रे तुला कळत कसं नाही. मी एवढी मोठी व हा किती लहान बायका नाही का हसणार मला, हा माझा लहान भाऊ आहे असं म्हंटल्यावर. पण तू यातील एखादा शब्द पण कोणाला सांगू नकोस. तुला महादेवाची शपथ आहे.” शांती बोलली.

“ वा ग वा, तू कर कुरघोड्या व मला शपथ घाल. मी काही सांगणार नाही. पण आभाळातून पडली गोठी शांतीची शपथ खोटी.”

पण शांतीचे बोलणे पुजाऱ्याने देवळात ऐकलं होत. घरी जाताना त्यानें शांतीच्या आईला सगळ काही सांगितल. तेव्हा शांतीवर आई चिडून होती. संध्याकाळी शांती घरात आलेली पाहून तिची आई तिच्या मागे लाकूड घेऊन मागे लागली. व म्हणाली,

“ कारटे काकूंचा मुलगा म्हणतीस होय का? उद्या मामांचा म्हणशील. थांब दाखवते. तुला असे म्हणताच शांतीने चांगलीच धूम ठोकली. व थेट वज्रेच्या घरी गेली. तेव्हा वज्रा अंगण झाडत होती. तिला पाहून शांती ओरडली, “ वज्रे लगेच चोंबडे पणा केलीस. शपथ घालून पण घरी सांगितलस. काय गरज होती. रामायण सांगायची. जा बघ माझ्या माग अर्जुनासारखे लाकडाचे पेटते बाण घेऊन लागलीय. चांगलच महाभारत होणार.”

वज्रा लगेच म्हणाली, “ मी काही सांगितले नाही. दुसऱ्या कुणीतरी चुगली केली असेल.”

तेव्हा शांतीने कशीबशी आईची समजूत काढली. व हे प्रकरण निभावून नेले. सांजेला शांता वाण्याच्या दुकानात खरेदीला गेली. तेव्हा तिथे पुजारीबुवा तिला चिडवून म्हणाले, “ काय म्हणतोय काकांचा मुलगा.”

तेव्हा शांतीच्या लक्षात आलं. की या पुजाऱ्यानच आग लावली. ती म्हणाली, “ म्हणजे तुम्हीच काडी टाकली तर. देह देवळात चित्त मात्र पायतानात. तुमचं. पूजाअर्चा सोडून वस्तरा केव्हापासून चालवायला लागलात.”

तेव्हा पुजाऱ्याला थोबाडीत मारल्यासारखे झालं. तेथील कट्ट्यावरील बसलेली टवाळ पोर खिदळायला लागली. दुकानातील माल घेऊन घरी जाताना तिचे लक्ष पुजाऱ्याकडे गेले. त्याचे डोळे लाल होते. ते पाहून ती म्हणाली, “तुमच्या डोळ्यांना बघून घाबरायला मी तुमची लग्नाची बाई नव्ह. परत पुजारपण सोडून माझ्या नादाला लागलं तर पुजारपण सोडाच मी नारळाची शेंडी पण कढण्यालायक सोडणार नाही.”

असे बोलून घरला परतली.

क्रमशः पुढे……



गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

कथा वाकाटखोर्याची भाग १२

 कथा वाकाटखोर्याची भाग १२

१२) सागवणीवरील भूत व लक्ष्मीची गंमत.

लेखक : निशिकांत हारुगले.

रविवार उजाडला त्या दिवशी महादेवाचा पाळक होता. शेतातील कामाला सुट्टी होती. तसेच शाळेलाही. त्या दिवशी स्त्रिया घरातील सडासारवण तसेच दळप कांडप करतात. त्या दिवशी वज्रा व शांती घरीच होत्या. वज्रेला तिच्या आईने हाक मारली. व तिला तट्यातिल भात काढायला सांगितले. तट्ट्या म्हणजे बांबूच्या कांबट्टयापासून बनवलेलं जाड तगडासारखे साधन ज्याचा उपयोग भात व धान्य ठेवण्यासाठी केला जातो. तसेच कणुगले ही वापरत.

वज्रेस भात काढणीस सांगितले. तेव्हा ती नाखुशिने तट्टयाजवळ गेली. तेथे खूप अंधार होता. आईने दिवा दाखवला तरच मी भात काढणार असे तिने सांगितले.

तेव्हा आई म्हणाली, “ तुला काही कोणी तिथे खाणार नाही चल गप्प उतार आत. मला कांडाप करायचं आहे. उगाच नखरे करू नकोस?”

तिने आईला दिवा आणायला सांगितला. तशी आई चिमणी लावून घेऊन आली. चिमणीच्या उजेडात वज्रा माळीतील तट्टयाजवळ आली. तिने आईला दिवा दाखवायला सांगितला. तसा आईने दिवा वर धरला. त्याच्या प्रकशात वज्रा चटकन स्टूलावर पाय ठेवून दिवळीत दुसरा ठेवून भींतीच्या खुंटिच्या सहाय्याने ती तट्टयात चढली. तट्ट्यात अंधार असलेने. तिने आईस दिवा दाखवनेस सांगितला. तस आई म्हणाली, “ काढ गपचुप.”

वज्रा छोट्या बुट्टीच्या साहाय्याने भरभर भात काढू लागली. भाताचा बुस्सा उडून नाका तोंडात जात होता. तिचा वेग पाहून आई म्हणाली, “ अग, हळू काढ. काय कुत्र बित्र पाठी लागलय काय?”

पण तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती झपझप काढत होती. तिने पहाता पहाता दोन हारे भात काढले. तेव्हा आई म्हणाली, “ बास बाई. सगळा तट्ट्या उपसाशिल चल बाहेर पड आता. “ आईचे बोलणे ऐकून तिने लगबगीने खालचे राहिलेले भात सरळ लावून ती बाहेर उतरली. बाहेर उजेडात आल्यावर तिला बरे वाटले. तेव्हा आई तिला म्हणाली, “ एवढी कसली घाई लागली होती.”

वज्रा बोलली, “ मागच्या महिन्यात त्या सदू पाटलाच्या कणगीत साप सापडला. तेव्हापासून मला बाई अंधारात भात काढायला भीती वाटते. आपला तट्ट्या पण माजघरात आहे. सगळा अंधार, जर एखादा साप असता तर मला चावला असता ना? म्हणून मी तुला दिवा आणायला सांगितला.”

तेव्हा आईने कपाळावर हात मारला. ती म्हणाली, “ शहाणी आहेस. त्या पाटलाच घर भरलय आसकाटान भोवताली वाढलेल गवत, तिथे साप सापडला म्हणून तुझ्याघरी नाही सापडणार.” तेव्हा वज्रा हसतच परसदारी अंग झाडत गेली. तिने न्हाणी घरात जाऊन भूस्याने माखलेले तोंड व हात पाय खसाखसा धुतले. तेव्हा आईची हाक आली. “वज्रा कांडप करून ठेवते. थोड्या वेळाने माझ्या बरोबर चल.”

तेव्हा वज्रा येतो म्हणाली. व परसदारी गेली. परसातील पेरवनीवर चढून तिने पेरू काढले. दोन चार लालेलाल पेरू तिला मिळाले. ते घेऊन माजघरात गेली. व तिने मीठ लावून ते पेरु खाऊ लागली. इतक्यात थोडया वेळाने तिला आईची हाक आली. व आईने तिला गिरणीला जाण्यास बोलावले होते. ती तिझ्याबरोबर गिरणीला निघाली. त्या गिरणीत पोहोचल्या. पाळक असल्याने सर्व आया बाया गिरणीत जमा झाल्या होत्या. शांती सुद्धा जोंधळे घेऊन आली होती. गिरणीचा मालक फुशारकी मारत होता. वज्रेन व तिच्या आईने शिंद्यांच्या लक्ष्मीच्या मदतीने डोक्यावरील हारा उतरून घेतला. वज्राच्या आईने वज्रेला जायला सांगितले. पण शांती गिरणीत असल्याने तिचा पाय काय निघता निघेना. ती गिरणीच्या दारात कोपऱ्यात उभा राहिली. तिला बघून नंबरच्या पाळीत आपले दळप ठेवून शांती तिच्याजवळ आली. सगळ्या बायका आपल्या आपल्या दळपा कांडपा जवळ बसल्या. होत्या.

इतक्यात शिंद्याची लक्ष्मी गिरणीत दळाप टाकत शेजारच्या मालूला म्हणाली, “ काय सांगू बाई, आता भगटायला उठायचे दिवस नाही राहिलेत.”

तिचं हे बोलण ऐकताच शेजारच्या बायका तिच्याकडे आश्चर्याने टक्का मक्का बघु लागल्या. इतक्यात शिंप्याची बायक्का म्हणाली, “ काय ग, काय झालं, ते सवन सांग की.”

तशी ती म्हणाली, “ काय सांगू बायाक्का मावशी, काल रोजच्याप्रमाणे कोंबडा अरावला. तवा शेण काढायला उठले होते. परसदराची बुट्टी आणायला गेले. तवा पाटलीनीच्या परड्यात मला दिसलं.”

“ काय दिसलं ग लक्ष्मी.” जना पाटलीन म्हणाली, “ अव बाईसाब, काय सांगू तुम्हाला पाटलीनीच्या मेसाजवळ, ते सागवणीच झाड आहे ना, ते गारीजवळ, तिथं मला बाई बसलेली दिसली बघा. मला काकणांचा आवाज पण ऐकू आला बघा. तिन माझ्याकडे पण बघितलं”

“ मग काय झाल ग?” बायक्का म्हणाली.

“ मग मी झटकन मागे फिरले. व घरात येऊन दार झटकन लावलं. बघा तवापासून सूर्याचं किरण दिसल्या शिवाय मी शेणच काय धार बी काढत नाही. म्या नवर्याला स्पष्ट सांगितलं, मला भगाटल्याशिवाय शेण काढायला जमणार नाय. नांदण गेलं तरी चाललं.” लक्ष्मी म्हणाली.

 तेव्हा मालू गुरवीन म्हणाली, “काय ग बाई, हे आणि नवीनच म्हणायचं, कलयुगच नव्ह का? अशी दिसाची भूत फिराय लागली. तर माणसानं कसं जगावं म्हणायचं.”

शांता व वज्रा सगळ कान देवून ऐकत होत्या. वज्रा रामरक्षा मनात पुटपुटू लागली. ते बघून शांती म्हणाली, “ हे बघा, खुळ लागलं बडबडायला. वज्रे भूतबित काही नसतं. त्या लक्ष्मीच्या अंगात शिरलाय आळस, काम नको करायला. कोकण याड नुसतं. कोकण्या कडगावची आहे ना ती. असल्या कल्ड्या पिकवल्यावर नवरा कशाला उठवतोय, शेण काढायला. चांगली सूर्याची उन्ह येईतोपर्यंत घोरत पडत असेल नुसती म्हशीसारखी.”

शांतीच बोलणं लक्ष्मीने ऐकलं. ती लगेच म्हणाली, “खुट्टयातन वर आलीस काय ग? मला म्हैस म्हणतीस काय सोनारणी. एवढं मी कलड्या पिकवतोय अस वाटत ना तुला, तर जा की त्या पाटलीनीच्या परड्यात रात्रीला.बाजल टाकून झोपून दाखीव बघू. अन् मग बोल मला कल्डया पिकवतोय म्हणून.” लक्ष्मीचा आवेश पाहून पार्वती म्हणाली, “शांते गप्प बस की, थोरा मोठ्यांच्या बोलण्यात आपण अस काही नाही बोलू नये. मोठ्या माणसांनी चार ध्याड पाहून अनुभव घेतलेला असतोया. तेच ते बोलतात. तू गप्प बसत जा.”

तशी शांती गप्प बसली. तशी वज्रा कावरी बावरी झाली. व म्हणाली, “शांते तू गप्प बस की. उगीचच मधी मधी नाक खुपसतेस.”

इतक्यात मालूबाई पाटलाच्या रखमाला म्हणाली, “ रुक्मिणीबाईसाब जरा जपून जावा परड्यात.”

तेव्हा रुक्मिणी पाटलीन बोलली, “माले तुला पण काय याड लागलंय. तू शांत बस, तुला काय पण ठाव नाय.”

तिचं बोलणं ऐकून लक्ष्मीला राग आला.ती म्हणाली,

“ एवढं माझ म्हणणं खोटं वाटतंय तर तू व ती शांती दोघीजणी जावा त्या सागवनीखाली बांधा झोपाळा व येत्या पूनवेला जागर करा म्हणजे माझा विश्वास पटलं. तुम्हाला त्या शिवाय माझं म्हणणं पटायचं नाही.” असं बोलून तिने गिरणी खालच दळप काढल. व दंडाच्या धडीतील दोन रुपड्या काढून गिरणीवल्यांच्या हातावर टेकवल्या. व ती टाचा आपटत गिरणीतून बाहेर गेली.

तेव्हा मालू रुक्मिणीला म्हणाली, “का हो रुक्मिणी बाईसाब तुम्ही असं लक्ष्मीला बोलल्यासा.”

तेव्हा रुक्मिणी म्हणाली, “ काय सांगू बाई तुला त्या दिवशी गारव्याच्या भेटीची पोळी अन भाकरी पवारांच्या शोभीन आणून दिली होती. तिचा भाऊ केंबळीसंन घेऊन आलता नव्ह. त्या भेटीची पोळी नको म्हणताना सासून खायला लावली. व लागला की पहाटे पोटात मुरडा मारायला. सासूला कशी उठवायची. नवऱ्याला उठवायला गेले तर नाही म्हणाला. व लागला भिंतिकडं तोंड करून घोरायला. तवा शेवटी भित भित उठले. रकेल तेलाची चिमणी पेटवली. अन् गेले परसात.आमचं परड म्हणजे कोकणातली हर तऱ्हेची झाड आमच्या अज सासऱ्यान लावलेली. घुडूपच नव्ह अंधाराचा. तवा त्या सागवणीच्या जवळच्या पायदानात निघाले. पायदाण्यात जायच्या आधी मेल कुठून वार आल् अन् चिमणी विझली. कळ आवरली नाही, म्हणून गारीवरच बसले. तवा शिंद्याची लक्ष्मी दार उघडून बाहेर आलती. तिने माझ्याकडे बघितल अन् माग वळून झपकन दार लावून घेतलं. तेव्हाच मी समजले की लक्ष्मी मला बघून भ्याली. म्या मघाशी उगाच बोलले नाही. कारण राबतय ढोरासारख. त्या निमित्तान का असेना सूर्य उगवतोवर झोपायला तरी मिळत तिला, नाहीतर रोजचा प्रपंच आहेच की. खुरपं, चूल, बांध अन् शेण पाचवीलाच पुजलेल आम्हा बायकांच्या. मागल्या शनिवारी नवऱ्यानं बाई कोळपा वढायला येत नाही म्हणून पायावर इसकी मारली, अजून पायावर वळ आहेत बघ तिच्या. आमच्या घाट कोकणच्या पोरी शेवाटी साऱ्या राबण्यास देसोऱ्यासनी सुद्धा नाही कामाला बदायच्या. तिच्या बापाच्या घरात कधी कोळपा बघितला नाही. रोपची रान तेंची. तिची निपाणीची सासू आपलाच तोरा मिरवती असती. कोळपा वढला तर शेत काम आलं नव्ह. हिंमत असेल तर ये म्हणावं आमच्या नाळीत, मग बघू गुडघाभर चिखलात रोप टवायला तवा बघते. लक्ष्मी पुढं जाती का ती ते. माळा मुर्डाच्या रानाच्या भांगलनीच कवतिक सांगती.

राबाय तेवढी पाहिजे  व खायला घालायला माग का सरती. मला तर बाई लई राग येतोय. तिला बघितलं तर खाऊ की गिळू वाटतंय. मी तर परवा धूणं धुयाला गेल्यावर जाताना लुगड्याच्या धडितन भाजी भाकरी चोरून नेऊन दिली. कशी वर्षाची भुकेली असल्यासारखी तिन खाल्ली.  डोळ्यातन पडणार पाणी सगळ काही सांगत होत. तिची सासू मला कशी म्हणती की तूझीच फूस हाय तिला. तिच्या भागातील आहे ना मी. म्हणती कशी सासूला सांगून तुला चांगलीच निपाणी दाखवाय लावते. तेव्हा मला पण तिचा राग आला. मी पण वाटच बघते, ही बया कवा  मला बोलतीया याचे. मी पण म्हंटले मला काय निपाणी दाखवतीय. ज्या नदीचं पाणी पिवून तू वाढलीस त्या नदीच्या उगमाच्या व्हळीची मी हाय. तुलाच चांगल कडगाव पाटगावच पाणी दाखवीन, चांगल वेताच्या बेटातल.  माझी पण आई निपणीची व ही पण बया, खरं दोघित जमीन अस्मानाचा फरक आहे.  तवा मला  म्हणती कशी. सासू गरीब गावलिया म्हणून टेंबा मिरवू नकोस. तुला चांगली माझ्यासारखी मिळाय पाहिजे होती. चांगली नालाची वेसण घालणारी. मलापण राग आला. मी म्हटलं वाटेवरची आक्कूबाईची विहीर बघून पवायला येतय का? तेव्हा म्हणती कशी पवायला यायला बाप्याची जात नव्ह माझी, तवा मी पण म्हटल गुमान वाटण जा, नाहीतर अक्कुबाईच्या विहिरीत ढकलिन. कुणाच्या बाला पण कळणार नाही. तवा गेली गप्प मांजरागत. मी म्हटल पडल्या झडल्यावर लक्ष्मीचं पाहिलं तुझ. तुझी लेक येणार नाही निस्तरायला तेव्हा गपचूप घरला गेली.”

तेव्हा मालू गुरवीन म्हणाली, “ बर झाल हान्न मोडलस म्हातारीच. लई नाटकं करतिया. भांगलायला स्वतःच्या शेतात दोन्ही हातांनी रान वरबाडती. अन् दुसऱ्याच्या शेतात गेल्यावर नवशिक्या  पोरींच्या मागच, कामचुकार मेली.”

वज्रा व शांता शांतपणे हे सार बोलण ऐकत होत्या. वज्रेन ते ऐकूण  रामरक्षा म्हणायचं विसरली. व शांतीकडे बघत खुदकन हसू लागली.

शांतीला पण आपण लक्ष्मी काकूंना असं बोलल्याच वाईट वाटल. थोड्या वेळाने त्या दोघींनी आपापली दळप कांडप आटोपली.  व वज्रा आपल्या आईसोबत व शांती आपल्या घरला गेली. घरी आल्यावर वज्रेन आपल कांडप ठेवलं. व ती बाहेर शांतीसवे खेळायला निघून गेली.

…. ….. ….. …..

क्रमशः पुढे….




कथा वाकाटखोर्याची भाग ११

 कथा वाकाटखोर्याची भाग ११

११) साकरीची शाळा सुटली

लेखक : निशिकांत हारुगले

सातवी इयत्ता पार पडली. आठवीहून पुढे तालुक्याला शिक्षणासाठी जावे लागे. तेव्हा सातवीचा निकाल लागला. मुले वर्गात जमली. गुरुजींनी निकाल वाटला. वज्रा, शांती, साकरीला चांगले मार्क भेटले होते. गुरुजींनी त्यांचे अभिनंदन केले. सर्व मुला-मुलींना पुढे कसे वागावे? याविषयी गुरुजींनी मार्गदर्शन केले. शेवटी त्यांचे डोळे पाणावले. मुलांनाही रडू आले. शेवटी निकाल व निरोप समारंभ झाला. आता आपण या शाळेत पुन्हा कधीच शिकायला येणार नाही याची खंत वज्रा व साकरीला वाटत होती. 

निकालपत्रक घेऊन मुले घरी चालली. साकरी, वज्रा व शांता पण चालली. जाताना त्यांच्यात पुढील शिक्षणाची चर्चा सुरू झाली. शांतीन आपण पुढे तालुक्याला शिकण्यास जाणार हे आधीच ठरवल होत. वज्रेच काही निश्चित नव्हत. कारण पुढील निर्णय तिचे वडिलच घेणार होते. साकरी मात्र नाराज होती. तिचे वडील पुढील शिक्षणाची परवानगी देतील असे वाटत नव्हते.

 चालत बोलत केवढ्यात घर आले हे कळलेच नाही. साकरी, वज्रा व शांतीचा निरोप घेऊन घरला निघून गेली. त्या दोघीही घरी गेल्या. जाताना मात्र संध्याकाळी वाज्रीच्या घरी खेळायला जमायचं ठरवल. घरात यायला दुपारचे दोन वाजले होते. घरी आल्यावर वज्रेने आपल्या वडिलांकडे निकाल दिला. व ती हातपाय धुवायला म्होरीत गेली. हातपाय धुवून ती बाहेर आली. तेव्हा वडिलांनी तिचे अभिनंदन केले. नंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन थाबड्यातील जेवण घेतले. व जेवण केले. जेवताना अण्णा म्हणजे तिचे वडील शेजारी बसले होते. ते म्हणाले, “ वज्रा आता सातवी झाली पुढे काय करणार?”

ती म्हणाली, “पुढे काय म्हणजे?”

तेव्हा शिवानंद म्हणाला, “ पुढील शिक्षण गावी नाही. तालुक्याला जावे लागणार. त्यासाठी खर्च आला…”

आण्णाचे वाक्य पूर्ण होण्याअगोदर ती म्हणाली, “ तुम्ही मला शाळेत घालणार नाही का?”

“ तसे नाही बाळ घालणार की?” शिवानंद अडखळत बोलला.

तेव्हा वज्रा चिडली. व म्हणाली, “ का दादाला घालताना तेवढा पैसा खर्च दिसत नाही. व मला घालताना दिसतोय होय. ते काही नाही. मी पुढे शिकणार .जर का मला शाळेत घातले नाही तर मी घरातील काहीच काम करणार नाही बसा.”

तिचा अवतार पाहून शिवानंद गप्प बसला. मात्र आजी बोलली, “ अग, तू पोरीची जात. तालुक्याला ये-जा तुला जमेल का. त्यासाठी खर्च आला. आपली परिस्थिती बेताची शेतातील धान्य व दुधाचा रतीब एवढंच आपल उत्पन्न. म्हणून तुला विचारले.”

तेव्हा वज्रा हिरमुसली. ते पाहून शिवानंदाला वाईट वाटले. त्याने तिला पुढे शिकवण्याच ठरवल. त्या बदल्यात वज्रेन घरातील कामात मदत करायची. ठरल. आपल्याला पुढे शिकवणार म्हंटल्यावर वज्रेला बरे वाटले. तिने जेवण आटोपले. व ती परसदारी गेली.

सांज झाल्यावर शांती व साकरी वज्रेकडे आल्या. वज्रेच्या परसदारी त्यांनी सारीपाटाचा डाव मांडला. शांतीन वज्रेस विचारलं, “ आण्णांनी परवानगी दिली का?”

वज्रा म्हणाली, “ हो विचारलं.”

तेवढ्यात त्यांचे लक्ष शेजारील साकरीकडे गेले. तिचे डोळे टिचले होते. तेव्हा वज्रेन तिला रडण्याचे कारण विचारले. “ काही नाही ग मला आता परत तुम्हाला सकाळीच व संध्याकाळीच भेटायला मिळेल. कारण मला पुढे शिकता येणार नाही.”

शांती व वज्रेस् वाईट वाटले. पण त्याच परावलंबी असलेने काही करू शकत नव्हत्या. त्यांचा आता खेळात जीव रमेना. त्यांनी डाव बंद केला. व त्या आपापल्या घरी निघून गेल्या. वज्रा व शांतीने तालुक्याच्या शाळेत प्रवेश केला. वज्रेस घरातील कामे आटोपून शाळा जावे लागत होते. तालुक्याला त्या चालत ये-जा करत होत्या. वज्रा सकाळी लवकर उठून घरातील झाडलोट करायची. शेण काढून आजीला घरकामात मदत करायची. व नऊ वाजेपर्यंत सर्व आटोपुन शांतीसवे शाळेस जाई. 

साकरी मात्र घरकाम करी. व शेताला जात असे.तिच्या घरची परिस्थिती गरीब असलेने घरच्या जमिनीबरोबर खंडाची जमीन तिच्या घरचे करत. तिची उणीव वज्रेस शाळेला जाताना जाणवत असे. मात्र ती काही करू शकत नव्हती. शांता मात्र वज्रा आपल्या सोबत येते म्हणून खुश होती. त्या नियमित शाळेला जात असत. 

नवीन शाळा सुंदर व तिची इमारत सुसज्ज होती. पण तेथील शहरी वातावरण व तेथील मुलांचे इस्त्री केलेले कपडे व आपल ग्रामीण राहणे पाहून वज्रेस अवघडल्यासारखं वाटे. हळूहळू त्या वातावरणाची त्यांना सवय झाली. त्या दोघी व वाटेवर भेट नाऱ्या इतर गावच्या मुली संगे असत. नियमित तिन मैल चालून त्यांचा खूप व्यायाम होई. शांता जरा धाडशीच होती. तिच्यामुळे वज्रेस भीती वाटत नसे. तिच्यामुळे ती थोडी धाडसी होत चालली होती. पण कधीतरी शांती तिला भित्री भागुबाई म्हणायची. 

व्यंकूचे तास असलेने तो सायकली ने जाई. थोडया दिवसांनी शांतीने ही सायकल घेतली. त्या दोघी सायकल शिकल्या. व फेरा फराने त्या डब्बल शिट सायकल मारत जाऊ लागल्या.साकरीला रोज रानात जावे लागे. तिची शाळाच सुटली होती. एकदा शाळेतून परतताना गावच्या वाटेवरील शेतातून घरी जाताना साकरी दिसली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती. त्यावर शिराट्यांचा भरा होता. तो घेऊन ती घरला निघाली होती. तिला वाटेवर वज्रेन हाक मारली. तेव्हा लाजून तिने पाहिले. तेव्हा वज्रेन विचारलं, “ काय करायला गेली होतीस.”

तेव्हा तिने रानात गेले होते. व घरी शेण काढायचे आहे असे सांगून ती घरी गेली. तिचे नजरेन भिडवणारे डोळे सर्व काही सांगत होते. तिच्यासाठी काहीतरी दुसरे कौशल्य शिकून मदत करायचे तिने व शांतीने ठरवले. 

साकरीसारख्या मुलीला हुशार असून देखील घरी राहावे लागत होते. कारण तिची घरची परिस्थिती बेताची होती. तिचे बाबा घरची तसेच दुसऱ्याची शेती करत. म्हसीचे दूध व शेतातील धान्य हेच काय ते उत्पन्न. त्यावरच संसाराचा सारीपाट चालत असे. 

वज्रेस आठवले. आपल्याही घरची परिस्थिती बेताचीच आहे. आपले बाबा आई चांगले म्हणून सर्व चाललय. नाहीतर आपली ही अशीच गत. हा विचार तिच्या मनात आला. व अंगावर शहारा उठला शांतीच मात्र बरे होते. तिचे बाबा सोनारकाम करत. या विचारात ती घरी गेली. व घरात गेल्यावर कामाला लागली.



कथा वाकाटखोर्याची भाग १०

 कथा वाकाटखोर्याची भाग १०

 १०)लागीर 

लेखक : निशिकांत हारुगले 


शांती व वज्रेतील अबोला मिटला होता. घरी आनंदात आलेल्या शांतीला पाहून तिची आई म्हणाली, “ काय शांता आज काय घबाड सापडलय वाटत. एवढी आनंदात आहेस.”

शांती म्हणाली, “ होय, सापडलेय मी जरा वज्रेकडे जाऊन येते.”

असे म्हणून तिन धूम ठोकली. तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आले व ती बोलली, “ बापरे! या महाराणीत तह झाला. आता गावात धुडगूसच नुसता. गाव पेटवाय रिकाम्या झाल्या म्हणायच्या.”

तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती वज्रेच्या घरी आली. तोपर्यंत वज्रा म्हशी बांधून आली. शांतीला पाहून म्हणाली, “ चल जाऊ परसदारी खेळायला.”

तेव्हा ती म्हणाली, “ नको चल वडाच्या झाडाखाली पारावर.”

त्या दोघींना एकत्र जाताना पाहून वज्रेच्या आईला व आजीला आनंद झाला. आजी म्हणाली, “ या दोघी बोलत नव्हत्या तेव्हा घर खायला उठायच. आता गुळात खोबरं घातल्यासारख वाटत.”

तेव्हा वज्रेची आई पार्वती म्हणाली, “होय खर हाय तुमचं.”

वज्रा व शांती वडाखाली खेळायला आल्या. तेव्हा त्यांना केरूअण्णाच्या दारात गर्दी दिसली. तिथे काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी त्या गर्दीत शिरल्या. व वाट काढत पुढे आल्या. बायकांच्या घोळक्यात जाताना तानुबाई न्हावीन म्हणाली, “ काय नडलय बारक्या पोरांचं इथे जावा तिकडे खेळा जावा.”

तिच्याकडे लक्ष न देता त्या तशाच पुढे गेल्या. तेव्हा त्यांना केरुआण्णाची सून भिंतीला टेकून बसलेली दिसली. तिला साऊ मावशी वार घालताना दिसली. केरुआण्णाची बायको वटवट करत होती. तशी ती दातओठ खात मुठी आपटत तिला शिवा देत होती.

गोंद्याच्या हिरान पारू पाटलीनीला विचारलं, “ काय झाल ग हिला घुमायला.”

तेव्हा ती म्हणाली, “ सकाळी देवपुजेला फूले आणायला रखमा पाटलीनीच्या परड्यात गेली होती. तिथं पाय घासरून पडली. तवा रखमेच्या नवऱ्यान दंडाला धरून आणली. तेव्हापासून अशी घुमायला लागलीय.”

तेव्हा हिरा म्हणाली, “ मग काय तिच असणार चिंचणीवरची अवदसा माली. स्वतः माती खाऊन फास लावून मेली. अन् आता कोवळ्या जीवांना धरतिया.”

“ तर काय बाईसाहेब सहा महिने पण झाले नसतील लग्नाला. चुडा पण उतरला नाही बघ.” पारू पाटलीन उत्तरली.

इतक्यात केरु आण्णाची बायको म्हणाली, “ तुला घर घुसायला दुसर मिळालं नाही वाटत. माझ्यापुढे तुझ चाळ चालायचं नाहीत. आल्या वाटेने निघून गेलीस तर बर. नाहीतर राधा खेळवीन तुझी. ती पण वेताच्या काठीने. ह.सांगून ठेवते.”

असे म्हंटल्यावर तिची सून दात-ओठ खात म्हणाली, “ बघतेच मी तू मला खेळवतेस की मी तुला खेळवते. “ असे म्हणून तिने केसांचा पुंजका केला. व ती आपलं डोचक खांबनीवर आपटणार इतक्यात साऊमावसीन तिला धरल. व म्हणाली, “ हे बघ ही नाटक माझ्यापुढे चालणार नाहीत. जास्त दंगा केलास तर खरोसीला नेईन ह. काय पायजे ते मागून घे व आल्या पावली परत जा. असे बोलून तिने पार्वतीनं आणलेला महादेवाचा अंगारा तिच्या कपाळावर लावला. तेवढ्यात शिंद्यांचा दामू तिथे आला. व बारक्या मुलांना तिथून बाहेर पिटाळू लागला. तस वज्रा व शांती हातात हात धरून बाहेर आल्या. शांतीस बाहेर आल्यावर वज्रा म्हणाली, “ पाहिलस केरुआण्णाची सून काय बिचारीचे हाल.”

तेव्हा शांती म्हणाली, “ काय हाल बिल नाहीत तिचे, काय लागिर वगैरे नाही ह तिला. नाटकं आहेत नुसती. अशी भूत लागाय लागली असती. अन् ठेवलेला निवद खायला लागली असती तर चैनीच झाली असती त्यांची. केरू आण्णाची सून आधी कोकणातली. तिची नाटक कळायची नाहीत तुला. काल शेताला जाताना वटवटत होती. सासूला शिवा देत होती. या म्हातारीला उगळाच पाणी दावते म्हणून.”

“ काय भयंकर आहे नाही हे.” वज्रा बोलली.

“ मी ऐकलंय काल रात्री नवर्याशी भांडली. वेगळं राहूया म्हणून. नव्हरा ऐकत नाही म्हंटल्यावर व आपला डाव फसतोय म्हंटल्यावर लागीर झाल्याचं नाटक करतिया.”

तेव्हा वज्रा बोलली, “ खरंच काय?”

“ कोकणचं याड तुला कळायचं नाहीत. वज्राबाई. रखमा पाटलीनीच्या परसातील चिंचेच्या चिंचा मी कित्येक वेळा काढल्यात. मला का बर माली झपाटली नाही.परवा त्या शिरप्याच्या बायकोन बुट्टीभर चिंचा नेल्या कोळ करायला. तिला बर ही माली झपाटली नाही. व ही सतीसावित्री नाही का हिला झपाटली काय? चल तिकडे खेळूया, तेंच ते निस्तरू देत. काय तू तिथे जाऊन रामरक्षा म्हणणार आहेस?”

“ नाही बा. मी तिथे जाणार परत, चल तुझ बरोबर हाय. पण तुला हे सगळं कसं माहीत.” वज्रा बोलली.

“ ते आहे ना गावातील चालत बोलत वर्तमानपत्र, गणू पुजाऱ्याची सावित्री, ती काल आईला सांगत होती.”

“ ती होय, बर असुदेत चल जाऊया आपण खेळायला. “

त्या दोघी वडाच्या पारवर खेळू लागल्या. पण त्यांचा जीव रमेना. शेवटी त्यांनी खेळ थांबवला व त्या घरी गेल्या.

… … …. …

क्रमशः. पुढे…….





कथा वाकाटखोर्याची भाग २५

 २५)दादाची सायकल लेखक :  निशिकांत हारुगले. व्यंकू आता खूप मोठा झाला होता. तो कॉलेजला जात असे. घराच्या गरीब परिस्थितीमुळे वज्रेला शाळा सोडावी...